Sunday, November 29, 2015

पासवर्ड

रोजच्या वापरातल्या अनेक गोष्टींना पासवर्ड असतो तसा तो आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्यालाही असतो. प्रत्येक टप्प्यावर तो वापरल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर " जाऊ दे, सोडून दे" किंवा "शांत रहा", "काळजी नको", किंवा "खूष रहा", "झालं ते झालं" असे अनेक.... जशी व्यक्ती तसा हा परवलीचा शब्द.
बाकी पासवर्ड विसरले जातात, तेंव्हा ते नव्याने मिळवण्याची सोय असते. पण आयुष्याचे पासवर्डस ना विसरण्याची सोय, ना परत दुसरा मिळवण्याची सोय.
ते विसरले तर पदोपदी अडेल, पदोपदी ठेच लागेल, आयुष्याचे परिमाणच बदलून जाईल.
अनेकदा सिंगल साईन ऑन असावे तसे एखाद्या नात्यात हा परवलीचा शब्द बाकी अनेक गोष्टी करतो. म्हणजे एखादवेळी "जाऊदे, सोडून दे" म्हणत सहज मनाने नात्यात एखादी गोष्ट विसरली, माफ करून टाकली तर अनेकदा पुढचा प्रवास सोपा सुकर होतो.

अनेकदा दुसऱ्यांनी वापरलेला असा एखादा परवलीचा शब्द जादू घडवतो. "मी आहे, काळजी करू नकोस". अनेकदा योग्य व्यक्तीकडून आलेला हा दिलासा जादू घडवतो. मनातून सारा भार हलका होतो आणि पंखात बळ येतं.

पासवर्ड ला जशी स्ट्रेन्थ असते तशी ती आयुष्याच्या पासवर्डला देखील असते. नुसती असतेच असे नाही तरी सकारात्त्मक किंवा नकारात्त्मक अशा परिणामासह ती असते. वर उल्लेखलेले परवलीचे शब्द जसे आयुष्य सोपे, सुकर, आनंदी करू पाहतात, तर "नाही म्हणजे नाही" , " मीच का?", "माझ्या नशिबातच नाही". सारे नकारात्मक प्रवाह असे परवलीचे शब्द निर्माण करत राहतात. दरवाजे बंद करायचे काम ते करतात. प्रत्येक वेळी त्यांच्या वापरासोबत आयुष्य त्याची लवचिकता हरवून बसते, सुखाचे क्षण पाहणे विसरते.

शब्दात परिणाम करण्याची खूप मोठी ताकद असते हे खरेच, स्वत:साठी किंवा अनेकदा दुसऱ्या व्यक्तींसाठी कोणते असे परवलीची शब्द वापरायचे हे शेवटी आपल्या हाती.