Tuesday, June 24, 2014

मनाचिये गुंती ………भाग २

मनाचिये गुंती चा हा पुढील भाग पण त्यातील संदर्भांशिवायही वाचणे कठीण जाऊ नये. 

सकाळचे सात वाजलेत. शनिवारचा दिवस आहे, टेबलपाशी आजची वर्तमानपत्रे आणि सकाळ पासूनचा दुसरा कॉफीचा मग हाती घेऊन गायत्री बसून आहे. वर्तमानपत्राच्या पानांवरून नजर फिरतीये, वाचले काहीच जात नाहीये. आज सुट्टीचा दिवस. तसा काही विशेष सुट्टीचा प्लान नाही. तशीही सकाळी सात ही सारंगसाठी उठण्याची वेळच नव्हे. आजकाल गेली काही वर्षे तीही त्यास उठवण्याच्या फंदात नाही पडली कधी. 

"आठवावे लागेल शेवटचे सकाळी प्रेमाने त्याला, " उठ रे, उठ ना रे सारंग, बघ किती वाजलेत" म्हणत उठवले होते ते" 

"सगळ्या जोडप्यांचे पुढे असेच होते का? सहजीवनाची, एकमेकांच्या सोबतीची, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची परिभाषा काळानुरूप बदलायला हवी. पण आपल्यासह अनेकांच्या बाबत असे घडताना दिसत का नाही? सध्या आपल्या आसपास जास्त अशाच गोष्टी का पाहायला मिळाव्यात? आज लग्नानंतर जवळपास चाळीस वर्षे होत आली आई-आप्पांच्या लग्नाला पण आजही त्याचे नाते कसे टवटवीत वाटते. म्हणजे ते तसे आहे की ते तसं दाखवतात? त्यांची लेक असून आपल्याला हा प्रश्न जर पडत असेल तर मग मात्र  ……"

" आसपास सगळी तकलादू नाती पाहिली कि कशाचाच भरवसा वाटू नये तसं झालंय आपलं." 

मधल्या काळात सखीचा रोहनशी घटस्फोटाचा निर्णय पक्का झाला, तिने तसा तो त्याला आणि दोघांच्या घरच्यांना सांगितला. बऱ्यापैकी घट्ट मनाने तिने हा निर्णय घेतला होता, ज्यावर ती तेवढीच ठाम ही होती, आहे. रोहन साठी हा धक्का होता, पण यास्थितीस तो ही कारणीभूत होताच,  सखीची बाजू इतकी पटण्याजोगी होती की रोहनची मैत्रीण असलेली गायत्री त्याच्याशी बोलण्याच्या किंवा दोघांत मध्यस्थी करण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. 

इथे सारंग आकंठ कामात बुडालेला आहे. कधी कधी घरी पहाटे तीन चार वाजता येऊन सकाळी नऊ वाजता पुन्हा ऑफिसला जातो. कधी लवकर घरी आलाच तर, काम, ड्रिंक्स आणि तो हेच त्याचे जग झालेय. तो पुढच्या महिन्यात यु एस ला जाणार हे आता नक्की झालंय. किमान दोन वर्षांसाठी. त्याला हवी असणारी गोष्ट शेवटी तो मिळवणारच हे नक्की.  

या उलट गायत्रीची परिस्थिती आहे. तिचं आयुष्य काहीसं संथ पाण्यासारखं झालंय. घर आणि करिअर चांगल्यापैकी स्थिरावलेले. नवीन काही, का?, किती? आणि कोणासाठी?मिळवावे हा प्रश्न सतत छळतोय. लग्नाला दहा वर्षे होतील आता. सर्व शक्य होते ते प्रयत्न करून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आता तर तिचीच इच्छा नाहीये. गेल्या काही वर्षातील तिच्यातील आणि सारंग मधील कोणत्याच कारणाशिवायचा वाढता दुरावा आणि आजूबाजूस असलेल्या इतर जोडप्यांमधील कुरबुरी पाहता कशासाठी अजून एका जीवाचे हाल असा प्रश्न पडू लागलाय. मूल नसल्याने दुरावा वाढतोय कि हा वाढता दुरावाच ते न होण्याचे कारण आहे? उत्तरेच नसणारे प्रश्न तरी का पडावेत? आणि हेच कारण होतं गायत्रीने यावेळी सारंग बरोबर सद्ध्या तरी जायचे नाही असे ठरवले त्याचे. त्यानेही विशेष आग्रह केला नाहीच म्हणा. 

