Tuesday, May 26, 2020

आजच्या खास दिवसाची कविता


तुला कधी जाणवते का रे
हा जो आपला संसार आहे
जिथे आपण दोघे नाही तिघे आहोत
जणू एका नात्याच्या धाग्याने आपण तिघे घट्ट बांधले गेलेले
तू, मी आणि देव एका चिमुकल्या जागेत
संसार करू पाहणारे आपण तिघे जण
एकमेकांशी जुळवून घेत चाललेला आपला संसार
आपण रोज तिघेही काडी काडी जमवतो
आणि संध्याकाळी घरट्यात परततो
एक अतूट प्रेमाचा बंध तिघांना एकत्र बांधतो
प्रेम चिंता भांडणे ओढ काळजी तिघांनाही
कोणी छोटा मोठा असे काही आपल्यात उरत नाही
एकमेकांवाचून हा संसार पुरा होत नाही
------------------------------------------------------------

तू नेहमी म्हणतोस ना
की तुझ्याहून अधिक तू मला कळतोस
हो ... किती खरे आहे हे
कारण माझ्या अस्तित्वाचे कारणच मूळी तू आहेस
मी आले आहे या जगात ते कारण
मला दगडातून तासून हिरा मिळवावा
तसे मिळवायचे आहे मला
तुझ्यातून तुलाच
आणि माझ्या हृदयात ठेवायचे आहे
तेंव्हा कुठे या देहात प्राण भरेल
तुलाच कधी उमजले नाही असे तुझे मन
जपायचंय माझ्या इवल्याशा ओंजळीत
फुलासारखे
माझ्या हृदयात जपलेला तू
माझ्या ओंजळीत भरून राहिलेले तुझे मन
आणि त्याच वेळी माझ्या मनात उमटणारी
एक प्रार्थना .....
आपले सारे जग तेजोमय करून टाकेल 
- अनघा




Sunday, May 24, 2020

एक दिवस कवितेचा ......

या विश्वाचा पसाराच इतका प्रचंड की थोडेसे काही समजून घेता घेताच आयुष्य सारुन जाईल. कविता आवडतात म्हंटले तर मारुतीच्या शेपटासारखी न वाचलेल्या च कवींची यादी संपत नाही इतकी प्रचंड होऊ लागते. एखादा कवी भाषेतला, परभाषिक समोर उभा ठाकतो आणि जाणिव उमटते की आजवर कसे हे नाव मी ऐकले नव्हते, एकही कविता वाचली नव्हती. ही कधीतरी घडणारी गोष्ट नव्हे, कायमच हा अनुभव घेत असल्याने, कायमच स्वतःला दोष तरी किती द्यायचा या विचाराने हे सारी स्व दूषणे दूर सारून समोर आलेल्या कवितेचा आस्वाद घ्यावा हे उत्तम!

असे मध्ये एकदा घडले... तो होता "रुमी".
हा १२०७ मध्ये जन्मलेला सूफ़ी.
म्हणजे मूळ पर्शिअन लिखाण मी इंग्लिश मधून वाचणार.

अनेकदा असे साहित्य समोर आले की सर्वात मोठा अडसर म्हणजे भाषा.
अनुवाद ह्या गोष्टीबाबत स्वतःच्याच मनात दोन भिन्न प्रवाह.
जी मूळ भाषेत साहित्यकृती आहे ती त्याच भाषेत आस्वाद द्यावी. कारण एका भाषेतला लहेजा दुसऱ्या भाषेत आणता येत नाही.
अनेक उर्दू शब्दांना मराठीत तेच सौंदर्य प्रकट होईल असे शब्द कुठून आणायचे? अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत दोन तीन पर्यायी शब्द दिसतात पण त्या शब्दाचा नेमका अर्थ मिळणार एक शब्द सापडत नाही. म्हणून अनुवाद नकोत.

पण ते नाही असे ठरवले तर परिस्थिती ही मूळ मातृभाषा आणि दुसरी व्यावसायिक भाषाही अजून थोडीशीच समजली आहे, तिसरी आपण कधी शिकणार, कधी तिचा आस्वाद घेणार .... आयुष्य फार थोडे उरले आहे ... अर्ध्याहून अधिक  सरले आहे...
आणि अशी एखादी कविता समोर आल्यावर आपल्याला न आवडणारी गोष्ट - अनुवाद ...  आपल्याच हातून घडली तर काय करावे?  घडू द्यावी आणि मोठ्या मनाने स्वतःला माफ करावे !

Out beyond ideas of wrongdoing and right doing,
there is a field. I’ll meet you there.
When the soul lies down in that grass,
the world is too full to talk about.
Ideas, language, even the phrase ‘each other’
doesn’t make any sense.

