"समवेदना"
ते २००३ साल होते. एका अस्वस्थ काळातून मी जात होते. पहिल्यांदाच आयुष्यात मला कोणत्या तरी अशा आधाराची गरज वाटत होती, कि जी नुसतीच मला त्यातून बाहेर काढेल नव्हे तर माझे मनोबल टिकवून देखील ठेवेल. सर्वकाही कोणावर तरी सोपवावे आणि त्याने आपल्याला सावरावे असे कोणीतरी. त्या वेळी देवावर नेहमीपेक्षा जास्त (कारण मुळात मी सश्रद्ध आहे )विश्वास ठेवावा असे कुठेतरी वाटू लागले होते. आणि त्यानुसार मी, सोळा सोमवारचे उपास सुरु करून त्या भोळ्या सांबावर सारा माझा भार सोपवून निर्धास्त झाले. जसजसे दिवस सरत होते तसतसे माझे मनोबलही वाढत होते. उपास तर केले आहेत, मग आता बाकी सर्वजण करतात तशीच आपणही याची सांगता करावी की आपल्या मनाचे ऐकावे हा विचार वारंवार मनात डोकावत होता. शेवटी कौल मनाचाच लागला. कारण माझ्यासारख्याच खावून पिऊन सुखी कुटुंबातील अनेकदा नात्यागोत्याच्याच १६/१७ जोडप्यांना बोलवायचे, गोडधोड जेवू घालायचे,दक्षिणा द्यायची......पण हे का करायचे? लोकांना मी नक्की कशाचे प्रदर्शन करायचे, मी किती उत्तम स्वयंपाक करू शकते, किती खर्च करू शकते, किती भारी वस्तू, साड्या मी दक्षिणा म्हणून देवू शकते, याचे???????? त्याने काय होते? माझ्या जवळच्या व्यक्तीना तर सारे माहीतच आहे आणि बाकीच्यांना हे नाही कळले तर काय बिघडते???
त्यापेक्षा व्रताची सांगता करायच्या दिवशी मी नेहमीसारखी मनापासून पूजा करेन, एखादे असे मेहूण ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता वाटते, मी ज्या अवघड काळातून गेले होते त्याची त्यांना कल्पना आहे अशा कोणालातरी बोलावेन आणि बाकी सारी रक्कम मी एखाद्या योग्य अशा संस्थेला देईन. याने देव पावला तर ठीक नाहीतर त्याची मर्जी. मुळात माझ्या दृष्टीने "देवाणघेवाणीचे" हिशोब ठेवतो तो "देव" कसा????
असे विचार मनात घोळत असतानाच "साप्ताहिक सकाळ" मध्ये समवेदना च्या नुकत्याच सुरु झालेल्या कामाबद्दल माहिती आली होती. डॉ. चारुदत्त आपटे यांचे नाव मी पूर्वी ऐकून होते.पुण्यात लहानाची मोठी झालेली असल्यामुळे "त्यांच्या वडिलांच्या "विद्यार्थी सहाय्यक समिती" बद्दल ही माहिती होतीच. माझी काकू सौ.केतकर हि त्यांची पेशंट होती. त्यानंतर एकदा माझ्या भावाला त्यांच्याकडे न्यावे लागले होते. तेंव्हा मी नाही पण माझा नवरा त्याला त्यांच्याकडे घेऊन गेला होता. नंतर परत आल्यावर जे वर्णन त्याने केले, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या भावाला अश्वस्त केले होते त्यावरून एक चांगली प्रतिमा त्यांची माझ्या डोक्यात होतीच. त्यामुळे हीच संस्था नक्की झाली. त्यावेळी "समवेदना" नुकतेच लावलेले लहानसे रोपटे होते. हर्डीकर हॉस्पिटलच्या एका मजल्यावर एका लहानशा खोलीत तिचा कारभार चाले. ठरवल्याप्रमाणे एकदा त्या रकमेचा चेक देऊन आल्यावर माझे काम संपले होते.
