Thursday, February 27, 2014

दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे.....................

एकंदरीतच वेगवेगळे दिवस अती उत्साहात साजरे करण्याची आपल्याला फार आवड! साहजिकच उत्साह जितका अती, तितकाच तो विरून जाण्याची प्रक्रियाही वेगवान! सगळे वरवरचे दिवस साजरे करण्याने होते तरी काय? मूळ उद्धेश अशा या दिवसांपासून लांबच असतात, दिन साजरा करण्याचा हेतू साध्य होत नाहीच  मग  तो  मराठी भाषा दिन साजरा असो,  महाराष्ट्र दिन वा प्रजासत्ताक दिन! 

असे दिवस साजरे करतानाही, आपल्याकडील विरोधाभास असा की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणार, स्वत: घराबाहेर पडल्यावर हिंदी नाहीतर इंग्रजीचा आधार घेत बोलणार  आणि असा हा एक दिवस साजरा करून आपण किती मराठीभाषेवर आपले किती प्रेम आहे याचे कवतिक करत राहणार, ते ही कसे तर फेसबुक, whatsapp, ट्वीटरवर कोणाकडून तरी आलेल्या मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा एकमेकांना पाठवून, अशाने कशी ती भाषा वाढावी, फुलावी? अशा शुभेच्छा पाठवणारे कितीजण किमान हा दिवस एखादे मराठी पुस्तक विकत घेऊन, नुसतेच विकत घेऊन नव्हे तर ते वाचून, किंवा आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला  एखादी उत्तम, कथा, कविता किंवा एखादा ललित लेख वाचून दाखवून किंवा वाचावयास लावून साजरा करतात? ज्या योगे पुढील पिढीस मराठीच्या समृद्धतेची कल्पना यावी? 

आपले मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच  आपण स्वप्ने पहाणार ती त्याच्या इंजिनीअर, डॉक्टर बनून खोऱ्याने पैसे कमावण्याची. क्रीडा प्रकार साऱ्या देशात एकच त्यामुळे जर चुकून आपण त्याने क्रीडापटू स्वप्न पहिलेच तर आपली इच्छा त्याने  सचिन तेंडूलकर बनावे हीच. आजतोवर मला अभावानेच कोणी आई बाप भेटलेत ज्यांचे स्वप्न आपल्या मुलाने साहित्यिक व्हावे असे  होते. त्यातल्या त्यात सोयीची भूमिका आपण घेतो ती म्हणजे "तिला/ त्याला स्वत:च्या आवडीने काय ते करिअर घडवू देत". पण शेवटी जे आदर्श समोर ठेवतो किंवा ज्या प्रकारच्या पुढील आयुष्यातील जीवनशैलीची गोडी लावतो त्या अपरिहार्यतेने मुले मळलेल्या वाटाच जवळ करताना दिसतात. 

आपली शैक्षणिक पद्धत ही अशी की हुशार ( मार्क मिळवण्यात ) मंडळी विज्ञान शाखेकडे वळावीत, थोडी कमी हुशार यांनी आपले कॉमर्सला जावून उत्तम नोकरी कशी मिळेल ते पाहावे, उरलेला सारा भार, आपण जमेल तसा कला शाखेत धाडून द्यावा, त्यांच्यातूनच मग डी एड, बी एड  वगैरे करून मंडळी जावीत पुन्हा शिक्षकी पेशात! बरं, त्यांना आपले सरकार पद कोणते देणार तर म्हणे "शिक्षण सेवक" ! आता अशा रीतीने मारून मुटकून शिक्षक बनलेल्या व्यक्तीकडून आपण उत्तम विद्यार्थी किंवा साहित्यिक घडवण्याची  अपेक्षा करणार, म्हणजे जे आडातच नाही ते आपल्याला पोहऱ्यात मिळावे ही आपली अपेक्षा. आता असा शिक्षक साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करेल कसा ? 

भाषा, साहित्य म्हणजे विज्ञानातील, तंत्रज्ञानातील  एखाद्या शोधाप्रमाणे नसते ना की लागला एखादा महत्त्वाचा शोध आणि सारी क्षितीजेच बदलून गेली! भाषा, ती रूजावी लागते. तिची मशागत व्हावी लागते. आणि घडते ते उत्तम निर्मिती मुल्ये असलेले लेखन, इतर भाषांतून अनुवादाच्या माध्यमातून होणारे संस्कार याचा पाया, बोली भाषेची समृद्धता तिचा सतत आणि सहज वापर, शालेयच नव्हे तर उच्च शिक्षणही या भाषेतून देण्याची  सोय आणि त्या साठीचे सातत्याचे प्रयत्न, त्याच बरोबर खोलवर रुजलेली वाचन संस्कृती यातून.  इतक्या साऱ्या बाबी वर्षानुवर्षे जुळून याव्यात तेंव्हा कुठे आपण विचार करू शकू ना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत एक समृद्ध वारसा पोहचवण्याचा!

एक बरे आहे, जन्माला येताना जसे नाक कान डोळे घेऊनच येतो तशी वाचनाची गोडी किंवा नावड सोबत घेऊन येत नाही हे! त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर  वाचनाची नसलेली  गोडी लागण्याची शक्यता तरी किमान कायम राहते! 

पण तरीही आपण जाणीवपूर्वक ही आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कोणत्याही भाषेमुळे असोत, जाणीवा समृद्ध होणे महत्त्वाचे असे आपण म्हणत नाही. रोजच्या जगण्यात हजारो रुपये विविध गोष्टींवर खर्च करणारे आपण कितीजण सहजपणे हजारभर रुपयांची पुस्तके आणून आपल्या मुलासमोर ठेवून," बाबारे, तुला  टी व्ही, मोबाईल, आय पॅड, मित्र मंडळ यातून वेळ मिळाल्यावर तरी  हे वाच" असे सांगतात? एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी भेटवस्तू च्या रुपात उत्तम साहित्यकृती देतात? किंवा एखाद्यास एक वर्षाची पुणे मराठी ग्रंथालयाची किंवा ब्रिटीश कौन्सिल ची  वर्गणी भरून त्याच्या हाती ठेवतात? 

दिसामाजी काहीतरी लिहिणे नाही जमणार कदाचित पण "दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे" हे तर शक्य होवू शकते ना आपल्याला? चला, नुसत्या "मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा" एकमेकांना  देण्यापेक्षा तिच्या वैभवात भर पडेल याकरिता एक पाऊल टाकूयात. माझ्या सर्व मित्र मंडळीना याकरिता अनेकोत्तम शुभेच्छा!