Thursday, October 4, 2012

६५ वी कला

वर्तमानपत्रात आजकाल अनेकदा पहिले पानभर जाहिरात असते, अशी दिसली की प्रचंड राग येतो. पण मला जाहिराती आवडतात, कोणतेही माध्यम असो. वृत्तपत्रीय जाहिराती पाहताना तर मी उजव्या कोपऱ्यातील जाहिरात कंपनीचे नावही आवर्जून पाहते. हळूहळू असे होऊ लागले की आधी मी ते नाव कोणते आहे ते पाहू लागले आणि मग जाहिराती वाचू लागले. पुण्यात एक प्रथितयश बांधकाम व्यावसायिक आहेत. लहानपणापासून मी त्यांच्या प्रोजेक्ट्स च्या जाहिराती पहात आले. त्यापैकी कित्येक आजही मनात घर करून आहेत. मराठी माणसाची अचूक नस पकडणाऱ्या जाहिराती हे यांच्या यशाचे एक सूत्र होते, असे नेहमी वाटत आले. आणि त्यांच्या या यशाचा "सेतू" बांधणारी जाहिरात एजेन्सी फार महत्वाची होती. त्यांनी त्यांच्या एका प्रोजेक्ट च्या हस्तांतरणाची जाहिरात अशी केली होती " सासुरयास चालली शकुंतला, लाडकी शकुंतला......चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला"..... अगदी याच भावना मनात ठेवून *** चं हस्तांतरण आज मी करत आहे" किंवा आज घर बुक करा आणि उद्या स्वत:च भूमिपूजनास बसा.....नक्कीच कुठेतरी आत जाऊन पोहचतात त्या जाहिराती. कदाचित माझ्या घरी पण हाच बिझिनेस आहे म्हणून या साऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत खोलवर जाऊन पोहचतात. एखादी बिल्डींग बांधताना आणि नंतर तिचे हस्तांतरण करताना ना अगदी मुलीला सासरी पाठवतानाच्याच भावना मनात असतात. नंतर त्या कंपनीने जाहिरात एजेन्सी बदलली हे कोणी न सांगताच बदलेल्या जाहिरातींच्या स्वरूपावरूनच लक्षात आले. मग मात्र ते म्हणजे घराण्याचे नाव रोशन करणाऱ्या गायकाने कुठलीही गाणी गावीत तसे वाटू लागले.


गेल्या काही दिवसात काही नव्या जुन्या ads पहिल्या ऐकल्या आणि यावर लिहावे असे तीव्रतेने वाटू लागले. जसे बर्फी बघताना त्यातला मर्फी , त्यातल्या एका दृश्यात ऐकू येणारा जुन्या प्रेस्टीज च्या जाहिरातीचा आवाज. लगेचच नंतरच्या वीकेंड ला T -२० पाहताना बघितलेल्या काही ads . आजकाल जाहिरातींवर मी प्रचंड कमेंट्स करते. शंका येऊ लागली की आपले वय व्हायला लागले काय? ज्या त्या जाहिरातीवर कसे आपले काही वेगळेच म्हणणे आहे? कला आहे ना ती? हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा भाग आहे ना, मग?

६५ वी कला जिला म्हंटले जाते तिने आपले आयुष्य इतके व्यापले आहे, की वर्तमानपत्र, आकाशवाणी, FM , टी. व्ही., रस्त्यावरचे होर्डींग्स, बस, ट्रेन्स मधील जाहिराती, इतकेच काय फेसबूकावरील जाहिराती. कुठेतरी प्रत्येक जाहिरातीची मनात नोंद होतेच. मार्केट ड्रिव्हन इकॉनोमीचा तो अविभाज्य भाग आहे. सेकंदास लाखो रुपये मोजून तुमच्या आमच्या पर्यंत पोचणाऱ्या त्या साऱ्या खरंच तितका परिणाम आपल्यावर आणि पर्यायाने त्या कंपनीच्या नफ्यात वाढ होण्यावर करतात का? नाही म्हणजे तशी नफ्यात वाढ अनेक रीतीने दाखवता येते. ते तितके महत्त्वाचे नाही, पण आपले काय विकत घ्यायचे आणि काय नाही यावर त्या नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात.