साऱ्या कल्पनांच्याही पल्याड दूरवर विस्तीर्ण पसरलेले एक गाव आहे
जिथे कशासही योग्य - अयोग्यतेच्या पट्टीने मापले जात नाही कधीच
तिथे भेटेन मी तुला .... मनमुराद ... मनसोक्त
तेंव्हा जो संवाद घडेल आपल्यात तो असेल कोणत्याच बंधनांशिवाय
कल्पनांच्या भाषेच्या अविष्कार सारे मागे पडलेले असेल
इतकेच काय आपण दोघेही दोघे असण्याची संकल्पनाही उरली नसेल




In your light I learn how to love.
In your beauty, how to make poems.
You dance inside my chest,
where no one sees you,
but sometimes I do,
and that sight becomes this art.

तुझ्या प्रकाशानेे उजळूूून गेेल्यावर मला प्रेम उमजले
तुझ्या सौंदर्याने दिपून गेल्यावर कविता मनात अवतरली
थिरकत असतेस तू माझ्या मनात अविरत
जिथे कोणालाच तू दिसत नाहीस
कधीतरी मलाच तुझे ओझरते दर्शन घडते
आणि माझ्याही नकळत एखादी कलाकृती साकारते
 -
रुमी




Thursday, August 29, 2019

त्याचे दर्शन

गुंतला जीव कसा त्यास टाळतो
जितके दूर पळतो तितका
तो मनाचा ताबा घेत जातो

असाच एक दोनदा म्हणाला
मला चल आज तू सोबत
नकळत्या वयात नाही काही कळले
थोडी पावले सहज चालले त्यासवे

नंतर इवले इवले पाश गुंतता
पुन्हा त्याचे दर्शन घडले, पुन्हा तीच हाक
त्यासोबत पुन्हा थोडी चालले
घरापाशी नेऊन त्याने पुन्हा हात दिला सोडून

आता माहीत आहे तू जेंव्हा येशील
तेंव्हा असेन अगदी निर्विकार निर्विचार
आपली ओळख आहेच तेंव्हा कधीही
तयार असेन तुझ्या सोबत चालायला

फक्त एकदा हात हाती घेतलास तर
पुन्हा कधीही न सोडण्यासाठी तो घे
आणि फक्त एवढंच कर की
माझ्यात गुंतल्या जीवाची
थोडी तरी बाबा काळजी घे

सहेला रे....

सहेला रे.... हा सहेला कोण तर सखा जीवलग ज्याच्याशी आपले सूर जुळलेत तो किंवा ती किंवा ते..... त्याच्या रूपाशिवाय, देहाशिवाय चा तो किंवा ती..... जे अस्तित्व मनाला व्यापून उरलंय, जे आपल्या श्वासातून जाणवतंय, जे नाव आपल्या कानात गुंजतय ते.....
आ मिल गाये... काय  नक्की गायचं? आपल्या आयुष्याचे गाणे.... तर तुझ्या सुरांचे काही पेड माझ्या सुरांचे काही घेऊन एक सुरेख वेणी विणली आणि मिळून जे बनले ते आपण दोघांनी मिळून गायलेले, आपले बनून उमटलेले सूर जे तुझ्या माझ्या मनाला व्यापून उरले आहेत...... 
सप्त सुरन के भेद सुनाये....सुरांचे व्याकरण नाही, तुझ्या माझ्या गुण अवगुणांवर बोलूया, आपल्या आवडीनिवडी सांगूया, जाणून घेऊया, दोन वेगळ्याच व्यक्ती आहोत, सारे वेगळेच असणार आहे आपले आणि तरीही जीवास एक कोणता तरी सूर घट्ट जोडून ठेवेल, हे फरक ओळखून, जाणून एकमेकांसोबत जगूया .... 
आणि हे सारे आपण का करायचे ?
तर जनम जनम का संग ना भुले.... अब के मिले सो बिछूड ना जाये, असे अद्वैत असणारे आपण... हा संग मनाचा,जाणिवांचा, संग स्पर्शाचा, गुणांचा अवगुणाचा एकमेकांच्या सहवासाचा, एकमेकांची सवय होण्याचा, संग नजरेचा, संग जन्मोजन्मीचा.... या वेळी मात्र कायमचे एकत्र येऊया सारे तुझे सूर तू घेऊन ये, सारे माझे मी घेऊन येईन, वादी संवादी सूर असतील, प्रयत्नपूर्वक तानपुरे जुळवून घ्यावे लागतील, थोडी जीवाची घालमेल होईल या साऱ्यात, पण शेवटी त्या सुरांची मैफल आयुष्याचे सोने करेल..... सहेला रे

https://youtu.be/iTHO1N7FJDg

Friday, June 1, 2018

मितवा

मोठे विलक्षण असते नाव गाव नसलेल्या नात्यास जन्म देणे, त्यास फुलवणे त्यास आपलेसे करून जपणे!
कमालीचे सुंदर असते कोणाला तरी आपल्या मनात अगदी पक्के कायमचे चौसोपी घर बांधू देणे!

