Saturday, June 21, 2014

नात्यांची गुंफण...

मध्यंतरी एका ओळखीच्यांकडे त्यांच्या लेकाच्या लग्नाच्या आधी काही दिवस "व्याही भोजनाचा" कार्यक्रम होता. घर तसे भले मोठे, सर्वार्थाने, माणसांनी भरलेले, सुबत्तेने आणि माणुसकीने देखील. आई वडील आणि तीन मुले, त्या पैकी दोघांचे संसार त्यांच्या एक एक मुलांसह सुरळीत सुरु असणारे. आता शेंडेफळ बोहोल्यावर उभे राहण्याच्या तयारीत. जेवणे आटोपली, व्याही मंडळी घरी गेली. घरची आणि माझ्यासारखी काही घरच्यासारखी असणारी मंडळी गप्पा मारत बसली होती. तितक्यात एक मध्यमवयीन नऊवारी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली स्त्री घरी आली. तिला पाहताच त्या घरच्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक आनंद जाणवला. त्या काकूंनी तिला बसायला सांगितले, वरकाम करणाऱ्या मुलीस पाणी आणायला सांगितले आणि आत तिचे जेवायचे पान घेण्यासाठीही.  त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या. उशीर का केलास अशी विचारणा झाली. आम्हा सगळ्यांचे लक्ष थोड्या कुतूहलाने त्या दोघींकडेच लागलेले. 

त्यातून समजलेली गोष्ट अशी कि त्या जेंव्हा हि मुले लहान होती त्यावेळी,या आलेल्या त्यांचे वयही १०/११ वर्षे होते आणि यांच्या घरी राहून त्यांनी मुलांना  सांभाळण्याचे काम केले होते. पाठोपाठची ३ मुले असल्याने अनेक वर्षे त्या या घरी राहत होत्या. नंतर कधीतरी त्यांचे लग्न झाले, आणि त्यांचे हे घर सुटले, पण घराशी, या माणसांशी असलेले संबंध  नव्हेत. त्याच आपुलकीने लग्न घरी आता त्या २/३ दिवस मुक्कामास आल्या होत्या. आता पुढचे दोन चार दिवस त्या या घराच्या किचनचा, वरकामाचा ताबा त्या घेणार हे स्पष्टच दिसत होते. येताना नवऱ्या मुलासाठी आणि त्याच्या आईबाबांसाठी चांदीच्या वस्तू आहेर म्हणून घेऊन आल्या. ते पाहून मला वाटलं की कशासाठी हे सारं? जीवनावश्यक खर्च सुद्धा मुश्किलीने भागवणाऱ्या व्यक्तींनी  तरी अशा गोष्टी करू नयेत ना. पण नाती जपण्याची, ती निभावण्याची प्रत्येकाची एक पध्दत असते. बाकीच्यांना त्याबद्दल काय वाटते हे तेंव्हा गौण ठरावे. 

अशी तुमची सपोर्ट सिस्टम म्हणून काम करणारी मंडळी आणि तुमचे त्यांच्याशी असणारे संबंध. दिवसाचे किमान १०/१२ तास घराबाहेर असणाऱ्या माझे तर पानही यांच्याशिवाय हालत नाही. तशीही आम्हा भारतीयांना यांची गरज तर फार असते, पण त्यांच्याशी छान संबंध ठेवावेत, थोडे माणुसकी दाखवत त्यांच्याशी वागावे हे मात्र अनेकांच्या पचनी पडताना दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर वरील प्रसंग वेगळा उठून दिसावा. 

तशीही मी थोडी इमो टाईप व्यक्ती असल्याने ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी असे कधी काम केले आहे त्यांच्या बद्दल मी थोडी हळवी असतेच. असे हळवेपण मग मला त्यांना सोडू देत नाही. पण कधीतरी निरोपाचे क्षण येतातच, आणि जड मनाने ते स्वीकारावेही लागतात. जसे कि लेकीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये ५/६ दिवस किंवा त्यानंतर दोन वेळा काही कारणांनी हॉस्पिटल मध्ये राहावे लागले तेंव्हा आपुलकीने मला मदतीचा हात देणारे डॉक्टर, नर्सेस, लेक लहान असताना तिला पहिले वर्षभर सांभाळले ती तिची ताई, गाडीवरून पडल्यामुळे काम बंद कराव्या लागणाऱ्या पूर्वीच्या एक पोळी काकू, आणि रेल्वेतून उतरताना पडून हात तुटल्या मुळे  काम सोडावे लागलेली एक घरकाम करणारी अशा काही मोजक्याच ज्यांना निरोप द्यावा लागला होता. वरवर जरी मी पैसे मोजते आणि ही लोकं माझ्यासाठी काम करतात असे असले तरी त्यांच्या कृतीतला ओलावा मी पैशाने विकत नाही घेऊ शकत ना?

