Saturday, September 16, 2017

गर्दी

गर्दी बिनचेहेऱ्याची
तरीही अनेक चेहेरे
आणि त्यावरील रंगीत मुखवट्यांची

गर्दी वाट हरवलेल्या माणसांची
तरीही अनेक रस्ते
व्यापून उरणारी

गर्दी माणूस रुपी बेटांची
तरीही सतत कोणाशी तरी
जोडली जाऊ पाहणारी

गर्दी भावनाशून्य भासणारी
तरीही हृदयात तो
ओलावा जपणारी

गर्दी कलकलाटाची
तरीही मनातला कोलाहल
आतच दडपून टाकणारी

गर्दी एक एकट्या माणसांची
तरीही सतत आपले माणूस
शोधत राहणारी

Sunday, June 25, 2017

समाज बदलताना

समाजची एक चौकट असते.. नियमांची, याेग्य अयोग्य, नैतिक अनैतिकतेची. जन्माला आल्यावर तिची लिखित प्रत कधी कोणी तुमच्या हाती ठेवलेली नसते. जसजसे तुम्ही समाजाचा हिस्सा बनत जाता तसतशी तुम्ही ती अंगिकारत जाता.

आपल्यापैकी कोणीच खरेतर हौस म्हणून उठसुठ या चौकटी मोडत नसते, येताजाता नियमांची पायमल्ली करत नसते. पण घडते असे कधीतरी की तुमची कृती ही चौकट मोडणारी ठरते. कधी परिस्थिती ते घडवते, कधी तुमची गरज असते, कधी तुमच्या भावना, तुमचा आतला आवाज ते घडवतो.

अनेक गोष्टी प्रथम घडल्या तेंव्हा त्या समाजाच्या चौकटीत बसणारया नव्हत्याच. पण कृती करणारयाने आपल्या भावनांशी, आपल्या आतल्या आवाजाशी प्रामाणिक रहायचे ठरवले आणि कृती केली, समाजापुढे मांडली, आपल्या कृत्याची जबाबदारी स्विकारली. समाजाने काही खुल्या दिलाने स्विकारल्या, काही अंशत: नाईलाजाने मान्य केल्या काही नाकारल्या. समाजाच्या चौकटीही अशाच विस्तारत जातात.

अनेक उदाहरणे देता येतील अशा समाजाच्या चौकटी बदलून टाकणारया व्यक्तींची, घटनांची. नोकरीसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्या घराचा उंबरठा ओलांडला ती स्त्री, जी तिने आपल्या त्या चार दिवसांतली सर्व वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक बंधने झुगारली ती, ते पहिले जोडपे ज्यांना आपल्यातला बंध जपण्यासाठी, नाते फुलवण्यासाठी लग्नसंस्थेची गरज नाही असे ठामपणे वाटले आणि म्हणून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशीप स्विकारली, आपले नाते जपले, टिकवले, फुलवले, आणि समाजाच्या चौकटीत न बसणारा आगळा संसार साकारला, तो किंवा ती जिने आपले विवाहबाह्य संबंध नाकारले नाहीत, समाजापुढे ठेवले, पण ते नातेही प्राणपणाने जपले, ज्याने कोणी आपण गे किंवा लेस्बियन आहोत हे जगापुढे मांडले....  अशी अनेक

खरेतर आपल्यापैकी प्रत्येकाला योग्य कल्पना असते आपली कृती समाजाच्या चौकटीत बसते की नाही याची, त्याच्या परिणामांची. तर अशी समाजाच्या चौकटीत न बसणारी कृती आपण करायला निघालो असू तर आधी विचार करायचा, हे आपल्याला पेलेल की नाही याचा उगीच नसती साहसे करायची नाहीत कारण त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. आपल्या क्षणिक भावनेतून, गरजेतून करण्याच्या या गोष्टी नव्हेत. कृती केल्यानंतर लगेच किंवा योग्यवेळी ती स्विकारणे, मान्य करून जबाबदारी घेणे हा एकच पर्याय असायला हवा. समाजाने ते मान्य करायचे कि नाही, तुम्हांला तुमच्या कृतीसह स्विकारायचे की नाही हा सर्वस्वी समाजाचा निर्णय....  तो जो जसा असेल तसा मान्य करून, त्याचा योग्य तो आदर करून पुढे जायचे. ही खरेतर अयोग्याला योग्य दिशा, अनैतिक कृत्यही नैतिकतेने निभावणे. या क्षणी कमकुवत नाही व्हायचे, त्या परिस्थितीपासून, माणसांपासून, आपल्या जबाबदारीपासून पळ नाही काढायचा.... ते खरे अयोग्य, अनैतिक.

