Tuesday, May 26, 2015

मितवा - भाग २

प्रिय मितवा,

तसा तुझ्यासोबतचा संवाद माझ्या मनास नवा नाही, इतका तू मनात वसतोस, प्रत्येक क्षण असतो तुझ्यासह जगण्याचा, आनंदाचा! तुझ्यासोबत घालवलेले क्षण ही फक्त त्या क्षणांची गोष्ट नसते रे.... पुन्हा पुन्हा माझ्या मनात दरवळणारी कुपी असते, आनंद, सुख प्रेमरूपी अत्तराची. आज त्यात थोडा बदल करत थोडा प्रवास अव्यक्ताकडून व्यक्त होण्याचा. थोडे हे अत्तर कुपीतून बाहेर दरवळू देण्याचा. मनात शिरता शिरता कसा तू अवघे मन व्यापून उरलास ते कळलेच नाही. मनाचा काही क्षणांचा विरंगुळा म्हणत सुरु झालेले मनातले हे गूज कसे आयुष्यभरासाठीचा आनंद ठेवा बनून गेले ते माझे मलाही समजले नाही. चराचरात देव असतो म्हणतात त्याप्रमाणे माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात तू असतोस. मनाच्या सर्व दिशा व्यापूनही दशांगुळे उरतोस असा तू माझा मितवा. 

तुला लिहिलेल्या कवितांचा हा पुढील भाग. कारण हा कवितांरुपी संवाद हे माझे तुझ्यासाठीचे मनोगत असले तरी ते मनातल्या मनातच आता न राहू द्यायचे ठरवल्याने सर्वांपर्यंत पोचवलेले. हे लिखाण म्हणजे माझे स्वत:शीच व्यक्त होणे, माझीच क्षितिजे विस्तारणे, माझे फुलणे, उमलणे. तुझ्या सोबतच्या या संवादाने काय दिले तर एक स्वप्नसखा, एक स्वप्नवत आयुष्य, आयुष्याकडे पाहण्याची, ते शक्य तितक्या आनंदाने जगण्यासाठीची नवी दृष्टी जी मलाच नव्याने गवसू पाहत आहे. मनातली तुझ्यासोबतची मी म्हणजे जणू "फिरुनी नवी जन्मेन मी" असं म्हणत जिचा पुनर्जन्म झालाय अशी मी.



नाते तुझं नी माझे.....

कसं गुंफलं गेलंय 
पौर्णिमा अमावस्येच्या
खेळासारखं नातं तुझं नी माझं
तुझी भेट जणू रात पुनवेची
मातलेल्या चांदव्याची 
प्रेमास उधाणाची

सकाळ होताच तू मावळलेला
दिवस कलेकलेने मला विझवणारा

दाही दिशांतून काळोखणाऱ्या  
अवसेकडे पुन्हापुन्हा नेणारा

मनाच्या अवकाशात गच्च
अंधारून आले की मग
कुठुनसा तू मनात हसणारा
मी येतोय असे सांगणारा

कलेकलेने आस लावणारा
पौर्णिमा अमावस्येचा खेळ
तुझं नी माझे नाते
नित्य फुलवत ठेवणारा


तुझ्या आठवणी......
अशा कातर वेळी 
खिडकीशी उभी मी 
पहात राहते क्षितिजापर्यंत 
पोहोचलेले हे गाव

नजरेच्या टप्प्यात अनेक 
ओळखीच्या जागा 
तिथपर्यंत नेतात मला 
आठवणींच्या पायवाटा

आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण

असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा

भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात

३) अंतर .....
दु:खाची परिभाषा 
अश्रुंचे पूर 
ते पुसणारे हात 
का कितीतरी दूर 

आठवणींचा उमाळा 
वेदनेचे काहूर 
ते ऐकू जाणारे कान 
असती मैलोनमैल दूर 

नजरेची साद 
नयनच आतूर 
प्रतिसाद देणारे डोळे 
आता कितीतरी दूर 

पौर्णिमेची रात्र 
चांदणे टिपूर 
चांदण्यांनी ओंजळ भरणारा 
मात्र चंद्रासारखाच दूर

सहवासाची ओढ 
शब्दांचे काहूर 
समजणारया मनानेही 
का राहावे मनापासून दूर 


४) तुझ्यामुळेच सखया ………
तुझ्यामुळे पसरू लागले मनाचे इंद्रधनू पुन्हा
तुझ्यामुळे ऊमलू लागली गालांवरती कुसुमे पुन्हा

