Sunday, September 30, 2012

चला चंगळवादी होऊयात .... ? का कशासाठी ???


३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
आज लोकसत्ता मध्ये चतुरंग सोबतच लोकरंगही पाठवलात त्याबद्दल मनापासून आभार. काय होतं ना वर्तमानपत्र न येण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार असेल ना तर मी फार अस्वस्थ होते, चतुरंग /लोकरंग वाचायला मिळणार नाही म्हणून. तसे वर्तमानपत्र डोळसपणे मी वाचायला सुरुवात केली ते माधव गडकरी संपादक असण्याचे शेवटचे दिवस असावेत. तेंव्हापासून लोकसत्ता फार आवडीने वाचते आहे. अगदी केतकरांचा प्रो कॉंग्रेस असणे याकडे डोळेझाक  करून. आपण संपादकपदी आलात, तेंव्हा वाटले चला बरे झाले. अनेकदा आपले "अन्यथा" हे सदर मी नुसतेच वाचत नाही तर फेसबुकवर किंवा पूर्वी इन्फी बीबी वर शेअरही करत असे. तर जशी तुमची पटणारी मते/ यांना शेअर केले तसे न पटलेल्या गोष्टींचे ही व्हावयास हवे म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच एक सांगू इच्छिते की मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. कारण राजकारणी लोकांनाच मुळात राजकारण सोडून बाकी कशाशी बांधिलकी नसते. मला वाटतं नमनाला इतकेच  तेल पुरे......कारण जगण्याच्या अपरिहार्यतेने असले तरी मनापासून मी "चंगळवादी" संस्कृतीचा भाग होवू इच्छित नाही.

तर आपण म्हणता त्या प्रमाणे चंगळवादाची व्याख्या करता येत नाही. आपण म्हणता त्या अर्थी खरेच असेल ते. पण काही उदाहरणे बघू आणि त्यातून मला  काही बोध होतो का ते पाहू. समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. पण मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, मग आणखी थोडे पेट्रोल जाळते पार्किंग साठी जागा शोधताना. तिथे आत जाते. कोणता तरी स्वस्त दिवस असतो तो. त्यामुळे तिथे पेप्सीच्या २ बाटल्या ९० रु. त मिळत असतात मला वाटते चला पैसे वाचत आहेत घेवून टाकू दोन लिटर. इथेच हे थांबत नाही, तिथे अजून अशाच चार सो कॉल्ड स्वस्त गोष्टी असतात. मी त्याही उचलून आणते घरी. शेवटी बऱ्यापैकी खिसा रिकामा करून पुन्हा पेट्रोल जाळून मी घरी पोहचते. आता बघा माझी गरज होती (?) १ लिटर पेप्सीची त्या स्वस्तच्या मोहापायी मी किमान ९० रु आणि पेट्रोल चे थोडे असे पैसे त्यावर खर्च केलेत कमाल  किती राम जाणे. माझ्या दृष्टीने गरज नसतानाही गरज असल्याचा आभास निर्माण करणे, व त्यासाठी खर्च करणे हा चंगळवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे १०० रु. लिटर चे तेल ९५ रु. लिटर प्रमाणे देणे त्यांना परवडते. साधारण सर्व शहरांमध्ये होलसेलची दुकाने असतात, जिथे हेच तेल जर १२ चा बॉक्स घेतला तर ८५ रु. लिटर प्रमाणे मिळते. ते देखील हवा असलेला ब्रान्ड. असं कधी अनुभवलंय का कोणी की या सुपर मार्केट्स मध्ये काही ठराविक ब्रान्ड च मिळतात. म्हणजे पुन्हा ५ रु स्वस्त साठी तडजोड आलीच.

तुमच्या म्हणण्यानुसार "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीत विकृती आहे. माझ्या मते आज झोपताना अंथरूण पाहून पाय पसरावेत, उद्या सकाळी उठून ते मोठे कसे होईल ते पाहावे आणि त्या दृष्टीने पावले उचलावीत. गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्नांनी अंथरूण लांब करत राहा हो आणि खुशाल पाय पसरत राहा, पण प्रत्येक वेळी अंथरुणावर टेकल्यावर "अंथरूण पाहून पाय पसारा" हे लागू होतेच ना? 

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, त्या आमच्या विरुद्ध अशी ओरड समाजात नेहमी आढळते ती म्हणजे सारी महागाई आमच्या मुळे आहे, आमच्यामुळे चंगळवाद बोकाळलाय. तुम्ही म्हणता तसं  लोक जास्त हॉटेल मध्ये जातील तर, ती चांगली चालतील, तिथे काम करणाऱ्यांचे वेतन आणि राहणीमान उंचावेल.....खरच असं घडेल का हो. नाही, कारण माझ्या घराजवळ एक  छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. दुसरा मुद्दा असा की जी गोष्ट घरी बनवताना मी "दिलसे" बनवते, तशी बाहेर कोणी बनवून देतं का हो? कितीही पैसे मोजायची तयारी ठेवली तरी माझ्या घरच्यांना सेम माझ्या हातची चव विकत आणता येईल का? 

तुम्ही म्हणता तरुण मुलीना लोणची पापड घरी न करता, विकत घेण्या बद्दल अनेक तरुण मुलीना ओरडा खावा लागतो. मला वाटता यात दोन मुद्दे आहेत, करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. जसा की गेली काही वर्षे दिवाळीत फराळाचा एकही पदार्थ मी घरी बनवू शकले नाही, उत्तमोत्तम पदार्थ पुरवणाऱ्या  चितळे, वृंदावन या दुकानांवर मी अवलंबून आहे. कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी रोज घरी स्वयंपाक किंवा किमान पोळ्या विकत आणते का? ५ रु एक पोळी मिळते. त्यापेक्षा उत्तम प्रतीचे गहू तेल घरी विकत आणून, एका उत्तम पोळ्या बनवणाऱ्या गरजू स्त्रीस घरी कामास ठेवणे मला चालेल जर इतकाच माझ्या वेळेचा प्रॉब्लेम असेल तर. यातूनही रोजगार निर्माण होईलच ना?

