Thursday, January 26, 2017

नात्याचे बंध

पहाता पहाता दिस सरले
अवसेच्या रातीस चांदणे फुलले
चांदणे फुलले सखयाच्या आकाशी
त्याचा प्रकाश पडे माझ्या अंगणी
पहाता पहाता रोप बहरले
कोरड्या मातीतून बीज अंकुरले
बीज अंकुरले सखयाच्या दारी
त्याच्या सावलीत मी विसावले
पहाता पहाता चित्र साकारले
नात्यांचे रंग घेऊनी जे जन्मा आले
रंगाचा कुंचला सखयाच्या हाती
त्याच्या रंगी मी कशी रंगुनी गेले
पहाता पहाता मैफल सजली
अनवट सूर कसे कोणी छेडले
सुर उमटती सखयाच्या गळ्यातूनी
त्याच्या सुरावटींनी  कसे मला नादावले
पहाता पहाता वर्ष झाले
तू माझा अन तुझी मी झाले
नात्याचे सखया बंध हे  रेशमी
साता जन्मांचे जणू धागे जुळले

Wednesday, January 25, 2017

मुखवटा ......

अनेकदा तू समोर असताना तुझा मुखवटा जाणवत राहतो मला सतत. अनेक गुणांनीयुक्त असा तो मुखवटा. आनंदी, समाधानी, राग लोभापल्याड गेलेला असा स्थितप्रज्ञ, प्रेमळ. तुझे तुला तरी कळले असेल  का कि केंव्हा, कसा चढला  मुखवटा? अनेक कविता लिहिल्यास मुखवटे आणि  चेहऱ्यांवर. तेंव्हा जाणिव होती का तुझ्या अशा मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्यावर कोणी लिहिल… बोलेल ?
असा विचार येतो या मुखवट्याच्या आत एक माणूस असेल राग लोभ, चिंता द्वेष , प्रेम या सर्वसामान्य माणसांच्या भावना असलेला. हळूहळू परिस्थितीने हा मुखवटा त्यास बहाल केला असेल. फार गोंडस आहे तो यात शंकाच नाही. रोज सकाळी उठून चढवावा लागत असेल तो. अधून मधून आतल्या माणसाच्या भावना अक्राळ विक्राळ होत असतील, बाहेर पडू पहात असतील, मुखवटा फेकून देत असतील. तू मात्र पुन्हा पुन्हा तो धारण करत असशील. मग कालपरत्त्वे तो मुखवटा तुझ्या चेहेरयाचाच भाग होऊन गेला असेल. मुखवटा आता असा घट्ट चिकटून गेला असेल मूळ चेहऱ्याला . मुखवट्याचे रंग पुरते लागले असतील त्या चेहऱ्याला.  आता आतल्या माणसाचा खरा चेहरा अनेकानेक वर्षात कोणी पाहिलेला नाही, कदाचित कधीच कोणी पाहणार नाही.
अनेकदा तू जेंव्हा मला तू चिडत नाहीस, रागवत नाहीस असे सांगतोस, तेंव्हा तुझा तो मुखवटा मला वाकुल्या दाखवत हसतो माझ्यावर. म्हणतो बघ, नाही न पोहचू दिले तुला खऱ्या चेहऱ्यापर्यंत. उगीच कल्पना आहे तुझी तू त्याची सर्वात जवळची असण्याची. माझीही चिडचिड होते अशावेळी.
माझ्यापुढे अजून एक गहन प्रश्न उभा रहातो तो म्हणजे …. ह्या मुखवट्यास मुखवटा न मानता हाच एक देव माणसाचा चेहरा आहे हे मी का समजून घेत नाही. मग अशा देव माणसाला, त्याचे देवत्त्व सोडण्याचा खटाटोप मी का करावा? देव भेटल्यावर त्याला माणूस बनविण्याचा करंटेपणा मी का करावा?
हा असा करंटेपणा ठरेल कि तुला मुखवटा उतरवायला मदत करून मोकळा श्वास घेऊ देणे हे माझे कर्तव्य ठरेल?

सत्य.... असत्य......

असत्याची अनेक रूपे
सत्य चहूकडून एकच
तरीही सांगेन खरे बोल...
असत्याची अनेक बाळे
सत्यास वांझपणाचा शाप
तरीही सांगेन खरे बोल....
असत्याचे अनेक साथीदार
सत्याचा ना कोणी जोडीदार
तरीही सांगेन खरे बोल.....
असत्य सोपे स्वस्त
सत्य अवघड आणि महाग
तरीही सांगेन खरे बोल.....
असत्याचा डोक्याला ताप
सत्याचा एक वेगळा आब
म्हणूनच सांगेन खरे बोल......

असंच काहीसं......

