Sunday, October 30, 2011

दिवाळी आणि दिवाळखोरी.....


दिवाळी आणि दिवाळखोरी यांचा खूपच जवळचा संबंध असावा....दिवाळी नंतर येते ती दिवाळखोरी असा तो असावा. नाही आर्थिक दिवाळखोरीबद्दल नाही बोलत मी. बौद्धिक दिवाळखोरीबद्दल बोलतीये मी. तथाकथित बुद्धिजीवी वर्गाच्या दिवाळखोरीबद्दल. तशी आपण ती वैयक्तीक आयुष्यात अनेकदा दाखवूनही देतो पण सरकार आपल्याला ती जाहीररित्या व्यक्त करण्याची संधी देतं दर पाच वर्षांनी आणि या वर्षी अगदी दिवाळीत आणि दिवाळीनंतर लगेचच ती चालून आली आहे.


आजच वर्तमानपत्रात जाहीर झाल्याप्रमाणे, पुणे महानगरपालिकेने नेहरू योजने अंतर्गत फक्त एक प्रकल्प पूर्ण केला आहे आणि तरी ३ पूर्ण केल्याचा दावा पालिका करत आहे....मी राहते त्या भागात एक उड्डाण पूल गेली चार वर्षे रखडलेला आहे आणि म्हणे तो १५ नोव्हेंबर पर्यंत पूरा होईल....कसा तो देव जाणे. त्याच योजनेअंतर्गत एक कचरा गोळा करणारी एक गाडी फिरते, जी फक्त मोठ्या रस्त्यांवरून फिरते आणि छोट्या गल्लीतील कचर्याला कोणी वाली नाहीये. गेल्या निवडणूकांच्या पुर्वी बनलेला रस्ता गेल्या पाच वर्षात इतका खराब झाला आहे, इतक्या वेळा तो काही ना काही कारणाने खोदला होता की त्यावरून चालणे महामुश्कील. तुमचा जीव मुठीत घेऊन चालण्याची संधी देणार्‍या त्या सर्वांचे आपण आभार मानायला हवेत.अशाच एका रस्त्यावर या वर्षी गणपतीत एक भलं मोठं कारंज भर रस्त्यात बनवून, उरलेल्या छोट्याशा रस्त्यावर गाडी चालवण्याची कसरत करण्याची संधी एक नगरसेविका या वर्षी घेऊन आली. कदरच नाही आपल्याला त्यांची.


तुम्हाला कदाचित माहीतही नसेल की कोण तुमचा नगरसेवक /सेविका आहेत ते. पण पहा त्याना तुम्ही माहीत आहात.......... तुमच्या घरी गेल्या पाच वर्षात प्रथमच एक मिठाईचा बॉक्स त्यांच्याकडून आलेला असू शकतो. घरातील प्रत्येक माणसाच्या नावे एक ग्रीटिंग कार्ड आलेलं असू शकेल, घराजवळ फ्लेक्स बोर्ड वर दिवाळी शुभेच्छा ची बरसात झालेली असेल,पाच वर्षात पहिल्यांदाच त्यांच्या पैकी कोणी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला असेल.


एकंदरच ही राजकारणी मंडळी खूप हुशार......कोणाचं महत्व कधी आणि किती, कोणाला कधी गोंजारायचं, कधी विसरायचं यात सार्‍यानी मास्टर्स केलेलं. फक्त झोपडपट्टी किंवा गरिबांना नव्हे तर, त्याना तथाकथित मध्यम, उच्च मध्यम वर्गीय नोकरदार, बुद्धिजीवी वर्गाला ही चांगल्या प्रकारे वापरता येऊ लागलं आहे, आपली बौद्धिक दिवाळखोरी त्याना चांगलीच ठाऊक आहे. आपण आपले करियर, छंद यात मग्न. एखादी ऑनसाइटची संधी, एखादी सेदान कार, एखादं सेकेंड होम, घराबाहेर पडून मजेत घालवलेले वीकेंड्स, मुलं सो कॉल्ड इंटरनॅशनल स्कूल मधे शिकायला पाठवणे, आणि नंतर त्यानी बाहेर देशात सेट्ल होणं यात झाली...... आपल्या आयुष्याची इति पूर्तता.


