Friday, August 31, 2012

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी.......

एक भली मोठी गुहा आहे. आत शिरायला मात्र एक लहानशी वाट आहे. गुहा म्हंटलं की अंधार आलाच. इथे मात्र भरपूर मशाली पेटवून ठेवल्या असल्यामुळे भरपूर प्रकाश आहे. मी आत शिरते. भीती वाटत कशी नाही मला हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. पण मी आत जात आहे. गुहेच्या मध्यभागी खूप माणसे आहेत. उलटी टांगून ठेवलेली. ती जिवंत आहेत का हा अजून एक प्रश्न मला पडलाय. जिवंत किंवा मृत असल्याचे कोणतेच लक्षण दिसत नाहीये. पण त्याचेही मला विशेष काही वाटत नाही. मी थोडा वेळ तिथे थांबते मग बाहेर पडते. मग एक तीन काठ्यांच्या मध्यभागी पेटवलेली शेकोटी दिसते. सर्वत्र लाल रंगाचा प्रकाश आहे.

हे स्वप्न अगदी आता आतापर्यंत पडणारे. म्हणजे ते या पुढे पडणारच नाही असे काही मी सांगू शकत नाही कारण दर वेळी तापाने फणफणले की आख्खी रात्र हेच स्वप्न मला पडत राहते. अगदी आठवतंय तेंव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी. लहानपणी तर एक वेडी कल्पना माझ्या मनात होती. कदाचित हे स्वप्न अजून विस्ताराने कधी तरी पडेल मला. त्याचा अर्थ कळेल. हे अर्धवट स्वप्न वाटे त्यावेळी, आणि जर पूर्ण एपिसोड स्वप्नात दिसला तर बरे होईल असेही वाटे. त्यामुळे अनेकदा, "मला ताप यावा" अशी माझी इच्छा असे. तापाने फणफणलेली मी आणि त्या स्वप्नात असणारी शेकोटी, तो लाल रंगाचा भगभगीत प्रकाश, त्या मशाली, काय संबंध आहे साऱ्याचा एकमेकांशी माहित नाही. इतक्या लहानपणीपासून हे स्वप्न पहातीये मी, त्यामुळे कधी याच्या अर्थाचा विचारच मनात आला नाही. ताप आला की हे स्वप्न पडणारच हे इतके पक्के आहे. पण दरवेळी सकाळी जाग आल्यावर मनात उरतो तो फक्त लालभडक प्रकाश.


पाऊस पडत नाहीये, पण पडून गेल्यासारखं वातावरण आहे. मी एक्स्प्रेस वे वर गाडी चालवतीये. बरोबर अजून कोणी गाडीत नाहीये. नेहमी चालवते तोच (जरा जास्तच ) स्पीडही आहे गाडीचा. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, मन प्रसन्न. गुंगून गेलीये हे दृश्य डोळ्यात साठवून घेण्यात. स्पीड वाढतोच आहे, आणि रस्त्यावरचं माझं लक्ष कमी होत गेलंय. शॉट१ कट.......तोच रोड, तीच मी, तीच गाडी, तसाच स्पीड. माझे लक्ष रोडवरच आहे. हळूहळू डोळ्यावर झापड येतीये माझ्या, या मला बघणारी अजून एक मी आहे. ती घाबरते. अक्सिडेंट होणार आता माझा या कल्पनेने. पण असं काही होत नाही. एका सरळ रेषेत मिटलेल्या डोळ्यांनी मी गाडी चालवते आहे. ( बाकी लोकांचे नशीब अगदीच जोरावर आहे म्हणायचे). एक मी गाडी चालवतीये आणि एक मी त्या मला बघते आहे. शॉट २ कट. वर्षानुवर्षे म्हणजे जवळपास १० वर्षे अधून मधून मी हे एक स्वप्न पाहतेच. या स्वप्नाचा अर्थ लावू जावे तर वाटते, कुठे तरी मला जागे, सजग, सतर्क ठेवणारे हे स्वप्न आहे. किमान तशी गरज आहे हे जाणवून देणारे. पण स्वप्नातून जागे झाल्यावर मनात उरतो तो आजूबाजूचा हिरवेगार परिसर, रस्त्याचा एक राखाडी, काळा रंग.


एक सुंदरशी बाग आहे. खरतर वाडी आहे. कारण दुतर्फा पोफळीची झाडे आहेत. अशा वाड्या कोकणात कुठेही दिसतातच. रस्ता, मध्ये वाडी आणि पलीकडे थेट समुद्र किनाराच. परिसर खूप सुखावणारा आहे. इथे मला मी कुठेच दिसत नाहीये. पण मी हे सारे पहात आहे. एक मस्त पैकी सैर होते या परिसराची. दरवेळी या स्वप्नातल्या बागेत कोणत्या तरी फळांचे ढीग रचलेले असतात. कधी केळ्यांचे घड, कधी नारळाने लगडलेले झाड, कधी आंब्याने भरून ठेवलेली मोठी टोपली. या स्वप्नातून जागे झाल्यानंतर ही मन प्रसन्न असते. त्या त्या फळाच्या रंगाचे एक अवकाश सोबत घेवून. अगदी पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा................

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!