Tuesday, April 29, 2014

भातुकलीच्या खेळामधली ............................

गेट उघडून काव्या आत शिरली. सभोती फुललेल्या बागेकडे तिने नजर टाकली ती थोड्या आश्चर्यानेच  अन घराच्या दरवाज्यासमोर उभी राहिली. बेल वाजताच आतून "आलो आलो " हा आवाज ऐकला  मग  क्षणातच काकांनी दरवाजा उघडला.

"ये काव्या, कधी आलीस दुबईहून? किती दिवस आहेस आता इथे? आणि आज इकडे कशी?"
"काका, आठवडा झाला इथे येऊन, मधेच दोन दिवस तुषार कामासाठी मुंबईला गेलाय तर माझ्याकडे थोडा वेळ आहे. म्हणून आईला म्हटलं की आज पलीकडच्या बँकेत थोडे काम आहेच, म्हणून थोडा जास्तीचा वेळ काढून तुम्हाला भेटून येते, कसे आहात तुम्ही?"
"मी कसा असणार आता? वेळ घालवतो काही कामात, काही तुझ्या मावशीच्या आठवणीत. बस तू, काय घेशील, पन्हं की लिंबू सरबत? उन्हाची आलीयेस."
"काका पन्हं ? तुमच्या घरात? म्हणजे तसं नव्हे पण आता मेघना मावशी नाहीये तर?
"अगं, मीच बनवून ठेवलंय"
"तुम्ही? विश्वासच नाही बसत काका. मला अजूनही तेच लहानपणी पाहिलेले काका आठवतात सारा वेळ ऑफिसच्या कामात बुडवून घेतलेले, अगदी चहा सुद्धा स्वत:चा स्वत: न करणारे"
"खरंय तुझं काव्या तुमच्या लहानपणी होतोच  मी तसा, लहानपणीच कशाला अगदी आता आत्तापर्यंत तसाच होतो मी, पण बदललो, मेघना, तिने बदल घडवून आणला हा अगदी गेल्या पाच सहा वर्षात"

काव्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपून राहत नाही. आज इतक्या वर्षानी काकांचे हे बदललेले रूप, ते ही मेघना मावशी गेल्यावर!

"आहे ना वेळ, बस निवांत इथे, हे समोर पेपर आहेत, नाहीतर टी व्ही लावू का, ऊन फार वाढलंय, मी आपल्या दोघांसाठी कैरीचे पन्हे घेऊन येतो"

काका आत जायला वळतात, काव्या थोडी निवांत होत सोफ्यात मागे सरकते. क्षणात अनेक वर्षाचे चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळून जाते. मेघना मावशी तिच्या आईची मैत्रीण अगदी हानपणीपासूनची. एकाच शाळेत, एकाच महाविद्यालयात आणि लग्नानंतर एकाच गावात. जिथे तिथे दोघी सोबत अगदी वर्षांपूर्वी मेघना मावशी जाईपर्यंत.
काव्याने या घरात काकांना नेहमी पाहिलेय ते कामात बुडून गेलेले, आणि बाकी वेळ मित्रांसोबत. घराला घरपण होतं ते फक्त मेघना मावशीमूळेच. रोहित आणि वीणा ही दोन मुले आणि मावशी यांचे एक वेगळेच जग होते. काका त्यात जराही कुठे नसत. काकांचा संबंध फक्त कदाचित पैसे कमावणे आणि घर, गाडी इतर गुंतवणूक या बद्दलचे निर्णय घेणे इतकाच, काव्याने त्यांना घरात सगळ्यांशी हसत खेळत गप्पा मारताना कधी पहिलेच नव्हते. मुलांची शिक्षणे, त्यांची आजारपणे, नातेवाईक, लग्न कार्य या साऱ्या साऱ्या मावशीने सांभाळलेल्या गोष्टी. 

तिची आई मावशीला नेहमी म्हणे, "मेघना असे कसे चालते तुला? काहीच कसं सतीशराव लक्ष घालत नाहीत घरात, मुलांत, हे सारे काय तुझ्या एकटीचे आहे का? कधीतरी तू बोलायला हवेस ना"
अशा वेळी मेघना मावशी नुसतीच हसून, "अगं, चालायचंच नसते एकेकाला आवड" असे म्हणत तो विषय संपवत असे. 

