मी देवाचे खूप आभार मानते की सतत चालणारे डोके मला दिल्याबद्दल. कधीकधी मीच अचंबित होऊन जे जे विचार जी स्वप्ने माझ्या डोक्यात उगवतात त्याकडे पहात राहते. स्वप्नांच्या गोष्टी चालू आहेत आणि खाणे, खिलवणे या बद्दल चा हा माझा ब्लॉग आहे म्हणून त्या विषयापुरतेच इथे लिहीन. आधी म्हंटले तसे हे दुसरे स्वप्न ही तितकेच हटके आहे. सध्याच्या काळात ती गरज ही खूप मोठी आहे. अजूनतरी माझी त्यातील उडी माझ्या बहिणीच्या दोन्ही मुलांच्या वेळेस जेजे शक्य झाले ते करणे एवढीच ठरली आहे, पण म्हणून तो विचार डोक्यातून गेलेला नाही. कदाचित हा विचार दुसऱ्या कोणी अमलात आणून स्वतः असे काही सुरु केले तरी हरकत नाही.
छोट्या कुटुंबात किंवा जिथे तरुण जोडपेच घरात राहते, जे बाकीच्या कुटुंबियांपासून दूर राहतात, दोघेही नोकरी करतात अशावेळी नव्या जीवाची जेंव्हा चाहूल लागते ती घटना आनंदाची खरी पण भांबावून टाकणारी आणि गडबडवुन टाकणारी असते. काय करावे, काय करू नये ह्याची माहिती मिळवता येते, गर्भसंस्कार, योगा, वेगवेगळे डॉक्टर्स त्यांचे सल्ले उपलब्ध असतात, पैसे मोजून ते घेऊ शकतो. एकीकडे स्वतःची सतत बदलत राहणारी स्थिती, सतत मिळणारे सल्ले विशेषतः खाण्या पिण्याचे, ऑफिसमध्ये कामाचा गाडा ओढणारी ती तरुणी या साऱ्यात एक प्रकारे त्रस्त असते. कळते पण वळत नाही हे कसे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही अवस्था. उत्तम आहार हा बाळाच्या पुढील आयुष्याचा पाया आहे हे कळते, पण कधी ते बनवताच येत नसते, कोणी तसे बनवून खाऊ घालणारे सोबत नसते, कधी वेळ नसतो तर कधी उरक नसतो.
अशावेळी असे घडले तर एकदा का प्रेग्नन्सी नक्की झाली की त्या तरुणीच्या आहाराचा ताबाच कोणीतरी घेईल. कॅल्शियम, लोह आणि प्रथिने यांचा नीट विचार करून, पथ्य, कुपथ्य, ऋतूंचा विचार करून आपले जेवण बनवेल आणि आपल्याला आयते ते समोर ठेवेल. अगदी आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये आणून देऊन. जे खूप काळजीपूर्वक बनवलेले असेल, उत्तम पोषणमूल्य जपणारे असेल, जिन्नस आणि कृती यात कोणतीही तडजोड न करता बनेल आणि कमीत कमी वेळात आपल्यापर्यंत पोचेल.
असेही घडते की बाळ घेऊन ती तरुणी घरी येते. चौकोनी कुटुंब असते, किंवा राजा राणीच्या संसारात सासू किंवा आई तात्पुरती येऊन राहिलेली असते. ह्या मुलीचे करणे, बाळाचे सर्व करणे, आले गेले बघणे आणि तेही दुसऱ्या ठिकाणी येऊन. खरेतर ती आई किंवा सासूच जास्त भांबावून गेलेली असते. पुन्हा काय करावे, करू नये, काय खावे खाऊ नये यातील वैचारिक मतभेद असतातच.
त्यापेक्षा असे झाले तर - कोणीतरी छानसा पथ्याचा डबा रोज घरी पाठवला तर, सूप, पालेभाजी, भाकरी, ताक, मुगाचे वरण, किंवा खिचडी, आंबोळी, शिरा, कोशिंबिरी, घरच्यासारखे साजूक तूप हे किंवा काही स्पेसिफिक जे डॉक्टरांनी सुचवलेले आहे ते जर रोज कोणी घरी पाठवू लागले तर? ती तरुणीच काय पण अशी आई किंवा सासू सुद्धा ते आनंदाने खाऊ शकेल, तिचे श्रम वाचतील ते वेगळेच. तिचा वेळ लेक/सून आणि नव्या नातवंडा साठी नीट कारणी लागेल ना?
हा विचार पुढे अजून वाढत गेला, की नुसते जेवणच का अळीव, डिंकाचे लाडू, बाळंतिणीची सुपारी किंवा अगदी सकाळी खाण्याची सुंठ गोळी ही बनवून येता येऊ शकेल. हे सारे स्वस्त नाही मिळणार, घरी एवढ्या पैशात किती सारे बनेल हा विचार इथे काम नाही करू शकणार, चितळ्यांकडे ४०० रुपये किलो डिंक लाडू मिळतात मग तुम्हाला ५०० रुपये का मोजायचे हा प्रश्न निरर्थक ठरेल, ताजे तूप कढवून, लगेच तेच तूप वापरून नुसते खोबऱ्याचा आणि खारकेचा भडीमार ना केलेले लाडू, सोबत सुंठ, केशर, पिंपळी, जायफळ असे औषधी घटक वापरून निगुतीने केलेल्या पदार्थाची किंमत बाहेरच्या तुलनेत जास्तच असणार. ५०० रुपयांचा एका वेळी दोन माणसांना पुरणारा पिझ्झा आणि असे बनवलेले ५०० रुपयात आलेले ३५/४० लाडू यांची तुलना होऊ नाही शकत!
स्वप्नांबद्दलच बोलत आहे आणि विषय नव्या बाळाच्या स्वागताचा चालू आहे, तर थोडे वेगळे अजून एक स्वप्न होते. माझी एक मैत्रीण आहे जी छोट्या मुलांचे कपडे अतिशय सुरेख शिवते, माझ्या घरात, ओळखीत जी नवी बाळे आली त्या साऱ्यांचे कपडे तिने शिवले. आणि त्यासाठी अनेकदा माझ्या कॉटन साड्या आणि ओढण्या कामी आल्या. बाळ जन्माला येण्याच्या कित्येक दिवस आधी मी तिच्या मागे लागून, झबली, टोपडी, दुपटी अगदी लंगोट देखील बनून तयार असत.
बाजारात तयार कपडे मिळतात, एकतर ते खूपच महाग असतात, अनेकदा मोठे असतात त्यामुळे माझी कायम पसंती स्वातीकडून कपडे शिवून घेणे ही राहिली, आणि म्हणूनच हा विचार अनेकदा माझ्या साठी म्हणून नव्हे (माझा आणि शिवणकामाचे अजिबात नाते नाही ) की का ती असा एक व्यवसाय सुरु करत नाही ज्यात की बाळ होण्याच्या तारखेआधी काही दिवस असा पूर्ण निगुतीने शिवलेला सुती कपड्यांचा सेट बनेल आणि घरी पोचेल, दोन तीन वेळा आधी छान धुतले जाऊन कपडे मऊसूत बनतील आणि बाळ येण्याच्या आधी अशी बॅग त्याच्या स्वागतास तयार असेल.