लहानपणी माझा भाऊ जाहिराती चालू असे पर्यंतच टी.व्ही पहात असे, त्या संपल्याकी हा उठून जाई. आजही माझ्या माहितीत अनेक लहान मुले अशी आहेत की जाहिराती ती फार आवडीने पाहतात, जसे की "तुम्हारा साबून स्लो है क्या" किंवा गाडी पार्क करतानाची "लगा क्या?", आय. पी. एल च्या वेळच्या झू, झू च्या जाहिराती, टमी की सुनू या ममी की म्हणत केलेली नॉर सूपची किंवा पिअर्स ची मासूम पिअर्स म्हणत केलेली.
सगळ्यात लाडकी माझी जाहिरात म्हणजे "अमूल बटरची" ची. एखाद्या प्रोडक्टची दर आठवड्याला वेगळी जाहिरात बनते, आणि चालू घटनांचा आधार घेत ती तुमच्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू आणते ते पण गेली कित्येक वर्षे. कमाल आहे. अनेक जिंगल्स माझ्या फोनची ट्यून बनून माझ्या सोबत असतात. जसं की एअर-टेल ची ज्यात "जाये बसो किन देस पियाजी" हे गाणे वापरले होते. अनेकदा त्या जिंगल्स मुळेच त्या जाहिराती आवडत्या होतात....जसे की जब घर की रौनक बढानी हो, अमूलची जरासी हसी प्यार जरासा,किंवा पूर्वी लागणारी बजाज ची "ज़ब मै छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था", जुनी डेअरी मिल्क ची त्या मुलीची किंवा सिनेमा पहायला गेल्यावर लागणारी विको ची पूर्ण जाहिरात आठवते? काही जाहिराती जशी की धारा- जलेबी, हमारा बजाज, उस्ताद झाकीर हुसैन यांची वाह ताज, होर्लीक्सची ये है बढता बच्चा कपडा छोटा होता जाये, फ्रेश n juicy असणारी फ्रुटी, गोदरेज ची खुशियोन्के आंगन में पहला कदम........ही लिस्ट थांबतच नाही.

माझ्या मते चांगली जाहिरात(visual media) ती की जी एखाद्या आपण बघत असलेल्या कार्यक्रमाच्या मध्ये व्यत्यय वाटत नाही, बरोबर बसलेल्या कोणाबरोबरही ती बघताना अवघडलेपण येत नाही, हलकेच एक हसू तुमच्या चेहऱ्यावर येते, आणि सहजगत्या नंतर तुम्ही आधी पाहत असलेल्या कार्यक्रमात पोहचता. जर एकंदर जेवढा वेळ मी टी. व्ही. समोर असते त्यापैकी निम्मा वेळ जर जाहिराती बघितल्या जाणार असतील तर, मनोरंजनाचेच निकष त्याला ही लावायला नकोत का? खरंच ती वस्तू विकत घ्यायची की नाही घ्यायची हा नंतरचा विचार.
जो माझा प्रांत नाही, पण मला त्यांच्या जाहिराती मात्र आवडतात, अशा काही त्यांच्या जिंगल्स मुळे किंवा अशीच जाहिरात म्हणून आवडतात. जशी सध्या लागणारी segram ची लिफ्ट मधली "प्यार की राह में चलना सीख ,. इश्क की चाह में जलना सीख. हवासे भी कर बातें लेकिन,. राज चुप्पी का उलझना सीख" किंवा दुसऱ्या दिवशी काहीच न आठवणारा किंवा तसं दाखवणारा सुमीत राघवन. bacardi ची ad ही तशीच त्याच्या जिंगल मुळे आवडणारी. ज्यातल्या काही अजिबात आवडत नाहीत जशा धर्मेंद्र, त्याचा तो सनी यांच्या जाहिराती मात्र .......जाऊ दे अजून काही बोलूया नकोत. खरं तर ज्या गोष्टीना मी सपोर्ट करत नाही त्यांच्या बद्दल काही बोलतही नाही. या काही मात्र त्यास अपवाद.

पण या जाहिराती फक्त पूर्वीच चांगल्या बनत असत असे काही नाही. आजही अनेक उत्तम जाहिराती बनतात जसे की रेड लेबल, डेअरी मिल्क, एअर टेल, आईडिया, एशिअन पेंट्स, रेमंड्स, टाटा nano ची एका लहान मुलीची. जशा ना एअर टेल च्या दोन्ही जाहिराती एक वर उल्लेख केलेली, किंवा दुसरी आर्मीतल्या मुलाची...वोडाफोन पपीची जो त्या मुलीला शाळेच्या बस मागे पळत तिने विसरलेली वस्तू नेऊन देतो, डेअरी मिल्क ची "करेलावाली" मात्र खासच. पूर्वी थोडेच दिवस एक अमिताभ करत असे ती डेअरी मिल्क ची "मिस पालनपुर" ची म्हशीची...ती पाहताच मी उद्गारले की " आता हिला पण सून करून घेणार का?" :D

समाजाचं बऱ्याचदा खरं प्रतिबिंब जाहिरातींमधून उतरतं, त्यामुळेच जर असे घडत असेल की या क्षेत्रातून काही अभिनव, मनमोकळे हसवणारे, किंवा दर्जेदार असे काही येत नसेल तर कदाचित एकंदरीत समाजाचीच अभिरुची बदलत चालली आहे. पण अनेकदा जाहिराती अशा का बनवलेल्या असतात असा प्रश्न सुटत नाही जसे की सध्या दिसणाऱ्या सगळ्या डीओ किंवा परफ्युम्सच्या ....मारा डीओ लागतील मुली/मुले मागे....अरे कोणीतरी जावून सांगा यांना "अरे बाबांनो, असे काही घडत नाही" कोणताही आणि कुठूनही आणलेला परफ्युम असो. तसं पहिला जावे तर तसा थोडा जमानाच "तमीझ" नसण्याचा आहे त्यामुळे सध्या T 20 मध्ये असणाऱ्या पेप्सीच्या जाहिराती, किंवा कोणत्या तरी एका फोन ची ज्यात ती मुलगी आपल्या बापाच्या वयाच्या माणसाला अंकल म्हणत चिडवते आणि हसते. किंवा जेवणाच्या टेबल वर स्वत: न जेवता, फक्त कॅडबरी खाणारी आणि ती बाकी कोणाला न देणारी मुलगी मला आवडली नाही. तशी सध्या एक कोका -कोलाची लिंटास ने बनवलेली "तापमान ४२ डिग्री वाली ...त्यातला सुरुवातीचा सगळा भाग छान वाटतो, अगदी "इस जमीन की सच्ची ख़ुशी है" पर्यंत पण अशा स्थितीत सचिनने येऊन स्वत: कोला पीत "खेलते रहो, खुश रहो" सांगणे हे पटत नाही. त्यापेक्षा नंतर फक्त "कोका-कोला" एवढेच आले असते तरी चाललं असतं ना? असो. पण चांगल्या वाईट गोष्टीनीच तर अनेक गोष्टी अर्थपूर्ण बनतात ना?