आपण आपल्या मुलाना राजकारण, समाजकारण या गोष्टींकडे प्रयत्न पूर्वक वाळवणे तर खूप दूरची बाब....आपल्या पैकी किती जण तो आलेला गिफ्ट बॉक्स नाकारू शकले, किती जण दिवाळी पहाट च्या कार्यक्रमवर बहिष्कार घालू शकले, किती जण दारी मत मागायला दारी आलेल्या नगरसेवकास " बाबारे, गेली पाच वर्षे तू कुठे होतास आणि गेल्या पाच वर्षात तू या भागासाठी, इथल्या विकासासाठी काय केलेस? तू खरच भ्रष्टाचारमुक्त राजकारण केल्याचे काही पुरावे आहेत काय? गेल्या पाच वर्षात तुझया आणि तुझया कुटुंबाच्या संपत्तीत किती पट वाढ झाली? आणि त्याचा उत्पन्न स्त्रोत कोणता?" असे प्रश्न विचारू शकतील.


जाऊ दे हो हे सारे....नुकतीच मस्त दिवाळी साजरी झाली आहे, मोठी खरेदी, कपडे, फराळ, पाठोपाठ एक मस्त ट्रिप....कुठे असा विचार करून डोक्याला ताण देताय....त्यापेक्षा एक ठप्पा उमटवून किंवा मतदान न करून कोण्या एका नाकर्त्या पक्षाला सत्ता देऊन आपण आपली बौद्धिक दिवाळखोरी प्रदर्शित करण्याची चालून आलेली संधी साधू.

Monday, October 24, 2011

वाढदिवस

खरं तर प्रत्येकासाठी हा एक आनंद दिन असतो अशी माझी कल्पना आहे. मी अनेकदा अनेकांचे वाढदिवस विसरले आहे. अगदी काल रात्री पर्यंत लक्षात होता पण आज मात्र साफ विसरून गेले असं अनेकदा घडलं आहे. आणि अनेकांच्या रोषाची मी धनी झाले आहे. पण कोणी आपलाच वाढदिवस विसरतो, यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही.


मी देखील खूप आतूर असे या दिवसासाठी. पण आजकाल काहीतरी बिनसलय...मला तो दिवस जसा जवळ येऊ लागतो तसं एक अनामिक भीती वाटू लागते. काही लोकांच्या शुभेच्छा, फोनची मी एकीकडे वाट बघत असते, आणि दूसरीकडे अशावेळी काय बोलावे अशी भीती वाटत असते. त्यामुळे त्यानी तो विसरावा अशी मनोमन प्रार्थना करत असते. फोन आणि प्रत्यक्ष भेटणार्‍या व्यक्तींशी त्या दिवशी बोलताना मी खूप अवघडलेली असते. घरी दुसर्‍या कोणी स्पेशल जेवण मॅझयासाठी त्यादिवशी बनवायच्या भानगडीत पडलं तर माझा ठाम विरोध असतो, आणि मी स्वत:पण त्या दिवशी काही स्पेशल बनवायच्या विचारात नसते. बाकी घरातील सगळयांचे वाढदिवस मी प्लान करते, काहीतरी सरप्राइज़ असतं, काहीतरी त्यांच्या आवडीचे जेवण बनवते. इतर कोणाचा वाढदिवस असेल तर(लक्षात असेल तर) फोन करते गप्पा होतात. पण माझा वाढदिवस असेल तर मात्र यातलं काहीच मला नकोसं होतं. गप्प बसून असावे, फारसं काही बोलू नये, एखादं आवडीचं पुस्तक हाती असावं, आवडीचं संगीत हळूवार गुंजत असावं, साधसं काही जेवण असावं बस...अजून काही नको.

काही वर्षांपूर्वी मी माझी सोशल नेटवर्किंग प्रोफाइल डेलीट केले होते. त्यामुळे या दिवशी येणार्‍या फोन मधे निम्म्याने घट झाली, आणि मला हुश्श झाले. बाकी इतर वेळी मी इतकी गप्पिष्ट आहे पण या दिवसाच्या अवघडलेपणा मी काही कमी करू शकले नाहीये. तो एक दिवस कॅलेंडर वरून डिलीट व्हावा.


