Friday, June 6, 2014

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी.....

अनेक दिवसांनी हाती लेखणी धराविशी वाटते आहे. काय होतं ना अनेकदा शब्द असे काही रूसतात की काहीही करा, त्यांना मनवणे महाकठीण होऊन बसते. असे मनधरणी करण्यात अनेक अस्वस्थ दिवस रात्र जातात. मला मान्य आहे  की त्यांना काही माझ्या काही दावणीला  बांधलेले नाहीत, की माझ्या मनात यावं आणि त्यांनी मागुते यावे, पण थोडी मनधरणी केल्यावर तरी यावे ना!  "बाबांनो, तुम्हाला नसेल रे पण मला तुमची खूप गरज आहे, तुम्ही नसाल रे, पण  मी तर तुमच्या प्रेमात आहे ना कायमच, कधीतरी त्याची जाण ठेवा आणि माझ्यावर असे रुसू नका ना". सुरेश भटांनी जसे जीवनाकडे "सूर मागू तुला मी कसा " म्हंटले तशी मी शब्दांना साद घालत राहते.

अनेक आकृतीबंध निर्माण होत राहणे, अनेक कल्पनांनी नुसतेच मनात रूंजी घालणे हे सारे सारे  होत राहते पण तरीही  शब्दच न सापडल्याने ते आ
कृतीबंध, त्या कल्पना हवेतच विरून जाणे हे अशा वेळी नित्याचेच. अशी त्यांची वाट पहात शेवटी, "आपण आता नाद सोडावा, हे लिहिणे, व्यक्त होणे ही आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नोहे, तेथे पाहिजे जातीचे.... " अशी आपण आपलीच समजूत काढावी आणि घर, आँफीस यात गुंतवून घ्यावे  हे उत्तम.

पण आपलीही अशी सहज समजूत निघते? शब्दांच्या विरहाचे दु:ख तर जाळतेच, पण काही इलाज नसतो ते मान्य करण्याखेरीज. हे मान्य करायलाच आधी किती वाद घालावा लागतो  आपल्या एका मनाला दुसऱ्याशी आणि आपण असतो हतबल काहीही  करू न शकणारे.

मग अचानक एके दिवशी एखादी छोटीशी, साधीशीच गोष्ट घडते,  पण तेंव्हाच डोक्यात काही तरी लख्खकन चमकते, तीच चमक कुठूनशी आपल्या डोळ्यात उतरते, आत कुठेतरी त्यांची चाहूल लागते, याची तुलना ना  फक्त अवचित दारी उभ्या सजणाला पाहताना त्याच्या सखीची होते ना त्याच्याशीच होऊ शकते. ही चाहूल खरी कि केवळ भास हे पहावे तरी असे म्हणत आपण एखादी कल्पना उतरवू पहातो, लेखणीतून शाई झरझर पाझरावी तसे शब्द उतरू लागतात, अनेकदा एखादा बांध फुटावा आणि धबधब्यासारखे पाणी वाहते व्हावे असा त्यांचा वेग  असतो. अनेकदा  मग बोटांना त्याच्याशी जुळवून घेण्याची कसरत करावी लागते. पण त्यांचे हे असे येणेही तितकेच  सुखावणारे असते. हे अनुभूतीचे गारूड मग मनावरून काही काळ तरी मग उतरायचे नाव घेत नाही.

जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले द्वारी अशी ही अवस्था, हाती लेखणी धरायला आवडणाऱ्या  प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येणारी! जसं आज मी कित्येक दिवसांनी फेसबुकवर दोन ओळींचे स्टेटस टाकावे म्हणून तिथे जाते काय आणि माझ्या शब्दांशी असलेल्या या नात्याचा शब्दपट उभा करते, काय सारेच आकलनापल्याडचे!
 

2 comments:

  1. होतं खरं असं. व्यक्त व्हायला शब्द सापडत नाहीत तोपर्यंत ती अस्वस्थता, विचार छळत रहातो मनाला. छान उतरवली आहेस ती भावना शब्दातून.

    ReplyDelete
  2. मनापासून आभार मोहना. कितीतरी दिवस चालू होती घालमेल आणि जेंव्हा शब्द आले तेही त्यांचेच असे वर्णन घेऊन! पण त्यानंतर मनाचे आकाश कसे निरभ्र होऊन जावे ना तसे वाटले.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!