काही गाणी आपण अनेकदा ऐकत असतो, पहात असतो किंवा कधीतरी आधी ते कवितेच्या रूपात वाचलेले असते. प्रत्येक वेळी ते मनाला जाऊन भिडतेच असे नाही. प्रत्येक गोष्ट मनात जाऊन घट्ट रुजण्याचे सुद्धा काही खास क्षण असतात. शब्द प्रधान गाणी ऐकतच मोठी झालेली मी. पण त्या त्या वयात, ती गाणी भावप्रधान होत गेली, आपलीशी झाली. "त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे", "हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता" किंवा "ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा" म्हणत हरवून जाण्याच्या वयातच ती गाणी खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोहचली होती.
पूर्वी एकदा आजारी असताना अचनाक "एक वार पंखावरूनी" हेच गाणे अचानक ओठी आले, मनात त्या क्षणी आलेले विचार आईला सांगू नाही शकले, तिला "आई, मला झोपायचं आहे, थोपटतेस का थोडा वेळ? असे म्हणून त्या गाण्याची, त्या भावाची घेतलेली अनुभूती शब्दात नाही सांगता येणार.
एक कविता होती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात,पूर्वी एकदा आजारी असताना अचनाक "एक वार पंखावरूनी" हेच गाणे अचानक ओठी आले, मनात त्या क्षणी आलेले विचार आईला सांगू नाही शकले, तिला "आई, मला झोपायचं आहे, थोपटतेस का थोडा वेळ? असे म्हणून त्या गाण्याची, त्या भावाची घेतलेली अनुभूती शब्दात नाही सांगता येणार.
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
मग तेंव्हा ती अनेकदा वाचली असेल, पाठ केली असेल, त्याच्या वरची प्रश्नोत्तरे लिहिली असतील, त्यात पैकी च्या पैकी मार्क्स मिळवले असतील, पण खरच ती कविता तेंव्हा कळली होती का? खरं तर नाहीच …… ते वय नव्हतंही खरं यातल्या गाभ्यापर्यंत पोहचण्याचे. मग कधी पोहचली ती माझ्यापर्यंत? खरं तर लग्न होऊन बरेच दिवस झाले होते, बऱ्यापैकी मी माझ्या खरी रुळले होते. तशी हळवी मी फार एका घरातून दुसऱ्या घरात रुजताना झालेही नव्हते. पण एक दिवस घरी मी एकटीच, एकीकडे गाणी ऐकत, स्वैपाक करत, संध्याकाळची कातर वेळ. ही वेळ पण ना… …. अशी असते की कोणत्याही लहानसहान गोष्टींनी डोळे नकळत भरून यावेत. आणि हे गाणे सुरु झाले. अन असे मनाला जाऊन भिडले. आपली मायेची माणसे, घर दार, सोडून आलेल्या तिला, तिथल्या प्रत्येक गोष्टीत तिचा जीव गुंतलाय, घरातील माणसांचीच नव्हे तर दारचा प्राजक्त, गोठ्यातील कपिला तिची नंदा… साऱ्या साऱ्यांची आठवण मन व्याकूळ करतीये. म्हणजे इथे या सासर घरी ती काही दु:खात नाहीये पण अजून हे सारे तितकेसे आपलेसे झालेले नाहीये. मायेचा, हक्काचा वावर असण्याचे अजून तरी ते घर हेच एक ठिकाण आहे. त्यामुळे वाऱ्याला जा म्हणताना ती स्वत:च अनेकदा तिथे जाऊन पोहचते आहे. परकरी पोर होऊन प्राजक्त वेचते, गुरावासरात रमते आहे, इथे बसून पुन्हा पुन्हा आईची माया आठवते आहे. त्यामुळे ह्या साऱ्या आठवणी आणि फिरून फिरून भरून येणारे डोळे हे चालूच आहे.
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !
लहानपणी सहकुटुंब एखादा चित्रपट ( बहुदा मराठीच ) पाहण्याचा एखादा कार्यक्रम असे, तसाच जाऊन पाहिलेला एक होता तो म्हणजे "अष्टविनायक" . ज्या कोणाला पंडित वसंतराव देशपांडे यांना त्यातील गाण्यांसाठीच नव्हे तर यातील वडील म्हणून चित्रपटात घेण्याचे सुचले असेल…. त्यांच्या स्वरस्पर्षाने गाण्यांचे सोने झले. त्यातील गणपतीची गाणी तर दर वर्षी ऐकतच होते. "दाटून कंठ येतो……. " हे मात्र खऱ्या अर्थाने उमजायला आईपण अनुभवावं लागलं. आईपणाची चाहूल लागली असताना ऐकलेल्या या गाण्याने आयुष्यात कधी नव्हे ते इतके हळवे बनवले की इतके लग्न करून सासरी जातानाही नव्हते. हे गाणे ऐकता ऐकताच एकीकडे आपल्या बाबांची आठवण तर दुसरीकडे आपल्या घरी ही एक परी यावी हा विचार पक्का झाला. मी तिला फक्त जन्म देऊन, मी आई होणार असले तरी आई म्हणून मला ती घडवणार आहे. तिच्या बोटाला धरून अक्षरे गिरवताना ती शिकेलच पण शिकवण्याची कला मीही शिकेन, नाही तर त्यात रमेनही.
हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने
बोलात बोबडीच्या संगीत जगवायचे, लय, ताल सूर यांची जाणीव करून द्यायची, लय ताल सूर हे फक्त गाण्याचेच नाहीत तर आयुष्यातही जमवून आणावे लागतात, याची ती जाणीव. आणि हे सारे करून कृथार्थ मनाने तिला परक्याच्या हाती सोपवायची.
बोलांत बोबडीच्या संगीत जागवीले
लयतालसूरलेणे सहजीच लेववीले
एकेक सूर यावा नाहून अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे
घेऊ कसा निरोप .... तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे
हे गाणे ऐकतानाच आपला स्वत:चाच पुढचा काळ असा डोळ्यासमोरून तरळून गेला, एका गाण्याने आईपणाच्या संकल्पना इतक्या स्पष्ट नजरेसमोर साकारल्या की आजही मी त्यान्चाच आधार घेत आईपण पेलतीये. एका गाण्यातून लेकीला घडवून, मोठी, शहाणी करून, तिला चांगल्या घरी, सुयोग्य साथीदाराच्या हाती देताना, निरोपाचे हे कोमल क्षण वेचणाऱ्या शांताबाई, हे क्षण आपल्या गळ्यातून, आपल्या अभिनयातून इतक्या प्रभावीपणे पोहचविणारे वसंतराव यांना सलाम!
आता आयुष्याचा पूर्वार्ध संपत आलाय, एकीकडे उत्तरार्ध त्याच उत्साहाने, आनंदाने कसा जाईल याचे विचार मनात डोकावत असतानाच, मधूनच भैरवी का बरे आठवते? नुसतीच आठवत नाही तर व्याकूळ करते .
जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
का या ओळी किंवा "संधीप्रकाशात अजून जो सोने" या बा. भ. बोरकरांच्या ओळींतले निरोपाचे क्षण उदास करतात?