Sunday, September 30, 2012

चला चंगळवादी होऊयात .... ? का कशासाठी ???


३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
आज लोकसत्ता मध्ये चतुरंग सोबतच लोकरंगही पाठवलात त्याबद्दल मनापासून आभार. काय होतं ना वर्तमानपत्र न येण्याचा दिवस जर शनिवार किंवा रविवार असेल ना तर मी फार अस्वस्थ होते, चतुरंग /लोकरंग वाचायला मिळणार नाही म्हणून. तसे वर्तमानपत्र डोळसपणे मी वाचायला सुरुवात केली ते माधव गडकरी संपादक असण्याचे शेवटचे दिवस असावेत. तेंव्हापासून लोकसत्ता फार आवडीने वाचते आहे. अगदी केतकरांचा प्रो कॉंग्रेस असणे याकडे डोळेझाक  करून. आपण संपादकपदी आलात, तेंव्हा वाटले चला बरे झाले. अनेकदा आपले "अन्यथा" हे सदर मी नुसतेच वाचत नाही तर फेसबुकवर किंवा पूर्वी इन्फी बीबी वर शेअरही करत असे. तर जशी तुमची पटणारी मते/ यांना शेअर केले तसे न पटलेल्या गोष्टींचे ही व्हावयास हवे म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच एक सांगू इच्छिते की मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. कारण राजकारणी लोकांनाच मुळात राजकारण सोडून बाकी कशाशी बांधिलकी नसते. मला वाटतं नमनाला इतकेच  तेल पुरे......कारण जगण्याच्या अपरिहार्यतेने असले तरी मनापासून मी "चंगळवादी" संस्कृतीचा भाग होवू इच्छित नाही.

तर आपण म्हणता त्या प्रमाणे चंगळवादाची व्याख्या करता येत नाही. आपण म्हणता त्या अर्थी खरेच असेल ते. पण काही उदाहरणे बघू आणि त्यातून मला  काही बोध होतो का ते पाहू. समजा मला १ लिटर पेप्सी ची बाटली घरी आणायची आहे. समजा त्याची किंमत ५०/- आहे. घराजवळचा किराणा किंवा जनरल स्टोअर्स मध्ये मी चालत जाते, ५० रु. देते आणि पेप्सी घरी घेऊन येते. पण मी बिग बझार, मोअर, स्टार बझार मध्ये जाते, जाते तीच मुळात थोडा खर्च करून पेट्रोल जाळून, मग आणखी थोडे पेट्रोल जाळते पार्किंग साठी जागा शोधताना. तिथे आत जाते. कोणता तरी स्वस्त दिवस असतो तो. त्यामुळे तिथे पेप्सीच्या २ बाटल्या ९० रु. त मिळत असतात मला वाटते चला पैसे वाचत आहेत घेवून टाकू दोन लिटर. इथेच हे थांबत नाही, तिथे अजून अशाच चार सो कॉल्ड स्वस्त गोष्टी असतात. मी त्याही उचलून आणते घरी. शेवटी बऱ्यापैकी खिसा रिकामा करून पुन्हा पेट्रोल जाळून मी घरी पोहचते. आता बघा माझी गरज होती (?) १ लिटर पेप्सीची त्या स्वस्तच्या मोहापायी मी किमान ९० रु आणि पेट्रोल चे थोडे असे पैसे त्यावर खर्च केलेत कमाल  किती राम जाणे. माझ्या दृष्टीने गरज नसतानाही गरज असल्याचा आभास निर्माण करणे, व त्यासाठी खर्च करणे हा चंगळवाद.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे १०० रु. लिटर चे तेल ९५ रु. लिटर प्रमाणे देणे त्यांना परवडते. साधारण सर्व शहरांमध्ये होलसेलची दुकाने असतात, जिथे हेच तेल जर १२ चा बॉक्स घेतला तर ८५ रु. लिटर प्रमाणे मिळते. ते देखील हवा असलेला ब्रान्ड. असं कधी अनुभवलंय का कोणी की या सुपर मार्केट्स मध्ये काही ठराविक ब्रान्ड च मिळतात. म्हणजे पुन्हा ५ रु स्वस्त साठी तडजोड आलीच.

तुमच्या म्हणण्यानुसार "अंथरूण पाहून पाय पसरावेत" या पूर्वापार चालत आलेल्या म्हणीत विकृती आहे. माझ्या मते आज झोपताना अंथरूण पाहून पाय पसरावेत, उद्या सकाळी उठून ते मोठे कसे होईल ते पाहावे आणि त्या दृष्टीने पावले उचलावीत. गैर मोठे होण्यात नाही हो. कसे होतां यावर सारे अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्नांनी अंथरूण लांब करत राहा हो आणि खुशाल पाय पसरत राहा, पण प्रत्येक वेळी अंथरुणावर टेकल्यावर "अंथरूण पाहून पाय पसारा" हे लागू होतेच ना? 