नशिबाने अशी फार मंडळी माझ्या घरी नाहीत पण जी आहेत ती गेली कित्येक वर्ष आमच्या घरचाच भाग आहेत.निमूटपणे त्या दोघी आल्यात, आपापली कामे करून, काही न बोलता निघून गेल्यात असे शक्यतो आमच्या घरी कधी घडत नाही. मुंबईहून पुण्यात आल्यामुळे बदलावी लागणारी किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे सोडून गेलेल्या एक दोन जणी वगळता गेली अनेक वर्षे त्याच माझी सपोर्ट सिस्टम आहेत. या पैकी एकजण तर जवळपास १३ वर्षे माझ्या घरी कामाला येतात आणि दुसऱ्या गेली ५ वर्षे. उद्या काही कारणांनी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचे झाले तर यांच्यासह व्हावे लागेल. कोणत्याही अशा व्यक्तींबाबत असतात तशा तक्रारी अधून मधून त्यांच्याबद्दल, केलेल्या कामाबद्दल माझ्याही असतात, पण कधी दुर्लक्ष करत, कधी गोड बोलून, तर कधी चिडून मी त्यांच्याकडून कामे  करून घेते. पण आम्ही एकमेकींना सोडत नाही. इतक्या वर्षांची आपुलकी आम्हाला एकमेकीना सोडूच देत नाही. 

अनेकदा घरच्या एखाद्या व्यक्तीने  आपली गरज समजून करावीत अशी कामे त्या करतात, जसे कि शनिवारी लेकीची दुपारी शाळा आहे, आणि मी मात्र सकाळी लवकर ऑफिसला गेले आहे, तेंव्हा तिची वेणी घालून देणे, जाताना ती डबा घरीच विसरून खाली उतरली आहे तेंव्हा कोपऱ्यावर असणाऱ्या तिच्या बस स्टोप पर्यंत धावत जाऊन तिला तो देणे,  मशीनमध्ये कपडे धुऊन तयार आहेत पण ते वाळत घालायला मला वेळ नाहीये, तर ते घालणे, घरात साफ सफाईला लागणाऱ्या गोष्टी संपल्यात, मला सांगितले होते पण मी विसरले आहे, तर मग स्वत:च सकाळी येताना त्या घेवून येणे आणि मग माझ्याकडून त्याचे पैसे घेणे अशी एक न अनेक अवांतर कामे त्या समजून करतात. त्यांच्या गरजा  समजून त्याप्रमाणे लागेल ती मदत करायला मलाही काही वाटत नसते. त्यांच्या घरच्या माणसांविषयी, त्यांच्या परिस्थितीबद्दल मलाही माहिती असते त्यामुळे काही गोष्टींमध्ये त्यांना सपोर्ट करणे हे ओघाने आलेच. 

अनेकदा मी न सांगता सुद्धा मला बरं नाहीये हे त्यांना कळते, किंवा कोणत्या कारणाने माझे काही बिनसले आहे हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही. अशा वेळी आपल्याला काय करायचे अशी भूमिका त्याही घेत  नाहीत, चौकशी कर, औषधे दुकानातून आणायची आहेत का ते विचार, मला बरं नाहीये हे आवर्जून (मला कळवायचं नसलं तरी ) जवळच राहणाऱ्या माझ्या आईला जाऊन सांग हे त्या दोघी केल्याशिवाय राहत नाहीत. हे सारे करावे हि अपेक्षा नसते पण त्यांनी ते केल्याने बरे वाटते हे नक्कीच. 