"सद्ध्या त्याच्या अनेक विचारांत, निर्णयात आपण नसतोच तसे यातही नव्हतोच. अपेक्षितच होता का त्याला आपला हा त्यासोबत न जाण्याचा निर्णय, की त्यालाही थोडी स्पेस हवीच आहे? हे थोडे अंतर गोष्टी थोड्या सरळ करतील का की अजूनच बिघडवतील. पण  काय बिनसलंय हे न कळताच आपण गोष्टी सुधारण्याची अपेक्षा का करतोय? वर वर तर सारे छान चालू आहे, इतर कोणाला पुसटशी शंकाही यायची नाही. सारंग जाण्यापूर्वी त्याच्याशी एकदा बोलायला हवे आहे का? मुळात तो आपल्यात सारे काही ठीक नाहीये हे तरी मान्य करेल की हे सारे तुझ्या मनाचे खेळ आहेत म्हणत आपले म्हणणे ऐकूनच घेणार नाही?"

"मध्यंतरी विराजने जो सल्ला दिला…… हळूहळू त्याने डोके पोखरून टाकले आहे "रिलेशन्स जप" असे म्हणाला होता तो. म्हणजे मी नक्की काय करू? नक्की कोणत्या नात्यांविषयी, कि सगळ्याच? म्हणजे मी आणि सारंग, मी आणि त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईक, कि प्रोफेशनल रिलेशन्स? तशीही सर्वच नाती प्रवाही असतात, त्यामुळे रोज थोडी थोडी बदलतातच. ती थांबली कि मगच संपण्याकडे वाटचाल करू लागतात. पण मग अशा वाहत्या पाण्यास जपायचे आहे मी म्हणजे नक्की काय करायचे आहे? 

बरं,ती जपण्यासाठी मीच एकटी का प्रयत्न करू? प्रयत्न करू म्हणजे तरी नक्की काय करू? सदैव मी पडती बाजू घेऊ, की कोणत्याही परिस्थितीत मी शांत राहू? पण हे करण्यासाठी तरी काहीतरी घडावे लागेल. नक्की करू तरी काय? कशाने काय बिघडणार आहे हे कळले तर कोणी काही उपाय तरी करेल ना, इथे आता सगळेच हवेत.काही न घडताच गोष्टी बिघडत चाललेल्या. 

"अनेकदा फोन हाती घेतला होता त्याला फोन करून त्याच्याशी यावर अधिक बोलण्यासाठी. पण धीर झाला नाही. एकतर मुळात तो सारंगचा मित्र आहे.तर मग त्याने जरी सारंगने सांगितले म्हणून आपली पत्रिका पहिली असेल तरी आपल्याशी बोलायला नको होते यावर. दुसरीकडे आपला यावर विश्वास कधी नव्हता. आजवर आयुष्यातली कोणतीही महत्त्वाची गोष्ट करण्यापूर्वी आपण ज्योतिष, कुंडली हे पहिले नव्हते. अगदी अजून मूल नाही यासाठी सुद्धा नाही. तर मग आज का वळावे आपण या साऱ्याकडे? त्याच्या या सल्ल्याने आपण का त्रास करून घेतोय. त्यालाही चांगलेच माहित आहे आपला या गोष्टींवर विश्वास नाही ते"