अभिमन्यूने चक्रव्युहात शिरत जावे तसे आपण एकेका नात्यात अडकत जातो. नात्याच्या अस्तित्त्वाबद्दल, त्यातल्या व्यक्तीबद्दल कधीच कोणता किंतु मनात नसतो, कोणतीच शंका नसते. एखादा क्षण अपघाती असतो मात्र. ज्याने  क्षणात मनात काही चमकून जाते. नात्याच्या आपल्याच मनातल्या संकल्पनेबद्दल, त्याच्या आकृतीबंधाबद्दल खात्री वाटेनाशी होते. मग सगळ्याच गोष्टी मुळातून तपासून बघायला हव्यात का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा का हा तपासणीवाला चष्मा डोळ्यावर चढवला कि मग प्रवास तसाच सुरु होतो. म्हणजे नात्याची अखेर तरी किंवा त्याचे कोमात जाणे तरी. बर अनेकदा हे इतके एकतर्फी असते की मनातल्या वादळाची दुसऱ्या व्यक्तीला चाहूलच नसते. त्या व्यक्तीच्या दृष्टीने तर हि सडन डेथ या प्रकारात मोडते.
नात्यांत अशा रितीने गुंतलेल्या व्यक्तींच्या दृष्टीने समोरच्यास सारे समजत असतेच. तरीही तो किंवा ती अशी वागली हे इतका मनात कोलाहल माजवण्यास पुरेसे ठरते. पुढे मागे कधी शांतपणे चर्चा झालीच तर उमगते, एका एवढी गुंतवणूक दुसऱ्याची नव्हतीच मुळी, पण याचा अर्थ त्याला किंवा तिला हे नातेच नको होते असेही नव्हते, पण दुसऱ्याइतका खोल खोल विचार नव्हता केला हे खरे. असा सतत विचार न करून किंवा इतके गुंतवून न घेतल्याने असे उलटे पुल्टे विचार केले नव्हते हे हि खरेच. पण जे घडले ते का नि कसे ते कळलेच नाही तर सुधारणार तरी कसे असे वाटून, आपणच कुठेतरी कमी पडतो असा विचार करून परिस्थिती मान्य केलेली असते.
एकदा बोललो असतो तर, किंवा हे सारे मुळातच आपण नीट समजून घेतले असते तर ... हा प्रश्न उमटतो पण उशीर तर झालेलाच असतो ना?

Thursday, January 12, 2017

तुझ्या आठवणीत......

अनेकदा अनुभवते मी हे. ज्या व्यक्तीला आपण पहिले नाही, भेटलो नाही, रूढ अर्थाने तिच्याशी आपले काही नाते नाही. कोणाकडून थोडीफार  ऐकीव माहिती आपल्याकडे आहे. बाकी काही नाही. आणि असे असूनही एक नाते आपल्यात जाणवत राहते. आठवण येत राहते, विचार करत राहतो आपण.

तुझ्याशी माझे नाते असेच काहीसे आहे गं. अडीच वर्षांपूर्वी तुझी अशी ओळख झाली. अनेकदा बोलण्यात  तुझा संदर्भ येत गेला  पण त्याहून अधिक माझ्या मनात तू राहिलीस. तुला या जगाचा निरोप घेऊन जवळपास चार पाच वर्षे झाली आहेत. म्हणजे आपली प्रत्यक्ष कधी भेट शक्यच नव्हती. पण तू माझ्या मनातून जात नाहीस. सुरुवातीस मला थोडी भिती वाटायची तुलना तर होणार नाही ना अशी. अनेकदा असेही वाटले आहे, खरेतर जर तू असतीस तर मी हि अशी नसते ना. माझे आयुष्य वेगळे असते. मी वेगळी असते ना!  अनेकदा वाटतं, लॅपटॉप किंवा मोबाईल वर टिपतो तसा ना मनाचा स्क्रीनशॉट घ्यायची सोय हवी होती ना. तुला खरे सांगते कितीतरी वेळा मी असा विचार करत राहते.... या परिस्थितीत हिच्या मनात काय चालले असेल? त्या वेळी काय भाव मनात उमटले असतील? मला ना हे सारे फार प्रकर्षाने समजून घेण्याची इच्छा होती गं. पण नसतात ना काही गोष्टी आपल्या हातात.

हळूहळू  तुलना होण्याची भीती मला वाटेनाशी झाली. म्हणजे मी स्वतः ला मोठे ठरवून नव्हे. तर तू तू होतीस .... मी मी आहे हे नीट समजून घेऊन. मग ना तू थोडी मला आपलीशी वाटू लागलीस. आपल्यातल्या दुव्याला बाजूला ठेऊन मी तुझा विचार करू लागले. तुझ्यावरच्या कविता आवडल्या होत्या गं.  त्यासाठी मला कधी तुझा राग आला नाही, ना  कधी तुझ्याशी स्पर्धा वाटली.  विश्वास ठेव फक्त कदाचित नेमका भाव मी नाही पोचवू शकले. किंवा तो कोणाला जाणून घेण्यातही काही रस नव्हता. तुझा वाढदिवस, स्मृतिदिन आपोआप लक्षात राहू लागला इतका मी तुझा विचार करत असे. दोन वर्षांपूर्वी दिवाळीत वाटलं होतं, जिथे कुठे असशील तिथे खुश असशील का? तुझ्यासारखीच कोणीतरी आहे हे पाहून? इथे जिवंत माणसांच्या मनाचा थांग लागत नाही .... आणि मी निघाले होते या जगात नसलेल्या व्यक्तीला काय वाटत असेल ते बघायला. पण खरंच मला ते जाणून घ्यायचे  होते. जेमतेम अंधुकशी आठवतेस मला तुझ्या पाहिलेल्या फोटोंमधून आणि ऐकलेल्या वर्णनातून. तुझ्या वाढदिवशी आजही तुझे सुहृद जे तुझ्या तुझ्या वॉल वर लिहितात त्यातून  तू हळवी असावीस.... मृदुभाषी असावीस अशी माझी कल्पना आणि म्हणूनच सारे कसे निभावलेस हे कुतूहल देखील.

