मोठे विलक्षण असते नाव गाव नसलेल्या नात्यास जन्म देणे, त्यास फुलवणे त्यास आपलेसे करून जपणे!
मोठे
सौभाग्याचे असते हे सारे आपल्याला अनुभवता येणे, या जगावेगळ्या अनुभवाची
खोली उमजणे, त्याच्या अस्तित्त्वाच्या, त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या,
विचारांच्या परिसस्पर्शाने आपले सोने होऊन जाणे, आपण झळाळून उठणे, किंवा
आपणच जणू आपल्या पोटी पुन्हा जन्म घेणे. ही अनुभूती मला बहाल करणाऱ्या
माझ्या मनातल्या मितवास.....
कमालीचे सुंदर असते कोणाला तरी आपल्या मनात अगदी पक्के कायमचे चौसोपी घर बांधू देणे!
खूप खास असते आपल्या नकळत मनात शिरलेल्या चोरास आपल्याच मनात कैद करून ठेवणे!
खूप खास असते, त्याच्यासाठी जगणे, अखंड त्याच्याशी संवाद करत राहणे, हर एक क्षण त्याच्या सोबतीने जगणे, फुलणे....
मोठे
विलक्षण असते प्रत्यक्ष दिसण्याची, भेटीची, संवादाची कोणतीच आस नसणे, तो
कुठे असतो कुठे जातो, कुठे राहतो, काय खातो, पितो, न जाणे काय करतो, काही
माहीत नसणे, बस इतना सच है के मेरी रुहमें बसता है वॊ!
कधी काही कळलेच तर कौतुकाने मन भरून जाणे, कधी भेट झालीच तर आजकल पाँव जमींपर नही पड़तै मेरे अशी अवस्था होणे....
तरीही
एक नितांत सुंदर नाते आपल्या मनात जन्मास येणे, ते आपण पेलणे, दिवसा
रात्री जागेपणी झोपेत फक्त त्याचे नाव मनात सतत उमटत राहणे, त्याच्या आणि
आपल्या नकळत आपण त्याचे होऊन राहणे. मनात, ओठांत फक्त त्याचे नाव गुंजत
राहणे! आपल्या श्वासांत त्याचे नाव ऐकू येणे, आपल्या रक्तात जणू जो वहात
असणे!
त्याच्या साथीने जगण्यास लय सापडणे, आपल्याला आपला सूर गवसणे, आणि अवघे आयुष्य सुरेल होऊन जाणे!