Saturday, August 11, 2012

जिन्दगीका सफ़र है ये कैसा सफ़र.......

पाय टाकायला जागा नाही इतकी गर्दी. गोतावळाच इतका त्यांचा. नातेवाईक म्हणू नका, ओळखी पाळखीचे, शिवाय क्लासमध्ये येणाऱ्या साऱ्याजणी. आज अचानक सारा खेळ संपतो. अनेकांना रडू आवरत नाहीये. घरचे, दारचे सर्वच जण यात आहेत. शांतपणे ती एका कोपऱ्यात उभे राहून सारे पहातीये. अगदी निर्विकार असा तिचा चेहरा. प्रयत्न करतीये ती, ओळखण्याचा, आसपासच्या कोणत्या मंडळींचे चेहरे खरे. आश्चर्य वाटतंय, अचानक माणसे अशी कशी वागू लागतात. आज आता इथे वागता-बोलता आहेत ते खरे की पूर्वीचे? अचानक दुखाचे महापूर कोठून आले? मागे उरलेल्या बद्दलची काळजी अचानक कशी व्यक्त होवू लागली? माणसे गेल्यानंतरचे हे प्रेम, नाही यातले थोडे तरी ती जिवंत असताना का उफाळून येत नाही? ईगो इतके कसे मोठे बनतात? इतर वेळी इतर लोकांसारखीच असणाय्रा तिला, या बाबतीत मात्र त्यांच्या सारखे वागता येत नाही.
पहाटेपासूनच, अगदी ती बातमी कानी आल्यापासून तिने बरीच आवश्यक अशी कामे उरकली आहेत. सर्व तयारी, साडी चोळी हार फुले इतकेच काय तर नंतर दिवा तेवता ठेवायला पणती, वात, विटा, कणिक, तेल इतपर्यंत. सारे फोनही लोकांना तिनेच केले. प्रत्येक फोनवर तीच माहिती सांगायची, लोकांचे तेच प्रश्न, हिची तीच उत्तरे. मुळात अनेकदा खात्री करून तिलाच ही बातमी खरी वाटत नव्हती, प्रत्येक फोन वर बोलताना तिलाच प्रश्न पडे, "हे सारे खरे आहे ना?" पण वेळ तर तिने निभावून नेली. हळू हळू सगे सोयरे सारे जमले. प्रत्येकजणच फार दु:खी दिसत होता. आता ती एकटी झाली. कोण होत्या त्या तिच्या ? सारे उरकले, मंडळी पांगली. अनेकांनी आपले दु:ख चांगल्या रीतीने जगाला दाखवून दिले. कुठे तरी घरात कुजबुज ही झाली " जरा म्हणून हिच्या डोळ्यात पाणी नाही, काहीच कसं वाटत नाही? " " किती कमाल आहे बाई". ती ही कानी पडली. यांच्या पैकी कोणी तिला पुस्तक वाचताना, किंवा एखादी टी. व्ही. सीरिअल पाहतानाही झरझर डोळे ओले केलेलं पाहिलं नाहीये का? एकंदरीतच लोकांना इतरांना "लेबले" लावायला फार आवडते.

माणूस गेलाय पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत त्याच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आता नवीन आठवणी निर्माण होणार नाहीत , पण जुन्याही माझ्या कोणी हिरावून घेऊ शकणार नाही.तिला आठवत राहिल्या त्या, त्यांच्याशी घडलेले संवाद. त्यांचे खालून वर फोन करणे, काहीतरी खाऊ न चुकता तिच्या घरी पोहचवणे. एखादी गोष्ट त्यांना सांगितली म्हणजे झालीच म्हणून समजा. असा तिचा अनेक वर्षांचा अनुभव. घर संसारात फार रमायचा स्वभाव नव्हता, पण उत्तम जनसंपर्क होता. तसं थोडा जगावेगळच व्यक्तीमत्व होत्या त्या. तिच्या डोळ्यासमोर अनेक असे क्षण उभे ठाकत होते. या आठवणी महत्वाच्या. त्या इतक्या सहज पुसल्या जाणार नव्हत्या. त्यांचे दिवस होतात न होतात तोपर्यंत जवळची माणसे आपल्या मूळ पदावर आली. पुन्हा हिला प्रश्न पडला की कोणती रूपे खरी. मृत्युच्या संवेदना इतक्या बोथट? इतके सहज आयुष्य पुन्हा पाहिल्यासारखे कसे होते?

मृत्यूचं दर्शन तसं तिला नवीन नाही. पहिला मृत्यू घरातला पहिला तेंव्हा अगदीच लहान होती, त्यामुळे फारशी जाणीव नव्हती. गमावली होती तिने पणजी. नंतर कित्येक दिवस आठवत राहिला तिचा मऊ हात ज्यावर डोकं ठेवून ती झोपी जात असे. नंतर काही वर्षांनी पणजोबा आजारी पडले कुठे तरी जाणीव आधीच झाली होती कदाचित त्यांच्या जाण्याची. त्यांच्या जायच्या एक दिवस आधी संध्यकाळी, ती दुधाचा कप धूत होती. नळाखाली तो धरून त्याकडे पाहत राहिली. मनात विचार येत होते " जगात असंच घडत असेल, जुनं पाणी वाहून जात असेल, नवे त्यात पडत असेल, मग नव्याला जागा हवी तर जुन्याला जायलाच हवे". तेंव्हा नुकताच काही दिवस आधी तिला आतेभाऊ झाला होता. आज मागे वळून पाहताना विचार येतो तिच्या मनात १० वर्षाच्या मुलीच्या मनात असे विचार येऊ शकतात का? की ते अकाली प्रौढत्व होते? दुसऱ्या दिवशी ते गेले. आदल्यादिवशीच्या विचारांनी कदाचित, धक्का बसला नाही त्यांच्या जाण्याचा.

मग अशी वेळ आली की मृत्यूचे दु:ख करायला वेळच नाही मिळाला. वयाच्या १५ व्या वर्षी अचानक तिचे बाबा गेले. थिजून गेली ती. काही दिवसांवर आलेली १० वीची परीक्षा. भान आले तेंव्हा मनात पाहिला प्रश्न आला "पुढे काय?" लोकांची सहानुभूती काही क्षण राहील, पण "पुढे काय?" आपली आपणच उत्तरे सापडत गेली मार्ग निघत गेले. दु:ख करायला फुरसतच नव्हती. तेंव्हा पासून अशीच दगड बनलीये ती. लहान सहन गोष्टींनी हळवी होणारी ती, मोठी संकटे मात्र झेलते. जगासारखे रडून तिला दु:ख व्यक्तच करता येत नाही आता. काही बोलणं या विषयीही नाही पसंत तिला. दु:ख मनात ठेवून "पुढे काय?" ची उत्तरे ती शोधू लागते. यावेळी ही तसंच काही घडलंय. आज जवळपास महिना होत आलाय, वरवर सारे ठीक दिसत असले तरी तिचे मन अजून थाऱ्यावर नाही. त्यांचे विचार अजून मनातून गेलेले नाहीत. रात्र रात्र झोपेशिवाय जातीये. वरकरणी सर्व, घर ऑफिस सुरळीत सुरु आहे, पण कुठेतरी काहीतरी अधुरं आहे. तिला माहीत आहे "काळ" हेच सर्व गोष्टींवर उत्तर आहे. तरीही.................

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!