Saturday, January 21, 2012

माझिया जातीचा मज कोणी भेटो..........

सध्या अनेक मराठी पुस्तकं वाचतीये...म्हणजे सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी एक, घरी आल्यावर एक, वीकेंड चा तिसरंच...मजा वाटत आहे. सर्वात वेड लावलंय ते "सुनीताबाई देशपांड्यांच्या - प्रिय जी. ए." या पुस्तकाने. "माझिया जातीचा मज कोणी भेटो" ही प्रत्येक माणसाला निरंतर वाटणारी ओढ असते. जी. ए. आणि सुनीताबाई मधील हा पत्र-संवाद ही काहीसा असाच. हा एकतर्फी संवाद इतका वेड लावतो तर दुतर्फी पत्रोत्तर वाचणे म्हणजे तर जणू एका सुंदर नात्याचे मूक साक्षीदार होण्याचे भाग्यच .... 


खरंतर यापूर्वी पण त्यांनी मला भारावून टाकलं होतं, जेंव्हा "मी आहे मनोहर तरी" वाचलं होतं. तेंव्हा कॉलेजमध्ये होते मी आणि ते पुस्तकं नुकतंच प्रकाशित झालं होतं , आणि त्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, तेंव्हा मी कॉलेज च्या एका वार्षिक अंकात " आत्मवृत्तावर अशी झोड उठवणं कसं चुकीचं आहे" हे ठसवणारा लेख लिहिला होता. 

आत्ता पर्यंत अनेक व्यक्ती "बाप माणूस" वाटल्या, अनेक खूप आवडल्या पण कोणाचं अनुकरण करावं असा कधी वाटलं नव्हतं, ही पहिली व्यक्ती जिच्या पाऊल खुणा धुंडाळत आपण चालावं असं वाटून गेलं.

Thursday, January 12, 2012

याचसाठी केला होता अट्टाहास.

एखादी महफिल असते. कधी कान इतके तृप्त होतात, वाटतं बस हेच ते, याचसाठी केला होता अट्टाहास. तर कधी सूर लागतात कधी लागत नाहीत, कधी तानपुरे जुळतात कधी जुळत नाहीत, कधी कधी सर्वोत्तम गायकाला मनाजोगी साथ मिळत नाही, कधी सर्व काही उत्तम जमून येते तरीही रसहीन होते महफिल. तरीही रसिक सवाई गंधर्वला जाणे सोडत नाहीत. एखाद दिवशी एखाद्या महान गायकाचं गाणं रंगलं नाही म्हणून त्याला ऐकणं कोणी सोडत नाही. त्याचं महत्त्व काही कमी होत नाही.
आयुष्य म्हणजे वर्ल्ड कप फायनल नसते की आज नाही जिंकलो तर संपले सारे. जिंकणे हरणे काही क्षणांची बात.
आयुष्य म्हणजे अशीच रोज नव्याने जमणारी मैफील असते. सतत कलाकार बदलत असतात प्रत्येकाची तऱ्हा निराळी, हर एकजण आपल्या गळ्यातून काय हरकती काढेल माहीत नाही. कोणी मनात मावणार नाही इतका आनंद देवून जाईल तर कोणी निराशा करेल. दर दिवशीचे वेगवेगळे राग निराळे, आपण कधी कलाकार तर कधी रसिकजन. मैफिलीला रोज उपस्थिती लावणे हे आपले काम.

Wednesday, January 11, 2012

छोट्या छोट्या गोष्टी वरून इतके वाद......

उगीच काय रे छोट्या छोट्या गोष्टी वरून इतके वाद

मला सोडून देण्याचा हा तूझा भलता नाद

जरा कल्पना करुन पहा त्या सुन्या दिवस रातींची

आणि भकास विरलेल्या आयुष्याची.....................

मी गेल्यावर तुझे मित्र टोळ घालतील धाड़ घरी

कोमेजुन जातील माझी सारी वृक्ष वल्लरी

वाहू लागतील वारुणीचे पाट

आपल्या नीट नेटक्या घराची लागेल वाट

मजा वाटेल चार दिस, वाटेल झाली सुटका

मित्र देतील साथ घटिका दोन घटिका

मग उरेल मागे सुने सुने आयुष्य

घरातील प्रत्येक गोष्ट देईल आठवण फक्त माझी

म्हणून म्हणते जरा कल्पना करुन पहा

त्या सुन्या दिवस रातींची आणि भकास विरलेल्या आयुष्याची...........

Tuesday, January 10, 2012

तुझं आकाश

तुझं आकाश माझ्या डोळ्यांपेक्षा वेगळं असतं का?
आकाशात बुडून जाताना तुला घड्याळ दिसतं का?
दोघं सोबत असता काळ थांबतो आपल्यासाठी
दोघांखेरीज बाकी जगही असतं, सांग हे तुला कधी स्मरतं का?