सधन आहे आणि सो कॉल्ड बिग बझार, मोअर सारखी किंवा उद्या येवू घातलेली परदेशी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात म्हणून मी तिथे जावे का? किंबहुना मी सधन आहे म्हणूनच  मला गुलटेकडी सारख्या किंवा  वाशीतील ए. पी. एम सी. सारख्या मार्केट मध्ये जाणे शक्य आहे. वर्षाचे उत्तम क़्वालीतीचे  समान आणणे शक्य आहे, ते साठवून ठेवण्यासाठी करावी लागणारी उस्तवार मी करू शकते आणि उत्तम प्रतीचे धान्य वर्षभर खाऊ शकते. असे करूनही जे काही थोडे समान दर महिन्याला आणायचे असते, ते जर मी घराजवळच्या किरकोळ वाण्याच्या दुकानातून आणले तर समजा माझे १००० रु. खर्च होत असतील तर मोअर, बिग बझार येथे जावून मी किमान दीडपट पैसे खर्च करून येते. कारण इतक्या तेवढी गरज नसलेल्या वस्तू तुमच्या बरोबर अशाच घरी येतात.....याला चंगळवाद म्हणू यात का?

तुम्ही म्हणता "आपल्याला घाऊक बाजारातील दर आणि या किरकोळ विक्रीच्या दुकानातील दर यांत प्रचंड फरक आढळतो." अगदी खरं ! पण मोअर, स्टार बझार ही दुकाने आपल्यास घावूक भावात खरंच या गोष्टी देतात का? याच वर्षीचे उदाहरण आहे. गुलटेकडी तून तुरडाळ उत्तम प्रतीची मला मिळाली ५० रु. किलो, आणि त्या नंतरच्या आठवड्यात स्टार बझार ने स्वस्त ची जाहिरात केली त्यात भाव होता ७० रु. जी स्वस्त ते विकत होते, ६५ रु किलो.....आता हे स्वस्त घाऊक भावात झाले  का?

जुने ते सर्व वाईट, टाकावू  किंवा आपल्याकडची सर्व मुल्ये टाकावू असे का आपले होते आहे. गरजेशिवाय केलेला अफाट खर्च म्हणजे चंगळवाद असे ठरवले तर हे नक्की ही सारी मोठी चकाचक दुकाने चंगळवाद वाढवण्यास नक्कीच मदत करतात. तरीही आपण त्यांचे समर्थन करायचे आहे का? 

Saturday, September 29, 2012

गणपती बाप्पांच्या डायरीतून .....


"चला पुन्हा एकदा १०/११ दिवसांसाठी पृथ्वीवर पाहुणे म्हणून जायची वेळ झाली. आजकाल ना नको वाटतं हे दर दर वर्षी तिथे जाणं. काय काय पाहावं लागतं, फार मनस्ताप होतो. पण काय करू ठरवल्या प्रमाणे जावे लागेलच....उंदीरमामा, चला तयार आहात ना?"

"हुश्श, पोचलो एकदाचा, काय हे ट्राफिक या शहरात, किती गाड्या रस्त्यावर! काय झालंय या देशात?  मंत्री, पंतप्रधान राष्ट्रपती येणार म्हंटल्यावर रस्ते लोकांसाठी बंद करायची पद्धत आहे, पण माझ्यासाठी नाही, कसाबसा उंदीरमामांबरोबर पोहोचलो. सकाळी ९:३० पर्यंतचा मुहूर्त एका पंडितांनी सकाळ मध्ये दिला होता, म्हटलं आपल्यामुळे मुहूर्त चुकायला नको. पण दमलो बुवा."

" सकाळपासून इथे येऊन बसलोय, मंडप सजवलाय, पण कार्यकर्ते कुठे आहेत? आजूबाजूच्या घरातून सुग्रास भोजनाचा सुवास दरवळतोय, पण पूजा झाल्याखेरीज कोण मला नैवैद्य दाखवताय? शोधलं पाहिजे कारण या थंड्या स्वागताच पुढच्या दहा दिवसात इथे बसल्या बसल्या"

"जेवण नाही, वामकुक्षी नाही, हे काय चाललाय? रात्रीचे साडेसात वाजले, बाजूच्या आपटे काकूंनी काय काय बनवले होते, मोदक, अळूवडीचाच नव्हे तर संध्याकाळच्या प्रसादाचा ही सुवास दरवळला. दणक्यात तास भर आरतीही चालू आहे. इथले लोक कुठे गायब आहेत? मागच्या वर्षी अनेक  माणसे रोज सकाळ संध्याकाळ येऊन पाया पडत होती, बाप्पा या वेळी निवडून येवू देत म्हणत होती, रस्ता अर्धा अडवून तिथेच कारंजे बनवले होते, मग या वर्षी काय झाले? अजून माझी प्रतिष्ठापना नाही. पृथ्वीवर "गुरुजींचा" मोठाच तुटवडा आहे वाटतं?"

"आले एकदाचे. बरोबर एक किरकोळ गुरुजी घेवून,  काय पुटपुटत होता तोच जाणे. शेवटी एक दोन आरत्या कोणी तरी म्हंटल्या आणि मग सुरु " ओम गं गणपतये नमः: ची सी डी. दरवर्षी १० दिवस रोज संध्याकाळी इथे फक्त हेच वाजते."