हे आपलेपण आता जेंव्हा पुढच्या पिढीतही दिसू लागते तेंव्हा मला खरेच मनापासून बरे वाटते. लेकीने सर्वात आधी एक उत्तम माणूस बनावे आणि मग बाकी काय ते अशी भूमिका असताना, पण तरीही कटाक्षाने तिला कोणाशी कसे संबंध ठेवायचे ते आपले आपण अनुभवातून काही अंशी शिकू दे असे  ठरवलेले असताना, मी घरी नसताना ती त्यांना कधी चहा करून देणे, आता उन्हाळ्यात कधी सरबत, कधी पन्हे देणे. अनेकदा तिच्या नाश्त्याची आणि त्यातल्या एकीची काम करायला येण्याची वेळ सध्या साधारण सारखीच असते, मग त्यांना नाश्ता विचारणे किंवा देणे अशा काही गोष्टी मी न सांगता करते  हे नक्कीच सुखावणारे आहे. माया एकाने लावली कि समोरचा अलिप्त राहूच कुठे शकतो? मग सलग ३/४ दिवस ती दिसली नाही की या दोघीजणी सतत विचारत राहतात. आता सुट्टीत ती दापोलीला गेली तर कधी येणार ती, घर फार रिकामं वाटतंय असं मला अनेकदा दोघींनी विचारून झालं. तिला बरं नसलं तर त्या अस्वस्थ होतात, चारचारदा त्याबद्दल विचारत राहतात. लेकही आता अनेकदा मजेत त्या दोघींना सांगते कि पुढे माझ्या लग्नानंतर मी तुम्हाला दोघींना माझ्या घरी नेणार म्हणून तेंव्हा त्या आपुलकीने त्या दोघीही नक्कीच सुखावत असणार. 

एक महिन्याभरापूर्वी एक आळसावलेल्या रविवारी सकाळी  मी वाचत बसले होते. इतका हेवी नाश्ता झाला होता कि नवरा आणि लेकीने आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन मस्त ताणून देणे पसंत केले होते. घराची बेल वाजली, मी दार उघडले घराची साफसफाई करणाऱ्या कुसुमबाई आल्या होत्या. आत येताच संस्कृती कुठे अशी त्यांनी विचारणा केली, खोलीत झोपलीये असे सांगताच "का, बरे नाही का" अशी विचारणा झाली. तसे काही नाहीये असे सांगताच त्या तिच्या खोलीकडे वळल्या. हातात काहीतरी होतं त्यांच्या. पाच मिनिटात लेक बाहेर आली. हातात एक भली मोठी कॅडबरी सिल्क घेऊन, आणि म्हणाली "आई, कुसुमबाई बघ हे काय घेऊन आल्यात माझ्यासाठी". सातत्याने देश विदेशातील chocolates खाणाऱ्या लेकीलाही  त्या त्यांच्या कृतीचे वेगळेपण जाणवले होते. 

त्यांना विचारले "अहो, हे काय, कशाला आणलेत, लहान आहे का ती आता कॅडबरी खायला, स्वत:च्या दोन नातवंडाना अशा गोष्टी घरी न्यायच्या सोडून हिला कशाला देताय? आणि एवढी महाग देतात का? त्यावर त्यांचे उत्तर होते, " अहो पोरीने मधे किती अभ्यास केला. आम्हाला त्यातलं काही कळत नाही, कुठली परीक्षा आणि काय काय करते ते, पण त्याबद्दल तिला काहीतरी द्यायला नको? गेले आठ दिवस रोज म्हणते तिला काहीतरी नेईन म्हणत होते तेंव्हा आज जमलं" यावर काही बोलू नाही शकले मी. क्षणात काही वर्षांपूर्वी त्या लग्नघरी आलेल्या त्या बाई आठवल्या आणि नात्यांची संगती पुन्हा एकदा लागली. 

4 comments:

 1. छान लिहिलं आहेस.

  ---- तशीही आम्हा भारतीयांना यांची गरज तर फार असते, पण त्यांच्याशी छान संबंध ठेवावेत, थोडे माणुसकी दाखवत त्यांच्याशी वागावे हे मात्र अनेकांच्या पचनी पडताना दिसत नाही. ---- खरं आहे पण मला वाटतं त्याला दोन बाजू आहेत. म्हणजे खूपजणांचा अनुभव असतो की बर्‍यांचदा ही लोकं तुम्हाला गृहीत धरुन ढवळाढवळ करायला लागतात त्यामुळे हाताच्या अंतरावर ठेवलेलं बरं. अर्थात अपवाद असतात आणि ते तुझ्या लेखनात दिसून आलेच.

  ReplyDelete
  Replies
  1. kharach majha nasheeb ki ashi apawaad watawa ashi manasa majhya sobat aahet ...

   Delete
 2. आवडली दोन्ही उदाहरणं आणि त्यातली संगती. खरं म्हणजे अशा नात्यांनी आपल्यावर खर्च करू naye असं वाटणं जितकं स्वाभाविक तितकंच त्यांना आपलं प्रेम भेटवस्तूद्वारे व्यक्त करायची इच्छा.

  ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!