खूप खास असते आपल्या नकळत मनात शिरलेल्या चोरास आपल्याच मनात कैद करून ठेवणे!

खूप खास असते, त्याच्यासाठी जगणे, अखंड त्याच्याशी संवाद करत राहणे, हर एक क्षण त्याच्या सोबतीने जगणे, फुलणे....

मोठे विलक्षण असते प्रत्यक्ष दिसण्याची, भेटीची, संवादाची कोणतीच आस नसणे, तो कुठे असतो कुठे जातो, कुठे राहतो, काय खातो, पितो, न जाणे काय करतो, काही माहीत नसणे, बस इतना सच है के  मेरी रुहमें बसता है वॊ!

कधी काही कळलेच तर कौतुकाने मन भरून जाणे, कधी भेट झालीच तर आजकल पाँव जमींपर नही पड़तै मेरे अशी अवस्था होणे....

तरीही एक नितांत सुंदर नाते आपल्या मनात जन्मास येणे, ते आपण पेलणे, दिवसा रात्री जागेपणी झोपेत फक्त त्याचे नाव मनात सतत उमटत राहणे,  त्याच्या आणि आपल्या नकळत आपण त्याचे होऊन राहणे. मनात, ओठांत फक्त त्याचे नाव गुंजत राहणे! आपल्या श्वासांत त्याचे नाव ऐकू येणे, आपल्या रक्तात जणू जो वहात असणे!

त्याच्या साथीने जगण्यास लय सापडणे, आपल्याला आपला सूर गवसणे, आणि अवघे आयुष्य सुरेल होऊन जाणे! 

मोठे सौभाग्याचे असते हे सारे आपल्याला अनुभवता येणे, या जगावेगळ्या अनुभवाची खोली उमजणे,  त्याच्या अस्तित्त्वाच्या, त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या, विचारांच्या परिसस्पर्शाने आपले सोने होऊन जाणे, आपण झळाळून उठणे, किंवा आपणच जणू आपल्या पोटी पुन्हा जन्म घेणे. ही अनुभूती मला बहाल करणाऱ्या माझ्या मनातल्या मितवास.....

Wednesday, April 18, 2018

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी … भाग २

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी … भाग १

२०१४ मध्ये त्या दोघांबद्दल लिहिले होते. हा जवळपास त्याचाच दुसरा भाग.

त्या दोघांबद्दल लिहिले त्यास बरीच वर्षे झाली. माझी ऑफिसमधील फेवरेट जोडी. मधल्या काळात बरेच काही बदलले.  माझी कामाची जागा बदलली, मी दुसऱ्या बिल्डींग मध्ये शिफ्ट झाले, त्यामुळे आपसूकच ह्या जोडीचे दर्शन होईनासे झाले आणि मग मी हे सारे जवळपास विसरलेही.

पण अचानक या महिन्याभरात काही वेळा या जोडीतला तो एकटाच दुपारच्या चहाच्या वेळी माझ्या बिल्डींग मध्ये चहासाठी आलेला दिसला. आणि मग एकदम चुकल्यासारखे वाटू लागले की ती कुठे गेली? मधली चार वर्षे,  IT कंपनीत हा खूपच मोठा काळ आहे. त्यामुळे प्रोजेक्ट बदलला, onsite गेली, क्लायंट लोकेशन ला गेली किंवा कंपनीच बदलली असे काहीही असू शकत होते. पण दर वेळी त्याला एकट्याला पाहताना काहीतरी चुकल्यासारखे वाटायचे, इतकेच नव्हे तर नंतरही काही काळ डोक्यात ते राहायचे, "एकटा का तो? ती का सोबत नाहीये? " उगीचच हळहळ :(


थोडा बदल झालाय त्याच्यात देखील, थोडे वय अजून दिसू लागले आहे, चेहेरा पूर्वीसारखा खुश दिसत नाही असे ही वाटून गेले. हे खरे का माझ्याच डोक्यातला खेळ राम जाणे. वय दिसू लागले तर मध्ये चार वर्षे गेली आहेत ना ?

