Saturday, February 9, 2013

एक धडा.............


दिवसाकाठी अनेक गोष्टी घडत असतात, त्या अनुभवतानाच या शब्दबद्ध कशा रीतीने करायच्या याचाही मनात विचार सुरू असतो. त्याप्रमाणे अनेकदा रात्री घरी आल्यावर मी लॅपटॉप उघडून बसते देखील, पण त्याच वेळी मनात लिहावे-नलिहावे याचे द्वंद्व सुरू असते. सद्ध्या तरी रोज "न लिहावे" याच बाजूने निकाल लागतोय. काय म्हणावे यास...आपल्याच कोषात जाणे? किती दिवस चालणार हे असे? डिसेंबर मधे मी एक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला, त्याचे पुढचे २ भागही एका दमात तेंव्हा लिहिले गेले होते, पण  ते पोस्ट करण्याची इच्छाच जणू मरून गेली. अनेक दिवसांत मी माझ्या स्वत:च्या "मी....माझे....मला" कडे बघितलेदेखील नाहीये. माझ्या बाकी सार्‍या ब्लॉग मित्र मैत्रीणींच्या ब्लॉगवर मी अधून मधून डोकवते देखील ... पण लिहीत मात्र नाहीये.

तशा मी रोजच्या रुटीनच्या बाकी सगळ्या गोष्टी करते, घराकडे लक्ष देते, नवरा लेकीशी गप्पा होतात, ऑफीसला जाते, जिमला जाते, चांगली गाणी ऐकते, गप्पा मारते, सभोवताली घडणार्‍या गोष्टींवर बोलते ही, मान्य की चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचं प्रमाण जास्त असते. रात्री घरी येऊन ठराविक कार्यक्रम टी.व्ही. वर पाहते, स्वत:बरोबर अनेक कडवट घटना नेहमीप्रमाणेच "जाऊ दे ना" म्हणत मागे टाकते. पण लिहीत मात्र नाहीये.

आज मी एक धडा शिकले. तो मात्र मी लिहिलाच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात" ....याच बाबतीतला एक धडा मी आज शिकलीय... आणि सकाळपासून तो माझ्या मनात घर करून आहे. आज मी गेले होते सकाळी एका गाण्याच्या वर्गाच्या एका कार्यक्रमाला. माझी लेक या क्लासला जाते. गेले काही दिवस त्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

कॉलेजला असताना माझ्या एका मैत्रीणीची बहीण होती, जी तेंव्हा संगीत घेऊन बी.ए. करत होती. अधूनमधून आम्ही भेटत असू, तिचं गाणं ही कधीतरी ऐकत असू. नंतर ती गाण्याचे कार्यक्रम करू लागली. अशाच कार्यक्रमांचे निवेदन उत्तम रीतीने करणार्‍या एका उमद्या तरुणाशी ओळख आणि नंतर प्रेमविवाह ही झाला. मधली काही वर्षे मी इथे नव्हते, काही वर्षांनी जेंव्हा परत आले, तेंव्हा या जोडीचे या शहरात चांगलेच नाव झालेले होते, एक दोन वेळा आमची भेट झाली देखील. संस्कृती लहान असताना जेंव्हा तिला गाणे शिकवायचा विचार आला तेंव्हा हिचेच नाव समोर आले, आणि त्याप्रमाणे संस्कृती तिच्याकडे गाणे शिकू लागली. त्या निमित्ताने आम्ही अधून मधून भेटू लागलो. पण पुन्हा काही कारणानी संस्कृतीचे गाणे थांबले, आणि आमच्या भेटीही.

