Monday, May 20, 2013

छोटी छोटीसी बात …

खरंतर यापूर्वीच कधीतरी भाज्या आणि त्या आणायला मी किती आवडीने जाते हे लिहून झालंय …… पण तरीही काहीतरी उरतेच. अनेकांना मंडईत जाणे म्हणजे आपल्याच डोक्याची मंडई झाल्यासारखे वाटते.
माझी एक मैत्रीण तिथे शिरताच जी शिंकायला सुरुवात करते ती थेट बाहेर पडेपर्यंत…. त्यामुळे कधी एकदा भाजी घेते आणि इथून बाहेर पडते असे तिला होवून जाते. माझ्या नवरयाला भाजी मंडई म्हणजे तिथे पडलेली घाण, कचरा एवढेच नजरेसमोर येत असावे, त्यामुळे तो शक्य तेवढी टाळाटाळ करत असतो. परवा माझ्या एका नवीन लग्न झालेल्या मित्राला, बायकोने भाजी आणायला पाठवले, हा बाबा घेऊन आला "पालक, शेपू, मेथी, राजगिरा, अळू ,मुळा ……. अशा सगळ्या पालेभाज्या, त्या पण २/२ गड्ड्या प्रत्येकी" बिचारी पुन्हा कधी त्याला भाजी घेऊन ये म्हणणार नाही कदाचित!

पण माझे असे नाही, माझ्यासाठी तो एक आनंदाचा भाग आहे. भाजी आणायला जायचे म्हणजे, माझ्या डोळ्यासमोर येतात त्या ताज्या हिरव्यागार भाज्या फक्त, तळात कोबीची पाने किंवा केळीची पाने टोपलीत छानशा रचून ठेवलेल्या भाज्या, हिरव्या रांगोळीत रंग भरावेत तशी मधेच कोठे लिंबाचा, मधेच लाल भोपळा तर कुठे टोमाटो, तर कुठे लाल सिमला मिरची. भरताची कधी पंढरी वांगी तर कधी जांभळी वांगी, मुळा हि रंगांची उधळण अजूनच वाढवतात. हिरव्यात तरी किती छटा असाव्यात …… मटारचा हिरवा वेगळा, वाल पापडीचा अजून वेगळा, तर भेंडी काळ्या रंगाला जवळ करणारा, गवार, पडवळ यांचा वेगळाच! तेथे जाणवणारा प्रत्येक भाजीचा आपला एक दरवळ. लिम्बांपाशी वेगळा ताजा असा, आले, लसूण, मिरच्या यांजवळ एक तिखटसा, पालेभाज्यांजवळ एक वेगळाच असा मातीच्या जवळचा……

अनेक वर्षे अशा रितीने तिथे जाऊन अनेक भाजीवाल्या माझ्या चांगल्याच ओळखीच्या झालेल्या आहेत. "ताई, आज ही भाजी घेवून जाच किंवा आज ही नेऊ नका" असं त्यांनी सांगण्या इतक्या. अशीच एकजण होती. अगदी बोलघेवडी अशी. मंडईत शिरल्या शिरल्या पहिल्या २/३ गाळ्यातच ती भाजी घेऊन बसत असे. आपण समोर गेलो की आधी एक मोठ्ठं हसू. आणि मग आमच्यात संवादरुपी लटकी चकमक घडे.

मी: कोबी कसा दिला ताई?
ती: ४० रुपये किलो.
मी: आणि वांगी? गवार
ती: तीस रुपये किलो, गवार  ६०
मी: लोकांनी काय भाज्या खाऊच नयेत का? इतक्या महाग भाज्या असतील तर?
ती: महाग कुठे देते? चांगलं खावं, प्यावं, सारखा पैशाचा विचार करू नये.
मी: अर्धा किलो कोबी, दीड पाव वांगी द्या.
ती: आणि काकडी गाजर नको? बर ताई एक बोलायचं आहे तुमच्याशी.....
मी: काय?
ती: मोठ्या मुलाचं कॉलेज नुकतंच संपलय, तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीला लाऊन घ्या न.....

एकीकडे हे बोलत तिने आपल्या मनानेच माझी भाजीची पिशवी तयार केलेली असते.

मी: काय शिकलाय? काय आवडतं त्याला? हा माझा फोन नंबर त्याला फोन करायला सांगा, मी बघते.
ती: साहेब येत नाहीत आजकाल?
मी: माझी मीच येते गाडी घेऊन.
ती: तुम्ही गाडी घेतली नवीन?
मी: नाही, जुनीच आहे, शनिवार, रविवार साहेब माझ्यासाठी ठेवतात गाडी.