"आरतीला दरवर्षी एक आपटे काकू यायच्या, त्यांच्यामुळेच सर्व आरत्या रोज संध्याकाळी कानी पडायच्या. फार हौस हो त्यांना. भजनाचा एक कार्यक्रम ही करायच्या. आज त्या आल्या नाहीत पण स्टेजवर त्यांचा फोटो हार घालून ठेवलाय. अरे अरे. गेली ३० वर्षे मी त्यांच्याच आवाजातली  आरती ऐकतोय, त्यांनी बसवलेले करमणुकीचे कार्यक्रम आनंदाने पाहतोय. किती दिवसांच्या तयारीने छोट्या छोट्या  मुलांकडून त्या ते करून घेत असत, कौतुकाने मी सारे बघत असे. या वर्षी यांनी आरतीची पण सी डी आणली आहे तर."

"सकाळी कोणी फिरकत नाही संध्याकाळी कोणीतरी सहा वाजता येते, पडदा सरकवून जाते, दिवा बत्ती करून जाते, पुन्हा कोणी नाही. नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, पुन्हा स्वर्गात परत गेलो की इथला एकदा हिशोब पहिला पाहिजे, कोणी काय मागितलं, आणि आपण कोणाला काय काय दिलं ते. मी ही विचार करतोय, या लोकांसारखेच, आपणही दर पाच वर्षांनी यावे काय?"

"आज एक नगरसेवक बाई आल्या होत्या सकाळीच, सोबत आमदार होते, त्यामुळे बाईंचे माझ्याकडे लक्षच नव्हते. त्या आमदारांच्याच सर-बराईत गुंतल्या होत्या. रक्तदान शिबीर आयोजित केले होते, दोघांनी तिथे पण भाषण केले. शब्दा शब्दाला मला हसू येत होते. आख्या ४ तासात अवघ्या १० लोकांनी रक्तदान केले. यांनी का नाही केले, आणि त्यांचे टगे कार्यकर्ते? ते नुसतेच गाड्या उडवत आले आणि गेले, कठीण आहे, पण सांगू कोणाला, १० दिवसांची शिक्षा आहे मला ही दरवर्षी."

"तरी बरं, दर वर्षी लोकमान्य मी स्वर्गात परत गेल्यावर विचारतात इथला इति-वृतांत.तेंव्हा  त्यांना मी हे काही सांगत नाही. उगीच बिचारे दु:खी व्हावयाचे. त्यांना उगीच अजून वाटते की त्यांनी सुरु केल्या प्रमाणे हा उत्सव चालतो, भजन, पोवाडे, भाव-भक्तीगीते, शास्त्रीय संगीताचे  कार्यक्रम, मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणे, अहो लोकमान्य, ते शेवाळकर, शिवाजीराव, वसंतराव, भीमसेन  आता तुमच्याच सोबत आहेत ना? मग भाषणे देणार कोण आणि शास्त्रीय संगीत गाणार कोण?" 

"आज नववा दिवस. सत्यनारायणाची पूजा झाली. हुश्श जायचा दिवस जवळ आला म्हणायचा. आता शेवटचा एक दिवस स्पीकर वरून कोणतीही गाणी ऐकवून घेतील, असो, पण उद्या परत जायचे आहे. पूजेला पुन्हा नगरसेवक बाई आणि त्यांचे पतीदेव आले होते. जात पडताळणी च्या केस मधून सलामत सुटू दे असं काहीसे म्हणाल्या. हे काय असतं मला माहित देखील नाही. आणि श्री. नगरसेवक म्हणाले बाप्पा मध्यावधी निवडणुका होवू देत म्हणजे, हिलाच आमदारपदासाठी उभे करतो. सोबत त्यांचे चिरंजीव होते म्हणाले बाप्पा तेवढी जमीन लाटल्याच्या प्रकरणातून सोडव बाबा, आणि कित्येक दिवस आई-बाबांकडे एक ऑडी मागतो आहे, या वर्षी ती मिळूदे बाप्पा. पूजा झाली, धार्मिक कार्यक्रम संपले, आता आयटम नंबर ची गाणी सुरु. दरवर्षी माझ्या माहितीत भर पडते, इथे येऊन. मग मी ती स्वर्गात जावून इतर देवांना ऐकवतो. तसा माझ्या इतका मुक्काम एक देवी सोडल्यास कोणीच करत नाही ना इथे." 

"अजून वाजले की बारा आहेच का? नवीन काय तर म्हणे हलकट जवानी? हे काय प्रकरण? बाकी शीला, मुन्नी, जलेबीबाई अजून आहेतच. सोबत पुणेकर बाई आणि त्यांची गाणी होतीच. उद्या जायचे आहे, आता शांत झोपू द्या रे"

"जायचे म्हणून भल्या पहाटे उठून तयार बसलोय, पण अजून कोणी फिरकले नाही. आठ वाजले आता"

"सकाळी ९ वाजता कोणीतरी आले, सगळ्या भूपाळ्या लावून गेले, गणपतीसमोर सगळ्या देवांना उठवून झाले, घनश्याम सुंदर, उठी श्रीरामा, उठ पंढरीच्या राया, उठा उठा हो गजानना, अरे देव म्हणजे काय तुमच्या सारखे आहेत का ९/९ वाजे पर्यंत झोपून राहणारे?

"जायचे जायचे म्हणता, संध्याकाळचे ९ वाजलेच. सात वाजल्या पासून इथे नुसतेच एक ढोल पथक आणि झांज पथक वादन करतंय. पण जायचं कुठे अडलंय? समोर रांगोळी काढून झाली, मग निघालो, हळू हळू  ठिक  ठिकाणी थांबत, महापौर, उप-महापौर, अनेक राजकीय पुढारी यांना  दर्शन देत निघालो. महत्वाची माणसे ना ती. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना नारळ दिला, तो कशाला? या वर्षी इको फ्रेंडली म्हणत गुलाल नव्हता. ते एक बरे झाले, इतका उधळत असत तो, नंतर चार दिवस डोळे नुसते चुरचुरत माझे. एकदाचा नदीवर पोहचलो. मोठा जयघोष झाला. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! कुठेतरी आजी आजोबांचे डोळे पाणावले, काकूंना वाईट वाटले, बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले मला निरोप देताना, त्या साऱ्यांसाठी तरी मला परत यायलाच हवे. मनात म्हटलं येतो बाबांनो! 