समाजमान्यता नसलेली, रूढीमान्य नसलेली गोष्ट माझ्या हातून घडली. त्या सारयात मला कधी खोट्याचा आधार घ्यावासा नाही वाटला, त्याचे जे बरे वाईट परिणाम होते ते माझ्या वाट्याला आले. जे त्यापायी भोगावे लागले ते मी भोगले, खूप काही गमावलेही. पण मी परिस्थितीपासून पळ काढला नाही, जबाबदारी टाळली नाही, जे काही होते ते प्राणपणाने निभावण्याचा शक्य तेवढा चांगला प्रयत्न मी केला ही गोष्ट कदाचित शेवटच्या क्षणी समाधान देईल. या काळात असेही काही सुहृद होते त्यांना माझ्या कृतीला योग्य- अयोग्य असे कोणते लेबल लावायचे नव्हते, माझ्याशी असलेले जे काही त्यांचे नाते होते ते त्यांना बाकी सारयाहून महत्वाचे वाटले, माझ्या सोबत असणे, आधाराचा हात पुढे करणे हा त्यांनी स्विकारलेला पर्याय होता. मी आजन्म या सारयांची ॠणी राहिन.

Friday, May 26, 2017

निरोप......

निरोपाचा क्षण
भरले डोळे
तरी प्रश्न उरे
तुझे नि माझे नाते काय ?
एकाचे दु:ख
वेदना दुसऱ्यास
तरी न कळे
तुझे नि माझे नाते काय ?
झाकोळल्या माझ्या मनास
तुझ्या अस्तित्त्वाचा आभास
तरी कसे सांगावे
तुझे नि माझे नाते काय?

ती......

कविता काही दशकांपूर्वीची......
कविता काही वर्षांपूर्वीची.....
कविता आजची......
कदाचित उद्याची ही.........
तेच राहिल वाट पहाणे
तेच राहिल लाटा मोजणे
तेच राहिल पायांचे वाळूत रूतणे
तेच राहिल भरती ओहटीचा अर्थ शोधणे
असाच चालू राहिल शोध
तिच्या नुरल्या अस्तित्त्वाचा
तिच्या पाऊलखुणांच्या
गाजेतून ऐकू येणार्या तिच्या सादे चा
व्यर्थ शोधतोयस वेड्या तिला लाटांमधे
नाही सापडायची कोणत्याच किनार्यावर
आत डोकाव जरा मनात
तिच्या आठवणींची प्रत्येक लाट
येऊन आदळते मनात तुझ्या
परतली कुठे आहे ती
हरवली कुठे आहे ती
मन व्यापूनही तुझे ती
ऊरते चराचरात ती

Tuesday, April 11, 2017

असा सुगंध, असे तुझे फुलणे...वेड लागेल नाहीतर काय.......

काही वृक्ष सदोदित तुमची सोबत करतात ... तुम्ही कुठेही जा ते सोबत असतातच. हे फक्त तुम्हाला माहित असायला हवे.   प्रत्येक नव्या ठिकाणी त्यांना शोधणे तुम्हाला जमायला हवे. माझ्याबाबतीत कदंब, पिंपळ, गुलमोहर, सोनचाफा, सप्तपर्णी आणि बहावा हे असे काही वृक्ष. कुठूनतरी आसपास मला ते सापडतातच. येता जाता ध्यास लागल्यासारखे माझे या साऱ्या झाडांबद्दल होते. नव्या ठिकाणी मी त्यांचा मनोमन शोध घेत राहते.

सप्तपर्णी किंवा रामप्यारी .... दिवाळीच्या सुमारास हलकेसे थंडीचे आगमन होता होता सप्तपर्णीने गंधाळून टाकावे आणि त्यास भुलल्यासारखे मी हे झाड़ आसपास कुठे आहे त्याचा शोध घ्यावा. हलकी थंडी, आणि वेखंडासारखा थोडा उग्र, उष्ण आणि तरीही हवाहवासा गंध. प्रत्येक संध्याकाळ ही सुगंधयात्रा  होऊन जावी.  प्रथम ओळख झाली तेंव्हा फेसबुक च्या माध्यमातून माहिती मिळवली. अभिनव फडके यांनी याचे मी केलेल्या वर्णनावरून याचे नाव सांगितले. मग या रामप्यारीचे वेड ही दरवर्षीची गोष्ट झाली.  यावर्षी सप्तपर्णीचा शोध घ्यावा नाही लागणार कारण ते झाड माझ्या आणि शेजारच्या इमारतीतच सापडले आहे. ते दिसल्यावर एखादा ठेवा आपल्या जवळ असल्याचा भास झाला मला.