आई आप्पांशी यावर बोलावे का एकदा? पण त्यांना ह्या गुंत्यांचा तरी त्रास आता या वयात नको द्यायला. मुळात आपल्याच कल्पना इतक्या धुसर आहेत कि त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचवावे तरी कसे. त्या दोघांनी दिलेले समतोल विचारांचं बाळकडू विसरत चाललोय का आपण? त्यातून आप्पांच्या सडेतोड प्रश्नांची उत्तरे देणे जमणार नाही आपल्याला. खरे तर त्यांच्याशीच एकदा मनमोकळा संवाद घडायला हवाय, कदाचित एखादी नवी दिशा त्यातूनच सापडेल आणि त्यावाटेवर चालता सारे कसे स्वछ आणि निरभ्र होऊन जाईल………

Saturday, June 21, 2014

नात्यांची गुंफण...

मध्यंतरी एका ओळखीच्यांकडे त्यांच्या लेकाच्या लग्नाच्या आधी काही दिवस "व्याही भोजनाचा" कार्यक्रम होता. घर तसे भले मोठे, सर्वार्थाने, माणसांनी भरलेले, सुबत्तेने आणि माणुसकीने देखील. आई वडील आणि तीन मुले, त्या पैकी दोघांचे संसार त्यांच्या एक एक मुलांसह सुरळीत सुरु असणारे. आता शेंडेफळ बोहोल्यावर उभे राहण्याच्या तयारीत. जेवणे आटोपली, व्याही मंडळी घरी गेली. घरची आणि माझ्यासारखी काही घरच्यासारखी असणारी मंडळी गप्पा मारत बसली होती. तितक्यात एक मध्यमवयीन नऊवारी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली स्त्री घरी आली. तिला पाहताच त्या घरच्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक आनंद जाणवला. त्या काकूंनी तिला बसायला सांगितले, वरकाम करणाऱ्या मुलीस पाणी आणायला सांगितले आणि आत तिचे जेवायचे पान घेण्यासाठीही.  त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या. उशीर का केलास अशी विचारणा झाली. आम्हा सगळ्यांचे लक्ष थोड्या कुतूहलाने त्या दोघींकडेच लागलेले. 

त्यातून समजलेली गोष्ट अशी कि त्या जेंव्हा हि मुले लहान होती त्यावेळी,या आलेल्या त्यांचे वयही १०/११ वर्षे होते आणि यांच्या घरी राहून त्यांनी मुलांना  सांभाळण्याचे काम केले होते. पाठोपाठची ३ मुले असल्याने अनेक वर्षे त्या या घरी राहत होत्या. नंतर कधीतरी त्यांचे लग्न झाले, आणि त्यांचे हे घर सुटले, पण घराशी, या माणसांशी असलेले संबंध  नव्हेत. त्याच आपुलकीने लग्न घरी आता त्या २/३ दिवस मुक्कामास आल्या होत्या. आता पुढचे दोन चार दिवस त्या या घराच्या किचनचा, वरकामाचा ताबा त्या घेणार हे स्पष्टच दिसत होते. येताना नवऱ्या मुलासाठी आणि त्याच्या आईबाबांसाठी चांदीच्या वस्तू आहेर म्हणून घेऊन आल्या. ते पाहून मला वाटलं की कशासाठी हे सारं? जीवनावश्यक खर्च सुद्धा मुश्किलीने भागवणाऱ्या व्यक्तींनी  तरी अशा गोष्टी करू नयेत ना. पण नाती जपण्याची, ती निभावण्याची प्रत्येकाची एक पध्दत असते. बाकीच्यांना त्याबद्दल काय वाटते हे तेंव्हा गौण ठरावे. 

अशी तुमची सपोर्ट सिस्टम म्हणून काम करणारी मंडळी आणि तुमचे त्यांच्याशी असणारे संबंध. दिवसाचे किमान १०/१२ तास घराबाहेर असणाऱ्या माझे तर पानही यांच्याशिवाय हालत नाही. तशीही आम्हा भारतीयांना यांची गरज तर फार असते, पण त्यांच्याशी छान संबंध ठेवावेत, थोडे माणुसकी दाखवत त्यांच्याशी वागावे हे मात्र अनेकांच्या पचनी पडताना दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर वरील प्रसंग वेगळा उठून दिसावा. 