पुनरागमनायच .....

Friday, September 28, 2012

गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.....

असं कधी झालंय का तुमच्याबरोबर ? की एखादी व्यक्ती, जिची आणि आपली प्रत्यक्ष ओळख नाही, आपले लौकिक अर्थाने काही नाते नाही, जिला आपण ओझरते देखील भेटलो नाही, आता ती व्यक्ती या जगात नाही, अशा व्यक्तीची तुम्हाला आठवण येते आणि डोळे वाहू लागतात. असं घडत होतं मध्यंतरी काही दिवस माझ्याबरोबर. रात्री गादीला पाठ टेकवली, आणि शांत विचार सुरु झाले की त्यांची आठवण.................. अनेक त्यांच्या तोंडाची वाक्ये जशीच्या तशी आठवत. तोच चेहरा भरल्या डोळ्यासमोर तरळत राही. तोच तो गोल चष्मा, कपाळावर थोडे वर लावलेले कुंकू, नीटनेटकी साधीशीच साडी, ओठांच्या या टोका पासून त्या टोकापर्यंतचे हसू. असे वाटे की आत्ता गप्पा मारायला सुरु करतील, मधेच अनेक कविता, संत साहित्याचा दाखला देत आपले म्हणणे पटवून देतील. कधी बा.भ., कधी आरती प्रभू, कधी मर्ढेकर तर कधी जी.ए. त्यांच्या बोलण्यातून डोकावतील. मनातलं सारं खरंखुरं बोलून मोकळे होणे हेच पटेल, अनेकदा ते बोलणे कडवट, दुसऱ्यांवर टीका केल्यासारखे पण वाटेल, पण ते खरे असेल.



काल घरात दिवाळीत कुठेतरी ४ दिवस फिरून येवू अशी चर्चा चालू होती. खरतर मनापासून मी या गोष्टींसाठी तयार नसते. मुळातच फार हिंडण्या फिरण्याची मला आवड नाही आणि जायचंच तर त्या साऱ्या प्रवासात घरापेक्षा चांगल्या गोष्टी आणि कमालीची शांतता मिळणार असेल तरच जायची माझी तयारी असते. नाहीतर घरच्यांसोबत चार सुट्टीचे दिवस घरीच मी आनंदाने घालवू शकते. तशीही माझ्या घराइतकी चांगली जागा या जगात दुसरी कुठेही नाही यावर मी ठाम आहे. त्यामुळे अनेकदा चर्चेची सुरुवातच मुळी माझ्या नकाराने होते. पण फक्त "तारकर्ली जवळ "धामापूर" आहे या एका गोष्टी साठी मी तयार झालीये. खूप मनापासून वाटतंय की जिथे त्यांचे बालपण गेले त्या धामापूरच्या तळ्याकाठी काही शांततेचे क्षण अनुभवावेत. काही दोघींमधील नात्याचा धागा सापडतो का ते पाहावे. अगदी कळत्या वयापासून खरतर कोणाचे अनुकरण करावे असे वाटले नाही पण या मात्र अपवाद ठरल्या. माझ्यात अनेकदा मी त्यांना पाहते. गुण आणि दोष यांच्या सीमारेषेवर आढळणाऱ्या काही गोष्टी आमच्यात समान असतीलही. पण कधी कधी ना त्या माझे मनच सारे व्यापून टाकतात. तशा काही ना काही समान गोष्टी अनेक माणसांमध्ये असतातच ना मग कुठे आपण तेंव्हा प्रत्येकवेळी हे धागे शोधतो का? मग यांच्याच बाबत असे का?


त्या गेल्या तेंव्हा काहीकेल्या मनाची अस्वस्थता जात नव्हती. मग पुन्हा एकदा त्यांची जमेल ती पुस्तके पुन्हा पुन्हा वाचतच गेले. आमच्या काय नक्की नाते आहे हे तपासत राहिले. काही ठोस म्हणावे असे सापडले नाही, पण त्यांच्याशी जुळलेली मनाची नाळ मात्र तुटायचं नाही म्हणत राहिली. त्यामुळे आज लौकिकार्थाने नाहीत पण त्या माझ्याशी जोडलेल्याच आहेत.


मी त्यांच्या इतकी करारी आणि प्रज्ञावंत नाही, आग्रही नाही, नीट नेटकी नाही. अनेक वेळी माझी स्मरणशक्ती दगा देते, आणि काही वेळा काही गोष्टी विसरू म्हणता विसरू देत नाही. त्यांच्या इतकी प्रत्येक गोष्टीसाठी मी आग्रही राहत नाही आणि काही गोष्टींचा हेका मात्र मी सोडत नाही. स्वत:च्या अनुभवातून त्यांच्यासारखेच शिकत आले मी. त्या मुळे त्यातून शिकलेल्या गोष्टी मात्र आनंदाने मी जपते आणि स्वत:बाबत तरी याच गोष्टींसाठी खूप आग्रही आहते. थोडे थोडे करून जमवलेल्या माझ्या विश्वातील प्रत्येक माणसावर, प्रत्येक वस्तू वर नको इतका माझा जीव आहे, पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा एकाही गोष्टीत माझा जीव गुंतणार नाही हे मला माहित आहे. या समाजाचे आपण देणे लागतो ते कसे द्यावे याचे कोडे त्यांचे त्यांना सुटले होते. या बाबतीत किती नशीबवान होत्या त्या! आणि त्यांच्याच कल्पनेतून अनेक मोठी समाजोपयोगी कामे त्यांच्या नावाचा मोठा उदो उदो न करताही उभी राहिली आणि आजतोपर्यंत चालू ही आहेत. घर, आपली माणसे आणि त्यांची पुढील आर्थिक सोय आणि ती कधी पर्यंतची करायची, गरजा कुठे सीमित करायच्या याची उत्तरे अजूनतरी मला सर्वार्थाने सापडली नाहीत, त्यामुळेच समाजाचे देणे मी नक्की कोणत्या तऱ्हेने फेडणार आहे या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही. एखाद दोन संस्थाना दरवर्षी थोडी आर्थिक मदत पाठवली की आपले काम झाले ही चुकीची कल्पना मनात नसल्याने, ती पाठवूनही मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. तिचे तुटपुंजेपण मनाला सतावत राहते.