पिंपळ .....  सर्वसाधारण हा आपल्या आसपास असतोच ना . मोहात काय पाडते तर यांच्या पालवी पासून पूर्ण मोठे पान होईपर्यंत दिसणाऱ्या असंख्य रंगछटा. कोवळी असतानाची तांबूस छटा घेऊन आलेली आणि नंतर पोपटी हिरव्याच्या काही छटा घेत मग पूर्ण पानात रूपांतर होणारे हे झाड. याची सळसळ नजरेला आणि कानांना सुखावणारी. याची पानाची बनणारी जाळी विलक्षण देखणी. तुमच्या आमच्यासाठी हा पिंपळ .... अगदी १२ पिंपळावरचा मुंजा अशी कोणाला उपाधी मिळवून देणारा ... पण तोच पिंपळ गौतम बुद्ध त्याखाली बसून ज्ञानप्राप्त करून घेताच बोधिवृक्ष ठरतो.

कदंब.......  तो कसा असतो, कसा दिसतो, कोणते वैभव घेऊन तो लगडतो ह्याची मला काहीच कल्पनाच नव्हती. म्हणे प्रत्येकाच्या पत्रिकेत एक आराध्य वृक्ष लिहिलेला असतो ... माझ्यासाठी तो कदंब लिहिलेला होता आणि मला त्याबद्दल माहिती नव्हती. "कदंब तरूला बांधून झोके" अशा गाण्याच्या ओळी ऐकल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाला प्रिय असे हे झाड शोधावे कुठे हा प्रश्न! पाच वर्षांपूर्वी सध्याच्या ऑफिस मध्ये आले साधारण सप्टेंबरमध्ये तेंव्हा चहूकडे थोडी लांब रुंद पाने असलेल्या मोठ्याशा झाडांवर हे चेंडू लटकलेले पहिले, आणि गूगल वर  शोध घेतला तर हा कदंब हे कळले. ऑफिसमध्ये आणि ऑफिस च्या रस्त्यावर दुतर्फा ही झाडे आहेत. तसा हा सदाहरीत वृक्ष पण साधारण जुलै ऑगस्ट मध्ये हे बहरलेले झाड इतके देखणे दिसते की पहाताच राहावे. एकदा त्याची ओळख झाली, वाढली  की मग पुन्हा पुन्हा भेट होणे हे ओघाने आलेच नाही का? मग पुढे आमची भेट एका पेट्रोल पंपाच्या बाहेर होऊ लागली आणि मग ते अजून एक आमच्या भेटीचे ठिकाण झाले. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी हाच पंप हे आपोआपच ठरून!


बहावा .... सोनालू असे बंगाली भाषेतले गोड नाव असणारा आणि अमलताश असे हिंदी मधील भारदस्त नाव असणारा हा वृक्ष! मराठीतच असे रुक्ष नाव त्याला कोणी का बरे दिले असावे? "बहकवा" पण चालले असते ना कदाचित! त्यापेक्षा नेपाळी भाषेत राजवृक्ष असे उचित नाव आहे याचे.  गेली अनेक वर्षे माझ्या घराजवळच्या इमारतीत फुलत असे. जाता येता त्यास पाहणे हा नितांत सुंदर अनुभव असे. पहिला फुलांचा घोस लगडल्या पासून ते त्याचे अंगोपांगी बहरून येणे. हलकेच वाऱ्याने त्याचे फुलांचे लोलक झुलत राहणे, सकाळ संध्याकाळच्या प्रकाशात या झाडातून पाझरणारा विलक्षण देखणा सोनेरी प्रकाश ... मनभर आनंद भरून राहणारा. हळूहळू  रोज त्याचा पडणारा सडा पाकळ्यांसोबत त्याच्या बिखरून सर्वत्र पडलेल्या बिंदल्या.
असे म्हणतात बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी पहिला पाऊस येतो, दरवर्षी ठरवते हे खरे आहे का तपासून बघायचे. पण दरवर्षी काही कारणाने एक दोन चार  दिवस बहाव्याकडे लक्ष जात नाही .... आणि जेव्हा जाते तेंव्हा तो इतका फुलून गेलेला असतो कि मी हळहळते. पहिला अंकुर, पहिले कळीचे अस्तित्त्व, देठातून उमलू पाहणारे कोवळ्या पानाची चाहूल हे सारे बघणे विलोभनीय असते नुकत्याच जन्मलेल्या बाळाइतके. तसा निष्पर्ण बहाव्याला लगडलेला पहिला सोन्याचा घोस! निसर्गातले वैभव असेच केवळ त्याचे वर्णन होऊ शकते. यावर्षी ऑफिस मध्ये बहावा फुलला आहे .... पण घराजवळ त्याचे दर्शन घडेना. अजून नव्या परिसराशी म्हणावी तितकी ओळख झालेली नाहीये. दर वीकांतास नव्या वाटा धुंडाळणे चालू आहे. परवा अचानक एक नवा रस्ता चालण्यासाठी घेतला एका इमारतीच्या आत हा फुललेला दिसला. खालून अर्धा पिवळ्याधम्मक घोसांनी लगडलेला आणि वर पालवीचा कोवळा हिरवा मुकुट ल्यालेला. आपला आनंदठेवा असा आपल्यापासून दूर नाही जाऊ शकत याची मनोमन खात्री पटवून देणारा क्षण तो हाच.



