Monday, November 5, 2012

आली माझ्या घरी ही दिवाळी.....

(खरतर ह्याला मागच्या दिवाळीची पार्श्वभूमी आहे....नवीन नवीन ब्लॉग लिहायला मागच्या वर्षी सुरुवात केली होती....त्यामुळे तेंव्हा लिहिलेली पोस्ट मनासारखी झाली नव्हती, तिचीच ही सुधारित आवृत्ती.)


दिपावली ४ दिवसांवर येऊन पोहचली, अजून मी घरात एकही फराळाचा पदार्थ बनवला नाही, आकाशकंदील लावले नाहीत, पणत्या शोधून ठेवल्या नाहीत. काल रात्री उशिरा घरी पोहचले, बिल्डिंग मधे शिरताना सहज वर लक्ष गेलं, एका घरी आकाशकंदील लागला होता, विचार आला अरे बापरे! अजुन आपण याचा विचारच केला नाहीये. दिवाळीचे वेध आजकाल लवकर लागतच नाहीत. पण असं म्हणावं तर नवरात्री पासूनच लक्ष्मी रोडवर पाय ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती असते. आता या सार्‍या गोष्टींसाठी वीकेंडची वाट पाहावी लागणार, किती कामे ठेवली आहेत त्या दोन दिवसांसाठी!

घरात शिरले समोर लक्ष गेलं, आणि चकित झाले, घर उजळून गेलं होतं, टेरेसभर चांदण्या उजळल्या होत्या. लेकीने आणि नवऱ्याने मिळून दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदील लावले होते.छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देऊन जातात नाही? मग आठवत राहिली लहानपण ची दिवाळी. किती आधीपासून त्याचे वेध लागायचे. कारण घरात फराळाची तयारी सुरू होत असे, पणत्या शोधून ठेवल्या जात, आकाशकंदील नवा बनवला जात असे, मला किल्ला करायला खूप आवडत असे. आम्ही जिथे राहत होतो तिथे मी एकमेव मुलगी होते जिला किल्ला करण्यात इंटरेस्ट होता. मोठे दगड जमा करायचे, माती आणायची, दगड रचून त्यावर ओबडधोबड चिखल लिंपून किल्ला बनवायचा. त्यावर अळीव पेरायचे, सकाळ संध्याकाळ पाणी मारायचे त्यावर आणि कधी उगवतात याची वाट पहायची. किल्ल्याच्या खाली शेते, तळी, कारंजी बनवायची. बाबांच्या मागे लागून फटाक्यांबरोबर मातीची चित्रेही दरवर्षी आणायची. ती चित्रे कोणी पळवून नेऊ नये म्हणून काळजी घ्यायची. आणि शेवटच्या दिवशी किल्ल्याच्या गुहेत सुतळी बॉम्ब लावून तो फोडायचा. खूप मजा वाटायची त्यात मला. ती सवय आजही टिकून आहे .....आता किल्ले बांधले जातात मनातल्या मनात!


फराळाची तयारी बरीच आधी सुरु होत असे, जसे की अनारशांसाठी पीठ तयार करणे, भाजणी बनवणे, करंजाचे सारण बनवणे, एवढेच काय त्याकाळी पिठीसाखर देखील गिरणीतून दळून आणली जात असे. आईने लाडूसाठी पाकात टाकलेला रवा, खवा वाटीत घेऊन खायला खूप आवडायचं मला....पण मिळायचं नाही कारण नैवेद्य दाखवायचा असायचा. चकली, शंकरपाळे करताना मदत करायची असायची. आज फराळाचे बनवले तर उद्या सकाळी सुद्धा घरात तो सुवास दरवळत असे. सलग चार दिवस घरी फक्त फराळाचे बनत असे. जसे की चकली, शेव आणि चिवडा एका दिवशी, लाडूचा रवा सकाळीच भाजून पाकात टाकायचा, आणि मग करंज्या, चिरोटे करून घ्यायचे, मग शेवटी लाडू वळायचे. एक आख्खा दिवस शंकरपाळी आणि थोडे अनारसे. लक्ष्मीपूजनासाठी म्हणून मग थोडे बेसनाचे लाडू. सगळे मोठे डबे  आधीच घासून पुसून ठेवलेले असत, मग सगळे पदार्थ त्यात भरून ठेवायचे.