तुमच्या म्हणण्याप्रमाणे सधन लोकांनी सर्व वस्तू सुविधा विकत घ्यावात जेणेकरून रोजगार निर्माण होतो. या न्यायाने तुमच्या घरी लोणची, पापड, चिवडा चकली, लाडू इतकेच काय रोजचा चहा, नाश्ता जेवण हे पण बाहेरूनच येते का हो? मी ज्या इंडस्ट्रीचा भाग आहे, त्या आमच्या विरुद्ध अशी ओरड समाजात नेहमी आढळते ती म्हणजे सारी महागाई आमच्या मुळे आहे, आमच्यामुळे चंगळवाद बोकाळलाय. तुम्ही म्हणता तसं  लोक जास्त हॉटेल मध्ये जातील तर, ती चांगली चालतील, तिथे काम करणाऱ्यांचे वेतन आणि राहणीमान उंचावेल.....खरच असं घडेल का हो. नाही, कारण माझ्या घराजवळ एक  छान हॉटेल आहे त्याच्या मालकाचा बंगलाही माझ्या घराजवळच आहे, राहणीमान गेल्या १२ वर्षात मला फक्त तिथेच उंचावताना दिसले आहे. टेबल साफ करणाऱ्या मुलांचे किंवा वेटरचे नाही. दुसरा मुद्दा असा की जी गोष्ट घरी बनवताना मी "दिलसे" बनवते, तशी बाहेर कोणी बनवून देतं का हो? कितीही पैसे मोजायची तयारी ठेवली तरी माझ्या घरच्यांना सेम माझ्या हातची चव विकत आणता येईल का? 

तुम्ही म्हणता तरुण मुलीना लोणची पापड घरी न करता, विकत घेण्या बद्दल अनेक तरुण मुलीना ओरडा खावा लागतो. मला वाटता यात दोन मुद्दे आहेत, करता येणं आणि करणं आणि या दोन अतिशय भिन्न बाबी आहेत. माझ्या मते न करता येण्या बद्दल तो ओरडा असतो. न करण्यासाठी नाही. जसा की गेली काही वर्षे दिवाळीत फराळाचा एकही पदार्थ मी घरी बनवू शकले नाही, उत्तमोत्तम पदार्थ पुरवणाऱ्या  चितळे, वृंदावन या दुकानांवर मी अवलंबून आहे. कारण वेळ नसणे हे अपरिहार्य कारण त्यास जबाबदार आहे. मला त्याबद्दल कधी कोणी काही बोलले नाही, कारण चकली पासून चिरोट्यापर्यंत प्रत्येक पदार्थ मला उत्तम बनवता येतो हे मी या पूर्वी सिद्ध केले आहे. आणि आता ऐन दिवाळीचे सुट्टीचे मिळणारे दोनच दिवस, घरचे लोक, नातेवाईक यांच्या सोबत न घालवता चकली चिवडा बनवण्यात घालवावे अशी कोणाचीच अपेक्षा नाही. पण रोजगार निर्माण होतोय म्हणून काही या दुकानांमधून मी पदार्थ विकत आणत नाही हो.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी वस्तू विकत आणते का ? तर नाही. गणपतीत उकडीचे मोदक साधारण १०० लागतात दुपारच्या जेवणासाठी १७/१८ माणसांसाठी, पैसा आहे म्हणून मी १५/१६ रु. ला एक या दराने १०० मोदक विकत आणेन का? आणि जर आणलेच तर नवरा त्यावर ताव मारून ५/६ मोदक तरी खाईल का तो मोदकांचा भाव ऐकून? खर तर नाही.

सधन आहे, रोजगार निर्माण होतो म्हणून मी रोज घरी स्वयंपाक किंवा किमान पोळ्या विकत आणते का? ५ रु एक पोळी मिळते. त्यापेक्षा उत्तम प्रतीचे गहू तेल घरी विकत आणून, एका उत्तम पोळ्या बनवणाऱ्या गरजू स्त्रीस घरी कामास ठेवणे मला चालेल जर इतकाच माझ्या वेळेचा प्रॉब्लेम असेल तर. यातूनही रोजगार निर्माण होईलच ना?

सधन आहे आणि सो कॉल्ड बिग बझार, मोअर सारखी किंवा उद्या येवू घातलेली परदेशी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात म्हणून मी तिथे जावे का? किंबहुना मी सधन आहे म्हणूनच  मला गुलटेकडी सारख्या किंवा  वाशीतील ए. पी. एम सी. सारख्या मार्केट मध्ये जाणे शक्य आहे. वर्षाचे उत्तम क़्वालीतीचे  समान आणणे शक्य आहे, ते साठवून ठेवण्यासाठी करावी लागणारी उस्तवार मी करू शकते आणि उत्तम प्रतीचे धान्य वर्षभर खाऊ शकते. असे करूनही जे काही थोडे समान दर महिन्याला आणायचे असते, ते जर मी घराजवळच्या किरकोळ वाण्याच्या दुकानातून आणले तर समजा माझे १००० रु. खर्च होत असतील तर मोअर, बिग बझार येथे जावून मी किमान दीडपट पैसे खर्च करून येते. कारण इतक्या तेवढी गरज नसलेल्या वस्तू तुमच्या बरोबर अशाच घरी येतात.....याला चंगळवाद म्हणू यात का?