5 comments:

  1. अमिताभ बच्चन, सचिन, संजय दत्त , धर्मेंद्र वगैरे सगळे कलाकार , खेळाडू हे कुठल्या तरी जाहिराती मधे पैशासाठी काम करतातच. स्वतःची आई कॅन्सरने मेल्यावर सुद्धा गुटखा ची जाहिरात करणारा संजय दत्त पाहिला की डोक्यात तिडीक उठते. लेख अर्धवट वाटतोय, काही तरी राहिलं का लिहायचं??

    काय योगायोग आहे पहा. याच विषयावर अगदी याच मथळ्याचा मी पण एक लेख लिहिला होता, पण कंटेंट्स एकदम वेगळे होते. लिंक इथे आहे .http://wp.me/pq3x8-1CH

    ReplyDelete
  2. महेंद्रकाका- धन्यवाद. काल रात्री हे पोस्त केले आणि सारा वेळ असे वाटत राहिले की काहीतरी राहिलंय.....आणि तेच सारे आतापर्यंत डोक्यात घोळत राहिले. तुमच्या प्रतिक्रियेने त्यावर शिक्का मोर्तब केले. करते आज पुन्हा edit-update. तुम्ही पाठवलेली लिंक त्यानंतर बघते....नाहीतर काय होते कधी कधी डोक्यातले विचार अजूनच भरकटत जातात....आणि पुन्हा तेच होता "काहीतरी राहिलंय"

    ReplyDelete
  3. झक्कास! झाकणपुराण, ते ही इतके खुस-खुशीत :) तुम्हीच ते लिहू शकता. वाचायच्या आधी माझी कल्पना होती जाहिरातींवरच आहे....:)

    ReplyDelete
  4. > वर्तमानपत्रात आजकाल अनेकदा पहिले पानभर जाहिरात असते
    >

    यांवरून आठवण झाली की लंडन टाइम्समधे १९६६-६७ पर्यन्त पहिल्या पानावर फक्त जाहिरातीच असत. तिथे बातम्या देणे हे अश्लील (कुरूप, अप्रिय, असभ्य या अर्थाने) समज़ल्या ज़ायचे. इंग्लंडमधल्या इतर मातब्बर वर्तमानपत्रांत (मुख्यत: गार्डियन) मात्र पहिल्या पानावर सध्याप्रमाणे मुख्य बातम्या असत. अगदी १८८१ मधे केसरीच्या पहिल्या अंकात पहिल्या पानाचे स्वरूप सध्यासारखेच होते, असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा लंडन टाइम्सची यांबाबत नक्की काय भूमिका होती हे मला कळत नाही. कदाचित अगदी पहिले जाहिराती देणे आर्थिक फायद्याचे समज़ले ज़ात असावे. मात्र तेव्हा पहिल्या पानावर पानधर एकच जाहिरात नसे, तर अनेक छोट्या जाहिराती असत. आज़मितीला १९२०-३०-६० मधला लंडन टाइम्सचा अंक चाळताना ते पहिले पान नक्कीच विचित्र वाटते. गूगलवर मिळालेली माहिती - "On 3 May 1966 it started printing news on the front page for the first time - previously the front page featured small advertisements, usually of interest to the moneyed classes in British society." हा बदल विल्यम रीस-माग (can't write Rees-Mogg properly in Devnagari right now) यानी केला अशी माझी स्मृति होती, पण तो टाइम्सचा सम्पादक होण्याआधीच विल्यम हेली (Haley) या सम्पादकानी हा बदल केल्याचे दिसते. नेट-वर 'london times first page advertisements deano risley' वर शोध घेतल्यास http://iconicphotos.wordpress.com स्थळावर ३-मे-१९६६ च्या टाइम्सचे मुखपृष्ठ पाहता येते, आणि टाइम्सच्या पहिल्या पानावर आलेले पहिले बिन-रंगीत प्रकाशचित्रही दिसते.

    ReplyDelete
  5. धन्यवाद नानिवडेकरजी. थोडक्यात अशी पानभर जाहिरात देवून आजची वृत्तपत्रे गतकाळात डोकावून येतात तर!

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!