तशीही मी थोडी इमो टाईप व्यक्ती असल्याने ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी असे कधी काम केले आहे त्यांच्या बद्दल मी थोडी हळवी असतेच. असे हळवेपण मग मला त्यांना सोडू देत नाही. पण कधीतरी निरोपाचे क्षण येतातच, आणि जड मनाने ते स्वीकारावेही लागतात. जसे कि लेकीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये ५/६ दिवस किंवा त्यानंतर दोन वेळा काही कारणांनी हॉस्पिटल मध्ये राहावे लागले तेंव्हा आपुलकीने मला मदतीचा हात देणारे डॉक्टर, नर्सेस, लेक लहान असताना तिला पहिले वर्षभर सांभाळले ती तिची ताई, गाडीवरून पडल्यामुळे काम बंद कराव्या लागणाऱ्या पूर्वीच्या एक पोळी काकू, आणि रेल्वेतून उतरताना पडून हात तुटल्या मुळे  काम सोडावे लागलेली एक घरकाम करणारी अशा काही मोजक्याच ज्यांना निरोप द्यावा लागला होता. वरवर जरी मी पैसे मोजते आणि ही लोकं माझ्यासाठी काम करतात असे असले तरी त्यांच्या कृतीतला ओलावा मी पैशाने विकत नाही घेऊ शकत ना?

नशिबाने अशी फार मंडळी माझ्या घरी नाहीत पण जी आहेत ती गेली कित्येक वर्ष आमच्या घरचाच भाग आहेत.निमूटपणे त्या दोघी आल्यात, आपापली कामे करून, काही न बोलता निघून गेल्यात असे शक्यतो आमच्या घरी कधी घडत नाही. मुंबईहून पुण्यात आल्यामुळे बदलावी लागणारी किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे सोडून गेलेल्या एक दोन जणी वगळता गेली अनेक वर्षे त्याच माझी सपोर्ट सिस्टम आहेत. या पैकी एकजण तर जवळपास १३ वर्षे माझ्या घरी कामाला येतात आणि दुसऱ्या गेली ५ वर्षे. उद्या काही कारणांनी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे झाले तर यांच्यासह व्हावे लागेल. कोणत्याही अशा व्यक्तींबाबत असतात तशा तक्रारी अधून मधून त्यांच्याबद्दल, केलेल्या कामाबद्दल माझ्याही असतात, पण कधी दुर्लक्ष करत, कधी गोड बोलून, तर कधी चिडून मी त्यांच्याकडून कामे  करून घेते. पण आम्ही एकमेकींना सोडत नाही. इतक्या वर्षांची आपुलकी आम्हाला एकमेकीना सोडूच देत नाही. 

अनेकदा घरच्या एखाद्या व्यक्तीने  आपली गरज समजून करावीत अशी कामे त्या करतात, जसे कि शनिवारी लेकीची दुपारी शाळा आहे, आणि मी मात्र सकाळी लवकर ऑफिसला गेले आहे, तेंव्हा तिची वेणी घालून देणे, जाताना ती डबा घरीच विसरून खाली उतरली आहे तेंव्हा कोपऱ्यावर असणाऱ्या तिच्या बस स्टोप पर्यंत धावत जाऊन तिला तो देणे,  मशीनमध्ये कपडे धुऊन तयार आहेत पण ते वाळत घालायला मला वेळ नाहीये, तर ते घालणे, घरात साफ सफाईला लागणाऱ्या गोष्टी संपल्यात, मला सांगितले होते पण मी विसरले आहे, तर मग स्वत:च सकाळी येताना त्या घेवून येणे आणि मग माझ्याकडून त्याचे पैसे घेणे अशी एक न अनेक अवांतर कामे त्या समजून करतात. त्यांच्या गरजा  समजून त्याप्रमाणे लागेल ती मदत करायला मलाही काही वाटत नसते. त्यांच्या घरच्या माणसांविषयी, त्यांच्या परिस्थितीबद्दल मलाही माहिती असते त्यामुळे काही गोष्टींमध्ये त्यांना सपोर्ट करणे हे ओघाने आलेच. 