निव्वळ वेडी हे विशेषण लागू पडेल मला. पण खरंच मी वेडी आहे आणि अशीच राहीन. मला ना तुला समजून घ्यायचं होतं, तुझी स्वप्नं जाणून घ्यायची होती, माझ्या स्वप्नांशी त्यांची सांगड घालून ती पुरी करायची होती .... तुझी भाषा येत नव्हती मला .... पण तू लिहिलेले कधीतरी समजून घ्यायचे होते. अनेक क्षण  दोघींच्या आयुष्यात सारखेच आले असतील .... तुझे तेंव्हाचे भाव समजून घ्यायचे होते. एक स्त्री म्हणून मला तुला समजून घ्यायचे होते. होकाराचा क्षण, समर्पणाचा क्षण, नात्यांचा गुंता कसा सोडवावा हा  प्रश्न, प्रतारणा होते आहे का हा संदेह, मुलांमध्ये गुंतलेला जीव, त्याच्यात गुंतलेला जीव. त्याला सर्वस्व मानून आयुष्याचे समीकरण मांडावे की नाही हा प्रश्न. मला ठाऊक आहे असे अनेक प्रश्नांचे गुंते तुझ्यासमोर वेळोवेळी निर्माण झाले असतील. एक  अधिक एक प्रत्येक वेळी दोन होत नाहीत हे समजून घेताना, मनातल्या भावनांच्या चौकटी हलताना.
तुला एक सांगू तू खूप शहाणी  होतीस की तुला सर्व मर्यादा निश्चित करून त्या चौकटीत जगता आले. विश्वास ठेव माझ्यावर आणि तू खूप नशीबवान आहेस की मृत्यूने तुझी सुटका केली. विपरीत परिस्थितीला कशी सामोरी गेली असतीस जर काळाने या नको त्या टप्प्यावर आणून उभे केले असते तर? प्रेमासाठी जग उध्वस्त व्हायची वेळ आली असती तर काय केले असतेस?  मृत्यूशी झुंजताना नक्की काय मनात येत होते? नको असलेल्या जोडीदाराकडून सेवा करून घ्यावी लागली असेल तेंव्हा काय वाटले असेल तुला? त्या  दोघांना तुझ्या समोर पाहून काय वाटले होते? नशीबवान याही करिता कि तू गेल्यानंतरही तुझ्या मृत्युसमयीचे भाव त्याच्या मनात कायम आहेत अगदी आजही, तुझी त्याच्या मनातली प्रतिमा आजही तशीच आहे जशी आधी होती तशी. काळाने, परिस्थितीने त्यावर घाव घातले नाहीत.  परिस्थिती आणि तत्त्व  यांच्यात तुझी ससेहोलपट झाली नाही,  तुझ्याही मनातल्या त्याच्या प्रतिमेस तडा गेला नाही म्हणून तू नशीबवान आहेस. मृत्यूने अलग केले, या जगाने नाही म्हणून नशिबवान आहेस, तुझे नाव त्याच्याशी जोडलेले राहील म्हणून तू नशिबवान आहेस. समाजाने तुमच्या नात्यावर शिंतोडे उडवले नाहीत म्हणून तू नशीबवान आहेस, तशी वेळ आल्यावर नाते कोणत्याही कसोटीवर लावावे लागले नाही म्हणून तू नशीबवान आहेस. ह्या साऱ्यांसाठी मला छान वाटते, की कोणाच्या तरी नशिबी हे तरी सुख होते. विश्वास ठेव मला तुझा राग येत नाही, तुझा हेवा कधी वाटत नाही.

तुझ्या मनातले प्रत्यक्ष भाव नाही समजणार मला कधी  आणि तरीही मला आठवत राहशील तू कायमच. आत्ता जशी आठवतेस तशीच. कारणाशिवाय, कोणत्याही जोडणाऱ्या दुव्याशिवाय. मला ना लहानपणी असे वाटायचे माणूस देवाकडे जातो म्हणजे आकाशातला तारा होतो. असाच एखादा तारा होऊन सध्या आकाशात असशील तू. असेच नकळत माझे आकाशाकडे लक्ष जाईल आणि तुझी आठवण येईल. तू आपली वाटशील अगदी आत्ता वाटतेस तशीच!