कळतं पण वळत नाही........

आज सकाळी उठून चहाचा मग घेऊन नेहमीप्रमाणे टेरेसमधे गेले, इतकी मस्त थंडी पडली होती.....अजून दिवाळी सुरू नाही झाली त्यामुळे हवाही प्रदूषीत नव्हती. मनात विचार आला, आता सकाळी चालायला जायला सुरूवात करायला हवी. पावसाळा संपला...आता न जाण्यासाठी काही कारण नाही.....नाही नाही......कारणं अशी संपत नाहीत...खूप थंडी आहे, उन्हाळा आहे, काल रात्री खूप उशिरा घरी आले, काम खूप आहे, अभ्यास करायचा आहे, पाहुणे आहेत....न संपणारी कारणे. कशा ना काही गोष्टी आपण मनापासून टाळतो? आजकाल रोज दिवसभरात अनेकदा माझया मनात येतं.....उद्यापासून जिम, चालणे, योगा काहीतरी सुरू करेन....पण तो उद्या काही उजाडत नाही. काही तरी कारण सापडताच न जाण्यासाठी.


१ तारखेपासून, सोमवारपासून, नवीन वर्षाचा असे अनेक संकल्प करून झाले, गेल्या वर्षी या तीन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्या पण माझा संकल्प जिथल्या तिथेच.अशी न आवडणार्या कामांची माझी एक मोठी लिस्ट आहे. जसं की जेवणानंतर टेबलाची आवाराआवारी, बँकेत जाणे, वाढदिवसाच्या दिवशी येणार्‍या फोनवर बोलणे, तसा अधूनमधून त्यांचा क्रम बदलत राहतो, पण व्यायाम कायम आपले प्रथम स्थान टिकवून आहे. किती प्रयत्न करून झाले, किती जिम ना देणग्या देऊन झाल्या पण नाही ती आवड मी काही केल्या निर्माण नाही करू शकले. मग कधीतरी समर्थन बुद्धिजीवी असण्याचं. कळतं पण वळत नाही, याचं यापेक्षा उत्तम उदाहरण दूसरं मिळणार नाही.

Thursday, October 20, 2011

आली दिवाळी....


दीपावली ३ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंड ची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इँटेरेस्ट होता. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता मी किल्ले मनातल्या मनात बांधते.

आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण आता ती मजा वाटत नाही. माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटक्या मुळे भाजल्यावर देखील. नारकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या सकाळी उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे.....मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची.

लगेच नंतर आजीकड़े जात असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत.
आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, आणि सारी मजा हरवून गेली.
Tuesday, October 18, 2011

सुनीताबाईं

आठवतं ते अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा सुनीताबाईंचं " आहे मनोहर तरी" पुस्तक नुकतच प्रकाशित झालं होतं, कॉलेज च्या मासिकात त्यावर मी एक लेख लिहिलेला होता...तो आता नीट आठवत नाही. पण तेंव्हापासून त्या मझयासाठी मॉडेल बनल्या मॅझयाही नकळत. आज पुन्हा एकदा ते पुस्तक पुन:प्रत्यायचा आनंद तर देतच पण अनेक त्यांच्या आचार-विचारांच्या पाऊलखूणा मी मझयात पाहू शकते अगदी त्यांच्या आईच्या देखील."आहे मनोहर तरी गमते उदास" अशी मनाची स्थिती अनेकदा होते, अनेकदा माझी मी नसतेच अशी अवस्था, कोणी आसपास असू नये, कोणी बोलू नये, डिस्टर्ब करू नये, फक्त स्वत:चाच स्वत:शी संवाद चालू राहावा...वेगवेगळे आठवणींचे पक्षी सतत मनात पिंगा घालत असतात, कधी हवेसे, तर कधी नकोशा आठवणी. जगापासून तुटक राहायला मनापासून कधी कधी आवडत्न मला. तसाच जीवन मूल्य जपायला. याच धारेत मी जगापासून दुरावते...पण त्याचीही खंत फारशी वाटत नाही मला.