अनेकदा मी न सांगता सुद्धा मला बरं नाहीये हे त्यांना कळते, किंवा कोणत्या कारणाने माझे काही बिनसले आहे हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही. अशा वेळी आपल्याला काय करायचे अशी भूमिका त्याही घेत  नाहीत, चौकशी कर, औषधे दुकानातून आणायची आहेत का ते विचार, मला बरं नाहीये हे आवर्जून (मला कळवायचं नसलं तरी ) जवळच राहणाऱ्या माझ्या आईला जाऊन सांग हे त्या दोघी केल्याशिवाय राहत नाहीत. हे सारे करावे हि अपेक्षा नसते पण त्यांनी ते केल्याने बरे वाटते हे नक्कीच. 

हे आपलेपण आता जेंव्हा पुढच्या पिढीतही दिसू लागते तेंव्हा मला खरेच मनापासून बरे वाटते. लेकीने सर्वात आधी एक उत्तम माणूस बनावे आणि मग बाकी काय ते अशी भूमिका असताना, पण तरीही कटाक्षाने तिला कोणाशी कसे संबंध ठेवायचे ते आपले आपण अनुभवातून काही अंशी शिकू दे असे  ठरवलेले असताना, मी घरी नसताना ती त्यांना कधी चहा करून देणे, आता उन्हाळ्यात कधी सरबत, कधी पन्हे देणे. अनेकदा तिच्या नाश्त्याची आणि त्यातल्या एकीची काम करायला येण्याची वेळ सध्या साधारण सारखीच असते, मग त्यांना नाश्ता विचारणे किंवा देणे अशा काही गोष्टी मी न सांगता करते  हे नक्कीच सुखावणारे आहे. माया एकाने लावली कि समोरचा अलिप्त राहूच कुठे शकतो? मग सलग ३/४ दिवस ती दिसली नाही की या दोघीजणी सतत विचारत राहतात. आता सुट्टीत ती दापोलीला गेली तर कधी येणार ती, घर फार रिकामं वाटतंय असं मला अनेकदा दोघींनी विचारून झालं. तिला बरं नसलं तर त्या अस्वस्थ होतात, चारचारदा त्याबद्दल विचारत राहतात. लेकही आता अनेकदा मजेत त्या दोघींना सांगते कि पुढे माझ्या लग्नानंतर मी तुम्हाला दोघींना माझ्या घरी नेणार म्हणून तेंव्हा त्या आपुलकीने त्या दोघीही नक्कीच सुखावत असणार. 

एक महिन्याभरापूर्वी एक आळसावलेल्या रविवारी सकाळी  मी वाचत बसले होते. इतका हेवी नाश्ता झाला होता कि नवरा आणि लेकीने आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन मस्त ताणून देणे पसंत केले होते. घराची बेल वाजली, मी दार उघडले घराची साफसफाई करणाऱ्या कुसुमबाई आल्या होत्या. आत येताच संस्कृती कुठे अशी त्यांनी विचारणा केली, खोलीत झोपलीये असे सांगताच "का, बरे नाही का" अशी विचारणा झाली. तसे काही नाहीये असे सांगताच त्या तिच्या खोलीकडे वळल्या. हातात काहीतरी होतं त्यांच्या. पाच मिनिटात लेक बाहेर आली. हातात एक भली मोठी कॅडबरी सिल्क घेऊन, आणि म्हणाली "आई, कुसुमबाई बघ हे काय घेऊन आल्यात माझ्यासाठी". सातत्याने देश विदेशातील chocolates खाणाऱ्या लेकीलाही  त्या त्यांच्या कृतीचे वेगळेपण जाणवले होते. 