गुलमोहर ..... शाळेत लाल रंगाचा गुलमोहर होता. खूप मोठा डेरेदार. त्याच्या कडेने बांधलेला दगडी पार आणि दोन्ही बाजूस असणारा लांबच लांब कट्टा. एकदा फुलला की पडणारा लाल सडा. पाकळ्यांची एक विशिष्ट रचना, कधी त्यात दिसणाऱ्या छटा , थोडे जाड देठ. शाळेत दोन मुलींचे प्रकार असावेत या झाडामुळे पडलेले. एक फुले वेचणाऱ्या नाजुका आणि नंतर त्याच्या शेंगांच्या रूपात तलवारी जवळ करणाऱ्या झाशीच्या राण्या!शाळा संपायला एक दोन वर्षे शिल्लक असताना अजून एक इमारत बांधण्यासाठी हा गुलमोहर तोडला. तेंव्हा वाईट वाटले असेल त्याहून अधिक वाईट आता तो तोडला याचे वाटत राहते. याच्याच जातकुळीतला अजून एक वृक्ष म्हणजे नीलमोहर... सहज सापडत नाही पण जर दिसतो तेंव्हा मोहवतो हे नक्की. पण गुलमोहर तो गुलमोहरच !



सोनचाफा ....  प्रेम आहे माझं..... फिदा आहे मी.... या फुलांवर. त्याच्या रूपावर गंधावर! आधी अनेकदा ते विविध रूपात व्यक्त ही करून झालंय. पण म्हणून प्रेम कमी थोडीच होतं? उलट वाढतं  ... माझ्या घरी होता, माझ्या घराच्या रस्त्यावर कोणकोणत्या घरासमोर आहे हे मला ठाऊक होते. त्या त्या रस्त्यावरून जाताना झाडावर एक तरी फुल दिसले तर पुढे दिवस छान जाणार अशी अंधश्रद्धा सुद्धा अनेक वर्ष मनात होती. कोणी ओंजळभर फुले समोर धरली तर मी कोणाला काय वाटेल याचा विचार न करता ती सारी फुले स्वतःच्या ओंजळीत घेईन हे नक्की. "लालच बुरी चीज हैं .... "असे मनातही नाही येणार माझ्या.
माझा एक मित्र ज्याला बागकाम करायला वेळ आणि जागा हे दोन्ही सध्या उपलब्ध आहे तो त्याच्या घरी आलेल्या फुलांचे फोटो पाठवून पाठवून मला माझ्या घरी काय नाहीये याची जाणिव करून देत राहतो. येईल पुन्हा या पावसाळ्यात सोनचाफा माझ्याही घरी येईल. तूर्तास तरी याचे दर्शन दुर्मिळ झालंय मला. विरहाने प्रेम वाढते म्हणतात ना? तसेच काहीसे घडेल सोनचाफ्याबाबत आता !




बकुळ.... पूर्वी शनिवारवाड्यात आणि संभाजी उद्यानात बकुळीची अनेक झाडे होती. लहानपणी पुण्यात सुट्टीत सकाळी शनिवारवाड्यापर्यंत जायचे आणि खूप सारी फुले गोळा करून त्याचे सर करायचे हा उद्योग असे. नाजूक पण देखणे पण थोडा उग्र गंध असणारे हे फुल. कागडा , मोगरा याप्रमाणे बकुळीचेही गजरे त्याकाळी विकत मिळत. आजकाल स्त्रियांनी गजरे केसात माळणे हेच लग्नकार्यापुरते मर्यादित होऊन बसले... आपल्या प्रियेसाठी गजरा आणणारा हा कथा कादंबऱ्या नाहीतरी सिनेमातूनच दिसू लागला.
मधली अनेक वर्ष हा बकुळ जणू विस्मृतीचा भाग झाला होता. एका अनवट वाटेवर अचानक त्याच्याशी भेट झाली आणि जणू तो बकुळीच्या फुलांचा सडा माझ्या मनाच्या अंगणात पडला ...  त्या बकुळीच्या सड्याने मला जन्मभराचा सुखाचा ठेवा बहाल केला.