ही एकच नाही तर अशा अनेक प्रकारे अस्वस्थता मला घेरून टाकते. आजूबाजूच्या अनेक घटना त्यास कारणीभूत असतात. सगळ्याच थेट माझ्याशी संबंधित नसतातही तरीही. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत पण झालं असेल का? कशी त्यांनी त्यावर मात केली असेल? सुख-दु:ख सारेच परस्वाधीन, ही अवस्था तर आजही तशीच कायम आहे, मग गुंते सोडवले कसे? असे विचार मनात काहूर माजवत असताना भरून येणारे डोळे हे काही यावरचे उत्तर नाही असू शकत. आहे मनोहर तरी..... म्हणतच ह्या साऱ्याला सामोरे जावे का?  


















(छायाचित्रे- आंतरजाल आणि शीर्षक-कवी ग्रेस यांच्या कवितेतून साभार.)

Sunday, September 23, 2012

गजरा महिरप आणि कमळाचे फुल

 मणी, मोती यांच्याशी तशी  फारशी माझी कधी जवळीक नव्हती. दागिन्याची विशेष आवड नसल्याने ती वेळ कधी आली नाही. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणींना कशात तरी गुंतवून ठेवावे लागे, नाहीतर सतत "कंटाळा आला" हा एकच घोषा ऐकावा लागे. त्याचाच एक भाग म्हणून एक वर्ष आई तुळशी बागेतून थोडे मणी घेवून आली. लागोपाठ इतर मुलींच्या घरी पण ते आणले गेले. सर्व मुलीनी मण्यांच्या कला कुसरीच्या वस्तू बनवण्याची टूम निघाली. कित्येक प्रयत्नानंतरही मी ते करू नाही शकले, कधी दोराच अडकून पडायचा, कधी मोतीच मोजायला चुकायचे ....शेवटी कंटाळून तो नाद मी सोडून दिला. आणलेल्या मोत्यांची आई ने एक वस्तू बनवली. या अनुभवातून ती पण एक शिकली की कला कुसरीच्या वस्तूंचे आणि आपल्या लेकीचे काही जमणार नाही. हिला आपली सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयाची वर्गणी भरून द्यावी, तिने पुस्तके वाचावीत आणि सुट्टी सार्थकी लावावी हे बरे! शाळेत सुद्धा "चित्रकला, शिवण, लोकरीचे काम, किंवा भरत-काम करावे लागणे म्हणजे माझ्यावर संकट ओढावे. अनेक गोष्टी माझ्या साठी आई, शेजारच्या काकू यांनी पूर्ण केल्या आहेत.




पुढे कॉलेजला सुद्धा आसपासच्या मुली काहीतरी बनवत असत, मी त्यात लुडबुड करायचा प्रयत्न केला तर शेजारच्या एक काकू आणि माझी बहिण लगेच मला म्हणत " जा तू आपली दलाल स्ट्रीट, कॅपिटल मार्केट वाच" ही कामे तुझी नव्हेत. मला पण ते पटे. मी दरवेळी इतरांना असे नेहमी सांगत असे, की तुमच्या अर्थार्जनाच्या गोष्टी खेरीज एखादी तरी कला तुमच्या कडे असायला हवी, जी थोडा रिकामा वेळ मिळाल्यावर तुमच्या सोबत असेल. पण अशी कोणती कला माझ्याकडे आहे हा प्रश्न मला स्वतःलाच पडणे थांबत नव्हते.  

काही वर्षांपूर्वी संस्कृती लहान असताना मी जेंव्हा घरी होते, तेंव्हा मला माझ्या चुलत सासू-बाईनी एक मोत्यांची महिरप दिली. खूप सुरेख दिसत होती ती. घरीच होते म्हणून स्वत: जावून थोडे मोती घेवून आले. थोडे प्रयत्न करून तशीच दुसरी बनवता आली. मग एका पाठोपाठ बनवत गेले. त्या वर्षी दिवाळीत बहिण, नणंद, जावू प्रत्येकीला या अशा बनवलेल्या महिरपीच भेट म्हणून दिल्या. पण ते तेवढ्या पुरतेच ....नंतर काहीच दिवसात मी पुन्हा नोकरी करू लागले आणि या साऱ्या गोष्टी एका पेटीत बंद होवून माळ्यावर जावून बसल्या. काही महिन्यांपूर्वी अशाच एक दोन नाजूक मोत्यांनी बनवलेल्या गोष्टी माझ्या नजरेस पडल्या आणि वाटले कदाचित आपण हे करू शकू. माळ्यावरून मोती शोधून काढले आणि ती फुले करून पहिली, आणि पहिल्याच प्रयत्नात ती जमली देखील. तेंव्हा लक्षात आले, जरी लहानपणी नाही, तरी आता आपल्याला ह्या गोष्टी कोणीही न शिकवता देखील जमू शकतात. मग त्यात थोडे प्रयोग करून पहिले. एका मैत्रीणीला दाखवले. तिने लगेच तिच्या साठी  या गोष्टी बनवायला सांगितल्या. गणपती आठवड्यावर आलेले. ती म्हणे मला हे गणपतीसाठी करून दे. वाढता वाढता एक ऑर्डरच झाली. गणपतीच्या आधी १०/१२ दिवस मी रात्री जागून, पहाटे लवकर उठून फक्त हेच काम करत होते. ती ऑर्डर लहान की मोठी हा मुद्दा गौण आहे. त्यातले पैसे महत्वाचे नाहीत, एखादी वस्तू सहज स्वत:ला बनवता येणं ही मला त्यातली फार मोठी गोष्ट वाटली. २/३ घरांमधले गणपती-गौरी या माझ्या कलाकारीने सजले, नैवेद्याची ताटे महिरपिंनी नटली असतील. हा विचार खूप सुखावणारा आहे. 