पण तिने अक्षरश: एकटीने नुसते मुलांनाच नाही तर अनेक गोष्टीना जपले. नाती जपली, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप जपला. रोहित आणि वीणा यांना अनेक गोष्टींची गोडी लावली, त्यांचा सर्वार्थाने विकास घडवण्यात तीच तर झिजली. ते दोघे शिकले, पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेले, यथावकाश अनुरूप जोडीदार मिळून त्यांची लग्नेही झाली. त्याच सुमारास काव्याही लग्न करून दुबईला गेली आणि तिथलीच झाली. मावशी कॅन्सरने गेल्यावरही तिला येता आलेच नव्हते. फोनवरच ती रोहित आणि वीणाशी बोलली होती. 

काव्या अशी आठवणीत गढून गेली असताच काका ट्रे मध्ये दोन ग्लास पन्ह्याचे घेवून आले. 

त्यातला एक तिच्या हाती देत म्हणाले, " काव्या तुला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे ग, मला असे घरात काही काम करताना पाहून, आणि ते ही तुझी मावशी नसताना"

"हो काका, कारण तुम्हाला फारसे कधी आम्ही घरीच पाहिलेले नाही, घरातली काही कामे तुम्हाला करताना पाहणे मी कधी कल्पनेत पण नव्हता विचार केला" 

"खरं सांगू  …… मला घर संसार, नातेवाईक या  गोष्टींची मुळात कधी आवड नव्हतीच, त्यातून त्याकाळी आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावे लागले याचा राग होताच. त्या काळी बायका शिकत पण नोकरी वगैरे फारशा नसत करत. पण ना मला वाटे बायको नोकरी करणारी असावी, पण मेघनाची कधी नोकरी वगैरे करण्याची कधी इच्छाच नव्हती. एकंदरीतच माझ्यासाठी हे एक लादलेले लग्न होते. मग मी त्या रागापोटी घराकडे कधी लक्षच दिले नाही. ऑफिसमधल्या परीक्षा देत पुढे जात राहिलो, उरला सुरला वेळ मित्र मंडळ होतेच, सिंहगड, पर्वती किंवा बुद्धिबळाचे डाव मांडून बसायला. जेवा, झोपायला फक्त घरी असाच त्याकाळी माझा दिनक्रम होता. मेघनाने हळूहळू घराचा ताबा घेतलाच होता, यथावकाश मुले झाली, त्यांच्या मोठं होण्यातही माझा विशेष काही वाटा नव्हताच. तिने कधी या गोष्टीची तक्रार केली नाही, एकटीवर सारे पडते म्हणत कधी त्रागा नाही केला ना कधी आमचे भांडण झाले. संवादच नसेल तर विसंवाद तरी कुठून येणार होता म्हणा.  मेघनाने घर छान ठेवले, मुलांना शिकवले, संस्कार दिले त्यांना, नातेवाईक जपले. पुढे रोहित, वीणा शिकायला परदेशी गेले तेंव्हा कुठे पहिल्यांदा मला जाणवले हे सारे मेघनाचे कर्तुत्त्व आहे, त्या दोघांच्या मोठे होण्यात आपला पैसे देण्याखेरीज काही वाटा नाही. दोघांनीही तिथेच शिकत असताना आपापले जोडीदार निवडले ते ही असेच उच्चशिक्षित, सालस. मेघनाचा गाढ विश्वास होता तिच्या संस्कारांवर. तिचा पाठिंबा होताच, सारे कसे छान सुरळीत चालू होते. पण मी त्यात कुठेच नव्हतो."