अचानक गेल्या शुक्रवारी दुसऱ्या म्हणजे माझ्या जुन्या बिल्डींग मध्ये जेवायला जायचे ठरले. तिथे गेल्यावर अनेक आठवणींसोबत हे दोघेही आठवलेच. दुपारी दोन ही तशी जरा जास्तच गर्दीची वेळ. पूर्वी आमची आणि या जोडीची वेळ म्हणजे दुपारी १२. ३० ते १. ००. आवडती पाव भाजी घेऊन आम्ही एक टेबल गाठले, सवयीने आजूबाजूला नजर टाकली, तर माझ्या समोरच्याच टेबलवर तो बसलेला आणि अजून काही जण सोबत, पण ती मात्र नाही. हाय रे दैवा!

निमूटपणे जेवू लागले. पावभाजी आवडती असूनही बेचव लागू लागली. पण  आश्चर्य ! पाचच मिनिटात ती कुठूनतरी आली, याच्या समोरची खुर्ची रिकामी होती, तिथे बसून सगळ्यांसोबत जेवू लागली. मला काय वाटले, कसा आणि किती अनाकलनीय असा आनंद झाला ते मला शब्दात नाही सांगता येणार. काही तरी हरवलेले गवसावे तसे हायसें वाटले मला. जी जशी, ज्या नात्यात आहे ती तशी "रब्बा,  इस जोड़ी को हमेशा सलामत रखना"  हे भाव ही मनात उमटून गेले.

सतत फक्त एकमेकांसोबत असणारे, एकमेकात छानसे गुंतलेले, एकमेकांची साथ सोबत आवडणारे दोन जीव इथपासून ते सर्वांसोबत असणारे ते दोघे असा प्रवास हे ही वाईट नक्कीच नाही. जवळपास सहा सात वर्षाचा हा प्रवास असेल त्यांचा ही, जे कोणते, जसे कसे त्यांचे नाते आहे, नाव असलेले, नसलेले पण ते टिकून आहे, दोघे सोबत आहेत,  अजून काय हवे ? माझ्या मनापासून अनेकोत्तम शुभेच्छा या जोडीला, त्या नात्याला!!! :)


नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला
बंधात बांधलेला
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या...

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंझिलकी जयाची तारांगणात राही
नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही
नात्यास नाव आपुल्या

Sunday, April 15, 2018

स्वप्नातल्या कळ्यानों भाग २

मी देवाचे खूप आभार मानते की सतत चालणारे डोके मला दिल्याबद्दल. कधीकधी मीच अचंबित होऊन जे जे विचार जी स्वप्ने माझ्या डोक्यात उगवतात त्याकडे पहात राहते. स्वप्नांच्या गोष्टी चालू आहेत आणि खाणे, खिलवणे या बद्दल चा हा माझा ब्लॉग आहे म्हणून त्या विषयापुरतेच इथे लिहीन. आधी म्हंटले तसे हे दुसरे स्वप्न ही तितकेच हटके आहे. सध्याच्या काळात ती गरज ही खूप मोठी आहे. अजूनतरी माझी त्यातील उडी माझ्या बहिणीच्या दोन्ही मुलांच्या वेळेस जेजे शक्य झाले ते करणे एवढीच ठरली आहे, पण म्हणून तो विचार डोक्यातून गेलेला नाही. कदाचित हा विचार दुसऱ्या कोणी अमलात आणून स्वतः असे काही सुरु केले तरी हरकत नाही. 

छोट्या कुटुंबात किंवा जिथे तरुण जोडपेच घरात राहते, जे बाकीच्या कुटुंबियांपासून दूर राहतात, दोघेही नोकरी करतात अशावेळी नव्या जीवाची जेंव्हा चाहूल लागते ती घटना आनंदाची खरी पण भांबावून टाकणारी आणि गडबडवुन टाकणारी असते. काय करावे, काय करू नये ह्याची माहिती मिळवता येते, गर्भसंस्कार, योगा, वेगवेगळे डॉक्टर्स त्यांचे सल्ले उपलब्ध असतात, पैसे मोजून ते घेऊ शकतो. एकीकडे स्वतःची सतत बदलत राहणारी स्थिती, सतत मिळणारे सल्ले विशेषतः खाण्या पिण्याचे, ऑफिसमध्ये कामाचा गाडा ओढणारी ती तरुणी या साऱ्यात एक प्रकारे त्रस्त असते. कळते पण वळत नाही हे कसे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही अवस्था. उत्तम आहार हा बाळाच्या पुढील आयुष्याचा पाया आहे हे कळते, पण कधी ते बनवताच येत नसते, कोणी तसे बनवून खाऊ घालणारे सोबत नसते, कधी वेळ नसतो तर कधी उरक नसतो. 