नाती निभावणे तसं सोपं कधीच नसतं आणि त्या व्यक्तींसाठी ज्या सूक्ष्म विचार करून प्रत्येक गोष्ट करतात त्यांच्याकरिता तर ती एक तारेवरची कसरत बनून राहते. पु. ल. सारख्या व्यक्तीची सहचरि बनणं हे तर नक्कीच साधा सुधं काम नव्हतं.अनेक रोष पत्करून त्यानी ते निभावलं. आपल्याच जवळच्या व्यक्तींकडे इतकं तटस्थपणे पाहणं, त्यांच्या गुण-दोषांसह त्याना स्वीकारणं आणि असं करताना आपल्यातलं वेगळेपण तरीही जपणे. अजून एक गोष्ट त्या काळातच परिणाम करून गेलेली होती ती म्हणजे आयुष्यावर ठसा उमटवणार्यांच्या बद्दल ऋण व्यक्त करण्याची त्यांची सवय.... नेमक्या व्यक्त केलेल्या त्यांच्या भावना, उगीच कोणताही खोटा मुलामा न चढवता......बोरकर, जी. ए., आई, आप्पा, सासूबाई, अगदी भाई सुद्धा सुटले नाहीत यातून. सोप्या नसतात या गोष्टी. ह्या खूप भावतात मला. आयुष्यात भेटलेल्या आणि न भेटलेल्या अनेक व्यक्ती कळतनकळत तुम्हाला घडवतात. सुनीताबाईंचा वाटा त्यात थोडा जास्तच."संधिप्रकाशात अजून हे सोने, तो माझी लोचने मिटो यावी" ही सुनीताबाईंच्या आवडत्या बोरकरांची कविता तर पु. लं च्या ओठी नसेल ना?

Wednesday, October 12, 2011

छोट्या छोट्या गोष्टी

अनेक दिवस मोबाईलचं बिल नवरा भरत असे आणि आजकाल मी अचानक प्रीपेड वापरायला सुरूवात केली आणि मला दरवेळी रीचार्ज करावा लागू लागला. मग मला नवीन शोध लागू लागले. एक वेबसाइट सापडली, जिच्यावरून मोबाईल रीचार्ज विकत घेतला की मग तितक्याच रकमेचे दुसर्या कोणत्यातरी प्रॉडक्ट चे डिसकाउंट कूपन मिळते. मला मजाच वाटली. पण हे दुसरे प्रॉडक्ट म्हणजे सार्‍या चैनीच्या गोष्टी. डॉमीनोस पिझा, मॅक, फर्न अँड पेटल्स असे. ते डिसकाउंट मिळवण्यासाठी आधी एका मोठ्या रकमेची त्या प्रॉडक्ट ची खरेदी करायची आणि मग खूश व्हायचं डिसकाउंट मिळवल्याबद्दल. तोच मोबाइल रीचार्ज मी विकत घेऊ शकते समोरच्या छोट्या दुकानातून. पण नाही इंटरनेट च्या युगात आहोत ना आपण.


सुरुवातीला मी पण याच मताची होते की मस्त स्कीम आहे ही. आणि जेव्हा असा काही मला खरेदी करायचं असेल तेंव्हा असं डिसकाउंट वापरण्यात काय चूक आहे? पण तसं होत नाही. अनेकदा माझयाकडे ही कूपन्स आहेत म्हणून आपण खरेदी करतो.


शेअर्स कोणते खरेदी करावे याच्या लिस्ट मधे मी नेहमी एक नाव घेते, ज्यूबाइलंट फुड्स जी कंपनी डॉमीनोस पिझा चेन चालवते....आता बघा जी कंपनी १०० रुपयात बनतो असा पिझा आपल्याला ४५० रुपयात विकते, आणि आपण सारे तो विकत घेतो. किती काळजी आपल्याला त्या कंपनीच्या प्रॉफिट ची. मग का नाही आपण ही तिचा प्रॉफिट शेअर करू?