Saturday, September 22, 2012

तू सुखकर्ता .....

कामावरून यावे, संध्याकाळी जवळच्या सार्वजनिक गणेश-उत्सवाच्या तयारीच्या बैठकांना उपस्थित राहावे. एकीकडे मनात घरच्या गणपतीला यंदा कोणती सजावट करावी याची आखणी करावी. मग बच्चे कंपनीला हाताशी धरून थर्माकोलची एक सुंदरशी सजावट करावी. मोठ्या उत्साहाने गणपतीची प्राण-प्रतिष्ठा सकाळी सकाळी करून मग पुन्हा मंडळाचा गणपती आणायला जावे. दाहीदिवस तिथे आपला सक्रीय सहभाग असावा, नाना स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम याचे बेत पार पडावेत. असे माझे बाबा! आज मागे वळून पाहते तेंव्हा विचार येतो कसं जमत असेल हे त्यांना तेंव्हा. त्यांच्यात अती उत्साह होता की माझ्यातच उत्साहाचा थोडा अभाव आहे?

साधारण राखी पौर्णिमेनंतरच आमच्या घरादाराला गणपतीचे वेध लागत. कारण बाबा संध्याकाळी त्या संबंधीच्या मंडळाच्या बैठकांना जात असत. जिथून गणेश मूर्ती आणत असू तिथे मूर्ती आल्या आल्या आम्ही तो बुक करून येत असू आणि आम्हा सर्वांमध्येच प्रचंड उत्साह संचारत असे. आईची स्वयंपाकघरात तयारी सुरु होई. घराची विशेष साफ-सफाई, गणपतीसाठी जे काही होते त्या फर्निचरची हलवाहलवी होई एका सुट्टीच्या दिवशी. बाबा एकीकडे मंडळाच्या कार्यक्रमाची तयारी आणि घरच्या गणपतीची सजावट यात अगदी गढून जात. आम्हा भावंडांची त्यात लुडबुड असेच. वाड्यात सर्वात सुंदर सजावट आमच्या घरी असे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी एकीकडे जोरदार तयारी आणि दुसरीकडे स्वयंपाक घरात मस्त मेनू शिजत असे, ज्यात मटार भात टोमाटोचे सार, शिरा असा बेत असे. आज पर्यंत मला तो का असे याचे कारण कळले नाही. दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पूजा जी एकत्रितरित्या वाड्यातील सर्व बायका आणि मुली करत असत. त्यासाठी सकाळीच फुले आणि पत्री गोळा करून आणायचा भारी सोस असे. एकदा पूजा पार पडली की दुसऱ्या दिवशीचे वेध लागलेले असत. त्यातच कोण किती कडक उपास करते याची चर्चा असे आणि आया अगं, कडक नको, खाऊन उपास करा म्हणत आमच्या मागे लागत. उपास आणि दुप्पट खाणे हा प्रकार या दिवशी पण असे. खिचडी, वराई-दाण्याची आमटी, भरली केळी, रताळ्याचा कीस, खजूर, भोपळ्याचे भरीत असे नाना प्रकार त्या दिवशी बनत. रात्री उशिरापर्यंत बाबांची मखर बनवण्याची लगबग सुरु राही. ते बनल्यावरच ते झोपत. दुसऱ्या दिवशी भल्या पाहते सर्व उठत. जवळपास सकाळी ८ वाजता गणपतीची प्राण-प्रतिष्ठा होत असे, आणि ती झाली की बाबा लगेच मंडळाच्या गणपती बसवायला जात आणि आई स्वयंपाक घरात. यथासांग मोदकाचे जेवण पार पडले की जी सुस्ती येई. नित्य नियमाने आम्ही बच्चे कंपनी घरच्या गणपतीची, वाड्यातल्या गणपतीची आणि मंडळाच्या गणपतीची आरती करून येत असू. त्यातच एकी कडे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमांची तयारी करत असू. बाबा कार्यकारणीवर असत, त्यामुळे आम्ही त्यात भाग घेणे ओघाने येतच असे. छान छान फ्रॉक किंवा कधी साडी, हाताला आणि पायाला लावलेला अल्ता, कधी नव्हे ते रंगवलेले ओठ फार मजा वाटे या साऱ्यात. दुसरी मजा वाटे नंतर या साऱ्याचे फोटो शाळेत नेवून दाखवून भाव खाण्यात. 

