अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात" तर मग काय विचारायलाच नको!
अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच.
आयुष्याच्या एका टप्प्यावर जेंव्हा घरासाठी वेळ द्यावा असे वाटत होते, त्यामुळे पूर्ण वेळेची नोकरी करूच नये अशी इच्छा होती, पण अर्थार्जन ही सर्वार्थाने सोडून द्यायचे नव्हते, तेंव्हा दुसरा कोणता पर्याय निवडावा असा जेंव्हा प्रश्न समोर होता तेंव्हा खरे तर अनेक पर्याय डोक्यात रुंजी घालत होते, ज्यांना उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहायला आवडतात त्यांचे काय विचारता? एक भले मोठे, अद्ययावत आणि मागाल ते पुस्तक चुटकीसरशी मिळेल अशी लायब्ररी सुरु करायची होती. कदाचित बालपणीचा मोठा काळ पुणे मराठी ग्रंथालयाच्या सानिध्यात गेल्याचा परिणाम असेल म्हणा, जेंव्हा पुण्यात डेक्कन वर मक्डोनाल्ड्स आणि पिझ्झा हट यांचे आगमन होत होते, तेंव्हा मी पिंपरी चिंचवड मधे असा फूड जोइण्ट सुरु करायची स्वप्ने बघत होते, ही गोष्ट आहे साधारण १९९८/९९ ची आणि चिंचवड मध्ये मक्डोनाल्ड्स पहिले अवतरले ते २००५/६ मध्ये. किंवा इच्छा होती असा एखादा फूड जोइण्ट सुरु करण्याची जिथे काही खास इंडियन डेलिकसीज बनवल्या जातील, जिथे बनणारे पदार्थ हे पोषण मूल्यांच्या तक्त्यात खूप वर असतील आणि टेस्ट मध्येही सर्वोत्तम ठरतील…………एक न दोन!
या गोष्टी मुळातच खूप मोठी गुंतवणूक असणारी होत्या पण त्याचकाळात मनात कुठेतरी शेअर बाजारातून आपण पैसा कमवू शकू असे वाटू लागले होते. तत्पूर्वी काही जणांना एखादा शेअर सुचवून पहिला होता आणि त्याला त्यात थोड्या कालावधीत फायदा होतानाही दिसला होता. डिजिटल व्यवहारांना नुकतीच सुरुवात झाली होती, CNBC सारख्या chaanel वर अखंड बडबड करणारी काही हुशार माणसे अवतीर्ण झाली होती, त्यांच्या जोडीला अनेक ब्रोकरेज फर्म्स मधील काही मंडळी दिवसभर या चर्चा करत असत. अनेक ब्लू चीप कंपन्याचे शेअर कवडी मोलाने विकले जात होते तर Infosys, सत्यम, विप्रो यांचे भाव रोज नवे उच्चांक दाखवत होते, आज बाजारात नामोनिशाण नसलेल्या अनेक डॉट- कॉम कंपन्या भूतो न भविष्यती असे रोजचे भाव दाखवत होत्या आणि अनेक ब्रोकर्स ह्या कंपन्या बाजाराला उद्या परवा अजून कुठल्या कुठे नेवून ठेवतील याची भली स्वप्ने दाखवत होते. बाजाराने पहिल्यांदा ६००० ची पातळी एकच दिवस गाठली होती. इतक्या साऱ्या पूरक गोष्टी असताना या शेअर बाजाराने भुरळ पाडली नसती तरच नवल!
