Saturday, August 20, 2011

चळवळी, आंदोलने, उपोषणे आणि आपण...................


गेले काही दिवस सर्वत्र फक्त अण्णा अण्णा आणि अण्णा असं वातावरण आहे. ऑफीस मधे बुलेटिन बोर्डवर फक्त हाच एक विषय आहे. अचानक सर्वत्र चैतन्य पसरल्यासारखं मला वाटत आहे. असं काही जेंव्हा समाजात घडत असतं तेंव्हा लोकांच्यात काहीतरी संचारते. कदाचित माणसाच्या सामाजिक असण्याच्या गरजा यातून भागवल्या जातात. अनेकानी मला विचारलं की इतकं सारं चालू असताना तुझयाकडून काहीच प्रतिक्रिया कशी नाही? तू खरच इतकी कामात व्यग्र आहेस का? नाही...... असं काही नाहीये. खूप सजगपणे मी या सार्‍या घटना बघू इछिते. या सार्‍या गोष्टींकडे बघण्याचा माझा एक दृष्टिकोन आहे.

एक जन लोकपाल विधेयक जादू ची कांडी बनेल आणि सारे प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही. गरज असणार्‍या अनेक उपायातील तो एक घटक आहे. ही चळवळ योग्य की अयोग्य याबाबत मी काही बोलणार नाही. परंतू एखादी चळवळ उभी राहताना तिच्यातून काय मिळवायचा प्रयत्न आहे हे जसं नक्की माहीत हवं तसच ती गोष्ट मिळवल्यानंतर काय? याचं ही उत्तर खूप सुस्पष्ट असायला हवं.पुढचा मार्ग खूप सुस्पष्ट नजरे समोर हवा आणि सर्व समाजाला सोबत घेऊन त्या वाटेवर चालू शकेल असं भरभक्कम नेत्रुत्वही! कदाचित याच गोष्टीचा अभाव स्वातंत्र्य चळवळीतही होता. स्वातंत्र्य मिळालं, पण पुढे हा देश कसा चालवणार आहोत, समाज कसा घडवणार आहोत, परराष्ट्र व्यवहार कसा असणार याबद्दल कदाचित सर्वसमावेशक असा विचार नव्हता झाला. ज्याची फळे आज आपण कदाचित भोगत आहोत. नाहीतर ६४ वर्षानंतरही आपण मूलभूत प्रश्ञांमधेच अडकून नसतो पडलो, शिक्षण, जातीयवाद, भाषावाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार हे सारे प्रश्न आजही आपल्याला भेडसावत नसते राहीले. माझा काही अनुभव असं सांगतो की हे सारं तत्कालीक असतं. गतनूगतिकोलोके असे अनेक जण त्यात असतात, चळवळ खूप मोठी भासते अन् नंतर भक्कम असं काही प्रत्ययास येत नाही.

भ्रष्टाचार ही एका दिवसात किंवा एका सरकारच्या काळात लागलेली कीड नाही. गेले ६४ वर्षात हा वृक्ष पसरलाय. अती उच्च पातळी वरुन थेट तुमच्या आमच्या पर्यंत त्याचा फैलाव आहे. आपल्या सगळ्यांचा भ्रष्टाचाराला विरोध आहे; पण बरेचदा तो विरोध मला एकांगी वाटतो. भ्रष्टाचाराला विरोध करताना; आपणही आपलं काही नुकसान करून घेण्यास तयार आहोत का? म्हणजे एका सरकारी कार्यालयात काही काम आहे, जे नाही झाले तर माझ काही नुकसान होऊ शकतं आणि ते होण्यासाठी तेथील कर्मचारी लाच मागत आहे, तर नुकसान सोसून भ्रष्टाचाराला आपल्यापैकी कितीजण विरोध करतील? उदाहरण घ्या एका बांधकाम व्यावसायकचं भली मोठी रक्कम एका जमीनीच्या तुकड्यात गुंतवल्यानंतर बांधकामास लागणारी परवानगी मिळवण्यासाठी लागणारी लाच सरकारी कार्यालयात न देणे त्याला किती काळ परवडेल?

हळूहळू मी या मतापर्यंत येऊन पोचलीये की समाज म्हणून आपला ह्रास गेल्या ६४ वर्षात खूप वेगाने झाला आहे. विकास, इंडिया शाइनिंग हे सारे फार पोकळ शब्द आहेत, त्यातून लौकिक अर्थाने आपण काही  थोडंफार मिळवलंही असेल पण मूल्यं मात्र आपण गमावली आहेत. तक्रार घेऊन पोलीस चौकीत जा, छोट्या कामाकरिता सरकारी कार्यालयात जा, लाच न देता काम करून घेणे म्हणजे तो कपिलाषष्ठीचा योग असायला हवा. हे लाच मागणारे तुमच्या आमच्यापैकीच एक असतात. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, वारस म्हणून नाव लावून घेण्यासाठी जिथे लाच मागितली जाते, ती समाजातील कीड आहे. ती ही आंदोलनं करून संपणार नाही. घराघरातून समाजाच्या सर्व स्तरातून मुल्य संस्कारांची गरज आहे. या आंदोलानातून ते घडतील असं मला वाटत नाही.  फक्त उपदेशातून समाजाची मूल्य बदलणार नाहीत; जोपर्यंत आपल्या सर्वांना मुल्य शिक्षणाची गरज पटणार नाही तोपर्यंत काही मोठे बदल दिसणार नाहीत. मग या मूल्य शिक्षणाची सुरूवात माझयापासून, माझया घरापासूनच व्हायला नको का? पण ते हक्क मी तेन्व्हाच गमावले आहेत जेंव्हा मुलाचा जन्मतारखेचा दाखला मी लाच देऊन मिळवलाय, लाखभर रुपये जादा देऊन मी त्याला शाळेत घातलाय, मॅनेज्मेंट कोटयातून का होईना मी त्याला इंजिनियर वा डॉक्टर करायची स्वप्ने पाहतोय; आणि ही सारी माझी गुंतवणूक तो दाम दुपटीने तो वसूल करेल या आशेवर.

सगळ्यांना माहीत असतं ना कायदा नावाची एक गोष्ट आहे ते....तरीही गुन्हे घडतातच, कारण आपला बेकायदेशीर गोष्टींवरचा विश्वास खूप दृढ होत चाललाय. भक्कम कायदा सुव्यवस्था निर्माण करणं हा उपाय होईल, आंदोलनं करून काय होईल? तत्कलीक मागण्या मान्य करून घेणे हा जर त्यामागचा हेतू असेल तर ती एक फार्स ठरतील, आणि मूलभूत व्यवस्थेत बदल घडवून आणणे हा हेतू असेल तर सर्वस्तरीय, सर्व विचारधारांची गुंफण असणारे, दूरगामी परिणाम करणारे कार्य हाती घेण्याची गरज आहे.

1 comment:

  1. khary agdi
    maza navra mazya ya asha vicharanvar kayam vaitagto ,pan mi chukichi nahiye
    koni tari ahe mazya sarkha vichar karnar

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!