तुम्ही म्हणता "आपल्याला घाऊक बाजारातील दर आणि या किरकोळ विक्रीच्या दुकानातील दर यांत प्रचंड फरक आढळतो." अगदी खरं ! पण मोअर, स्टार बझार ही दुकाने आपल्यास घावूक भावात खरंच या गोष्टी देतात का? याच वर्षीचे उदाहरण आहे. गुलटेकडी तून तुरडाळ उत्तम प्रतीची मला मिळाली ५० रु. किलो, आणि त्या नंतरच्या आठवड्यात स्टार बझार ने स्वस्त ची जाहिरात केली त्यात भाव होता ७० रु. जी स्वस्त ते विकत होते, ६५ रु किलो.....आता हे स्वस्त घाऊक भावात झाले  का?

जुने ते सर्व वाईट, टाकावू  किंवा आपल्याकडची सर्व मुल्ये टाकावू असे का आपले होते आहे. गरजेशिवाय केलेला अफाट खर्च म्हणजे चंगळवाद असे ठरवले तर हे नक्की ही सारी मोठी चकाचक दुकाने चंगळवाद वाढवण्यास नक्कीच मदत करतात. तरीही आपण त्यांचे समर्थन करायचे आहे का? 

3 comments:

 1. माझे पण दोन मुद्दे आहेत.
  लोस मधला चंगळवाद हा लेख वाचला,थोडा एकांगी झालाय, पण आवडला. एकाधिकार झाला की किमतींवर नियंत्रण येतंच. जसे कोक-पेप्सी जरी जन्मजात एकमेकांचे शत्रू असले तरीही एखाद्या देशात गेल्यावर सर्वप्रथम तिथल्या लोकल कंपन्यांशी एकत्र येऊन त्यांना पैशाच्या जोरावर लोकल ब्रांड्स बंद करायला भाग पडायला लावतात, ( पार्ले सारखे पण यांच्याशी लढा देऊ शकत नाहीत) आणि एकदा शंभर टक्के मार्केट शेअर मिळाला की त्या मधे आपला शेअर वाढवण्यासाठी प्रयत्न करतात.
  आता सध्या एक वाल मार्ट येतंय, पण लवकरच इतरही अशाच कंपन्या आल्या आणि त्यांच्याकडील ्विकत घेण्याची अपरिमित शक्तीचा वापर करून शेतमालास सध्या अडते देतात तेवढाही भाग देणे मान्य केले नाही तर शेतकऱ्यांचे काय होईल? आणि असेच करणार नाही हे कशावरून?
  म्हणून अगदी रेड कार्पेट वेलकम नसावे असे वाटते.
  आता इथे तुम्ही मारूती उद्योग, किंवा सॅंट्रो या कंपन्यांचीही उदाहरणे देऊ शकता. पण त्याचा परीणाम म्हणजे लोकल कंपन्या बंद होणे हा झालाय, हे पण नाकारता येऊ शकत नाही. अ‍ॅम्बेसेडर, फियाट चा कारखाना बंद पडलेला आजही दिसून येतो.
  असो.. लेखामधे दुसरी बाजू ही समोर आली असती तर जास्त आवडले असते.

  ReplyDelete
 2. महेंद्रकाका- धन्यवाद, या कंपन्यांना इथे येण्यापासून रोखावे असे नव्हे, ते आता आपल्या हातात नाहीच आहे. त्या आल्यावर कोणाचा काय फायदा तोटा होईल माहित नाही. लहान दुकानांवर याचा कसा परिणाम होईल, त्याचा एकत्रित परिणाम आपल्या अर्थ-व्यवस्थेवर कसा होईल हा तर स्वतंत्र लेखाचा विषय होईल. माझा आवाका तेवढा मोठा नाही. पण फक्त त्या येत आहेत म्हणून आपण चंगळवादी व्हावे असे ही नाही ना? आज जी काही सुपर मार्केट्स जसे की बिग बझार, मोर, रिलायंस फ्रेश आहेत यामुळे खूप काही आपला फायदा होतोय असे मला तरी कधी वाटले नाही. मग आता या येवू घातलेल्या कंपन्यांसाठी आपण "चला, चंगळवादी होवू या" असे एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकाने तरी सांगू नये. एकंदरीत या गोष्टी सर्वसामान्य माणसाला कसे भूल-भूलाय्यात अडकवत जातात आणि आपण सर्व सो कॉल्ड ग्लोबल होण्याच्या नावाखाली त्यात अडकत जातो एवढेच ....

  लोकसत्ताला पुन्हा एक "Pro Congress" संपादक मिळाला काय? की लोकसत्ता मध्ये येवून माणसे "Pro Congress " बनतात?????

  ReplyDelete
 3. अनघा "म्हणून आपण चंगळवादी व्हावे का" हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि एका चंगळवादी देशात राहायला लागल्यापासून मला तरी सुरुवातीपासून पडलेला आहे...उगाच बाय वन गेट फ़्री किंवा कुपन सिस्टिम्समुळे वस्तूंनी घर भरून ठेवायची याल काही अर्थच नाहीये....

  ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!