अशावेळी असे घडले तर एकदा का प्रेग्नन्सी नक्की झाली की त्या तरुणीच्या आहाराचा ताबाच कोणीतरी घेईल. कॅल्शियम, लोह आणि प्रथिने यांचा नीट विचार करून, पथ्य, कुपथ्य, ऋतूंचा विचार करून आपले जेवण बनवेल आणि आपल्याला आयते ते समोर ठेवेल. अगदी आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आणून देऊन. जे खूप काळजीपूर्वक बनवलेले असेल, उत्तम पोषणमूल्य जपणारे असेल, जिन्नस आणि कृती यात कोणतीही तडजोड न करता बनेल आणि कमीत कमी वेळात आपल्यापर्यंत पोचेल.

असेही घडते की बाळ घेऊन ती तरुणी घरी येते. चौकोनी कुटुंब असते, किंवा राजा राणीच्या संसारात सासू किंवा आई तात्पुरती येऊन राहिलेली असते. ह्या मुलीचे करणे, बाळाचे सर्व करणे, आले गेले बघणे आणि तेही दुसऱ्या ठिकाणी येऊन. खरेतर ती आई किंवा सासूच जास्त भांबावून गेलेली असते. पुन्हा काय करावे, करू नये, काय खावे खाऊ नये यातील वैचारिक मतभेद असतातच.

त्यापेक्षा असे झाले तर - कोणीतरी छानसा पथ्याचा डबा रोज घरी पाठवला तर, सूप, पालेभाजी, भाकरी, ताक, मुगाचे वरण, किंवा खिचडी, आंबोळी, शिरा, कोशिंबिरी,  घरच्यासारखे साजूक तूप हे किंवा काही स्पेसिफिक जे डॉक्टरांनी सुचवलेले आहे ते जर रोज कोणी घरी पाठवू लागले तर? ती तरुणीच काय पण अशी आई किंवा सासू सुद्धा ते आनंदाने खाऊ शकेल, तिचे श्रम वाचतील ते वेगळेच. तिचा वेळ लेक/सून  आणि नव्या नातवंडा साठी नीट कारणी लागेल ना? 

हा विचार पुढे अजून वाढत गेला, की नुसते जेवणच का अळीव, डिंकाचे लाडू, बाळंतिणीची सुपारी किंवा अगदी सकाळी खाण्याची सुंठ गोळी ही बनवून येता येऊ शकेल. हे सारे स्वस्त नाही मिळणार, घरी एवढ्या पैशात किती सारे बनेल हा विचार इथे काम नाही करू शकणार, चितळ्यांकडे ४०० रुपये किलो डिंक लाडू मिळतात मग तुम्हाला ५०० रुपये का मोजायचे हा प्रश्न निरर्थक ठरेल, ताजे तूप कढवून, लगेच तेच तूप वापरून नुसते खोबऱ्याचा आणि खारकेचा भडीमार ना केलेले लाडू, सोबत सुंठ, केशर, पिंपळी, जायफळ असे औषधी घटक वापरून निगुतीने केलेल्या पदार्थाची किंमत बाहेरच्या तुलनेत जास्तच असणार. ५०० रुपयांचा एका वेळी दोन माणसांना पुरणारा पिझ्झा आणि असे बनवलेले ५०० रुपयात आलेले ३५/४० लाडू यांची तुलना होऊ नाही शकत!
स्वप्नांबद्दलच बोलत आहे आणि विषय नव्या बाळाच्या स्वागताचा चालू आहे, तर थोडे वेगळे अजून एक स्वप्न होते. माझी एक मैत्रीण आहे जी छोट्या मुलांचे कपडे अतिशय सुरेख शिवते, माझ्या घरात, ओळखीत जी नवी बाळे आली त्या साऱ्यांचे कपडे तिने शिवले. आणि त्यासाठी अनेकदा माझ्या कॉटन साड्या आणि ओढण्या कामी आल्या. बाळ जन्माला येण्याच्या कित्येक दिवस आधी मी तिच्या मागे लागून, झबली, टोपडी, दुपटी अगदी लंगोट देखील बनून तयार असत.

