अभिमन्यूने चक्रव्युहात शिरत जावे तसे आपण एकेका नात्यात अडकत
जातो. नात्याच्या अस्तित्त्वाबद्दल, त्यातल्या व्यक्तीबद्दल कधीच कोणता
किंतु मनात नसतो, कोणतीच शंका नसते. एखादा क्षण अपघाती असतो मात्र. ज्याने
क्षणात मनात काही चमकून जाते. नात्याच्या आपल्याच मनातल्या संकल्पनेबद्दल,
त्याच्या आकृतीबंधाबद्दल खात्री वाटेनाशी होते. मग सगळ्याच गोष्टी मुळातून
तपासून बघायला हव्यात का हा प्रश्न निर्माण होतो. एकदा का हा तपासणीवाला
चष्मा डोळ्यावर चढवला कि मग प्रवास तसाच सुरु होतो. म्हणजे नात्याची अखेर
तरी किंवा त्याचे कोमात जाणे तरी. बर अनेकदा हे इतके एकतर्फी असते की
मनातल्या वादळाची दुसऱ्या व्यक्तीला चाहूलच नसते. त्या व्यक्तीच्या
दृष्टीने तर हि सडन डेथ या प्रकारात मोडते.
नात्यांत अशा
रितीने गुंतलेल्या व्यक्तींच्या दृष्टीने समोरच्यास सारे समजत असतेच. तरीही
तो किंवा ती अशी वागली हे इतका मनात कोलाहल माजवण्यास पुरेसे ठरते. पुढे
मागे कधी शांतपणे चर्चा झालीच तर उमगते, एका एवढी गुंतवणूक दुसऱ्याची
नव्हतीच मुळी, पण याचा अर्थ त्याला किंवा तिला हे नातेच नको होते असेही
नव्हते, पण दुसऱ्याइतका खोल खोल विचार नव्हता केला हे खरे. असा सतत विचार न
करून किंवा इतके गुंतवून न घेतल्याने असे उलटे पुल्टे विचार केले नव्हते
हे हि खरेच. पण जे घडले ते का नि कसे ते कळलेच नाही तर सुधारणार तरी कसे
असे वाटून, आपणच कुठेतरी कमी पडतो असा विचार करून परिस्थिती मान्य केलेली
असते.
No comments:
Post a Comment
हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!