Monday, November 12, 2012

ते ३ शब्द.....त्या साऱ्या आठवणी

मेल बॉक्स उघडल्यावर  नवीन येऊन पडलेल्या मेल्सवर आधी एक नजर टाकली. एका मेल कडे लक्ष गेले अन सब्जेक्टलाईन मधल्या त्या ३ शब्दांनीच पौर्णिमेच्या चंद्रासारखे हसू माझ्या चेहऱ्यावर पसरले. अगदी आतून आलले खरेखुरे! मन अलगद कापसाप्रमाणे उडत मागे गेले. अनेक आठवणी पहाटे उमलणाऱ्या प्राजक्तासारख्या दरवळू लागल्या. 

नाही नाही .... जास्त उत्सुकता मी ताणत नाही. "ते ३ शब्द" असे  म्हणता, जे पहिले स्वाभाविक पर्याय येतील हे ते नव्हते. :) नवीन काळे लिहित असलेल्या "सॉंग ऑफ द डे" या ब्लॉग वर add झालेल्या नवीन पोस्ट ची ती मेल होती आणि "ते ३ शब्द" होते "दिन ढल जाये ....." खरं सांगू का या शब्दांच्या जागी इतर कोणतेही  शब्द जसे की "आज फिर जीनेकी तमन्ना", "पिया तोसें नैना लागे", "गाता राहे मेरा दिल" "सैया बेईमान" "तेरे मेरे सपने" किंवा "वहा कौन हे तेरा" असते ना तरी मी इतकीच खुश झाले असते. बाकी सगळ्या मेल्स बाजूला ठेवून, त्या ब्लॉगवर जाऊन हि पोस्ट वाचायला घेतली. तसंही नवीन काळे जेंव्हा एखाद्या गाण्या बद्दल लिहितात ना तेंव्हा त्याचे इतरही अनेक संदर्भ, त्या गाण्यासंबंधी किस्से सांगत जणू तो सगळा काळ तुमच्या समोर उभा करतात. फ्रेम बाय फ्रेम गाणे तुमच्या नजरेसमोर जिवंत करण्याचे कसब त्यांच्या लेखणीत आहेच. आणि जेंव्हा ते गाणे "दिन ढल जाये" सारखे असते तेंव्हा तर बात काही और असते.

अति परिचयात अवज्ञा ते हेच का? खरं तर या पूर्वीच मी याबद्दल लिहायला पाहिजे होतं. पण कसं ते माहित नाही पण कायम राहूनच जाते.  "गाईड" या सिनेमा बद्दल मी पूर्वीच काही लिहा बोलायला हवे होते इतका तो माझ्या काळजाच्या जवळचा आहे. किती वेळा मी तो पहिला असेल माहित नाही. पण असंख्य वेळा पाहूनही मन भरणार नाही असे जे मोजकेच चित्रपट आपल्याकडे बनतात त्यापैकी तो एक.  अगदी लहान असताना असे कुठेतरी बर्याच ठिकाणी लिहिलेले वाचले होते, "मिलीये राजू गाईडसे".....पण तरी म्हणजे काय ते अनेक दिवस कळलेच नव्हते. अंधुकसे आठवते ते म्हणजे जेंव्हा लहानपणी सर्वात पहिल्यांदा तो दूरदर्शनवर लागणार होता तेंव्हा आजी म्हणाली "लहान मुलांनी पहावा असा तो नाहीये"(म्हणजे तेंव्हाच्या प्रचलित कल्पना आणि संस्कारांप्रमाणे, आजचे मापदंड यास लागू होणार नाहीत.) तरी मी तो पहिलाच.(नेहमी असेच घडते न? मोठ्यांनी विरोध करावा आणि लहानांनी ती गोष्ट हमखास करावीच). त्या नंतर अनेकदा बघतच गेले. पण नुसताच बघितला आणि विसरून गेले असे नाही झाले.....प्रेमात पडले...या गाण्यांच्या,सचिनदांच्या, वहिदा रेहमानच्या जिच्या मुळे सौदर्याचे मापदंड खूप वर गेले..... आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच सिनेमाने माझ्या  स्वप्नातल्या राजकुमाराची प्रतिमा रेखाटली. जी आयुष्याचा खराखुरा साथीदार मिळाल्यानंतरही मनात कायम राहिली. हळुवार, प्रेमळ देखणा "तेरे मेरे सपने अब एक रंग .....तेरे दु:ख अब मेरे, मेरे सुख अब मेरे" म्हणणारा..... जी सिनेमातले काही खरे नसते माहित असतानाही मी कित्येक वर्षे जपली.