"पण मी रिटायर झालो, आणि काही काळ तरी दिवसभराचा मला घरात घालवावा लागू लागला. म्हणजे तसे पर्वती, सिंहगड, बुद्धिबळाचा अड्डा हे होते पण तरीही.  नकळत का होईना मेघना दिवसभर घरासाठी काय काय करते ते लक्षात येऊ लागले. मी साठीत पोहोचलो म्हणजे ती ही पंचावन्न ची होतीच की. सकाळी उठून योगासने, चहा नाश्ता, मग पेपर वाचन, थोडे बागकाम, देवपूजा, रांगोळी मग स्वैपाक, इतर आवाराआवर, मग दुपारी अंध शाळेत ती जात असे, तिथे लहान मुलांना गोष्टी सांग, लहान सहान गोष्टी करायला शिकवायला, तिथून परत आली की मग संध्याकाळचे चहापाणी मग एखादी मैत्रीणींबरोबर चक्कर, घरी येवून पुन्हा स्वैपाक, रात्री टी. व्ही पाहून झोप. पण या तिच्या दिनक्रमात मी स्वत:ला कुठे आणि कसे बसवावे हेच मला कळत नसे. जो काही संवाद आमच्यात होता तो फारच कामापुरता असे."

"तेव्हाच नेमका मी एकदा सकाळी पर्वतीहून येत असताना स्कूटरला एका गाडीने ठोकले आणि पाय फ़्रक्चर होऊन सलग चार महिने घरी बसून राहायची माझ्यावर वेळ आली.तेंव्हा माझे करणे हे अजून एक वाढीव काम तिच्यासाठी होऊन बसले. हे सारे करत असताना काय त्रास आहे हि तिची भावना कधीच नव्हती. तिच्यावर सारा भार पडत होता हे नक्की. मुलांचा फोन येत असे, माझ्यापाशीच कॉर्डलेस ठेवलेला असे पण तो उचलताच तिकडून "बाबा कसे आहात, पाय बारा आहे का आता असे विचारून लगेचच "जरा आईला फोन देता?" असे विचारत, तिच्याकडे फोन गेल्यावर मात्र पुढचा कित्येक वेळ त्यांच्या गप्पा चालत. कुठेतरी दुखावला जात असे मी. पण त्या काळात झाले असे की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुले यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो.  हळू हळू लक्षात येवू लागले की घर उत्तम रितीने सांभाळत तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. ज्यात तिचे पुस्तक भिशीचे ग्रुप्स आहेत, अंध मुलांची शाळा आहे. मी पुरता नास्तिक - कळता झाल्यापासून कधी मी देवाला हात जोडले नव्हते, पण मेघनामुळे घरात देव होते, त्यांची रोज पूजा होत असे, घराच्या बागेतली फुले त्यांच्यासाठी असत, दारात आमच्या रांगोळी असे, सांजवात कधी चुकत नसे. दिवसेंदिवस मला तिच्या या सगळ्या गोष्टी इतक्या जीव लावून करणाऱ्या स्वभावाचेच कौतुक वाटू लागले, आणि कुठेतरी खंत देखील, की हे विश्व आपले होते आणि आपण आपल्या हेकटपणाने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो."

"पण याच जाणीवेने आमच्या दोघातला संवाद कुठेतरी पुन्हा जुळून येऊ लागला. मेघनानेही हा माझ्यातला बदल लक्षात घेत मनापासून साथ दिली आणि साठीला पोहोचता आमचे खऱ्या अर्थाने सहजीवन सुरु झाले. मेघना सोबतचे दिवस खरंच माझ्या आयुष्यातला एक अमुल्य ठेवा  आहे, ज्याने मला खूप समृद्ध केले. सकाळी पहिला चहा बनव, बागकाम कर, देव पूजेसाठी फुले ठेव, घराबाहेर पडताना आवर्जून बाहेरून काही आणायचे आहे का ते विचारून घेऊन ये, दर रविवारी आठवड्याची भाजी आण अशी अनेक छोटी छोटी कामे करण्यात मी रस घेऊ लागलो. तिच्यासाठी महत्त्व मी ती कामे करण्याचे नव्हतेच तर एकमेकांसोबत, एकमेकांसाठी ही कामे करण्याचे होते."

"अर्थात हे फार काळ नशिबी नव्हतेच, कारण त्यानंतर जेमतेम ३ वर्षांनी तुझ्या मावशीला कॅन्सर झाला. जिने इतक्या कष्टाने हे घर, ही माणसे घडवली तिच्या अखेरच्या काळात तिला थोडेतरी आनंदाचे क्षण वाट्यास आले आणि ते मी देऊ शकलो हेच फार झाले." 