मला मी त्या चंगळवादी संस्कृतीचा भाग आहे याचे वाईट वाटते. लोकांना अधिकाधिक रक्कम या गोष्टींवर खर्च करायला लावा. भाजी घेताना रुपयासाठी हुज्जत घालणारा आपला समाज या बाबत कधी आवाज उठवत नाही. ग्लोबल होताना आपण जास्तीत जास्त कमवायला लागलो, जास्तीत जास्त खर्चही करू लागलो आणि ब्रँड, इंटरनॅशनल च्या नावाखाली अशा कंपन्यांचे खिसे भरू लागलो. पण असं करताना मी त्या छोट्या दुकानदाराचं तुटपुंजे उत्पन्न अजून कमी करतीये हे आपल्या लक्षात कधी येणार? थोडा विचार जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांपासून आपल्याला वाचवू शकतो.

Tuesday, October 11, 2011

भविष्यात डोकावताना

परवा एक सुरेख मैफल रंगली होती गप्पांची! अचानक आमची गाडी मुलांच्या शाळा आणि त्यापायी मोजावे लागणारे लाखो रुपये यावर घसरली. मी या मताची होते की वय वर्ष ३ असताना तुम्ही अशा रीतीने खर्च करता त्यांच्यावर तेंव्हा आपोआप तुम्ही तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू लागता, प्रत्येक गोष्ट सहजगत्या त्यांच्या हाती देऊन, काही मिळवल्याचे सुख त्याना कधी गवसत नाही. या ओघात मी असं म्हणाले की काही वर्षानंतरची परिस्थिती मला खूप भीषण भासते आहे. पण म्हणजे नक्की काय?


याच आमच्या ग्रूप मधे एक जोडपे आहे, काही वर्षांपूर्वी लग्न झाले, आईवडिलानी घरदार बांधून ठेवलेले, हे दोघे दोन वेगवेगळ्या सेक्टर मधले, ती आय टी वाली..... गेल्या दोन वर्षात त्यानी दोन घरे विकत घेतली....गुंतवणूक म्हणून. मी अशी तर समाजवादी कधी नव्हते, पण या एका बाबतीत मला तो भावतो. काय आयुष्य करून घेतलाय आपण....नोकरी मिळताच पहिला विचार सुरू होतो तो घराचा. आई बापाने सोय केलेली असली तरी. मग लग्न होतं कमवती बायको येते, १५ वर्षांसाठीचं लोन ७/८ वर्षात संपून जातं, मग आपण म्हणतो आता मी मॅझया मुलासाठी पण एका घराची सोय करू पाहतो, तो पर्यंत आई बापाचं घर ही रिकामं झालेलं असतं, तरी आपण घराचाच विचार करतो.


मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तर किमती वाढतात या अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे सदैव गगनाला जागांच्या किमती. आणि घर या गोष्टीकडे गुंतवणूक म्हणून पाहणारे आपण. काही काळानंतर गरीब आणि श्रीमंत यातील ही दरी इतकी वाढलेली असेल की श्रीमंत किंवा आपण तथाकथित मध्यमवर्गीय माणसाना आपणच कमावलेली संपत्ती संभाळताना नाकी नाउ येतील.


त्या एका गरीबाला विचारा काय कष्ट आहेत, एक वन रूम किचन चे स्वप्न बघून ते साकारताना. कुठे तरी हे कष्ट करून कमवायची लिमिट संपेल, आणि त्याचा उद्रेक होईल....."पा" मधील दृष्य आठवा, सारे गरीब संपादकाच्या घरात घुसलेले. काही वर्षांनंतर अशी परिस्थिती खरोखर उद्भवली तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही मला.


हाच पैसा आपण काही वेगळ्या सेक्टर मधे नाही का गुन्तवू शकणार? जर खरोखर आपल्याकडे गरजेपेक्षा खूप जास्त पैसा असेल तर दोघांपैकी कोणी एक फक्त मुलांकडे नाही का पाहू शकणार? सो कॉल्ड ग्लोबल शाळेत शिकणारी आपली मुलं खरच जागतीक स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार होत आहेत का? वाटत नाही मला असं. बाइक ला पैसे हवे म्हणून आजीचा खून करणारा, भन्नाट वेगाने गाडी चालवून मृत्यूला जवळ करणारा आझरुद्दींचा मुलगा, अशी अनेक उदाहरणे आसपास दिसतील. वयाच्या ५व्या वर्षी फेसबूक वर पडीक राहणारी तासन्तास मोबाइल वर गप्पा छाटात असलेली, जंक फुडवर पोसली जात असलेली, शाळेत जाताना काही हजारो रुपये पॉकेटमनीं म्हणून खर्च करणारी ही पिढी काय मूल्य घेऊन जगणार आहे, कष्टाचं मोल कधी जाणू शकतील ते? समवेदना म्हणजे काय हे अनुभवलं असेल त्यानी? एकीकडे अशी कमकुवत मूल्य घेऊन जगणारी आपली मुले नि दुसरीकडे असुया, चीड, द्वेष मनात बाळगणारा एक मोठा समाज. स्फोटक असेल परिस्थिती.

