Wednesday, August 1, 2012

किसको ऐसी बात कहे..................


रात्रीचा एक वाजून गेलाय. मनाविरुद्धच मी ऑफिसच्या बाहेर पडलोय. गाडी सुरु करतो, त्याचबरोबर सूर कानी पडतात. " किसको ऐसी बात कहे" खरंच कोणाला सांगू ही अशी अवस्था! काचेवर वायपर सरसर फिरता आहेत आणि मनावर आठवणी. पावसाचे थेंब पुसले जातात पण या आठवणीचं काय करू? बाहेरचं फारसं धड दिसतही नाहीये. तसं मनातलं काही तरी कुठे उमगतंय? संध्याकाळ पासूनच मी थोडा अस्वस्थ आहे. तसा प्रत्येक पाऊस मला अस्वस्थच करतो, अजब अशी बैचैनी पसरत जाते. काही कळत नाही मग. आधी भूरभूर वाटणारा पाऊस आता नुसता कोसळतो आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्याचीच इच्छा नव्हती. वाटतं की एखाद्या खोलीत कोंडून घ्यावं, काम करत राहावं, काही संपर्क नको जगाशी. अशा पावसात आजूबाजूला सगळेच लोक कसे इतके प्रफुल्लीत होतात हे आजकाल मला समजत नाही. 

"खरतर पाऊस मला पूर्वी कधी आवडलाच नाही. लहान होतो तेंव्हा बाकीची मित्र मंडळी मजेत भिजत, कागदी होड्या करून पाण्यात सोडत. पण मी, ....मी नाही हे काही केलं. पुढे कॉलेजमध्ये ही पहिली काही वर्षे मी कटाक्षाने या पावसापासून दूर राहिलो. शेवटच्या वर्षी, आपल्या ग्रुपची पावसात ट्रीपची टूम निघाली. मनापासून यायची इच्छा नव्हतीच, पण तू खूप उत्साही दिसलीस. तशी आपली नुकतीच थोडी ओळख होवू लागली होती. पण ना कळे का तुझ्या सोबत काही क्षण घालवण्याची एकही संधी मी सोडत नव्हतो. मंतरलेले दिवस ते. खरंच ती ट्रीप लक्षात राहावी अशीच होती. आपण सारे कुठल्याशा गडावर गेलो होतो, अगदीच भूरभूर असा तो पडत होता. तुझ्या बटांवर ते चिमुकले थेंब इतके गोड दिसत होते, की नजर हटत नव्हती. तेवढ्यात तुला कोणीतरी कविता म्हणायचा आग्रह केला. ती ऐकायला मी ही उत्सुक होतोच. तुझ्या तोंडून आली ती................


              "नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली"


तुझ्यामुळे कविता, गाणी काव्य आवडायला लागले, तशी तू ही. पण शब्दात व्यक्त करणं मला कधी जमलंच नसतं. तरीही हळू हळू आपण बाकी ग्रुपपासून वेगळे होत गेलो. तू एकदा बोलायला लागलीस की अखंड धारा बरसताहेत असे वाटायचे. मुळातच हुशार तू, त्यात अनेक कवितांची पाखरणी, तरीही ते सहज असे.....तुला पाऊस खूप आवडत असे. आकाशात जरा ढग दिसले की तू मोहरून यायचीस, अगदी त्या मोराप्रमाणे. तुला अशावेळी कितीतरी कविता आठवत. तू शब्दश: कविता जगायचीस. कवितेचे सारे भाव तुझ्या डोळ्यात दाटून यायचे, अन मी तुला पाहताच राहायचो. वाटायचं असं एखाद्या गोष्टीवर प्रेम करता यायला हवे.

असेच एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. एम.बी. ए च्या दुसऱ्या वर्षाला होतो आपण तेंव्हा. थोडी हलकी सर होती, म्हणून लायब्ररीच्या पायऱ्यांवर आपण दोघे बसून होतो. तू "चल, ना भिजू" असा हट्ट धरून होतीस, आणि मी नेहमी प्रमाणे " नको" चा राग आळवत होतो. त्या दिवशी कसे आठवत नाही पण तू माझे ऐकलेस, आणि थांबलीस. आजूबाजूला फारसं कोणी नव्हतंच आणि तू हलकेच गुणगुणायला सुरुवात केलीस " ओ, सजना बरखा बहार आयी, रस की फुहार लायी, आखियोंमे प्यार लांयी" तू गुणगुणत होतीस आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. चटकन मी उठलो, म्हटलं, "चल जावू या" 

तुझ्या आग्रहाखातर, मी चक्क रागदारी, हिंदुस्थानी संगीत ऐकू लागलो. आठवतं? एकदा तुझ्या आग्रहाखातर आपण सवाई गंधर्वला गेलो होतो, तो तुझा सखा पाउस, तिथेही तुझ्या मागे आला, भर डिसेंबर महिन्यात, तू तर काय मग..........मध्यरात्री पावसात जितका भिजलो नाही तितका तुझ्या सुरात भिजून निघालो. तुला बाईकवरून तुझ्या घरी सोडायला जाताना. अवेळी पडून गेलेला पाऊस आणि तुझे गुणगुणणे.