अजून एक कणाकणातून फुललेला वृक्ष जो बेंगलोर मध्ये भेटला होता. गुलाबी रंगाची एक सुंदरशी फुलांची छटा. टिश्यू पेपर प्रमाणे पोत असलेले, वॅनिलाच्या जवळ जाणारा गंध होता त्याचा. नोव्हेंबर महिन्यात जागोजागी ही झाडे बहरली होती. इतका देखणं रूपडे होते त्याचे की पुढे अनेक महिने मी त्यास फेसबुकवर मिरवले होते. आजही माझ्या लॅपटॉपवर तोच आहे. अतिशय देखणी व्यक्ती दिसावी पण ओळखच होऊ नये आणि मधूनच कधीतरी ती आठवण वर यावी अशी काहीशी ही गोष्ट!

                                         असा सुगंध, असे तुझे फुलणे...वेड लागेल नाहीतर काय.......

तशी काही झाडे नित्याने तुमच्या आसपास सभोवती आढळतात... केळी, नारळ, लिंबू, जास्वंद अबोली गुलाब, प्राजक्त, कुंद, तुळस .... पण ती मोह घालत नाहीत मला, कुठूनतरी मला साद घालत नाहीत. त्याचे सभोवती  नसणे याचा मला फारसा फरक पडत नाही, असली दिसली तर छान वाटते हे खरे.  पण ही काही झाडे जिथेजिथे मी असते तिथे तिथे असतातच, दिसली नाहीत तर मी त्यांचा शोध घेते तेंव्हा कुठे शांत होते. ही झाडे माझ्या सोबत असतातच, माझे सखे सोबती आहेत हे सारे !




Friday, February 3, 2017

तुझे माझे सहजीवन ......

तुझे माझे सहजीवन म्हणजे

दोघांनी मांडलेली भातूकली

थोडा खेळ, थोडे भांडण

तरीही तुझ्या माझ्याशिवाय न रंगणारी

तुझे माझे सहजीवन म्हणजे

विणायला घेतलेली पैठणी जरतारी

वीण जमून आलेली सुबक नक्षी

तुझे माझे अंतरीचे धागे घेऊन विणलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे

दारातली सुबक रांगोळी

संगती जुळून आलेली

तुझे माझे रंग घेऊन रेखाटलेली

तुझे माझे सहजीवन म्हणजे

अखंड सुरेल मैफल

सदैव बहारदार रंगलेली

तुझ्या माझ्या सुरांनी सजलेली

Thursday, February 2, 2017

सृजनाचे अविष्कार ज्याच्या मनात साकारतात
त्याने का वसंताकडे नवा उन्मेष, नवे चैतन्य मागावे?
भावना ज्याचे शब्द लाभावे अशी इच्छा करतात
त्याने का भावनांच्या ओलाव्यासाठी तृषार्त राहावे ?
चंदनासारखे दरवळतो त्याने
का सरपणात स्वत:ची अखेर पहावी?

माणसांचा असतो तसा ब्लॉग चा ही वाढदिवस असतो  :)
रवि .... तुझा ब्लॉग तीन वर्षाचा होताना मला सुचले ते हे 
https://ravikantjoshi.blogspot.in/

Thursday, January 26, 2017

नात्याचे बंध

पहाता पहाता दिस सरले
अवसेच्या रातीस चांदणे फुलले
चांदणे फुलले सखयाच्या आकाशी
त्याचा प्रकाश पडे माझ्या अंगणी
पहाता पहाता रोप बहरले
कोरड्या मातीतून बीज अंकुरले
बीज अंकुरले सखयाच्या दारी
त्याच्या सावलीत मी विसावले
पहाता पहाता चित्र साकारले
नात्यांचे रंग घेऊनी जे जन्मा आले
रंगाचा कुंचला सखयाच्या हाती
त्याच्या रंगी मी कशी रंगुनी गेले
पहाता पहाता मैफल सजली
अनवट सूर कसे कोणी छेडले
सुर उमटती सखयाच्या गळ्यातूनी
त्याच्या सुरावटींनी  कसे मला नादावले
पहाता पहाता वर्ष झाले
तू माझा अन तुझी मी झाले
नात्याचे सखया बंध हे  रेशमी
साता जन्मांचे जणू धागे जुळले

Wednesday, January 25, 2017

मुखवटा ......

