मुळात माझे आणि त्याचे नाते हे कोणत्याही रूढी, परंपरा, नियम यात बांधलेले नाही. त्याचे आणि माझे नाते इतके वैयक्तिक आणि घट्ट आहे कि सहजासहजी कोणी त्यास धक्का लावू शकणार नाही. कारण मुळात हे नाते एका श्रद्धेचे आहे. तो देव म्हणून माझी त्यावर श्रद्धा आहे एवढेच खरेतर पुरेसे. पण कदाचित मग अशीच श्रद्धा त्याचीही माझ्याबाबत एक व्यक्ती म्हणून असेल आणि म्हणून कदाचित आमचं इतकं घट्ट नातं टिकून असेल.
कोणतेही देवस्थान, कोणतेही गाव, कोणतेही देऊळ, कोणतीही मूर्ती, कोणत्याही पादुका, कोणत्याही देवळाचा कळस, कोणतीही पायरी या साऱ्यात मी त्याला पहात नाही. कोणतेही संत, कोणतेही साधू हे म्हणजे तो नव्हे. माझी तयाप्रती असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मला या साऱ्यांची गरज असतेच असे नाही. म्हणजे अशी ठिकाणे मला वर्ज्य आहेत का तर तसे नाही पण तिथे गेल्यानेच माझ्या श्रद्धेचा अविष्कार घडतो का? तर तसे मुळीच नाही. उद्या जगातल्या सर्व अशा ठिकाणांमध्ये एक स्त्री आहे म्हणून प्रवेश मिळणार नाही अशी स्थिती निर्माण जरी झाली तरी मला काडीचाही फरक पडणार नाही. खरेतर मुळात अशी श्रद्धा आहे हे हे व्यक्त करण्याचीच मला गरज नाही.
तो म्हणजे घरात असलेल्या किंवा नसलेल्या मूर्ती नाहीत, कोण्या एका स्थानात, कोण्या एकाच दगडात तो वसतो असेही नाही. तो तुमच्या माझ्या सारखा माणूस नाही त्यामुळे माणसाची जात करते ते देवाण घेवाणीचे नियम तिथे लागत नाहीत. माणसांसारखी लाच घेत जसे की पेढे, नारळ, फुले, दक्षिणा, देणगी अजून काय काय घेत इच्छा पुऱ्या करणारा तो "देव" नव्हे. किंवा यातले मी काहीच केले नाही म्हणून माझ्यावर डूख धरून माझे वाईट करतो, असाही तो ही "देव" नव्हे. माझ्या अथक प्रयत्नांना जिथे मर्यादा येतात आणि तरीही गोष्टी घडतात ते घडवणारी शक्ती म्हणजे देव. तरीही माझे जे काही चांगले वाईट घडण्यास तो जबाबदार नाही माणसाच्या आकलनापल्याड असंख्य गोष्टी घडतात चांगल्या/वाईट, माणूस किंवा कोणताही प्राणी सोडून, ते घडविणारा तो जो कोणी कर्ता, जी शक्ती तो देव. त्याला देव म्हणूनच संबोधले पाहिजे असे नाही. त्याला पुजलेच पाहिजे असेही नाही.
हो… आणि मी एक स्त्री आहे. स्त्री म्हणून जन्म किंवा त्यासोबत मिळालेल्या कोणत्याही गोष्टी ह्या माझ्या अस्तित्त्वाचाच भाग आहेत. त्यामुळे त्या गोष्टींमुळे मी स्वतःला कमी लेखत नाही. वयात येणे, स्त्री म्हणून फुलण्याची सुरुवात होणे , शरीराने प्रजजनासाठी तयार होणे यास अतिशय नैसर्गिक प्रक्रिया मी मानते. मग या गोष्टी माझ्या दैनंदिन आचरणातील अडथळा बनत नाहीत. या कोणत्याही गोष्टीचे अवडंबर मी माजवत नाही, त्यासाठी कधी कोणत्या सवलतीची अपेक्षाही मला नाही. या बाबत समाज, इतर लोकं काय विचार करतात, म्हणतात हे सारे माझ्यासाठी गौण आहे. मी जशी आहे तशी मला स्विकारणारा तो माझा "देव" आहे. माझ्या कोणत्याही शारीरिक स्थितीचा त्यास विटाळ होत नाही. कारण मुळात आमचे नाते त्यावर अवलंबून नाही. त्याचे आणि माझे नाते हा एक धागा आहे माझे मन आणि त्याची शक्ती यास जोडणारा.