बाजारात तयार कपडे मिळतात, एकतर ते खूपच महाग असतात, अनेकदा मोठे असतात त्यामुळे माझी कायम पसंती स्वातीकडून कपडे शिवून घेणे ही राहिली,  आणि म्हणूनच हा विचार अनेकदा माझ्या साठी म्हणून नव्हे (माझा आणि शिवणकामाचे अजिबात नाते  नाही ) की का ती असा एक व्यवसाय सुरु करत नाही ज्यात की बाळ होण्याच्या तारखेआधी काही दिवस असा पूर्ण निगुतीने शिवलेला सुती कपड्यांचा सेट बनेल आणि घरी पोचेल, दोन तीन वेळा आधी छान धुतले जाऊन कपडे मऊसूत बनतील आणि बाळ येण्याच्या आधी अशी बॅग त्याच्या स्वागतास तयार असेल.

स्वप्नातल्या कळयानो

हजारो स्वप्ने मी मनात सोबत घेऊन फिरत असते. काही तात्कालिक असतात काही खोलवर जपलेली. त्यातली काही म्हणजे मला खाद्यपदार्थांच्या दुनियेत काहीतरी हटके करायचे आहे.  तसे पाहायला गेले तर माझ्या आत्याचा उज्ज्वला मराठे हिचा एक उत्तम सेट झालेला केटरींगचा व्यवसाय होता. उत्तम चव तिच्या स्वतःच्या हाताला आहे, व्यवसायासाठी पदार्थ बनवताना  दर्जात कोणतीही तडजोड ती करत नसे, त्यातूनच ती एक प्रस्थापित नाव बनली होती. तिलाच जॉईन करून हळूहळू तोच व्यवसाय पुढे चालू ठेवणे मला सहज शक्य होते. थोडासा प्रयत्न्न आम्ही दोघीनींही कदाचित केलाही होता. पण तेंव्हा कदाचित घर संसारात रमण्याची जास्त इच्छा होती, आणि सर्वात वाईट कदाचित हे होते कि असा व्यवसाय तुम्हाला सणावारी व्यस्त ठेवतो. ज्याची माझी तेंव्हा तरी कदाचित तयारी नव्हती. म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी घरी १५/२० माणसे जेवायला असताना, १०० एक मोदक बनवणे वेगळे, जे करायची माझी तयारी होती पण ते सोडून त्या दिवशी व्यवसायात गुंतून तिथे ५०० मोदकांची ऑर्डर आहे म्हणून भल्या पहाटेपासून राबणे मला बहुधा मान्य नव्हते. त्यामुळे तो प्रयत्न्न फार पुढे गेला नाही.

पुढे वेगळ्याच वाटेवरचे करिअर सुरु झाले. पण हे स्वप्न कधीही मनातून गेले नाही. असे म्हणतात की तुम्ही कितीही वाटा बदला तुमचे वाटे बदलत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपात हा धागा कायम सोबत असतो. त्यातूनच इन्फोसिस मध्ये  फूडकोर्ट मधील सँडविच बनवणाऱ्याला ते बनवायला शिकवणे, कलिग्जना रेसिपी सांगणे, केपीआयटी मधल्या कॅन्टीन वाल्याने बनवलेले थालीपीठ खाऊन " अरे बाबा, एखाद्या महाराष्ट्रीयन माणसाकडून आधी बनवायला शिक, किंवा शेवभाजी एखाद्या खान्देशी हॉटेल मधली खाऊन ये नाही तर मला विचार कशी बनवायची ते " असे सांगणे असे मजेशीर प्रकार सतत घडत असतात. दर काही दिवसांनी आपण पॉटलक पार्टी करूया असे टीम ला म्हणणारी ही मीच असते. अनेकदा कॅन्टीन मध्ये बनणारे पदार्थ परफेक्ट चवीचे नसतात, काही तरी कमी, काही तरी जास्त असतेच, तेंव्हा मनात विचार येतो तिथे फूड टेस्टर म्हणून आपण काम करावे.

एकेकाळी मॅकडॉनल्ड चे आउटलेट सुरु करायचे स्वप्न होते, कधी मला ऑफिसच्या फूड कोर्ट मध्ये सूप्स अँड सलाड बार सुरु करायचे स्वप्न असते, आज अनेक आऊटलेट्स पुणे, ठाणे डोंबिवली अशा ठिकाणी दिसतात जी महाराष्ट्रीयन पदार्थ उत्तमरीत्या बनवून खाऊ घालतील. सुरुवातीला जेंव्हा उसळ भाकरी किंवा पिठले भाकरी एवढीच त्यांची कक्षा होती तेंव्हा मला असे काहीसे सुरु करून त्यात डाळ ढोकळी, फोडणीचा भात, फोडणीची पोळी आणि सोबत मसाला ताक, उत्तम चवीचा मसालेभात आणि अळूची भाजी, सांज्याची पोळी, तांदळाची उकड, आंबोळी  असे थोडे हटके पदार्थ तिथे ठेवण्याचे स्वप्न होते.