अनेकदा तू समोर असताना तुझा मुखवटा जाणवत राहतो मला सतत. अनेक गुणांनीयुक्त असा तो मुखवटा. आनंदी, समाधानी, राग लोभापल्याड गेलेला असा स्थितप्रज्ञ, प्रेमळ. तुझे तुला तरी कळले असेल  का कि केंव्हा, कसा चढला  मुखवटा? अनेक कविता लिहिल्यास मुखवटे आणि  चेहऱ्यांवर. तेंव्हा जाणिव होती का तुझ्या अशा मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्यावर कोणी लिहिल… बोलेल ?
असा विचार येतो या मुखवट्याच्या आत एक माणूस असेल राग लोभ, चिंता द्वेष , प्रेम या सर्वसामान्य माणसांच्या भावना असलेला. हळूहळू परिस्थितीने हा मुखवटा त्यास बहाल केला असेल. फार गोंडस आहे तो यात शंकाच नाही. रोज सकाळी उठून चढवावा लागत असेल तो. अधून मधून आतल्या माणसाच्या भावना अक्राळ विक्राळ होत असतील, बाहेर पडू पहात असतील, मुखवटा फेकून देत असतील. तू मात्र पुन्हा पुन्हा तो धारण करत असशील. मग कालपरत्त्वे तो मुखवटा तुझ्या चेहेरयाचाच भाग होऊन गेला असेल. मुखवटा आता असा घट्ट चिकटून गेला असेल मूळ चेहऱ्याला . मुखवट्याचे रंग पुरते लागले असतील त्या चेहऱ्याला.  आता आतल्या माणसाचा खरा चेहरा अनेकानेक वर्षात कोणी पाहिलेला नाही, कदाचित कधीच कोणी पाहणार नाही.
अनेकदा तू जेंव्हा मला तू चिडत नाहीस, रागवत नाहीस असे सांगतोस, तेंव्हा तुझा तो मुखवटा मला वाकुल्या दाखवत हसतो माझ्यावर. म्हणतो बघ, नाही न पोहचू दिले तुला खऱ्या चेहऱ्यापर्यंत. उगीच कल्पना आहे तुझी तू त्याची सर्वात जवळची असण्याची. माझीही चिडचिड होते अशावेळी.
माझ्यापुढे अजून एक गहन प्रश्न उभा रहातो तो म्हणजे …. ह्या मुखवट्यास मुखवटा न मानता हाच एक देव माणसाचा चेहरा आहे हे मी का समजून घेत नाही. मग अशा देव माणसाला, त्याचे देवत्त्व सोडण्याचा खटाटोप मी का करावा? देव भेटल्यावर त्याला माणूस बनविण्याचा करंटेपणा मी का करावा?
हा असा करंटेपणा ठरेल कि तुला मुखवटा उतरवायला मदत करून मोकळा श्वास घेऊ देणे हे माझे कर्तव्य ठरेल?

सत्य.... असत्य......

असत्याची अनेक रूपे
सत्य चहूकडून एकच
तरीही सांगेन खरे बोल...
असत्याची अनेक बाळे
सत्यास वांझपणाचा शाप
तरीही सांगेन खरे बोल....
असत्याचे अनेक साथीदार
सत्याचा ना कोणी जोडीदार
तरीही सांगेन खरे बोल.....
असत्य सोपे स्वस्त
सत्य अवघड आणि महाग
तरीही सांगेन खरे बोल.....
असत्याचा डोक्याला ताप
सत्याचा एक वेगळा आब
म्हणूनच सांगेन खरे बोल......

असंच काहीसं......

