Wednesday, May 29, 2013

स्वच्छतेचे धडे … कोण शिकणार कोण शिकवणार?


फ्रेशरूम मधील डस्टबीन जे नेहमी  पायाने उघडले जाते, त्याच्यात बिघाड आहे, आता ते पायाने उघडत नाही, तर तुम्ही त्यात वापरलेले  टिश्यू पेपर कसे टाकाल?  उत्तरे - 
-हाताने डस्ट बीन चे झाकण हाताने उघडून 
-डस्टबीन च्या बाहेर कुठेही 
-आता डस्टबीन उघडतच नाही पायाने, तर टाकून देऊ  वाशबेसिन मध्ये 
-फ्रेश रूम स्वछ ठेवणे ही आपली जबाबदारी नाही, त्यामुळे काहीही करा 

हा न एका अभ्यासक्रमातला प्रश्न असायला हवा, आणि हा एकच प्रश्न नाही तर यासारखे असे अनेक …. आणि बालभारती किंवा सामान्य विज्ञान हे विषय शिकावायच्याही आधी हा विषय सर्व लहान मुला मुलींकडून घोटून घ्यावयास हवा. वर वर्णन केलेले उदाहरण गेले काही दिवस मी रोज पाहते आहे. शेवटी परवा एका मुलीला जी असेच टिश्यू पेपर जमिनीवर टाकून चालली होती तिला मी टोकले, पण मला माहित आहे असे वागणारी ती एकटी नाही. आसपास नुसते साक्षर भरलेत, सुशिक्षित कमीच. 

पाण्याचा वाहता नळ व्यवस्थित बंद करण्याचे कष्ट न घेणे, वाटेल तसे आणि वाटेल तितके टिश्यू पेपर वापरणे, अनेकींच्या पर्स मध्ये रुमाल वगैरे काहीच नसावे? बेसिन जवळ उभे राहून, केस सारखे करतांना, गळलेले केस तसेच सोडून जावे …. अशा एक न दोन अनेक गोष्टी. एका वाक्यात सांगायचे झाले तर "Toilet Etiquettes" शिकवलेलेच नाहीत यांना कोणी. बर पूर्वी कोणी शिकवले नाहीत तर आता समाजात वावरताना काही बघून, समजून घेवून काही चार चांगल्या गोष्टी शिकाल की नाही? अनेकदा मला या लोकांना एक प्रश्न विचारावा वाटतो "तुम्ही तुमच्या घरी असेच वागता का?" या प्रश्नांचे उत्तर जर हो असे असेल तर मग मात्र कठीण आहे. मग मात्र वयाच्या ३/४ वर्षीच एका अशा सक्तीच्या अभ्यासक्रमाची गरज आहे, जो पूर्ण केल्याखेरीज कोणत्याही शाळेत प्रवेश मिळणार नाही. 

मध्ये एक दिवस रात्री उशिरापर्यंत ऑफिस मधे होते, फ्रेश रूम मध्ये शिरले आणि तशीच उलट्या पावली परत फिरले कारण कोणाच्या तरी उलटी ने भरलेले वाशबेसीन तसेच होते. एवढेच नव्हे तर त्याचा दर्प तेथे भरून राहिला होता, अजून २ सेकंदभर तेथे असते तर मलाच मळ्मळायला लागले असते. हे लिहिताना सुद्धा मला इतकी किळस वाटते आहे, तर जिला कोणाला हे साफ करावे लागले तिचे काय? ते बेसिन तसेच सोडून जाताना त्या मुलीला/स्त्रीला काहीच कसे वाटले नाही? पण हे कोणी लक्षातच घेत नाही. 

अशा ठिकाणी स्वच्छतेसाठी अनेक स्त्रिया काम करत असतात, पण त्याही माणूसच आहेत ना? का नाही आपण माणसांना माणसांप्रमाणे योग्य त्या मानाने वागवू शकत? का असे सर्वत्र पडलेले टिश्यू, केस त्या स्त्रियांनी गोळा करून डस्टबीन मध्ये टाकायचे? का अशा रितीने खराब केलेले बेसिन कोणी दुसरीने स्वछ करायचे? मला बाकी इंडस्ट्री जसे की मन्युफ़्रक्चरिङ्ग किंवा बँकिंग या बद्दल फार माहित नाही, पण माझ्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या जणी किमान कॉम्प्युटर ग्राज्युएट किंवा  इंजिनीअर असतात ना? मग तरीही असे ? पुस्तकी शिक्षण आपल्याला योग्य तऱ्हेने जर जगायला शिकवणार नसेल तर मग काय उपयोग? अनेकदा आपण समाजाच्या निम्न स्तरातील अस्वच्छता या बद्दल तावातावाने बोलतो, अशा लोकांमुळे आपले शहर किती बकाल होत चालले आहे यावर बऱ्याचदा आपले एकमत असते, पण आपल्यातल्याच या लोकांचे काय करायचे?

एक स्त्री म्हणून मी या गोष्टी वारंवार पहाते, म्हणून त्याच सांगू शकते, पण याचा अर्थ बाकी सर्वत्र सर्व ठीक आहे असे नाही … कारण तसे असते तर अनेक वर्षांपूर्वी Infosys च्या एका induction मध्ये तेंव्हाचा FLM राहुल देव ला, नवीन joinees ना "don't spit out chewing gums in urinals, as it gets sticked there and a person cleaning it, needs to remove it with his hands, please try to respect those people who keep this World class campus beautiful"  असे सांगावे लागले होते यातच सर्व काही आले नाही?

3 comments:

  1. हम्म... हे वाचताना सध्या मला खटकतं आहे ते सांगते. रोज सक्काळी सक्काळी मी एका मैत्रींणीबरोबर फिरायला जाते. वाटेत ती इतक्या वेळा थुकते, नाक शिंकरते (आणि स्वत:च्या शर्टाला हात पुसते)की हैराण व्हायला होतं. माझ्या वेळ पाळण्याच्या बाबतीच्या आग्रहामुळे आधीच ती थोडीशी वैतागलेली असते. आता हे नवीन....शेवटी उपाय म्हणून मीच तिच्यासाठी टिश्श्युपेपर ठेवायला सुरुवात केली आहे. निघालो की मी तो आधी पुढे करते. बघू लक्षात येतं का.... पण कधी बदलणार आपल्या या सवयी?

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे मोहना. पण तुझ्या पेशन्सला दाद द्यायला हवी. खटकणाऱ्या गोष्टी बदलण्याचा हा प्रयत्न स्तुत्य.
      आणि एक - परवा मला इथे तुझी अजून एक कम्मेण्ट दिसत होती "ऐलोमा पैलोमा" वर पण आता दिसत नाहीये. blogger गणलय बहुधा :)

      Delete
    2. :-).

      हम्म...मी काय लिहलं होतं ते आठवून परत टाकते तिकडे.

      Delete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!