त्यांना विचारले "अहो, हे काय, कशाला आणलेत, लहान आहे का ती आता कॅडबरी खायला, स्वत:च्या दोन नातवंडाना अशा गोष्टी घरी न्यायच्या सोडून हिला कशाला देताय? आणि एवढी महाग देतात का? त्यावर त्यांचे उत्तर होते, " अहो पोरीने मधे किती अभ्यास केला. आम्हाला त्यातलं काही कळत नाही, कुठली परीक्षा आणि काय काय करते ते, पण त्याबद्दल तिला काहीतरी द्यायला नको? गेले आठ दिवस रोज म्हणते तिला काहीतरी नेईन म्हणत होते तेंव्हा आज जमलं" यावर काही बोलू नाही शकले मी. क्षणात काही वर्षांपूर्वी त्या लग्नघरी आलेल्या त्या बाई आठवल्या आणि नात्यांची संगती पुन्हा एकदा लागली. 

Sunday, June 15, 2014

तिसरा वाढदिवस!

जूनचा किंवा डिसेंबरचा दुसरा शनिवार म्हणजे इसाकाच्या परीक्षेचा दिवस. २०११ मध्ये अशीच एक परीक्षा देऊन निवांत रविवार घालवण्याचा विचार होता.पण होतं असं की थकवा वगैरे सारं परीक्षा होईपर्यंतच असतं, एकदा ती झाली कि मग एक अंगावर येणारे रिकामपण मागे उरते, तसेच काहीसे झाले होते. मग काय करावे असा मनात विचार चालू असतानाच अचानक त्यापूर्वी जवळपास २ वर्षे आधी सुरु केलेला आणि स्वत: काही न लिहिलेला ब्लॉग आठवला. तत्पूर्वी काही दिवस थोडे काहीतरी इन्फी ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न करून झाला होताच, आणि आता इन्फोसिस सोडायचे दिवस आता जवळ येत चाललेत याची जाणीवही तीव्र होत चाललेली. त्यामुळे आता अजून काही लिहिण्याचा प्रयत्न चालूच जर ठेवायचा असेल तर नवे माध्यम, नवे ठिकाण हवेच होते, जुना ब्लॉग आठवल्याने हा वेगळा शोध घेण्याची गरज मग उरली नाही. 

मग आधीच्या ३/४ महिन्यातले जे काही तोडके मोडके लिखाण होते ते या जूनच्या दुसऱ्या रविवारी या ब्लॉगवर घेऊन आले. म्हणजे तसे हे बाळ दत्तक आणण्यासारखेच झाले. पण तसे का होईना….… ते आले हे काय कमी? कसेही आलेले असले तरी बाळाचे आगमन सुखावणारेच असते. तर मग अशारितीने हे "ब्लॉगबाळ" आज ३ वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस लक्षात होता, लिहिण्याचा उत्साह ही खूप होता. दुसऱ्या वर्षी लिहिण्याच्या प्रक्रियेला अशी काही खीळ बसली होती की या ब्लॉगबाळाचा वाढदिवस खुद्द आईच विसरली. हे चालू वर्ष पुन्हापहिल्यासारखेच लिहिते करून गेले, त्यामुळे जवळपास आठवडाभर आधीपासून याची आठवण होती. 