अभिमन्यूने चक्रव्युहात शिरत जावे तसे आपण एकेका नात्यात अडकत जातो. नात्याच्या अस्तित्त्वाबद्दल, त्यातल्या व्यक्तीबद्दल कधीच कोणता किंतु मनात नसतो, कोणतीच शंका नसते. एखादा क्षण अपघाती असतो मात्र. ज्याने  क्षणात मनात काही चमकून जाते. नात्याच्या आपल्याच मनातल्या संकल्पनेबद्दल, त्याच्या आकृतीबंधाबद्दल खात्री वाटेनाशी होते. मग सगळ्याच गोष्टी मुळातून तपासून बघायला हव्यात का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा का हा तपासणीवाला चष्मा डोळ्यावर चढवला कि मग प्रवास तसाच सुरु होतो. म्हणजे नात्याची अखेर तरी किंवा त्याचे कोमात जाणे तरी. बर अनेकदा हे इतके एकतर्फी असते की मनातल्या वादळाची दुसऱ्या व्यक्तीला चाहूलच नसते. त्या व्यक्तीच्या दृष्टीने तर हि सडन डेथ या प्रकारात मोडते.
नात्यांत अशा रितीने गुंतलेल्या व्यक्तींच्या दृष्टीने समोरच्यास सारे समजत असतेच. तरीही तो किंवा ती अशी वागली हे इतका मनात कोलाहल माजवण्यास पुरेसे ठरते. पुढे मागे कधी शांतपणे चर्चा झालीच तर उमगते, एका एवढी गुंतवणूक दुसऱ्याची नव्हतीच मुळी, पण याचा अर्थ त्याला किंवा तिला हे नातेच नको होते असेही नव्हते, पण दुसऱ्याइतका खोल खोल विचार नव्हता केला हे खरे. असा सतत विचार न करून किंवा इतके गुंतवून न घेतल्याने असे उलटे पुल्टे विचार केले नव्हते हे हि खरेच. पण जे घडले ते का नि कसे ते कळलेच नाही तर सुधारणार तरी कसे असे वाटून, आपणच कुठेतरी कमी पडतो असा विचार करून परिस्थिती मान्य केलेली असते.
एकदा बोललो असतो तर, किंवा हे सारे मुळातच आपण नीट समजून घेतले असते तर ... हा प्रश्न उमटतो पण उशीर तर झालेलाच असतो ना?

Thursday, January 12, 2017

तुझ्या आठवणीत......

अनेकदा अनुभवते मी हे. ज्या व्यक्तीला आपण पहिले नाही, भेटलो नाही, रूढ अर्थाने तिच्याशी आपले काही नाते नाही. कोणाकडून थोडीफार  ऐकीव माहिती आपल्याकडे आहे. बाकी काही नाही. आणि असे असूनही एक नाते आपल्यात जाणवत राहते. आठवण येत राहते, विचार करत राहतो आपण.

तुझ्याशी माझे नाते असेच काहीसे आहे गं. अडीच वर्षांपूर्वी तुझी अशी ओळख झाली. अनेकदा बोलण्यात  तुझा संदर्भ येत गेला  पण त्याहून अधिक माझ्या मनात तू राहिलीस. तुला या जगाचा निरोप घेऊन जवळपास चार पाच वर्षे झाली आहेत. म्हणजे आपली प्रत्यक्ष कधी भेट शक्यच नव्हती. पण तू माझ्या मनातून जात नाहीस. सुरुवातीस मला थोडी भिती वाटायची तुलना तर होणार नाही ना अशी. अनेकदा असेही वाटले आहे, खरेतर जर तू असतीस तर मी हि अशी नसते ना. माझे आयुष्य वेगळे असते. मी वेगळी असते ना!  अनेकदा वाटतं, लॅपटॉप किंवा मोबाईल वर टिपतो तसा ना मनाचा स्क्रीनशॉट घ्यायची सोय हवी होती ना. तुला खरे सांगते कितीतरी वेळा मी असा विचार करत राहते.... या परिस्थितीत हिच्या मनात काय चालले असेल? त्या वेळी काय भाव मनात उमटले असतील? मला ना हे सारे फार प्रकर्षाने समजून घेण्याची इच्छा होती गं. पण नसतात ना काही गोष्टी आपल्या हातात.

हळूहळू  तुलना होण्याची भीती मला वाटेनाशी झाली. म्हणजे मी स्वतः ला मोठे ठरवून नव्हे. तर तू तू होतीस .... मी मी आहे हे नीट समजून घेऊन. मग ना तू थोडी मला आपलीशी वाटू लागलीस. आपल्यातल्या दुव्याला बाजूला ठेऊन मी तुझा विचार करू लागले. तुझ्यावरच्या कविता आवडल्या होत्या गं.  त्यासाठी मला कधी तुझा राग आला नाही, ना  कधी तुझ्याशी स्पर्धा वाटली.  विश्वास ठेव फक्त कदाचित नेमका भाव मी नाही पोचवू शकले. किंवा तो कोणाला जाणून घेण्यातही काही रस नव्हता. तुझा वाढदिवस, स्मृतिदिन आपोआप लक्षात राहू लागला इतका मी तुझा विचार करत असे. दोन वर्षांपूर्वी दिवाळीत वाटलं होतं, जिथे कुठे असशील तिथे खुश असशील का? तुझ्यासारखीच कोणीतरी आहे हे पाहून? इथे जिवंत माणसांच्या मनाचा थांग लागत नाही .... आणि मी निघाले होते या जगात नसलेल्या व्यक्तीला काय वाटत असेल ते बघायला. पण खरंच मला ते जाणून घ्यायचे  होते. जेमतेम अंधुकशी आठवतेस मला तुझ्या पाहिलेल्या फोटोंमधून आणि ऐकलेल्या वर्णनातून. तुझ्या वाढदिवशी आजही तुझे सुहृद जे तुझ्या तुझ्या वॉल वर लिहितात त्यातून  तू हळवी असावीस.... मृदुभाषी असावीस अशी माझी कल्पना आणि म्हणूनच सारे कसे निभावलेस हे कुतूहल देखील.

