Sunday, September 23, 2012

गजरा महिरप आणि कमळाचे फुल

 मणी, मोती यांच्याशी तशी  फारशी माझी कधी जवळीक नव्हती. दागिन्याची विशेष आवड नसल्याने ती वेळ कधी आली नाही. लहानपणी दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा बहिणींना कशात तरी गुंतवून ठेवावे लागे, नाहीतर सतत "कंटाळा आला" हा एकच घोषा ऐकावा लागे. त्याचाच एक भाग म्हणून एक वर्ष आई तुळशी बागेतून थोडे मणी घेवून आली. लागोपाठ इतर मुलींच्या घरी पण ते आणले गेले. सर्व मुलीनी मण्यांच्या कला कुसरीच्या वस्तू बनवण्याची टूम निघाली. कित्येक प्रयत्नानंतरही मी ते करू नाही शकले, कधी दोराच अडकून पडायचा, कधी मोतीच मोजायला चुकायचे ....शेवटी कंटाळून तो नाद मी सोडून दिला. आणलेल्या मोत्यांची आई ने एक वस्तू बनवली. या अनुभवातून ती पण एक शिकली की कला कुसरीच्या वस्तूंचे आणि आपल्या लेकीचे काही जमणार नाही. हिला आपली सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयाची वर्गणी भरून द्यावी, तिने पुस्तके वाचावीत आणि सुट्टी सार्थकी लावावी हे बरे! शाळेत सुद्धा "चित्रकला, शिवण, लोकरीचे काम, किंवा भरत-काम करावे लागणे म्हणजे माझ्यावर संकट ओढावे. अनेक गोष्टी माझ्या साठी आई, शेजारच्या काकू यांनी पूर्ण केल्या आहेत.
पुढे कॉलेजला सुद्धा आसपासच्या मुली काहीतरी बनवत असत, मी त्यात लुडबुड करायचा प्रयत्न केला तर शेजारच्या एक काकू आणि माझी बहिण लगेच मला म्हणत " जा तू आपली दलाल स्ट्रीट, कॅपिटल मार्केट वाच" ही कामे तुझी नव्हेत. मला पण ते पटे. मी दरवेळी इतरांना असे नेहमी सांगत असे, की तुमच्या अर्थार्जनाच्या गोष्टी खेरीज एखादी तरी कला तुमच्या कडे असायला हवी, जी थोडा रिकामा वेळ मिळाल्यावर तुमच्या सोबत असेल. पण अशी कोणती कला माझ्याकडे आहे हा प्रश्न मला स्वतःलाच पडणे थांबत नव्हते.  

काही वर्षांपूर्वी संस्कृती लहान असताना मी जेंव्हा घरी होते, तेंव्हा मला माझ्या चुलत सासू-बाईनी एक मोत्यांची महिरप दिली. खूप सुरेख दिसत होती ती. घरीच होते म्हणून स्वत: जावून थोडे मोती घेवून आले. थोडे प्रयत्न करून तशीच दुसरी बनवता आली. मग एका पाठोपाठ बनवत गेले. त्या वर्षी दिवाळीत बहिण, नणंद, जावू प्रत्येकीला या अशा बनवलेल्या महिरपीच भेट म्हणून दिल्या. पण ते तेवढ्या पुरतेच ....नंतर काहीच दिवसात मी पुन्हा नोकरी करू लागले आणि या साऱ्या गोष्टी एका पेटीत बंद होवून माळ्यावर जावून बसल्या. काही महिन्यांपूर्वी अशाच एक दोन नाजूक मोत्यांनी बनवलेल्या गोष्टी माझ्या नजरेस पडल्या आणि वाटले कदाचित आपण हे करू शकू. माळ्यावरून मोती शोधून काढले आणि ती फुले करून पहिली, आणि पहिल्याच प्रयत्नात ती जमली देखील. तेंव्हा लक्षात आले, जरी लहानपणी नाही, तरी आता आपल्याला ह्या गोष्टी कोणीही न शिकवता देखील जमू शकतात. मग त्यात थोडे प्रयोग करून पहिले. एका मैत्रीणीला दाखवले. तिने लगेच तिच्या साठी  या गोष्टी बनवायला सांगितल्या. गणपती आठवड्यावर आलेले. ती म्हणे मला हे गणपतीसाठी करून दे. वाढता वाढता एक ऑर्डरच झाली. गणपतीच्या आधी १०/१२ दिवस मी रात्री जागून, पहाटे लवकर उठून फक्त हेच काम करत होते. ती ऑर्डर लहान की मोठी हा मुद्दा गौण आहे. त्यातले पैसे महत्वाचे नाहीत, एखादी वस्तू सहज स्वत:ला बनवता येणं ही मला त्यातली फार मोठी गोष्ट वाटली. २/३ घरांमधले गणपती-गौरी या माझ्या कलाकारीने सजले, नैवेद्याची ताटे महिरपिंनी नटली असतील. हा विचार खूप सुखावणारा आहे. 6 comments:

 1. मला ताटाच्या बाहेरच्या कलाकुसरीपेक्षा आतली कलाकुसर आवडली ;)

  ReplyDelete
  Replies
  1. "हाहाहाहा.... आपण सारे खवय्ये!" :)

   Delete
 2. हेरंब,
  मला पण . :)
  गुगल क्रोम डालो केलंय, आणि आता प्रतिक्रिया पोस्ट करून पहातो.

  ReplyDelete
 3. महेंद्रजी, स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार!

  ReplyDelete
 4. हे वाचून मला माझे बालपण आठवले .....माझ्या लहानपणी माझी चित्रकलेची वही आईच्यामदती शिवाय पूर्णच व्हायची नाही :) !!...वाचून मज्जा आली

  ReplyDelete
 5. मनापासून आभार आणि ब्लॉगवर स्वागत!

  ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!