पुढे अनेकदा हे असे हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातले अगदी मैलाचे दगड नाहीत पण त्यांना बाजूला करून तो इतिहास पूराच नाही होवू शकणार असे सिनेमे पाहताच गेले. गोडी अशी लागत गेली जी आजही कायम आहे. जसे की देव आनंदचे हम दोनो, मुनीमजी, सी. आय डी. नौ दो ग्यारह, प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, काला पानी, काला बाजार, जब प्यार किसीसे, तेरे घर के सामने, बंबई का बाबू, .... गुरुदत्त यांचे प्यासा, साहिब बीबी, आर पार  चौदावी का चांद ....अशी भली मोठी यादी आहे. आजही सर्वात छान माझी सुट्टीची कल्पना हीच आहे की " शांत निवांतपणे हे सगळे सिनेमे" पाहता यावेत अशीच आहे. 

गाईड हा सिनेमा ज्यातले प्रत्येक गाणे इतके सुंदर की मला कधी यातले सर्वात आवडते कोणते हे आजतोवर कधी ठरवता नाही आले. जर कधी सर्वात आवडणारी १० गाणी निवडावी लागली तर गाईड आणि प्यासा या दोन सर्वात सुंदर सिनेमातील नक्की कोणती १० हे ठरवताना माझी दमछाक होईल. प्रत्येक गाणे त्या कथेमध्ये असे बेमालूम गुंफलेले की त्या गाण्यानेच कथा पुढे न्यावी.या गाण्यांशिवाय ह्या सिनेमांची मी कल्पनाही करू शकत नाही, इतका ती गाणी प्राण आहेत या सिनेमांचा....नव्हे तर या युगातील अनेक अशा सिनेमांचा. या गाण्यांनी मला घडवलंय .....आज फिर जीनेकी तमन्ना है म्हणत पुढे सारे विसरून पुढे जगायला शिकवलंय, युं ही काहोगे तुम सदा के दिल अभी नाही भरा ...म्हणत संयम शिकवलाय, तेरे मेरे सपने म्हणत आयुष्यभराची साथ द्यायला, दिल ढल जाये..... ने विरहाची जाणीव करून दिलीये, चांद फिर निकाला...म्हणत कोणाचीतरी वाट पाहायला,  ये दुनिया अगर मिलभी जाये तो क्या ही....ने भीषण वास्तवाची जाणीव करून दिलीये...आणि तरीही सर जो तेरा चकाराये तो ....चा उपाय ही या गाण्यानीच सांगितलाय. या गाण्यांनी माझे भावजीवन समृध्द बनवले. खरे तर हे सिनेमे माझ्या पिढीच्या जन्माच्याही बरेच आधीचे.....पण आमच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या अनेक पिढ्यांवर या गाण्यांनी राज्य केलंय .... माझ्या प्रत्येक भावनेला चपखल शब्दात बांधणाऱ्या या साऱ्या गाण्यांना सलाम! 

2 comments:

  1. सुरेख
    ह्या गाण्यामध्ये भावार्थ ,आणि आशय दडला असायचा म्हणूनच गाण्याच्या ओळी
    यक्ष , गंधर्वांनी गाऊन अजरामर केल्या,

    ReplyDelete
  2. माझाही एक अत्यंत आवडता चित्रपट, गाण्याचे शब्द, त्याचे संगीत, वहिदाचा अभिनय हे सारे अप्रतिम, देवानंद पण खूप आवडत्या हिरो पैकी पण ह्या सिनेमात माझ्या दृष्टीने तो high point नाही. सिनेमाच्या ह्या साऱ्या विषयी अनेकांनी अनेक उत्कृष्ट प्रकारे लिहिले आहे. पण ह्या साऱ्याचा परमोच्च म्हणजे चेतन आनंदचे editing आणि direction. संकलनाचा आदर्श वस्तुपाठच आहे हा सिनेमा. "आज फिर जीनेकी तमन्ना है" ह्या गाण्याचे taking इतके अप्रतिम केले आहे कि प्रत्येक शब्दाचा अर्थ action मधून बाहेर येतो. सिनेमा हे खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाचे माध्यम आहे. कलाकारांनी अभिनय उत्कृष्ट केला आहेच पण विशिष्ट हालचाली, कॅमेरा movement आणि एडिटिंग द्वारे त्याने कितीतरी शब्दापलीकडले, अभिनयापलीकडले त्यात भरले आहे ते आपल्याला sub-conscious पातळीवर जाणवते. प्यासा आणि इतर सिनेमासाठी गुरुदत्त दिग्दर्शक म्हणून नावाजला जातो तसा माझ्या मते चेतन आनंद गाईड साठी आहे.

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!