काही महिन्यांनंतर माझ्या नावे एक टपाल आले समवेदना कडून....काय असेल असा विचार करत ते उघडून पाहते तो आत एका पेशंटच्या डिस्चार्ज पेपरची प्रत आणि सोबत त्याच पेशंटला का मदत केली गेली याची माहिती आणि त्याच्यावर केल्या गेलेल्या एकूण खर्चाचा भर कोणी आणि किती उचलला त्याचीही माहिती. त्या मोठ्या खर्चात माझी रक्कम खरतर फार लहानशी होती आणि तरीही त्यांनी मला हि सर्व माहिती पाठवणे उचित समजले होते. इतक्या पारदर्शक कारभाराची मी अपेक्षाच नव्हती केली. समवेदनच्या या कृतीने मीच भारावून गेले होते. "आपटे" या नावावर टाकलेला विश्वास नक्कीच खूप सार्थ होता याची खात्री पटली. याच ओघात मी अजून एक लहानशी रक्कम "समवेदना" च्या कार्यालयात पोचती करून आले. ही अशी लहानशी मदत दरवर्षी करावीच असे काही ठरले नव्हते. पण नंतरच्या प्रत्येक वर्षी श्री. सुनील हिंगणे दरवर्षी आठवणीने साधारण जानेवारी महिन्यात आधी फोन करून येऊ लागले, त्यांच्या येण्यापुर्वीच मागील वर्षातील दिलेल्या रकमेचा विनियोग कसा केला याची संपूर्ण माहिती पोस्टाने घरी आलेली असेच. श्री. हिंगणे सोबत वार्षिक अहवाल घेवून येत असत...नंतर नंतर प्रीती दामले यांच्याशी संपर्क वाढू लागला. मधेच कधीतरी समवेदनाच्या कार्यालयातून शरयूचा दर महिन्याच्या एका गुरुवारी होणाऱ्या मीटिंगला येऊ शकाल का असा फोन येऊ लागला.त्यामुळे समवेदनच्या कामाची व्याप्ती कशी वाढते आहे याचा अंदाज येऊ लागला होता. नुसतीच गरजू रुग्णांना मदत नव्हे तर आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातील स्त्रीयांसाठी कर्करोग तसेच स्त्रीरोग तपासणी उपक्रम, आणि आता पुण्यातील पहिली "त्वचा पेढी".
आपल्या ऑफिस मधून होणाऱ्या "CSR" मध्ये तर आपण अनेकदा सामील होतच असतो. पण तेवढेच या देशात, आपल्या समाजासाठी पुरेसे आहे असे मला वाटत नाही. प्रत्येक सुजाण नागरिकाने, आपला चिमुकला हिस्सा वैयक्तिक स्तरावर उचलून कोणत्या न कोणत्या स्वरूपाचे योगदान दिले तर खूप मोठे बदल इथे दिसून येतील हे नक्की. आपल्यापैकी प्रत्येकाला खूप मनापासून विनंती की "समवेदना" ची खालील माहिती एकदातरी जरूर वाचा.
समवेदना-
- गरीब व गरजू रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत.
- सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व शाखांमधून सेवा उपलब्ध.
- सह्याद्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची सेवा याकरिता पूर्णपणे विनामुल्य.
- सह्याद्री हॉस्पिटलकडून उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत.
- देणगीदारांना त्याच्या निधीच्या विनियोगाची तपशीलवार माहिती पाठवली जाते.
- सोबतच अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे कामही ही संस्था करत असते, त्याकरिता कोणतेही मानधन आकारले जात नाही.
- निम्न आर्थिक स्तरातील महिलांसाठी मोफत कर्करोग पूर्वनिदान तपासणी उपक्रम, व गरज पडल्यास उपचारदेखील.
- ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरे.
- गेल्या वर्षी समवेदनेने १२५ गरजू रुग्णांसाठी जवळपास १ कोटीच्या मदतीचा टप्पा गाठला.
- फेब्रुवारी २०१२ मध्ये पुण्यातील पहिल्या "त्वचा बँक" या उपक्रमास सुरुवात झाली. मृत्युपश्चात "त्वचादान" या सर्वसामान्यपणे माहित नसलेल्या संकल्पनेचा प्रसार आणि प्रचार करण्याची जबाबदारी या संस्थेने घेतली आहे.
आपल्यापैकी कोणासही या कार्यास आपला हातभार लावावा असे वाटल्यास, समवेदनामध्ये आपले स्वागत आहे. देणगी स्वरूपात मदतीची आपल्याला जर इच्छा असेल तर त्यासाठीचा तपशील खालीलप्रमाणे.
Union Bank of india, karve road branch,
S/b Account No. 37000201090 2648 for indian passport holders
&
Account No. 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code UBIN0537004
दरवर्षीच्या एका लहानशा रकमेच्या धाग्याने माझ्यात आणि या संस्थेत एक घट्ट धागा विणला गेला. असा धागा की पुढे मागे जर नोकरी सोडून मी एखाद्या सामाजिक कार्यास वाहून घ्यायचे ठरवले तर हीच ती संस्था असेल.....असे मनोमन ठरवले जाण्याइतका. "एकही गरीब व गरजू रुग्ण निव्वळ आर्थिक पाठबळ नाही म्हणून परत जाऊ नये" हे ध्येय समोर ठेऊन अखंडपणे गेली १० वर्षे "समवेदना" ज्या रीतीने कार्यरत आहे, त्या कळकळ, त्या प्रेरणेला मनापासून सलाम!