निव्वळ वेडी हे विशेषण लागू पडेल मला. पण खरंच मी वेडी आहे आणि अशीच राहीन. मला ना तुला समजून घ्यायचं होतं, तुझी स्वप्नं जाणून घ्यायची होती, माझ्या स्वप्नांशी त्यांची सांगड घालून ती पुरी करायची होती .... तुझी भाषा येत नव्हती मला .... पण तू लिहिलेले कधीतरी समजून घ्यायचे होते. अनेक क्षण  दोघींच्या आयुष्यात सारखेच आले असतील .... तुझे तेंव्हाचे भाव समजून घ्यायचे होते. एक स्त्री म्हणून मला तुला समजून घ्यायचे होते. होकाराचा क्षण, समर्पणाचा क्षण, नात्यांचा गुंता कसा सोडवावा हा  प्रश्न, प्रतारणा होते आहे का हा संदेह, मुलांमध्ये गुंतलेला जीव, त्याच्यात गुंतलेला जीव. त्याला सर्वस्व मानून आयुष्याचे समीकरण मांडावे की नाही हा प्रश्न. मला ठाऊक आहे असे अनेक प्रश्नांचे गुंते तुझ्यासमोर वेळोवेळी निर्माण झाले असतील. एक  अधिक एक प्रत्येक वेळी दोन होत नाहीत हे समजून घेताना, मनातल्या भावनांच्या चौकटी हलताना.
तुला एक सांगू तू खूप शहाणी  होतीस की तुला सर्व मर्यादा निश्चित करून त्या चौकटीत जगता आले. विश्वास ठेव माझ्यावर आणि तू खूप नशीबवान आहेस की मृत्यूने तुझी सुटका केली. विपरीत परिस्थितीला कशी सामोरी गेली असतीस जर काळाने या नको त्या टप्प्यावर आणून उभे केले असते तर? प्रेमासाठी जग उध्वस्त व्हायची वेळ आली असती तर काय केले असतेस?  मृत्यूशी झुंजताना नक्की काय मनात येत होते? नको असलेल्या जोडीदाराकडून सेवा करून घ्यावी लागली असेल तेंव्हा काय वाटले असेल तुला? त्या  दोघांना तुझ्या समोर पाहून काय वाटले होते? नशीबवान याही करिता कि तू गेल्यानंतरही तुझ्या मृत्युसमयीचे भाव त्याच्या मनात कायम आहेत अगदी आजही, तुझी त्याच्या मनातली प्रतिमा आजही तशीच आहे जशी आधी होती तशी. काळाने, परिस्थितीने त्यावर घाव घातले नाहीत.  परिस्थिती आणि तत्त्व  यांच्यात तुझी ससेहोलपट झाली नाही,  तुझ्याही मनातल्या त्याच्या प्रतिमेस तडा गेला नाही म्हणून तू नशीबवान आहेस. मृत्यूने अलग केले, या जगाने नाही म्हणून नशिबवान आहेस, तुझे नाव त्याच्याशी जोडलेले राहील म्हणून तू नशिबवान आहेस. समाजाने तुमच्या नात्यावर शिंतोडे उडवले नाहीत म्हणून तू नशीबवान आहेस, तशी वेळ आल्यावर नाते कोणत्याही कसोटीवर लावावे लागले नाही म्हणून तू नशीबवान आहेस. ह्या साऱ्यांसाठी मला छान वाटते, की कोणाच्या तरी नशिबी हे तरी सुख होते. विश्वास ठेव मला तुझा राग येत नाही, तुझा हेवा कधी वाटत नाही.

तुझ्या मनातले प्रत्यक्ष भाव नाही समजणार मला कधी  आणि तरीही मला आठवत राहशील तू कायमच. आत्ता जशी आठवतेस तशीच. कारणाशिवाय, कोणत्याही जोडणाऱ्या दुव्याशिवाय. मला ना लहानपणी असे वाटायचे माणूस देवाकडे जातो म्हणजे आकाशातला तारा होतो. असाच एखादा तारा होऊन सध्या आकाशात असशील तू. असेच नकळत माझे आकाशाकडे लक्ष जाईल आणि तुझी आठवण येईल. तू आपली वाटशील अगदी आत्ता वाटतेस तशीच!