Saturday, December 22, 2012

या वळणावर ......


कातरवेळा.... आदित्य अस्वस्थ. तरीही बाहेर पडलेला,उंचापुरा आदित्य, स्मार्ट, बारीक काड्यांचा चष्मा डोळ्यांवर, अंगात जीन्स आणि पांढरा  शर्ट. रस्ता फुटेल तसं चालत राहावं, बरोबर फक्त मोबाईल घेतलेला. गाणी ऐकत चालत राहावे हरवलेले काहीतरी पुन्हा परत मिळते का ते बघत. मोबाईलच्या कॉर्डचे एक टोक कानात, दुसरे मोबाईलशी जोडलेले आणि मधे हा सारा गुंता.  तो मनात म्हणतो "अगदी आपल्या दोघांची अशीच अवस्था आहे बघ.  दोन टोकांना आपण दोघे, आणि मध्ये हे सारे आपल्या प्रेमाचे, आठवणींचे, सुख-दु:खाचे हे सारे गुंते."
 
एकंदरीतच हा गुंता सोडवणे अवघड आहे. असा विचार करून  तो  गाणे सुरु करतो.........."रंजिश ही सही....दिल ही दुखानेके लिये आ...." का माझ्या प्ले-लिस्ट वर हीच गझल सर्वात पहिली लागते? पहिल्यांदा ऐकताच या गाण्याच्या प्रेमातच का पडायला झालं होतं? जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा आपली भेट झाली नव्हती. म्हणजे तुझ्या भेटीपूर्वीच मी या गाण्याच्या प्रेमात होतो.  पण "दिल ही दुखाने के लिये आ" हे मागणे मी कधी मागितले नाही, तरी हेच का?" 
 
मनात आलेली गोष्ट मिळाली नाही असे कधी होते हेच त्याला  जिथे माहित नव्हते, तिथे इतक्या खोलवर पोहोचणाऱ्या दु:खाची कल्पना केवळ अशक्य. पण हे गाणे कुठेतरी खोलवर जाऊन रुतलेले. अशा अचानक भेटलेल्या, अचानक गवसलेल्या गोष्टी तुमचे आयुष्य बघता बघता बदलून टाकतात नाही? या गाण्यानंतर तो  मेहंदी हस्सन, बेगम अख्तर, गुलाम अली, जगजीत-चित्रा यांचा दिवाना होत गेला.  दु:ख वेड  लावते म्हणतात ते कसे ते त्याला तेंव्हा कळू लागले.
 
रेडीमेड असे करिअर समोर होते, एका दिवसाच्या नोटिशीवर तो  घरचेच ऑफिस जॉईन करू शकणार होता, नव्हे करणारच होता. एकदा का इथून इंजिनिअर झाला  कि दोन अडीच वर्षे अमेरिकेत पूढील शिक्षणासाठी आणि तिथून थेट घरच्याच कंपनीत ....सिनिअर पोस्टवर. सारे कसे अगदी आखीव रेखीव. तेंव्हाच त्याची  भेट झाली उल्काशी, कॉलेजमधल्या एका सोशल अवेअरनेस च्या एका मीटिंग मध्ये. झोपडपट्टीतल्या एका शाळेत महिन्यातून दोन रविवारी ती  शिकवायला जायची. या साऱ्या गोष्टी तेंव्हा मैलोनमैल दूर होत्या त्याच्यापासून. ती  बोलत होती,  वर्गातल्या मुलांना आवाहन करत होती थोडा वेळ या कामासाठी देण्यासाठी. आदित्य ऐकत होता  कि नव्हता  ठाऊक नाही पण भारावून गेला होता.. पुढच्या रविवारी उल्का बरोबर जायचे त्याने कबूल केले आणि चक्क सकाळी ९ वाजता त्या शाळेत पोहोचला  देखील!
 