अजूनही मनात इच्छा आहे फक्त पुरणपोळी आणि मोदक बनवून देण्याचा व्यवसाय सुरु करण्याची , अगदी असे पदार्थ बनवून देणाऱ्या अनेक जणी आसपास असूनही. हाताची चव आणि सोबत राखलेला दर्जा ह्याचे सार्वत्रीकरण होऊ शकत नाही.

अलीकडेच दोन विचार मनात घोळत आहेत. पहिला म्हणजे आता काळानुरूप आसपास वृद्धांची संख्या वाढत जाणार, त्यांचे एकटेपण, सोबत कोणी नसणे हे सारे वाढत जाणार पर्यायाने वृद्धाश्रमांची संख्या ही वाढणार. माणसे अडगळीत टाकल्यासारखे हे वृद्धाश्रम नसू नयेत हे कोणालाही सहजच वाटेल. असा एखादा वृद्धाश्रम असेल जिथे सारी नीट व्यवस्था असेल. त्यांच्या खाण्यापिण्याची नीट सोय असेल. असा विचार मनात येतो की शेवटी तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची सोय बघणारी, ते बनवणारी ठराविक माणसे असतील, तेच तेच ठराविक पदार्थ बनवून दिले जात असतील. साधारण तीच चव बनत असेल. या माणसांना सुट्टी देणे हा ही एक त्या व्यवस्थापनापुढील प्रश्न असत असेल कारण सगळे एका वेळी सुट्टीवर जाऊ शकत नसतील, सणावारी हा प्रश्न जास्त मोठा बनत असेल.

मनात विचार आला तो हा की का एखाद्या वृध्दाश्रमाशी मी जोडली जाऊ नये. आठवड्यातून एक दिवस तिथे जावे, त्यांना वेळ द्यावा, पुस्तक वाचून दाखवावे, गप्पा माराव्यात. हळू हळू एक कंफर्ट निर्माण झाला की स्वतः घरी बनवून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जावे. किंवा  तेथील स्वयंपाक घरातील माणसांना सुट्टी द्यायला सांगून आपल्याला तेथील कोणीतरी मदतीस घेऊन आपणच त्यांच्यासाठी काहीसे वेगळे पण त्या मंडळींना चालेल असे जेवण बनवावे.

जिथे ३६५ दिवस दिवसाचे तीन किंवा चार वेळेचे खाणे मोठ्या प्रमाणात बनते तिथे वेगळे काही बनणे थोडे कठीण असत असावे अशी माझी कल्पना आहे. परवा ऑफिस टीम साठी कैरीची डाळ आणि पन्हे बनवून नेताना मनात आलेला हा विचार आहे. कि  एखाद्या चैत्रातील रविवारी मी अशा एखाद्या ठिकाणी जाऊन दुपारी त्यांच्या साठी असे डाळ -पन्हे का बनवू नये, आणि ते खाऊन तृप्त त्यांना होताना पाहू नये. मग हे विचार पुढे वाढतच गेले आणि सदर पदार्थांची यादी ही. 

आज तरी हे स्वप्न आहे कारण दिवसाचे १० तास ऑफिसला जाणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर आपले वृद्धाश्रमाचे स्वयंपाकघर काही काळ का होईना कोण ताब्यात देईल मला माहीत नाही. पण स्वप्न तर बघायलाच हवीत तेंव्हा ती पुरीही होतील एक ना एक दिवस हे खरे ना?

Saturday, September 16, 2017

गर्दी

गर्दी बिनचेहेऱ्याची
तरीही अनेक चेहेरे
आणि त्यावरील रंगीत मुखवट्यांची

गर्दी वाट हरवलेल्या माणसांची
तरीही अनेक रस्ते
व्यापून उरणारी

गर्दी माणूस रुपी बेटांची
तरीही सतत कोणाशी तरी
जोडली जाऊ पाहणारी

गर्दी भावनाशून्य भासणारी
तरीही हृदयात तो
ओलावा जपणारी

गर्दी कलकलाटाची
तरीही मनातला कोलाहल
आतच दडपून टाकणारी

गर्दी एक एकट्या माणसांची
तरीही सतत आपले माणूस
शोधत राहणारी

Sunday, June 25, 2017

समाज बदलताना

समाजची एक चौकट असते.. नियमांची, याेग्य अयोग्य, नैतिक अनैतिकतेची. जन्माला आल्यावर तिची लिखित प्रत कधी कोणी तुमच्या हाती ठेवलेली नसते. जसजसे तुम्ही समाजाचा हिस्सा बनत जाता तसतशी तुम्ही ती अंगिकारत जाता.