सात आठ वर्षे मधे अशीच गेली. अजून एका मैत्रीणीच्या बोलण्यातून हिची खुशाली कळे. गेल्यावर्षी एप्रिलमधे एकदा दुपारी मैत्रीणीचा फोन आला "अनघा, "XXX"च्या मिस्टारांचा अपघात झालाय, आय.सी.यू.मधे आहेत ते" हे ऐकून थोडे सुन्न व्हायला झाले. नंतर थोड्याच वेळात भावाचा फोन आला, हीच बातमी सांगणारा. नंतरचे ३/४ दिवस या बद्दल मैत्रीण आणि भावाकडून त्यांच्या खालावत जाणार्‍या तब्येती बाबत. एक दिवस त्यांच्या जाण्याची बातमी आलीच. मैत्रीण आणि माझा भाऊ तिथेच होते. माझा आणि तिचा भाऊ हे गेली अनेक वर्ष चांगले मित्र आहेत. एकदा मनात विचार आला होता, तिला भेटायला जाण्याचा. पण का कोण जाणे तो मी टाळला, बरेच वर्ष काही संपर्क नसताना अशा प्रसंगी जाऊन काय बोलायचे. कोणाच्या शब्दांनी हलके व्हावे इतके लहानसे दु:ख नव्हते तिचे. चाळिशीत जोडीदार अचानक सोडून जातो, मागे त्याचे आई वडील, आपण आणि आपला मुलगा ठेवून ....तेंव्हा ते दु:ख काय असते हे मी माझ्या लहानपणी अनुभवलय. त्या नंतर काही दिवसांनी तिने गाण्याचे वर्ग पुन्हा सुरू केलेले पण मैत्रीणी कडून कळले. वाटले "बरे झाले, आता सावरेल थोडी." नंतर एकदा संस्कृतीने पुन्हा गाण्याचा विषय काढला आणि मी तिला फोन केला. तिच्याशी बोलले. दर्शनी तरी आता गाडी सावरलीये असे वाटून गेले. मध्यंतरी एकदा संस्कृतीला  मी मला गाणे शिकायचेय असे सांगितले, तिने तिच्या या ताईला सांगितले, निरोप आला "आईला म्हणावे, ये शनिवारी" मी म्हणाले "एवढे एक सर्टीफिकेशन आणि त्याची परीक्षा झाली की मग जायला लागेन"

आज सकाळी कार्यक्रमाच्या जागी पोहचले. आत शिरताच ती पुढे आली, आम्ही बोलू लागलो, आणि नकळत मला भरून येऊ लागले. स्वत:ला बर्‍यापैकी सावरत मी तिच्याशी बोलले. नंतर खुर्चीत जाऊन बसले आणि मग मात्र मी स्वत:ला थांबवू शकले नाही. तिच्या जोडीदाराच्या जाण्यानंतर तिने आयोजित केलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. त्याना श्रद्धांजली वाहिली गेली. कार्यक्रमाला सुरूवात झाली, आणि निवेदन करणार होता तिचा ११/१२ वर्षांचा सुपुत्र. थोडाफार त्यांच्याच स्टाईलने त्याने काहीकाळ निवेदनाची धूरा छानपैकी सांभाळली. पण माझे मात्र डोळे सुरुवातीचा थोडावेळ भरून वहात राहीले.

एकीकडे ती ज्या पद्धतीने या प्रसंगातून धीराने बाहेर येते आहे, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाला सावरते आहे, संभाळते आहे, लेकाला त्याच्या बाबांच्या मार्गावरून पुढे नेते आहे, कदाचित त्याच्या बाबांचेपण हेच स्वप्न असेल, हे बघून मला तिचे खूप कौतुक वाटत राहीले. त्या बरोबरच एकटीने हे सारे करण्याची वेळ नियतीने तिच्यावर आणली याचे वाईटही.
आणि धडा हा की "गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात". त्या क्षणी तिला सावरण्यास अनेक हात तिच्यापाशी होते, माझ्या तिला भेटायला जाण्याने तिला काही फरक पडला असता, नसता, माहीत नाही. मला मात्र नक्कीच पडला असता. माझ्या भावनांचा योग्यवेळी निचरा झाला असता, आमच्या ओळखीतून जे बंध निर्माण झाले होते त्यासाठी तरी मी तिला भेटायला जायला हवे होते. ती तिची नाही तरी गरज माझी होती. ती जर मी वेळीच ओळखली असती असे अवेळीच डोळे भरून येण्याची वेळ माझ्यावर आली नसती.

4 comments:

  1. :(.. सहमत !! अनेक गोष्टी निव्वळ आळसामुळे किंवा असंच काहीच कारण नसतानाही करायच्या राहून जातात :(

    ReplyDelete
  2. गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात....अगदी खरं, त्या प्रसंगी कोण येऊन गेलं नाही याचं भानही नसेल मैत्रीणीला पण तरीही नकळत नोंद होत असते आवर्जून येऊन गेलं त्याची. पण असंच तर शिकत असतो ना आपणही एकेक.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!