प्रत्येक दिवशी घरी दारी काही ना काही कार्यक्रम असेच. ऋषी पंचमीचे खास जेवण, मग गौरी आणण्याची लगबग, गौरी जेवण आणि मग गौरी आणि गणपतीचे एकत्र विसर्जन. हे ५ दिवस कधी घराला कुलूप लागत नसे. एकदा गौरी गणपतीचे आंब्याची डाळ आणि खिरापत या सोबत विसर्जन केले, की मग त्यादिवशी रात्री पासून आम्ही पाची जण गणपती पहावयास बाहेर पडत असू. आठ च्या सुमारास जेवून बाहेर पडायचे, आणि रात्री १२ पर्यंत घरी परत. पायी पायी फिरत २/३ दिवसात सारे पुण्यातले गणपती पाहून होत. त्या काळातही त्या दिवसात रस्त्यावर अनेक लहान मुलांसाठी खास अशा वस्तूंची रेलचेल असे. आम्ही हट्टही करत असू. काही वस्तू, खेळणी मिळतही. पण तो काळ, मनातला अमाप  उत्साह  आणि खिशातल्या तुटपुंज्या नोटा यांचे व्यस्त प्रमाण असण्याचा होता. वाड्यात एवढ्या उत्साहाने दरवर्षी गणपती बघणारे आम्ही एकमेव घर होतो. विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरी अनेक वर्षे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भेळ बनत असे. बाबा तर मंडळाच्या गणपती सोबत असत. पण लक्ष्मी रोड पासून घर दोन मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे, अनेक नातेवाईक त्या दिवशी आमच्या कडे दुपार पासूनच येवू लागत. दुपारी ३ च्या सुमारास पहिला मानाचा गणपती शगुन चौकात पोहचत असे, तर तिथे जावून आधी पासूनच जागा पकडावी लागे. संध्याकाळ पर्यंत गणपती बघायचे, घरी यायचे, भेळ खायची, पुन्हा जायचे रात्री १०/११ पर्यंत रोषणाई चे गणपती पाहून मग मात्र डोळे मिटू लागत. घरी जाऊन झोपत असू. पहाटे कोणी तरी येवून उठवे की "चला मंडई आणि दगडूशेठ चे गणपती येत आहेत." त्यांची रोषणाई आणि त्यांच्या समोरील  वाद्य पथके पाहणे फार मौजेचे वाटे त्या काळी. एकदा गणपती विसर्जन झाले की लक्षी रोड कसा सुना सुना वाटू लागे.

हे सारे करत असता आम्ही कधी शाळेला कधी दांडी मारली नाही, आमच्या मागे कधी कोणी अभ्यास करा म्हणून लागले नाही. कार्यक्रम, स्पर्धा यात भाग घेण्यापासून आम्हाला कधी कोणी अडवले नाही, रात्री १२ पर्यंत पायपीट करूनही दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी करण्यासाठी तेवढाच उत्साह असे. कमावता माणूस एक आणि खाणारी तोंडे ५, दर महिन्याचा खर्च भागवताना नाकीनाऊ येत असण्याच्या काळात माझ्या आई बाबांकडे एवढा अमाप उत्साह कुठून बरे येत असेल? मला राहून राहून त्या मागचे गमक कधी कळले नाहीये. 

आता  मी काय करते? तोच वारसा मी पुढे चालवते आहे का?  घरच्या गणपती साठी तेवढाच जोरदार उत्साह असतो. कोकणस्थ असून हे दोन दिवस सारा कारभार देशस्थी असतो. कारण घरी दुपारी जेवायला बहिण, नणंद, दीर आपापल्या कुटुंबासमवेत असतात. अशारितीने आम्ही १६/१७ जण असतो. उकडीच्या मोदकांचा बेत असतो. सजावट नेहमी फुलांचीच असते, त्याच सोबत हार घरीच बनतात. दुपारी जेवण अटपतानाच ३ वाजतात. साधारण सकाळी ११.३० ते २ मी फक्त मोदकच बनवत असते. जेवणे पार पडून सर्व जण थोडे पडतात, आणि मला संध्याकाळच्या आरतीचे वेध लागतात. ज्यास एक तिखट आणि एक गोड असे दोन  ताजे नैवेद्य असतात आणि आरतीला साधारण ५० जण असतात. या साऱ्या गोष्टींची कोरडी तयारी किमान आधीचे ३/४ वीकेंड्स आणि गणपतीच्या आधीचे २ दिवस सुट्टी घेवून चालू असते. पण बास इतकेच.एकदा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले की भरले घर सुद्धा सुने सुने वाटू लागते.  कॉलनीत कुठे अन कसा गणपती बसतो ह्याचा सुद्धा मला पत्ता नसतो. गेल्या कित्येक वर्षात मी जावून गणपती पहिले नाहीत. नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडे श्रींच्या दर्शनाला मी जर या दीड दिवसा नंतर एखादा वीकेंड आला, तरच जाऊ शकते. गौरी आणते, पण तिची सवाष्ण नवरात्रातल्या सवाष्णी सोबत बोलावते. कारण तेंव्हा खात्रीने एक वीकेंड मिळतोच. आज काल सार्वजनिक गणेश उत्सवात काही गाण्याचे कार्यक्रम, इतर स्थानिक लोकांचे विविध गुण दर्शनाचे  कार्यक्रम, काही स्पर्धा होतात की नाही ते मला माहित देखील नाही. कॉलनीतल्या गणपती पुढे स्पीकर लावून संध्याकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गाणी (भक्ती गीतेच, किंवा गायत्री/गणेश मंत्र) चालू असतो, त्यामुळे या दिवसात घरून काम करण्याचा मी विचार सुद्धा करू नाही शकत. पुण्यातालीच काय पण चिंचवड मधील विसर्जन मिरवणूक कशी असते ते देखील मी गेल्या काही वर्षात पाहिलेली नाही. थोडक्यात काय? तशी आज आताही सारी गणिते व्यस्तच आहेत कारण पैसा आहे पण वेळ आणि तेवढा उत्साह मात्र कुठून उसना मिळत नाहीये.



Thursday, September 6, 2012

फिरून फिरून भोपळे चौकात ........