अशी श्रद्धा जिथे असेल तिथे काय फरक पडतो कोणते मंदिर, कोणती पायरी, कोणता चौथरा मला मी स्त्री आहे म्हणून वर्ज्य असेल तर? फरक पडतो… नक्कीच जोवर एक स्त्री या साऱ्याला महत्त्व देते तोवरच …… साऱ्या स्त्रिया एकदाच हा का विचार करत नाहीत की अशा भेदाभेद करणाऱ्या कोण्या देवाची मलाच गरज नाही? त्यासाठी कोणा व्यक्तीशी , संस्थेशी, कोणत्या समाजाशी माझे कोणते भांडण नको कोणताही विद्रोह नको …. कारण गरजच नाहीये त्याची. असे नियम कोणीतरी बनवले, आपण ते मानले म्हणून त्याविरुद्ध लढा देणे आले आणि मग पुढचे सारे सुरु झाले ना?
एक स्त्री म्हणून मी स्वत:ला कमी लेखत नाही, त्याचबरोबर एक स्त्री म्हणून मी कोणापेक्षा वरचढ ठरत नाही. मग मी स्त्री म्हणून कोणाकडून कोणत्याही फेवर ची अपेक्षा ठेवत नाही. मी स्वत:ला नाजूक समजत नाही कोणत्याही प्रकारे. माझे खंबीर असणेही जगावेगळे नाही. जसे हळवेपणा हे माझे शस्त्र नाही, तसेच शरीर, मनाचा कणखरपणा हे देखील नाही. माझी समाजाच्या कोणत्याही स्तराशी स्पर्धा नाही, असेल तर फक्त स्वत:शीच. एक माणूस म्हणून जगणे जास्त प्रिय आहे मला. समाजाचा दुसरा भाग म्हणजे पुरुष …. कोणीतरी सुपर पॉवर म्हणून त्यांच्याकडे पाहत नाही मी. मला न मिळणाऱ्या गोष्टींसाठी पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाने शिमगाही मी करत नाही. त्यांनीही माणूस म्हणून जगावे आणि जगू द्यावे इतकी साधी सोपी अपेक्षा आहे माझी. कोणत्याही बाबतीत त्यांच्याशी बरोबरी करावी असे मला कधी वाटत नाही. कारण मी स्वत:ला कमी लेखत नाही . स्त्री म्हणून कोणता फायदा करून घेणे आणि दुसरीकडे स्त्री म्हणून अन्य्याय होतो अशी ओरड करणे ह्या दोन्ही गोष्टी मला वर्ज्य आहेत. या जगाकडे मी पुरुषांनी, त्यांच्या नियमांनी बनलेले जंगल म्हणून पहात नाही. जे नियम मी मानतच नाही ते कोणी बनवले, किंवा ते कसे दांभिकतेकडे झुकणारे आहेत किंवा माझ्यावर कसे अन्य्याय करतात हा प्रश्नच उद्भवत नाही, पर्यायाने मी त्यास सहन करणे, त्या विरुद्ध विद्रोह करणे हे देखील नाही. देव धर्म त्याचे आचरण हे माझे, खरेतर प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याचे कोणी अवडंबर माजवत असेल तर ते मी मानत नाही. म्हणजेच पर्यायाने मी सहन काही करत नाही. किंवा तसे करण्याची वेळ स्वत:वर येऊ देत नाही.
एकच नंबर ...निष्काम कर्मयोग यालाच म्हणत असावेत.
ReplyDeleteे.very balanced and sound minded approach.. ह्या लेखाबद्दल आभारी आहोत.
keep writing.
Nice .. khup chhan wichar
ReplyDelete