Wednesday, October 17, 2012

पुन्हा एकदा मला

पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय

माखल्या हातांनी स्वयंपाक घरात जावून डोकवायचंय

पेरलेले धान्य कधी उगवतं याची वाट पहायचीय

तिथे पहारा देत शिवाजीसह मावळ्यांचे रक्षण करायचय


पुन्हा एकदा भल्या पहाटे उठून पर्वती सर करायचीय

थकून भागून परत येताच फराळाचे ताट फस्त करायचेय

भरल्यापोटी चांदोबा किशोरच्या साथीने परीराज्यात जायचेय

गोष्टी सांगणाऱ्या वेताळाला एकदातरी पकडून ठेवायचंय


पुन्हा एकदा मला आजोळी जायचंय

बस मधून उतरतानाच मामा दिसतो का ते पहायचय

पहाटे चुलीपाशी बसून आजीशी गप्पा मारायच्यात

रात्री जागून अंधारात घाबरले तरी भुतांच्या गप्पा ऐकायच्यात


पुन्हा एकदा मला दफ्तर घेऊन शाळेत जायचय

न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय

चित्रकलेच्या तासाला सुबक चित्रे काढायची आहेत

डब्यातला खाऊ खाण्यासाठी मधल्या सुट्टीची वाट पहायची आहे


येईल का जाता आता बालपणात पुन्हा?

येईल का होता अल्लड आता मला पुन्हा?

येईल का दारी भोलानाथ आता पुन्हा?

मिळेल का सुट्टी तळे साचून आता पुन्हा?

4 comments:

  1. फार सुंदर लिहिलीये कविता अनघा.
    न येणारी समीकरणे आता सोडवता येतात का पहायचय
    ही ओळ फार छान.
    लिहित रहा.

    ReplyDelete
  2. केदार आणि ब्लॉगवर स्वागत!
    ही गोष्ट नेहमीच मनात डोकावते. जी समीकरणे शाळेत मला झळत आता कदाचित सोडवता येतील....जशी आता अवघड वाटणारी आयुष्याची समिकरणे काही काळाने सोपी वाटू लागतील.

    ReplyDelete
  3. लहानपणी 'मोठ' व्हावसं वाटतं आणि मोठेपणी 'लहान' - ही मनाची किमया!

    ReplyDelete
  4. फारच सुंदर - पहिल्या आणि कडव्याने मला माझ्या बालपणी नेले, दुसऱ्याने चांदोबा - किशोर डोळ्यासमोर आणले आणि एकूण कवितेने पुन्हा पुन्हा गहीवरवले.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!