"बरेच दिवसांनी आजारी पडले आणि २/३ दिवस सक्तीची विश्रांती मिळाली. अगदी चहा आणि जेवण सुद्धा रूम मध्ये येत होतं. पण खरंतर या विश्रांतीत काही मजा नसते."
"घ्या, आयतं मिळालं ते कुठेच गेलं! आणि म्हणे त्यात काही मजा नाही" 
"तसं नाही रे! आधीच तुम्ही तुमच्या आजाराने त्रस्त असता, आराम, आयतं चहा-पाणी यांचं जरासुद्धा कौतुक वाटू नये इतके. पण अशी सुट्टी इतर वेळी मिळत नाही ना!  माझ्या सर्व सुट्ट्या दरवर्षी जवळपास संपतात. कारणं काय असतात सुट्ट्यांची......लेकीचे आजारपण, सण समारंभ, जवळच्या नात्यातील एखादे कार्य किंवा एखादी ट्रीप यासाठी. यातला एकही दिवस खरंतर विश्रांती मिळत नाही, झालीच तर दगदगच होते. पण सुट्ट्या मात्र अशाच संपून जातात. अरे, फेसबुक वर जेंव्हा हे अपडेट टाकलं तर काय मजेशीर कमेंट्स होत्या, पण एकानेही "लवकर बरी हो" म्हटलं नाही. कोणालाच कसं वाटत नाही मी पण आजारी पडू शकते म्हणून?"
"अहो कीर्तनकार! ह्याला म्हणतात नमनाला घडाभर तेल... अगं बाई, तू आजारपणाबद्दल बोलत  होतीस ना, मग? कुठून कुठे पोहोचलीस?"
"हो खरंच! असं होतं कधीकधी, कुठून कुठे पोहोचतो ना बोलता बोलता आपण"
"आपण नव्हे आssपण! आणि "भरकटतो" असं म्हणायचय का तुला? (दोन "आपण" मधील फरक लक्षात येतोय ना?)
"हो हो तेच ते शाब्दिक फाटे फोडू नकोस रे!  तर त्या ट्रिप्स. फक्त आपले आपण जावे, तर आपण इन मीन ३ माणसे, करून करून काय मजा करणार. त्यापेक्षा केसरी, सचिन ह्यांच्या बरोबर जावे. धमाल येते. पण इतकी पळापळ करवतात, आज इथे, उद्या इथे, आणि वर सारखं हे खा, ते खा. दमवून टाकतात नुसतं."
"याचा आणि आजारपणाचा काय संबंध?"
"नाही. तेच सांगत होते मी."
"दरवेळेस आपल्यातला कोणी आजारी पडलं, की जाते विचारपूस करायला, काही मदत करू का विचारत. तुला सांगते, आजकाल मला एक महान शोध लागलाय."
"न्यूटन नंतर तूच! आता तो कोणता?"
"हाच की "मी काही मदत करू का? हा या जगातला सर्वात मूर्ख प्रश्न आहे."
"मग झालंच की, "तुझ्या त्या पुस्तकाची पहिली कथा तुझीच, नाव काय तुझ्या त्या पुस्तकाचे? अरे हो "मूर्खांच्या नंदनवनात" (इतरांच्या माहितीसाठी- कोणा अतीच मूर्ख व्यक्तीशी गाठ पडली असता त्याचे वर्णन मी घरी "मूर्खांच्या नंदनवनात- व्यक्तीचित्र नं ** असे करते)
"मला हीच कमेंट अपेक्षित होती तुझ्याकडून, असू देत आहेच मी मूर्ख. आणि ते बरेच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय. मुद्दा तो नाहीये"
" मग कोणता आहे, "फिरून फिरून भोपळे चौकात"
"अरे, काय कमाल आहे!  माझ्या बरोबर राहून बघ किती बदल झालाय तुझ्यात, वाक्यावाक्याला म्हणी सुविचार यांची पाखरणी. यालाच  म्हणतात ना  "ढवळ्या शेजारी बांधला पवळा,......  असो"
"असं करत जाऊयात का आपण. दरवर्षी असा एक आठवडा विश्रांती आठवडा म्हणून जाहीर करत जाऊयात एक तुझा, एक माझा. लेकीला काय मनात येईल तेंव्हा विश्रांती मिळतेच.... म्हणजे अजून तरी. जेंव्हा माझा विश्रांती-आठवडा असेल तेंव्हा घराची सारी व्यवस्था तू पहायचीस, मला आयतं चहा, नाश्ता, जेवण मिळायला हवा, तो तू बनव, बाहेरून मागव मी काही म्हणणार नाही. मी किचन मध्ये पाय टाकणार नाही. जमेल तेवढी पुस्तके वाचून काढणार. जुने सिनेमे पाहणार, संगीत कानात साठवून ठेवणार,  फोनवर गप्पा मारणार.  घराबाहेर पडणार नाही. हवे तर एखाद्या मैत्रीणीला घरीच बोलावेन गप्पा मारायला.  कोणतेही काम या काळात " तू घरीच आहेस ना मग एवढे करून टाक" म्हणत माझ्या मागे गोड बोलून लावायचे नाही. मी करणार नाही. मित्रांना ह्या काळात कोणत्याही छोट्या-मोठ्या पार्टी साठी घरी बोलवायचे नाही, आणि घरी पार्टी आरेंज केली तर कसे पैसे वाचतील हे मला पटवायचा प्रयत्न ही  करायचा नाही"
"ह्याच साऱ्या अटी-शर्ती माझ्या "विश्रांती-सप्ताहालाही  लागू असतील नाही?"
"तशी तुला अशा विश्रांतीची खरंच गरज आहे का?" तुझ्या मनासारखी ती तू अधून मधून घेतच असतोस की, चहा, नाश्त्याच्या फर्माईशी तर नेहमीच सुरु असतात."
"नाही नाही, आपण कधी नव्हे ते आपल्याच शब्दात पकडल्या गेल्या आहात, आता जे ठरलंय तेच होईल. दरवर्षी एक "विश्रांती-सप्ताह" नक्की होणार. आत्ताच तुझा झालाय, माझा कधी ते विचार करून सांगतो."