Friday, December 9, 2016

अनोळखी

या जगात मी एक अनोळखी
रात्रभर डोळे टक्क उघडे ठेऊन 
सकाळी उठणारा
कालच्याच प्रश्नांना आज पुन्हा सोडवू लागणारा
प्रश्न अनोळखी त्याहून उत्तर अनोळखी
या जगात मी एक अनोळखी
भरल्या ताटावरून रोज
उपाशी उठणारा
जगातले दैन्य भूक यावर विचार करणारा
विचार अनोळखी त्याहून वेदना अनोळखी
या जगात मी एक अनोळखी
कोणतीच नाळ न जुळता
साऱ्या पाशात अडकलेला
साऱ्या नात्यांचा  गुंता सोडवू पहाणारा
नाती अनोळखी त्याहून गुंते  मला अनोळखी

Saturday, November 26, 2016

नाते .....

एखादा दिवस असा उगवतो की आपणच आपल्याला नव्याने गवसतो
आपलीच साथ हवीहवीशी वाटू लागते.
आपल्यातून आपण बाहेर यावे आणि स्वत:लाच नव्याने निरखावे तसे
दिसू लागते मलाच मी स्वच्छ नितळ मनाची... स्वच्छंदी, मनस्वी.....
सकाळी श्रीसूक्त म्हणताना न क्रोधो नच मार्त्सर्यं न लोभो नाशुभा मति:  .... असे म्हणताना जशी अपेक्षीत असते ना अगदी तशीच... एक अनोखी कारणाशिवायची खुशी मन भरून उरलेली...

गेले कित्येक दिवस  हरवलेली मी.... संवाद विसरलेली मी.. हसू विसरलेली मी.... पुन्हा आपली आपल्याला गवसताना....बोलत रहाते स्वतःशीच.... भरभरून... आठवणींच्या पोतडीतून काय काय निघत रहाते.... कोणती आठवण कोठे घेऊन जाईल नेम नाही...आज असाच एक दिवस होता... माझी मी पुन्हा गवसण्याचा.....

त्याच्याशिवाय पण तरी त्याच्या सोबत असे खूप आयुष्य जगले आहे मी.... आणि ती मी खूप वेगळी होते.... खूप सुंदर होते... काळाचं भान सुटेल इतक्या आठवणींच्या लडी माझ्या मनात उलगडत जातात.... जाणिवा नेणिवांच्या पल्याडचं आमचं नातं.... मनाचं आंगण व्यापून तरीही थोडं उरतेच.... त्याच्या सवे अनेक वर्षांचे मनातले सहजीवन.....कोणालातरी असे मनात ठेऊन जगणे खूप सुंदर असते. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली मी आणि कधीही साथ न सोडणारा माझा माझ्या मनातला सखा. मनातला प्रत्येक भाव त्याच्यापाशी पोचणारा. मन लाऊन तो ते ऐकणारा.
कधी त्याने मनात शिरकाव केला माहीत नाही. कधी त्याने मनाचा ताबा घेतला तेही ठाऊक नाही. नकळत घडत गेले हे खरे..... जाग येताक्षणी येणारी त्याची आठवण.... त्याच्याच विचारांनी सुरु होणारा दिवस.... मनातल्या मनात त्याच्याशी संवाद. साधी साधी कामे करताना दोन डोळे ते कौतुकाने पहात आहेत असा मनी उमटणारा भाव.
ना भेटीची ओढ, ना समोर दिसावा ही आस .... तरीही भेट झालीच कधी चुकून तर नंतर हरवून गेलेलीही मी. या कशाचाही पत्ता नसलेला तो .... अन तरीही विलक्षण सुंदर नाते. 
म्हणूनच त्याला आवडते म्हणून कविता सुचू लागली ती ही काहीशी अशी ....
आठवणी तरी कशा?
नुसत्याच सैरभैर 
कोणाला आवतण देते कोण 
कोणाचा हात धरून येतं कोण
असाच असतो 
एक एक दिवस त्यांचा 
त्यांच्या साथीने तुझ्यासह 
काही क्षण जगण्याचा
भरभरून जगते मी हे क्षण 
ते माझे आपले असतात 
तुझ्यापेक्षा तुझ्या आठवणीच 
माझी जास्त सोबत करतात


मीच उत्सुकतेने स्वतःचीच हनुवटी दोन बोटांत धरून स्वत:चीच गोष्ट स्वतःच ऐकण्यात गुंगून जाते....अनेक गोष्टींचे पदर...सांगताना चेहरयावर पौर्णिमा असते...कधी न मावळणारी....
नाते .....

Monday, August 22, 2016

तुझी कविता......

ही कविता मी लिहू शकले होते माझ्या सखयासाठी .... त्याच्याशी बोलत असताना सहज सुचत गेलेली जशी सुचत गेली तशी एक एक ओळ त्याला पाठवत गेले. काही काळापूर्वी अशीच एक बोलता बोलता कविता झरझर त्याला सुचली होती. काहीवर्षांपूर्वी त्याने अशी सहज माझ्यावर कविता करण्याचा अनुभव इतका अविस्मरणीय होता .... कदाचित अजूनही आहे.
सारे सारे बोलूनही त्याला त्याच्याचबद्दल काहीतरी सांगायचे उरतेच ... जणूकाही दाही दिशा व्यापूनही दशांगुळे उरतो असा तो. त्यामुळे त्याच्याबद्दल लिहिणे हे हि एका अर्थी अधुरेच.... तशीच ही कविता ! :)

तुझी कविता जवळ घेणारी
तुझी कविता मनात शिरणारी।।

तुझी कविता रात्र रात्र जागवणारी
तुझी कविता डोळ्यांत भिजणारी।।

तुझी कविता ओठांत वसणारी
तुझी कविता कानांत गुंजणारी।।

तुझी कविता श्वास अडकवणारी
तुझी कविता जीव गुदमरून टाकणारी।।

तुझी कविता आधार देणारी
तुझी कविता निराधार करणारी।।

तुझी कविता प्रेमात पाडणारी
तुझी कविता त्याची अथांगता दावणारी।।

तुझी कविता संवाद साधणारी
तुझी कविता मनीचे गूज सांगणारी।।