आपल्यापैकी कोणीच खरेतर हौस म्हणून उठसुठ या चौकटी मोडत नसते, येताजाता नियमांची पायमल्ली करत नसते. पण घडते असे कधीतरी की तुमची कृती ही चौकट मोडणारी ठरते. कधी परिस्थिती ते घडवते, कधी तुमची गरज असते, कधी तुमच्या भावना, तुमचा आतला आवाज ते घडवतो.

अनेक गोष्टी प्रथम घडल्या तेंव्हा त्या समाजाच्या चौकटीत बसणारया नव्हत्याच. पण कृती करणारयाने आपल्या भावनांशी, आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक रहायचे ठरवले आणि कृती केली, समाजापुढे मांडली, आपल्या कृत्याची जबाबदारी स्विकारली. समाजाने काही खुल्या दिलाने स्विकारल्या, काही अंशत: नाईलाजाने मान्य केल्या काही नाकारल्या. समाजाच्या चौकटीही अशाच विस्तारत जातात.

अनेक उदाहरणे देता येतील अशा समाजाच्या चौकटी बदलून टाकणारया व्यक्तींची, घटनांची. नोकरीसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या घराचा उंबरठा ओलांडला ती स्त्री, जी तिने आपल्या त्या चार दिवसांतली सर्व वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक बंधने झुगारली ती, ते पहिले जोडपे ज्यांना आपल्यातला बंध जपण्यासाठी, नाते फुलवण्यासाठी लग्नसंस्थेची गरज नाही असे ठामपणे वाटले आणि म्हणून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीप स्विकारली, आपले नाते जपले, टिकवले, फुलवले, आणि समाजाच्या चौकटीत न बसणारा आगळा संसार साकारला, तो किंवा ती जिने आपले विवाहबाह्य संबंध नाकारले नाहीत, समाजापुढे ठेवले, पण ते नातेही प्राणपणाने जपले, ज्याने कोणी आपण गे किंवा लेस्बियन आहोत हे जगापुढे मांडले....  अशी अनेक

खरेतर आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य कल्पना असते आपली कृती समाजाच्या चौकटीत बसते की नाही याची, त्याच्या परिणामांची. तर अशी समाजाच्या चौकटीत न बसणारी कृती आपण करायला निघालो असू तर आधी विचार करायचा, हे आपल्याला पेलेल की नाही याचा उगीच नसती साहसे करायची नाहीत कारण त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. आपल्या क्षणिक भावनेतून, गरजेतून करण्याच्या या गोष्टी नव्हेत. कृती केल्यानंतर लगेच किंवा योग्यवेळी ती स्विकारणे, मान्य करून जबाबदारी घेणे हा एकच पर्याय असायला हवा. समाजाने ते मान्य करायचे कि नाही, तुम्हांला तुमच्या कृतीसह स्विकारायचे की नाही हा सर्वस्वी समाजाचा निर्णय....  तो जो जसा असेल तसा मान्य करून, त्याचा योग्य तो आदर करून पुढे जायचे. ही खरेतर अयोग्याला योग्य दिशा, अनैतिक कृत्यही नैतिकतेने निभावणे. या क्षणी कमकुवत नाही व्हायचे, त्या परिस्थितीपासून, माणसांपासून, आपल्या जबाबदारीपासून पळ नाही काढायचा.... ते खरे अयोग्य, अनैतिक.

समाजमान्यता नसलेली, रूढीमान्य नसलेली गोष्ट माझ्या हातून घडली. त्या सारयात मला कधी खोट्याचा आधार घ्यावासा नाही वाटला, त्याचे जे बरे वाईट परिणाम होते ते माझ्या वाट्याला आले. जे त्यापायी भोगावे लागले ते मी भोगले, खूप काही गमावलेही. पण मी परिस्थितीपासून पळ काढला नाही, जबाबदारी टाळली नाही, जे काही होते ते प्राणपणाने निभावण्याचा शक्य तेवढा चांगला प्रयत्न मी केला ही गोष्ट कदाचित शेवटच्या क्षणी समाधान देईल. या काळात असेही काही सुहृद होते त्यांना माझ्या कृतीला योग्य- अयोग्य असे कोणते लेबल लावायचे नव्हते, माझ्याशी असलेले जे काही त्यांचे नाते होते ते त्यांना बाकी सारयाहून महत्वाचे वाटले, माझ्या सोबत असणे, आधाराचा हात पुढे करणे हा त्यांनी स्विकारलेला पर्याय होता. मी आजन्म या सारयांची ॠणी राहिन.