या साऱ्या लेखना मागे प्रेरणा खरे तर एकच, आणि ती म्हणजे स्वत:ला व्यक्त होण्याचे हे उत्तम माध्यम. पण एकदा ते तुम्ही जगापुढे ठेवलेत की ते सर्वार्थाने तुमचे असे उरतच नाही. लिखाण,त्यावरील प्रतिक्रिया मग पुन्हा त्यातून पुढच्या लिखाणातील बदल असा प्रवास सुरु होतो. गोष्टी थोड्या बदलतात,जेंव्हा कौतुक वाट्याला येऊ लागले की. मग एक त्याचीही छान नशा असतेच, चांगल्या रितीने ती तुम्हाला लिहिते ठेवते. मागच्या वर्षात म्हणजे २०१३ मध्ये फक्त ८ इतक्या कमी पोस्ट हातून लिहिल्या जाऊनही एकूण तीन वर्षात १२० पोस्टस........ not bad अशी शाबासकी मी स्वत:लाच देतीये. कारण माझ्यासारख्या आळशी व्यक्तीने स्वानंदासाठी  सुरु केलेला हा उपक्रम सलग तीन वर्षे टिकू शकला हेच खूप झाले. तसे हे लिखाण म्हणजे तरी काय रोजच्या जगण्याच्या कुपीत लपलेले काही सुगंधी क्षण, काही आठवणींचा उमाळा जो कोणा समोर व्यक्त करायला मन तयार होत नाही, काही सभोतालच्या घटनांवरील प्रतिक्रिया, तर काही स्वत:शीच घडवून आणलेला मोकळा संवाद. 

अनेकदा हे लिहिले पाहिजेच का हा विचार छळतो आणि लिखाण थांबते, काही वेळा प्रचंड इच्छा असून शब्द साथ देत नाहीत, तर कधी वेळ. कधी मनातल्या मनात अनेक कल्पना रुंजी घालतात पण laptop समोर बसल्यावर "शब्दरूपी उरावे" यासाठी एकही कल्पना तयार होत नाही. कधी लिहिले गेल्यानंतर ते स्वत:च्याच मनास येत नाही, म्हणून ते ब्लॉगपर्यंत पोहचत नाही, अशा अनेक  अडथळ्यांच्या शर्यती पार करत हा ब्लॉग लिहित्या अर्थाने आज तीन वर्षाचा झाला. 

वाढदिवशी मागील आढावा तर घ्यावाच पण पुढील वाटचालीचा पण मागोवा घ्यावा. पण जमेल तसं स्वत:ला व्यक्त होऊ द्यायचं हे एकच ठरवलेले असल्याने पुढील प्रवासाचा मागोवा कसा आणि काय घेणार म्हणा. पण मागे वळून पाहताना या ब्लॉगने ज्या प्रकारे मला श्रीमंत केले ते याचे एक ऋण राहील माझ्यावर, अनेक ब्लॉगर मित्र मंडळी, अनेक फेसबुकीय मित्र मंडळ मला या लिखाणातून मिळत गेले, मैत्र तुमच्या नकळत तुम्हाला समृद्ध करत राहतेच, तसे ते इथेही झालेच. त्यामुळे या सर्वांचे मनापासून आभार. असेही अनेक जण असतात की नित्यनियमाने ते तुमचे लिखाण वाचतात, प्रतिक्रिया देत नाहीत, पण वाचत राहतात, कधीतरी गप्पांच्या ओघात लक्षात येते की अरे ही / हा आपण लिहिलेले वाचतात याची खात्री पटते, तर या सर्वानाही मनापासून धन्यवाद. माझ्या आसपासच्या अनेक व्यक्तींच्या स्वभावाच्या अनेक छटा माझ्या लिखाणात उतरतात, त्यामुळे तशा छटा घेऊ द्यायची  संधी देणाऱ्या ह्या साऱ्यांचेही खरोखर आभार! 

मी पूर्वी म्हंटल्या प्रमाणे संवाद संपला की नाती संपतात, नात्यांशिवायचे जगणे रुक्ष, कोरडे होऊन जाते, या ब्लॉगने मला व्यक्त होणेच नव्हे तर सारे जगणेच आनंदमयी करण्यास मदत केली. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा ठेवा या "मी …. माझे … मला" ने मला मिळवुन दिला. अनेक अर्थानी जगणे समृध्द केले. एक प्रयत्न म्हणून सुरु केलेला हा संवाद आता नकळत माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक कसा आणि कधी होऊन गेलाय ते कळलच नाही. म्हणूनच हा संवाद असाच चालू ठेवण्यासाठी या ब्लॉगबाळाला आणि त्याच्या आईला अनेकोत्तम शुभेच्छा !


