Wednesday, June 5, 2013

एक दिवस खाता खाता, बनवणाऱ्याचे हात घ्यावेत ….….

कोणी प्रेमाने एखादा पदार्थ तुमच्यासाठी बनवला तर त्यात आनंद काही औरच असतो ना? यापूर्वी आई, आजी, मामी, आत्या, साबा  यांनी त्यांच्या हातचे मला आवडणारे पदार्थ खूपदा बनवले आहेत. यांच्या प्रत्येकीच्या अशा काही हातखंडा रेसिपीज आहेत. आई च्या हातचे दडपे पोहे, मसालेभात, ओल्या साल पापड्या, रवा नारळाचे खवा घातलेले लाडू, आत्याच्या हातची पुरणपोळी, सुरळीवडी, उपमा, मक्याची नारळाच्या दुधातील करी, साबांच्या हातची भरली वांगी, काजूची उसळ, गुळाची पोळी, तिळाचे लाडू, लसूण कुरकुरीत तळून घातलेला पातळ पोह्याचा चिवडा, मामी च्या हातच्या पाकातल्या पुऱ्या आणि साखरभात अशी यादी बरीच मोठी आहे आणि या साऱ्याजणी वेळोवेळी आमचे हे हट्ट पुरवत असतात देखील.
नवऱ्याच्या हातचा वीकेंडला सकाळचा चहा. जेंव्हा तो "तू झोप थोडा वेळ, मी चहा तयार झाला की तुला हाक मारतो" असे म्हणतो तेंव्हा  अजून जास्तीची अर्धा तास झोप मिळाल्यावर  आणि वर आयता चहाचा कप हाती आल्यावर अजूनच छान लागतो. या चहाशिवाय तो नियमित पणे फक्त रात्रीचा वरणभाताचा कुकर लावतो. तसा त्याचा स्वयंपाक घरातील वावर बराच असतो. सर्वात मोठे काम म्हणजे "सूचना". मीच काय पण त्याची आई, बहिण, सासू, मेव्हणी, माझ्या चुलत जावा, नणंदासुद्धा यातून सुटत नाहीत. इतर काही पदार्थ तो आवडीने बनवतो पण मी नॉन-व्हेज खात नसल्याने ते माझ्या काही कामाचे नसतात. पण तरी देखील, जेंव्हा घरात डोसे, पावभाजी, थालीपीठे असा कोणता तरी बेत असतो तेंव्हा बाकीच्यांचे जेवण आटोपून जेंव्हा मी एकदाच स्वत:चे पान वाढून घ्यायचा विचार करत असते, तेंव्हा मला गरम गरम खायला आवडते हे लक्षात ठेवून तो जेंव्हा "पहिला डोसा घेवून तो सुरुवात कर जेवायला, नंतरचा मी करून वाढतो" असे जेंव्हा म्हणतो तेंव्हा दोन घास नक्कीच जास्त जातात. 

सध्या तिसऱ्या व्यक्तीची लुडबुड या प्रांतात वाढत चालली आहे. माझ्या लेकीची संस्कृतीची! सुरुवातीला चहा, कॉफी, maggi, पास्ता किंवा आमच्या दोघांपैकी कोणीच घरी नसू आणि जेवायला येणार असू तर मग कुकर. मग मागच्या सुट्टीत फुलके करता येऊ लागले, त्याखेरीज कांदे पोहे, दही पोहे कधी मधी घरी संध्याकाळी बनू लागले. पण ह्याचा प्रसार फक्त बाबापुर्ताच होता. बाबाच सर्वात मोठा परीक्षक आणि कौतुकाने खाणारा असल्याने अनेकदा यातल्या अनेक गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नसत. तशीही मी रात्रीच्या जेवणाच्या वेळेपर्यंत कशीबशी घरी पोहचते. 

मागच्या वर्षी पहिल्यांदा माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी एक सुंदर पदार्थ बनला. जे माझ्यासाठी सरप्राईज होते. मारी ची बिस्किटे, साखर, पाणी आणि कॉफी च्या मिश्रणात एक सेकंद बुडवून नंतर कोकोच्या पेस्ट चे आवरण त्यावर देऊन पुन्हा होती तशी रोल बनवून ठेवली, अल्युमिनीयम च्या फोईल  मध्ये गुंडाळून ३/४ तास फ्रीज मध्ये ठेवून बनवलेला एक सुंदर पदार्थ होता तो. 