नंतर काही दिवसांनी मंडईतल्या सगळ्या भाजी वाल्यांचे गाळे बदलले गेले. ही अगदी लांब गेली. पण गाडी पार्क करून आत शिरण्याचा माझा रस्ता तोच राहिला. तिच्या गाळ्यापाशी पोहचेपर्यंत माझी जवळपास सगळी भाजी घेऊन होत असे. तिच्याशी थोडे बोलून जावे म्हणून थांबले तर....

ती:  या! सगळी मंडई पिशव्या भरून भरून घेऊन यायचे, इथे काही घ्यायचे नाही! शोभतं का ताई तुम्हाला हे?
मी:  जागा तुम्ही बदलली आणि नावं मला ठेवा. एखादी भाजी इथून घ्यायची म्हणून आधी नाही घेतली, आणि तुझ्याकडे पण नसली तर, मला त्रास ना पुन्हा मागे जाऊन आणण्याचा?
ती:  तरी मटार न्याच आता, स्वस्त दिला ६० रुपये किलो. किती देऊ, २ किलो करू का?
मी:  नको, आता खूप भाजी घेऊन झालीये, एवढ्या भाजीचे निवडणे होणार नाही आज मला.. दोन         दिवसाच्या सुट्टीत किती कामे संपवायची मी?
ती:  मी निवडून ठेवू का? संध्याकाळी येऊन घेवून जाल का?
मी:  असं करा ना उसळच करून पाठवा घरी!
तोपर्यंत किलोभर मटार बाईने पिशवीत भरलेला असतो वर काकडी, टोमाटो.
मी: येवढे नको.
ती: खाता का नुसतंच त्याकडे बघून पोट भरता? मी पैसे मागितले का?
मी: अहो ताई, प्रश्न पैशांचा नाही, घरी इन मीन अडीच माणसे एवढी जास्त भाजी संपत नाही, इथे रुपया दोन रुपयांसाठी घासाघीस करायची आणि नंतर वाया घालवायची हे पटत नाही म्हणून.
ती: जिवाला खा जरा! एवढं काम करून पैसे मिळवता आणि खात का नाही? बघा आजकाल चेहरा कसा उतरून गेलाय तुमचा.
मी: हो गं बाई, तुझ्याकडची भाजी येत नाही न माझ्या घरी, त्यामुळे काही अंगीच लागत नाही बघ!

असाच अजून एक भाजीवाला आहे. दिवसा सरकारी नोकरी करतो. शेती करतो आणि संध्याकाळी भाजी मंडईत असतो. तो विकतो त्यापैकी बऱ्याच भाज्या त्याच्या घरच्या असतात. त्यामूळे कोथिंबीर घेतली की न्या घरचा आहे म्हणत पुदिना, कढीपत्ता पिशवीत जाऊन बसतोच. तिथेही, "साहेब नाही आले बरेच दिवसात, आजकाल धाकट्या ताईपण येत नाहीत तुमच्या संग" ही चौकशी होतेच. एकदा नवीन गाडी घेऊन भाजी आणायला गेले तर दोघांनीही विचारले "ताई पेढे नाही आणलेत?" आणायला पाहीजे होते असे प्रकर्षाने वाटून गेले…

चार शब्द प्रेमाने बोलायला कोणालाच पैसे पडत नाहीत. पण कधी कधी हेच लोकांना कळत नाही. आणि मग लोकं आयुष्यातले लहानसे आनंदाचे ठेवे हरवून बसतात.

3 comments:

  1. Nice, छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करणारे लोक कमी होत चालले आहेत, पण चार शब्द प्रेमाने बोलायला कोणालाच पैसे पडत नाहीत हेच खरं!!

    ReplyDelete
  2. अनघा इज ब्याक :)

    ReplyDelete
  3. सौंदर्य टिपणारे मन असले कि जगातले सारे सौंदर्य दिसू लागते, साऱ्या गोष्टींमध्ये सुंदरता दिसू लागते, आनंदी राहण्याचा स्वभाव असला कि ती व्यक्ती मधमाश्या जसा फुलातला मध टिपून घेतात तसा प्रत्येक घटनेतून आनंद टिपून घेते आणि मनमिळावू स्वभाव असला कि कोणाशीही चार चांगले पेमाचे शब्द बोलोयाला त्रास पडत नाही, इगो आड येत नाही. हे सारे जमते ती व्यक्ती म्हणजे अनघा !!!

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!