(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

Friday, June 6, 2014

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी.....

अनेक दिवसांनी हाती लेखणी धराविशी वाटते आहे. काय होतं ना अनेकदा शब्द असे काही रूसतात की काहीही करा, त्यांना मनवणे महाकठीण होऊन बसते. असे मनधरणी करण्यात अनेक अस्वस्थ दिवस रात्र जातात. मला मान्य आहे  की त्यांना काही माझ्या काही दावणीला  बांधलेले नाहीत, की माझ्या मनात यावं आणि त्यांनी मागुते यावे, पण थोडी मनधरणी केल्यावर तरी यावे ना!  "बाबांनो, तुम्हाला नसेल रे पण मला तुमची खूप गरज आहे, तुम्ही नसाल रे, पण  मी तर तुमच्या प्रेमात आहे ना कायमच, कधीतरी त्याची जाण ठेवा आणि माझ्यावर असे रुसू नका ना". सुरेश भटांनी जसे जीवनाकडे "सूर मागू तुला मी कसा " म्हंटले तशी मी शब्दांना साद घालत राहते.

अनेक आकृतीबंध निर्माण होत राहणे, अनेक कल्पनांनी नुसतेच मनात रूंजी घालणे हे सारे सारे  होत राहते पण तरीही  शब्दच न सापडल्याने ते आ
कृतीबंध, त्या कल्पना हवेतच विरून जाणे हे अशा वेळी नित्याचेच. अशी त्यांची वाट पहात शेवटी, "आपण आता नाद सोडावा, हे लिहिणे, व्यक्त होणे ही आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे.... " अशी आपण आपलीच समजूत काढावी आणि घर, आँफीस यात गुंतवून घ्यावे  हे उत्तम.

पण आपलीही अशी सहज समजूत निघते? शब्दांच्या विरहाचे दु:ख तर जाळतेच, पण काही इलाज नसतो ते मान्य करण्याखेरीज. हे मान्य करायलाच आधी किती वाद घालावा लागतो  आपल्या एका मनाला दुसऱ्याशी आणि आपण असतो हतबल काहीही  करू न शकणारे.

मग अचानक एके दिवशी एखादी छोटीशी, साधीशीच गोष्ट घडते,  पण तेंव्हाच डोक्यात काही तरी लख्खकन चमकते, तीच चमक कुठूनशी आपल्या डोळ्यात उतरते, आत कुठेतरी त्यांची चाहूल लागते, याची तुलना ना  फक्त अवचित दारी उभ्या सजणाला पाहताना त्याच्या सखीची होते ना त्याच्याशीच होऊ शकते. ही चाहूल खरी कि केवळ भास हे पहावे तरी असे म्हणत आपण एखादी कल्पना उतरवू पहातो, लेखणीतून शाई झरझर पाझरावी तसे शब्द उतरू लागतात, अनेकदा एखादा बांध फुटावा आणि धबधब्यासारखे पाणी वाहते व्हावे असा त्यांचा वेग  असतो. अनेकदा  मग बोटांना त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत करावी लागते. पण त्यांचे हे असे येणेही तितकेच  सुखावणारे असते. हे अनुभूतीचे गारूड मग मनावरून काही काळ तरी मग उतरायचे नाव घेत नाही.

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले द्वारी अशी ही अवस्था, हाती लेखणी धरायला आवडणाऱ्या  प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणारी! जसं आज मी कित्येक दिवसांनी फेसबुकवर दोन ओळींचे स्टेटस टाकावे म्हणून तिथे जाते काय आणि माझ्या शब्दांशी असलेल्या या नात्याचा शब्दपट उभा करते, काय सारेच आकलनापल्याडचे!