संदीप खरे माझा अजून एक खूप आवडता कवी. त्याचा माझयाकडून असा एकेरीत उल्लेख ऐकला की माझा एक मित्र मला चिडवतो "संदीप अगदी आपल्या घरचाच आहे नाही?" साध्या सोप्या शब्दात तुमच्या भावना तुमच्या पर्यंत तोच पोहचावतो. तुम्ही जगलेले क्षण तो तुमच्यासमोर असे काही उभे करतो आणि तुम्ही विचार करत राहता "अरे, हे तर माझेच अनुभव, अगदी अचूक कसे याने शब्दात पकडलेले?" खरच बाप माणूस आहे तो.
मला कधीतरी कविता जन्माला येते ती कशी हे खूप जवळून अनुभवायचं आहे. माझया विश-लिस्ट वर एक गमतीशीर गोष्ट आहे. देवा पुढचा जन्म माणसाचा असेल तर या माणसा सोबत तो असू देत...कोणत्याही नात्याने चालेल...........त्याची सर्वात जवळची मैत्रीण असो, त्याची बायको म्हणून असो, बहीण म्हणून असो अगदी त्याची मुलगी म्हणून सुद्धा चालेल. त्याच्या कविता त्याच्याच शब्दात ऐकणे हा तर एक सुरेख अनुभव असतो. असं वाटतं की लय या कवितेतच आहे, संगीतकाराला फारसे कष्ट त्यावर घ्यावे लागत नसतील.
मी मला खूप नशीबवान समजते की अशा मातीत मी जन्माला आले.....की जिथे कला, साहित्य. संस्कृती यांचा उत्तम संगम आहे. खूप मोठा वारसा आपल्यापाशी आहे. किशोरी ताइंचं, जसराजांचं गाणं, गुरुदत्त वहिदा यांचा अभिनय, रेहमान, पंचम, सलील चौधरी असे एक से एक सरस संगीतकार, गुलजार ते तर चिरतरुण आहेत. बा. भ. बोरकर,शांताबाई, कुसुमाग्रज,सुरेश भट असे अनेक कविवर्य, लता,आशा, रफी यांचे गुंजणारे सूर, कुमार गंधर्वांचे निर्गुनि भजन गाताना लागलेला सूर..........प्रत्येक गोष्टीने भारून गेलीये मी. या पैकी अनेकाना मी कधी प्रत्यक्ष पहिलं किंवा प्रत्यक्ष ऐकलेले नाही तरीही....
तोच वसा मला माझया पिढीत काहीजण चालवताना दिसतात जसं की राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, संजीव चिमलगी, वैभव जोशी, सलील कुलकर्णी आणि संदीप. त्याचीच एक अत्यंत अर्थवाही आणि प्रवाही देखील कविता...................
उगाच काय ग छोट्या-मोठ्या गोष्टींवरून इतके वाद?
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद?
मी, तू, जगणे, पृथ्वी कुणीच इतके वाईट नाही
अधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही
अगं विरस व्हावा इतके काही उडाले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टशिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग
अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा आपल्या आपल्या जागी आहेत
पैसे भरल्यावाचून अजून डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या अजून विनामूल्य पडत आहेत
अजूनतरी कर नाही आपले आपण गाण्यावर
सा अजून सा च आहे , रे तसाच रिषभावर
अजून देठी तुटले फूल खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर
स्पॉन्सर केल्यावाचून अजून चंद्र घाली चांदडभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय कळी उमलून होते फूल
सागर अजून गणती वाचून लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठलीच जकात घेत नाही पाउलवाट
थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाउस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून
काही काही बदलत नाही…. त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने
आकाशाचे देणे काही आज उद्यात फिटत नाही
आणि इतक्या लवकर होईल प्रलय असे काही वाटत नाही
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!