Monday, October 3, 2011

कोठे गेली ती गावे, ती राने त्या वस्त्या?

परवा एका एन जी ओ मधे जाताना लक्षात आले की या रस्त्यावरून आपण यापूर्वी गेलो होतो. एक सहा सात वर्षांपूर्वी कदाचित. पण आता तो भाग ओळखू येवू नये इतका बदलला होता. पुर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारी हिरवाई नाहीशी होऊन सिमेंट चे जंगल उभे राहीले होते. हा बदलाचा वेग फार जबरदस्त आहे. आपण शहरीकरणा साठी खूप काही गमावतो आहे. आपली अशी संकल्पना काही काळापर्यंत होती की शहराच्या बाहेर गेला की निसर्गरम्य गावे, शेते दृष्टीस पडतात. पण आता कदाचित यात बदल करावा लागेल, आणि शहराच्या बाहेर पडल्यावर दुसरे शहरच लागते असे म्हणावे लागेल. ज्या रस्त्याचा वर उल्लेख केला तो माझया ऑफीस जवळच आहे. हे आय टी पार्क जिथे वसलेलेआहे त्यात ही मधे मधे येथे पुर्वी एखादे गाव वसलेले असण्याच्या काही तुरळक खुणा आढळतात. मग गेलं कुठे हे गाव, इथली वस्ती इथले उद्द्योग? या आय टी पार्क ने इथल्या तमाम लोकाना रोजगार दिला का? नाही. अचानक जमिनीला सोन्याचा भाव आलान, टाकल्या विकून मग. मोठे मोठे कॉंप्लेक्स उभे राहीले, यांच्या दारात एस यू व्ही उभ्या राहिल्या. पैशाची काही किमत राहिली नाही. याचं एक उत्तम उदाहरण नुकतेच पाहिलेले.


मी ड्रेस शिवायला टाकण्यासाठी दुकानात गेले होते. माझया आधी तिथे २ मुली होत्या. साधारण गाववाल्या वाटणार्‍या. एक मोठी गाडी चालकासह बाहेर उभी होती. किमान १ तास वेगवेगळ्या फॅशन त्या ड्रेस मधे सुचवून त्याना त्या पसंत पडत नव्हत्या. शेवटी अनेक फॅशन मासिके चाळून त्यानी कसा ड्रेस शिवायचा ते नक्की केला. मी वैतागले होते हा प्रकार पाहून. त्यांचा संपल्या शिवाय टेलर दुसर्या कडे वळणार नव्हता. त्याने त्यांच्या सर्व गोष्टी चा बिल केलं रु.१०४५ ...एका ड्रेसची शीलाई! तसं मटेरियल ही अगदीच साधा वाटत होतं, म्हणून त्या गेल्यावर मी कापडावरचा प्राइस टॅग पहिला तो होता रु. ३२५/- फक्त. आता बोला.


एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरीकरणाची आपल्याला खरंच गरज आहे का? अशी वेळ काही वर्षानंतर येणार तर नाही ना की अन्न धान्य आपण १००% आयात करू आणि तरीही महासत्ता होण्याची स्वप्ने पाहू. शेत, हिरवळ हे सारं आपल्या पुढच्या पिढ्या चित्रात पाहतील नाहीतर भरपूर पैसे खर्च करून एखाद्या पर्यटनस्थळीच पाहू शकतील. देवा, तो दिवस बघायला मला या जगात ठेवू नकोस रे बाबा. :(