मग अनेक रविवार तो  उत्साहाने तिथे जातच राहिला. अक्षरा नावाची एन.जी.ओ. होती जी झोपडपट्टी, तसेच बांधकामावरील मजुरांच्या मुलांसाठी या शहरात शाळा चालवत होती. उल्काची आई त्या एन.जी.ओ. शी संबंधित होती ओघाने उल्का अधून मधून तिथे शिकवायला जाताच होती.  दोन्ही कारणे होती आदित्यसाठी तिथे जाण्याची.  तिच्या सोबत राहणे तर होतेच पण या मुलांना शिकवणेही  इतके आनंददायी होते कि बाकी त्याच्या नित्याच्या अनेक एषो आरामाच्या गोष्टी तितक्या त्याला  महत्त्वाच्या वाटेनाशा होत गेल्या. सवयी बदलत गेल्या. अनेक तडजोडी तो  सहजगत्या करू लागला. त्यांचे शेवटचे वर्ष होते ते. त्यामुळे प्रोजेक्ट सबमिट करण्याचे कामही होतेच. त्यामुळे रात्र रात्र जागून प्रोजेक्टचे मित्रांसोबत बसून केलेले काम. उल्का त्याच्या पेक्षा २ वर्षे मागे होती. तसे फार दिवस आदित्यचे  इथे राहिले नव्हतेच. एकदा शेवटचे सेम संपले कि मला लगेचच पुढच्या तयारीला लागायचे होते. ही गोष्ट आतापर्यंत इतकी साधी सरळ होती कि काही त्यावर विचार करायचे काही कारणच नव्हते.
 
पण त्याच्या  मनात मात्र काही वेगळेच विचार सुरु झाले होते. इथे राहून हे काम करण्यात मोठी मजा वाटू लागली होती. समाज बदलवण्यात आपला सहभाग त्याला आनंददायी वाटत होता. आयुष्यात प्रथमच समाजात तो इतका मिसळून गेला होता. अक्षरात येण्यापूर्वीचे आणि त्या नंतरचे त्याचे जगच निराळे होते. अक्षराने त्याचे विचार, राहणीमान, सवयी, आवडी-निवडी बऱ्याच बदलून टाकल्या होत्या. शिवाय उल्काच्या सहवासाची ओढ होतीच. एकीकडे हळूहळू त्यांच्या गाठीभेटी वाढू लागल्या होत्या. तशी उल्का एक हुशार, पण थोडी लाडावलेली मुलगी होती. आईने समाज कार्यात स्वत:ला झोकून दिलेले होते, घरी पैशाला काही कमी नव्हती. मजा म्हणून ती हे शाळेत शिकवण्याचे काम रविवारी करत होती. इंजिनीअर का व्हायचे होते याचे पण कोणते कारण तिच्याकडे नव्हते. बाबा म्हणाले म्हणून ती इथे आली होती.  थोडक्यात अभ्यासात हुशार, दिसायला गोड अशी, लाडावलेली, श्रीमंत घरातली, पण करीअर वगैरे गोष्टींचा फारसा विचार न केलेली, आयुष्याबद्दल फार मोठी स्वप्ने नसलेली.
 
एके  दिवशी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर सहजच त्याने हा विषय काढला.
 
"बाबा, मी आता असे केले कि पुढच्या शिक्षणासाठी  एखाद दोन वर्षे मधे जाऊ देवू का? "
"का रे आदित्य? काय विचार आहे पुढे तुझा?"
"हि सेम संपल्यावर सरळ आपली कंपनी जॉईन करतो, आणि नंतर २ वर्षांनी जाऊन पुढचे शिकेन, शेवटी बाबा अनुभव महत्वाचा असे तुम्हीच नेहमी म्हणता ना?"
"अरे, हो ते आहेच. पण आता तुला जे काही शिकायचे ते शिकून घे. मी कंपनी सांभाळायला समर्थ आहे. परत आलास कि मग तुलाच सांभाळायचे आहे सारे कामकाज. थकलो आता मी."
"असे काय बोलता बाबा?"
"आता मी जात नाही, नंतर पाहू."
"बरं, तुला जसे ठीक वाटेल तसे. माझे काही म्हणणे नाही"
 
हेच हवे होते त्याला. मग मात्र त्याने अक्षराच्या कामात अगदी झोकून दिले स्वत:ला. सोबत मधून मधून घराच्या कंपनीत जाणे चालूच होते. जात्याच हुशार आणि लहानपणापासून घरात बिझनेसचे बाळकडू मिळालेले असल्याने त्याला ते फारसे जड गेले नाहीच. उल्काची आणि त्याची मैत्री दिवसेंदिवस गहरी होत चालली होती. निदान असे त्याला वाटत होते. अक्षराच्या कामात ती थोडा वेळ  त्याच्या सोबत असे. बाकीचा वेळ तिचा कॉलेज आणि  मौजमजा करण्यात जात असे. पण संध्याकाळी कॉफी शॉप, कधी ट्रेक तर कधी सिनेमा असे छान दिवस चालले होते. पण उघडपणे या नात्याबद्दल बोलावे असे कोणालाच वाटत नव्हते. अक्षराच्या आता अशा ३ ठिकाणी पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या होत्या. आणि त्याचे बरेचसे श्रेय आदित्यला जात होते. त्यामुळे उल्काची आईपण आदित्यवर खूष होती.

(क्रमश:)