लहानपणी दिवाळी सुरूच मुळी होत असे ती वसुबारसेपासून. संध्याकाळी जवळच्या गाय असणाऱ्या ठिकाणी जायचे, तिला फराळाचा नैवेद्य दाखवायचा, त्या मालकाला दक्षिणा द्यायची आणि परत. मग धनोत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. अशी किमान ६ दिवसांची दिवाळी असे मधे एखादा भाकड दिवस आला तर तो बोनस. आजकाल सारखं नाही, जेवढे दिवस ऑफिसला सुट्टी तितकीच दिवाळी. प्रत्येक दिवशी काहीतरी खास असे. दिवसभराच्या घडामोडीत आणि जेवणातही. जसे कि पाडव्याला हमखास बासुंदी बनत असे, आई ओवाळणीत काय मिळणार याची उत्सुकतेने वाट पहात असे, दुसऱ्या दिवशी मामा येणार किंवा नाही यावर बेत ठरत असे. बाबा आत्याकडे जात आणि मामा आमच्याकडे.

कपडे खरेदी हा एक आवडता उद्द्योग....तसा तो आज ही आहे..... पण तेंव्हा वर्षातून एक दोनवेळाच ते मिळत त्यामुळे त्याचे जरा जास्तच कौतुक वाटे. ..... माझे बाबा खूप सारे फटाके घेऊन यायचे, त्याची तिघात वाटणी होत असे. एकमेकांचे फटके चोरणे आणि मग त्यात शेवटी भांडभांडी होत असे. सर्वात जास्त फटाके मी उडवत असे. दोन वेळा फटाक्यांमुळे भाजल्यावर देखील. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहिली माळ कोण लावणार अशी चुरस असे. खरच इतक्या पहाटे उठत असू की सकाळी ७ पर्यंत तेल, आंघोळ, फटाके, फराळ सगळं होत असे..... रेडीओवर पहाटे दिवाळीचे खास असे कीर्तन, ते वातावरण निर्मिती करत असे. मग पर्वती चढायला जाण्याचा कार्यक्रम. इतकी मजा यायची. ११ वाजेपर्यंत घरी परत. दहीभात खावून, चांदोबा, किशोर हे दिवाळी अंक वाचत मस्त झोप काढायची. संध्याकाळी पुन्हा फटाके, दारात रांगोळी.


 दिवाळीनंतर लगेच आजीकड़े जात असू. उरलेले फटाके तिथे घेवून जात असू. मामाची मुले आणि आम्ही तिघे भावंडे. आजोबांच्या घरी शेती होती, ज्यात तांदूळ पिकत असे, त्यामुळे त्याची काढणी आणि धान्य घरी येण्याचे अनेकदा तेच दिवस असत. तिथल्या देवळात पहाटे उठून काकड आरतीला जाणे. कुडकुडत जावे लागते म्हणून तिला काकड आरती म्हणत असे मला लहानपणी वाटे. अगदी शाळा सुरु व्हायच्या आदल्या दिवशीपर्यंत तिथे मुक्काम करूनच घरी परत येत असू. आजकाल बोलावल्याशिवाय सख्खे नातेवाईकही एकमेकांकड़े जात नाहीत. आता सगळं बदललं. सार्‍या गोष्टी पैशाने उपलब्ध झाल्या, वेळ दुर्मिळ झाला.आता पर्यावरणाच्या नावाखाली फटाके बंद झाले. फराळाचे पदार्थ सतत घरात दिसू लागले, काही मजा राहिली नाही.......

अहो......आठवणीत रमलेल्या काकू! काहीतरीच काय? म्हणे काही मजा राहिली नाही. किती मजा असते.....


किमान एक महिना आधीपासून चितळे, वृंदावन त्यांच्या मेल्स येवून पडतात, त्या पाहून किमान दोन- तीन आठवडे त्यांना जावून किंवा ऑन लाईन फराळाची ऑर्डर द्यावी लागते. कोणाकडे काय चांगले मिळते हे लक्षात ठेवावे लागते म्हणजे तो पदार्थ आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खिलवून आपल्याला थोडा भाव खाता येतो. सगळेच पदार्थ स्वत: बनवणे शक्य नसले तरी, एखादा आपला असा खास पदार्थ घरी बनवायचा असतो. खरेदीसाठी कोणता वीकेंड यावर घरी जोरदार चर्चा घडवून आणावी लागते, एखाद्या वीकेंड वर एकमत झाले तर त्या दिवशी सहकुटुंब लक्ष्मी रोडवर सकाळीच पोहोचावे लागते, दुकाने उघडतील भले १० वाजता, पण त्यावेळी पार्किंगला जागाच मिळणार नाही. थोडा उशीर झाला तर मग दुकानातही उभे राहायला जागा मिळणार नाही. अशी "Shop till you drop" खरेदी झाली की मग पुन्हा कोणत्यातरी खास,गर्दी असणाऱ्या वैशाली, दुर्वांकुर नाहीतर श्रेयस मध्ये गर्दीत जेऊन घरी परत. हुश्श!!! पण सगळ्यांनी एकत्र जावून अशी खरेदी करण्यातही आनंद मिळतो ना!