गेल्या शुक्रवारी असाच अजून एक पदार्थ बनला होता. आधी मला विचारून झालं "घरात कॉर्नफ्लोर" आहे न? म्हणून. संध्याकाळी आले तर चीझ बॉल्स तयार होते. चीझ किसून त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट मिसळली होती, ते हलक्या हाताने वळून कॉर्नफ्लोर च्या पेस्ट मध्ये बुडवून घेतले आणि नंतर  ब्रेडक्रम्स वर घोळवून तळले होते.  इतके मस्त लागत होते ते! पण पहिला खाऊनच लक्षात आले एकंदरीतच हा पदार्थ खूप हेवी आहे. मग मला कळले कि ४ अमूल च्या चीझ क्युब्स चे फक्त ८ बॉल्स बनले आणि तरी माझ्या साठी चक्क ३ कसे  उरले होते ते. पण खायची आणि करून खिलवायची आवड निर्माण होते आहे हीच माझ्या साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

(हे पदार्थ तिने बनवल्याचा आनंदात मी नेहमीप्रमाणे कॅमेरा हाती घ्यायला विसरलेच)

5 comments:

 1. एक दिवस खाता खाता, बनवणाऱ्याचे हात घ्यावेत ….….

  हे खाण्या इतके सोप्पे नाहीये !

  गेल्या सोमवारी मी पुष्पा कडे GPS द्यायला गेलो होतो. तिने मला पाच मिनिटात Pan Cake च्या पीठाचे सुरेख डोसे करून खायला दिले. Pan Cake चे पीठ इथे Walmart मध्ये मिळते. हे डोसे बनवणार्याचे हात घेण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. बघू जमते का ते. हा प्रयोग 'मी माझ्यावर' करणार आहे त्यामुळे तो फसला तरी काळजी नाहीये.

  ReplyDelete
 2. नक्की जमतील!!! शुभेच्छा!

  btw इकडे येऊन हा प्रयोग आमच्यावर करता का???

  तुम्हाला प्रयोग थोडा महाग पडेल, पण आम्ही तयार आहोत असे खाद्य प्रयोग स्वत:वर करून घ्यायला :)

  ReplyDelete
 3. किती छान. माझा मुलगा अधूनमधून कॉफी करतो आणि मुलगी केक. पण खरं तर मला माझीच आठवण जास्त झाली. आमच्याकडे सतत पै पाहुणा. मोठ्या बहिणीला स्वयंपाकाची अज्जिबात आवड नाही. मला मात्र आईचे श्रम कमी व्हावे असं वाटायचं त्यामुळे माझी फार लुडबुड चालायची. नवीन पदार्थ करायची हौसही दांडगी. आई, भाऊ (वडिल) माझे बिघडलेले पदार्थ कसे मिटक्या मारुन खायचे ते आठवलं :-).

  ReplyDelete
  Replies
  1. `बाबांनी असे माझ्या हातचे पदार्थ आवडीने खाण्याचे माझ्या नशिबात नव्हते पण त्याच वेळी मला असे सासरे मिळाले आहेत की ती कमी कुठेतरी भरून निघावी. लग्नानंतर मला सुगरण बनवण्यात सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर त्यांच्या " वाईट झालेल्या पदार्थाबद्दल चकार शब्द न काढणे आणि जमलेल्या प्रत्येक पदार्थास भरभरून दाद देणे" या वृत्तीचा. त्यांनी मला चांगला स्वयंपाक येत नव्हता अशा काळात रोज माझ्या हातचा डबा रोज ऑफिसला नेलाय, आणि एकदाही कधी काही बिघडलं होतं असं घरी येऊन मला सांगितलं नव्हतं, अनेकदा दुपारी जेवताना माझ्या लक्षात येत असे कि काय बिघडलंय ते.

   Delete
  2. हे तुझ्या सासर्‍यांना सांगितलंस की नाही? काही काही गोष्टी त्या त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं हा ही आनंदादायक अनुभव असतो.

   Delete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!