शिक्षण संपले, अर्थार्जन सुरु झाले. आपण दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात, मी आय. टी. वाला तर तू बँकेत. मी चिडवायचो तुला " या बँकेतून बाहेर पडणाऱ्या नोटा बघून घ्या, त्यावर कविता लिहिलेल्या आढळतील." तू चिडायचिस, ठणकावून सांगायचीस " investment बँकर आहे मी". एकदा मी घरी होतो, मार्च महिन्याचे शेवटचे दिवस, दुपारी चार वाजताच काळोख दाटू लागला, पावसाची चिन्हे दिसू लागली. मी, तुला फोन केला, म्हंटले " ए, बाहेर पाहिलयस का ? काय मस्त हवा आहे, बाहेर पडणार आहेस की investment ची गणिते मांडत राहणार आहेस? पिक अप करू का तुला थोड्या वेळात? चल लॉंग-drive ला जावू" तू हो म्हणालीस. खूप उत्साहाने मी तयार झालो. खाली पार्किंग मध्ये पोहचून गाडी काढणार, पाहतो तर काय, तू रिक्षातून उतरत होतीस. मी सुखावलो, वाटले जो विचार माझ्या मनात चालू आहे, तसेच काही हिच्याही. पण माहित नाही काही तरी बिनसले होते त्या दिवशी तुझे. गाडीत बसल्यावर मी तुझा हात हाती घेतला, पण तू काही न बोलता सोडवून घेतलास. मी म्हणालो " गाडीत सी. डी. नाहीयेत, आज आपण काहीतरी live ऐकूयात, पण काहीच प्रतिसाद नाही. आपण थांबलो एका ठिकाणी, मी पुन्हा पुन्हा तुला "काय झालंय" असं विचारले, पण तू "काही नाही" या पलीकडे काही बोलली नाहीस. 

ती आपली शेवटची भेट. वारंवार मी तुला काय झालंय असं विचारत राहिलो, फोन वर, मेल्स वर, पण सारे प्रयत्न व्यर्थ ठरत होते. नंतर नंतर तू माझे फोन घेणंही बंद केलंस. अनेक दिवसांच्या तुला बोलतं करायच्या माझ्या प्रयत्नांतून काहीच हाती लागले नाही. शेवटी सारे विसरून मी स्वत:ला माझ्या कामात गुंतून घेत गेलो. जगाच्या दृष्टीने एक मोठा माणूस. पैसा-अडका सारं काही बक्कळ कमावणारा. बाकी सारे दिवस तर ठीक जातात पण, तुझा तो मित्र "पाऊस" फार जीव नकोसा करतो. तुझ्या साऱ्या आठवणींचा चित्रपट माझ्या समोर उभा करतो. पहिले थेंब पडू लागतात आणि विचार येतो " कुठे असशील, काय करत असशील?" असा हा पाऊस तुला ही असं अस्वस्थ करत असेल का? जशा तुझ्या आठवणी मनात काहूर माजवतात माझ्या, तशा त्या तुझ्याही मनी दाटून येत असतील का? आज ही तू कविता, गाणी तशीच गुणगुणत असशील का? "काली घटा छाए" किंवा "पिया बिन नहीं आवत" हे आज ही तुझ्या ओठी येत असेल का?

घरी पोहोचलोय माझ्या मी. पाऊस पण थांबलाय आता बाहेरचा, आणि मनात सुरु झालाय. रात्र अशी आता भिजुनच संपेल. गाडीत मेहंदी हसन यांचे सूर आहेत.....

कर रहा था ग़म-ए-जहाँ का हिसाब
आज तुम याद बेहिसाब आये

इस तरह अपनी ख़ामुशी गूँजी
गोया हर सिम्त से जवाब आये..........................

1 comment:

  1. सुंदर..... पाऊस आणि आठवणी यांचं काहीतरी वेगळंच नातं असतं... :)

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!