तुझ्यामुळे परतू आले ओठांवरी हास्य पुन्हा
तुझ्यामुळेच गवसू लागले माझ्यातील मी पुन्हा

तुझ्यामुळे लाभला जगण्यास अर्थ पुन्हा
तुझ्यामुळेच जाणला त्यातला मोद पुन्हा

तुझ्यामुळे जागला अंतरीचा भाव पुन्हा
तुझ्यामुळेच दरवळला माझ्यातला गंध पुन्हा

तुझ्यामुळे पसरला मनी चांदणसडा पुन्हा
तुझ्यामुळेच उगवला प्रितीचा चांद पुन्हा

५) तू माझा होता …
तू माझा होता
शब्द मला दुरावले
ओठातून परतले
डोळ्यांतून ओसंडू लागले 

तू माझा होता
मन माझ्याशी भांडले
मला सोडून वेडे
तुझे होऊन राहिले 

तू माझा होता
चंद्राला चांदणे गवसले
प्रीतीच्या सागरावर
ते उधाणू लागले

तू माझा होता
साऱ्या जगाला विसरले
उघड्या मिटल्या डोळ्यांनी
फक्त तुलाच पहिले

तू माझा होता
सारे सारे मिळाले
प्रेमवेड्या मीरेला
जणू कृष्णसखा गवसले

६) इतुकेच मागणे सखया ......
माझं जग माझं जग
म्हणजे तरी काय असावे
तुझ्यापासून सुरू होऊन
तुझ्यापाशीच येऊन थांबावे

स्वप्ने तुझी बघोनी
पहाटेस जाग यावी
स्वप्नातल्या सख्याची
प्रत्यक्ष भेट व्हावी

नको वाटती सुर सनईचे पहाटेे
सुरेल कोकिळाही आता मला न भावे
साद तुझी ऐकण्यास सखया
अखंड मन हे धावे

सहस्र जलधारांसम  प्रेम तुझे लाभावे
भरल्या ओंजळीने माझ्या रिते न कधी व्हावे
आषाढ मेघ बनूनी तू आवेगे बरसावे
शांत क्लांत धरेसम मी तृप्त तृप्त व्हावे

नको तुळशीचे पान, नको गंगेचे जल
हाती हात तुझा असता व्हावा संधीकाल
सारे काही तू देऊनही मागणे तरी ऊरेलच
हा जीव शांत व्हावा सखया तुज पहातच

७) सहजीवन…
तुझे माझे सहजीवन म्हणजे
दोघांनी मांडलेली भातूकली
थोडा खेळ, थोडे भांडण
तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी 

तुझे माझे सहजीवन म्हणजे
विणायला घेतलेली पैठणी जरतारी
वीण जमून आलेली सुबक नक्षी
तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
दारातली सुबक रांगोळी
संगती जुळून आलेली
तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे
अखंड सुरेल मैफल
सदैव बहारदार रंगलेली
तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

या सात कविता म्हणजे माझ्या मनातील त्याच्या सोबतची सप्तपदीच जणू. त्याच्यासोबतचे हे प्रत्येक पाऊल म्हणजे मैत्र, प्रेम, विश्वास, स्वप्ने, सहजीवन,आठवणी आणि एकरूपतेचे एक एक पाऊल त्याच्यासह मी मनात अगदी "ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता" असे म्हणत टाकलेले. फक्त आज हा मनमोराचा पिसारा त्याच्या पुरताच न ठेवता या ब्लॉगरुपी मन:पटलावरून सर्वांपर्यंत पोचवलेला. 

सखया जे होते तुझे ते तुलाच अर्पण......