काळाच्या थोडी पुढची स्वप्ने हे तेंव्हाही होतेच त्यामुळे पुणे शेअर बाजाराचा अध्यक्ष असणाऱ्या माझ्या एका ओळखीच्या गृहस्थाना विचारलं की ऑन लाईन ट्रेडिंग करता येईल का? त्याने उत्तर दिले की सर्व सामान्य लोकांना हे करता यायला बरीच वर्षे लागतील. मग एक मित्र जो एक ब्रोकरचे टर्मिनल घेवून हेच काम करायचा त्याच्याशी सौदा ठरवला, मी त्याला फोन वर ओर्डर द्यायची, त्याने माझ्यासाठी ते शेअर घ्यायचे /विकायचे. छोट्या छोट्या ऑर्डर्स मी ठेवू लागले थोडासा फायदा दिसू लागला मग मोठ्या मोठ्या सुरु झाल्या, डे ट्रेडिंग नसल्याने आठवडा मिळत असे …. मग एक दिवस असा आला अर्थ संकल्पाच्या दिवशी मार्केट वर जाणार या अपेक्षेने काही मोठ्या पोझिशन्स घेवून ठेवल्या. साधारण ११/१२ च्या सुमारास तो सुरु झाला आणि मार्केट ने जी उतरण दाखवायला सुरु केली, एकाच दिवसात एक भला मोठा फटका माझ्या वाट्याला आला की पुनः मी या गोष्टी कडे आपला व्यवसाय म्हणून पाहू नाही शकले. ६००० चा टप्पा २००० साली गाठलेल्या बाजाराने जवळपास २००३ मध्ये २९००ची पातळी दाखवली.
याच सुमारास माझी ओळख डोंबिवलीमधील एका ज्योतिषांशी झाली. माझा या गोष्टी वर विश्वास आहे, आणि ते शेअर बाजार आणि ज्योतिष शास्त्र यातील चांगले जाणकार म्हणून ओळखले जातात. त्यांना जेंव्हा मी असे का झाले असावे असे विचारले तेंव्हा ते म्हणाले " असे एक एक धडे आयुष्य शिकवत असते, आपण त्यातून बोध घ्यायचा असतो, तुमच्या नशिबी असा बिन कष्टाचा ,फुकटचा पैसा नाही, पैसा तुम्ही कमवाल पण तो फक्त स्वतच्या कष्टाचाच असेल, एक दिवस असा येईल की तुम्ही अशा मार्गाने पैसे कामावता येतात या गोष्टीला हसाल. पुढे त्यांच्याशी संपर्क राहिला नाही, पण या त्यांच्या वाक्याने आयुष्याला दिशा दिली. थोडे दिवस विचार करण्यात गेले, हळू हळू नवीन मार्गावर वाटचाल सुरु झाली.
आज अनेक टेक्निकल बाबी मला काळात नाहीत किंवा त्या शिकून घेण्याइतका माझ्या कडे वेळ नाही. पुट/ कॉल ऑप्शन, मुव्हिंग अव्हेरज आणि काय काय ते. पण याचा अर्थ मी इथे नसतेच का तर तसं मुळीच नाही, पण आता पद्धत थोडी बदलून गेली. थोड्याच प्रमाणात पण फक्त delivery based करण्यासाठीच मी शेअर बाजाराकडे पहाते. काही माझे लाडके शेअर्स आहेत तेवढ्यानवरच नजर ठेवून मी असते, त्यांनी मला आजतागायत कधी निराश नाही केले.
पण या शेअर बाजाराबद्दलचे प्रेम आजही कमी झालेले नाही काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलून गेल्या, अनेक नवीन सोफ्टवेअर्स आली, मोबाईल वरून ट्रेडिंग चुटकीसारखे होवू लागले, ब्रोकर नावाच्या माणसाची गरज भासेनाशी झाली, शेअर्स नव्हे तर कमोडीटी, forex यात ट्रेडिंग करता येवू लागले, पण मुंबई शेअर बाजारचे महत्व काही उतरले नाही, फरक पडला "निफ्टी" च्या आगमनाने पण तरीही… क्षणात जादूची कानडी फिरवल्यागत कोणाची चांदी होईल, तर क्षणात रावाचे रंक ही इथेच होताना दिसतील. माठ मोठ्या Management/business schools मधून पदव्या घेवून बाहेर पडून कोणत्या तरी टी व्ही chanels च्या बड्या बड्यांचे अंदाज चुकवत राहील. पिढ्यान पिढ्या येत जात राहतील पण बाजार आपल्याच मस्तीत आपली दिशा बदलत राहील.
फारच सुंदर आणि त्रयस्थ पणे स्वतःच्या अनुभवाविषयी लिहिलेस आहे. शेयर बाजारात एकाचा फायदा हा दुसऱ्याच्या तोट्यातून (हा तोटा मुर्खपणामुळे झालेला असो वा दुर्दैवाने ) उत्पन्न होतो त्यामुळे मला नेहमीच ह्या पासून दूर रहावेसे वाटले आणि मी राहायचा प्रयत्न केला.
ReplyDelete