दिवाळी पूर्वी करायचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे एखाद्या लहानमुलांच्या आश्रमास दिवाळीच्या काही वस्तू पाठवून द्यायच्या. कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपल्या या लहानशा कृतीमुळे हसू फुलत असेल तर त्या इतकी दुसरी चांगली गोष्ट आहे का?

घर अजून देखणे कसे दिसेल हे पहायचे असते. ठेवणीतले गालीचे, सजावटीचे समान बाहेर काढावे लागते. मायेचा हात घरातील वस्तूंवरही फिरवायचा असतो. दारात रांगोळ्या काढायच्या असतात, तोरणे बांधायची असतात. रांगोळी काढणे हा आज देखील माझ्या दिवाळीचा एक मोठ्ठा भाग असतो. येते काढता येते मला फक्त टिपक्यांचीच रांगोळी. दिवाळीच्या आदल्यादिवशी, रात्री उशिरा घरी पोहचले तरी सुद्धा रांगोळी काढायचीच असते, सोबतीला लेक असते आणि सूचना द्यायला तिचा बाबा! गप्पा मारत २/३ तासात एक रांगोळी पूर्ण होते तेंव्हा जवळजवळ रात्रीचे बारा एक वाजलेले असतात. पण अशी रांगोळी काढल्याशिवाय मला दिवाळी वाटतच नाही. पहाटे नटून थटून "दिवाळी पहाट" च्या एकद्या सुश्राव्य गाण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावायची असते. एक दिवस सासरचे, एक दिवस माहेरचे, एक दिवस लेकीच्या मैत्रिणी, यांना घरी जेवायला बोलवायचे असते. सगळ्यांपेक्षा वेगळा आणि तरीही रुचकर, सुग्रास बेत करायचा असतो. त्या निमित्ताने चार दिवस आपल्या माणसांसोबत हसत खेळत घालवता येतात. हे ४ दिवस कसे उडून जातात ते कळतही नाही. पर्यावरणाचा विचार करून फटाके घरी आणून उडवणे केंव्हाच बंद झालंय....पण एखादा फायर वायर शो बघायला मजा येतेच ना? पाडव्याला सुग्रास जेवण जेवून सुस्तावलेल्या नवऱ्याला बाहेर न्यायला पटवावे लागते, तेंव्हा कुठे जाऊन पाडव्याची काही खास ओवाळणी पदरी पडते. मग आग्रह करून करून काहीतरी छानशी वस्तू त्याच्यासाठी घ्यायला भाग पडावे लागते. भाऊबीजेला अजून एकदा वसुली केली कि मग दिवाळी संपते. इतक्या दमल्या भागलेल्या जीवाला मग विश्रांती हवी असते, मग जोडून सुट्टी घेवून कुठे तरी ट्रीपला जावे, आपलाच खिसा थोडा हलका करून यावे लागते.

तर काकू......सगळ्या जुन्या आठवणीत रमणे छानच असते हो पण जुन्या आठवणींमध्ये जगत आजचा आनंद हरवू द्यायचा नसतो हो..........पण आताच्या काळातल्या सगळ्याच गोष्टी, प्रथा टाकावू नसतात ना?


(सर्व छाया चित्रे आंतरजालावरून साभार)
4 comments:

 1. दिवाळीच्या शुभेच्छा..

  छान झालाय लेख :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद अपर्णा आणि तुलाही दिवाळीच्या मन:पूर्वक खूप सार्‍या शुभेच्छा!

  ReplyDelete
 3. जुन्याची नव्याशी सांगड घालणारा हा लेख दिवाळीच्या फराळा इतकाच चुरचुरीत झाला आहे.

  ReplyDelete
 4. धन्यवाद!आणि दिवाळीच्या शुभेच्छा!!!

  ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!