"आज ती नाहीये पण ती करत असलेली प्रत्येक गोष्ट तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तिच्या इतक्या चांगल्या नसतील जमत मला पण तरीही…. जसे तिने ठेवले होते तसे घर, जी जी कामे ती या घरासाठी तन्मयतेने करे ते प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करतो, आता कळले मावशी नसतानाही घरी बनवलेले कैरीचे पन्हे तुला इथे कसे मिळाले ते ?" 

"काका मी समजू शकते आता तुम्हाला नक्की काय वाटते ते. आता सोडून द्या पूर्वी काय घडले ते कटू विचार. तिच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे तुमच्या साथीने आनंदात गेली हाच आनंद तिच्यासाठी खूप असणार. मी निघू आता? काळजी घ्या"

असं म्हणून काव्या पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडली खरी, पण बाहेर पूर्वीसारखीच फुललेली  टवटवीत बाग पाहताच चेहऱ्यावर पसरलेले एक हसू घेऊनच. 

Monday, April 28, 2014

कोणा कशी कळावी?…वेडात काय गोडी …

ऑफिसचा पहिला दिवस… म्हणजे  induction day. त्या दिवशी भेटलेली सगळीच माणसे काही लक्षात रहात नाहीत. तर त्या दिवशी एक खूप सुंदर मुलगी नवीन आलेल्यांच्या ग्रुपमध्ये असते. त्यामुळेच कदाचित लक्षातही राहते. थोडे दिवस जातात हळू हळू सगळ्या गोष्टी सेट होत जातात या नवीन ऑफिसमध्ये देखील. टीम सोबत चहा, जेवण एकत्र होऊ लागते. बऱ्याचदा फूड कोर्ट मध्ये ती पण दिसू लागते. तिच्यासोबत तिची टीम कधीच दिसत नाही. ती आणि तिचा एक कलीग…. म्हणजे हे ही माहित नाही की ते दोघे एका टीम मध्ये आहेत आहेत की नाहीत, कदाचित तो तिचा manager पण असू शकतो. फक्त तिला पहातीये त्या दिवसापासून एक मात्र नक्की की तो तिचा नवरा नाहीये. 

पण जेंव्हा जेंव्हा ती दिसते तेंव्हा तेंव्हा ते दोघं बरोबरच असतात. ती दिसायला खूपच सुंदर, वय असेल २४/२५ च्या आसपास, उंच आणि छान चाफेकळी नाकेली. तो पण उंच, गोरा, पूर्वी छान दिसत असेल कदाचित पण आता डोक्यावरचे छप्पर उडून चाललेले, थोडे पोट सुटलेले असा, वय असेल ३६/ ३८ असे काही. गेल्या अडीच वर्षात मीच काय इतर कोणीही एकदाही त्या दोघांना ऑफिसमध्ये एकटे पाहिलेले नसेल किंवा दुसऱ्या कोणाबरोबरही. मग माझ्यासारख्या काही लोकांना सतत प्रश्न पडतात जसे की या जोडीतला एकजण ऑफिसला येणार नसेल तर दुसराही येतच नाही का? एकाला बरं वाटत नसेल म्हणून किंवा खूप काम आहे, किंवा महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून जेवायला किंवा चहाला एकजण जाणार नसेल तर दुसराही उपाशीच राहतो का? हे दोघे जर एखाद्या मोठ्या टीमचा हिस्सा असतील तर बाकीचे लोक यांना बळेच कधी त्यांच्या बरोबर येण्याचा आग्रह कधी करतच नसतील का? असे एक ना अनेक!

न जाणे कसे पण आज इतक्या दिवसानंतरही आमच्या जेवायच्या, चहाच्या वेळा साधारण सारख्याच असतात. त्यामुळे आसपासच्याच टेबलवर ही जोडी दिसणे हे ओघानेच. त्यांचे हे असे एकत्र असणे गेली दोन अडीच वर्ष पाहताना, त्यांच्या नात्यात झालेला बदलही सहज टिपण्याजोगाच. नवीन ओळख असतानाचा अवघडलेपणा केंव्हाच निघून गेलाय. एका छानशा comfort zone मध्ये असलेले ते दोघं आता अजूनच छान वाटू लागतात.   आजकाल मात्र त्यांच्याकडे पहिले की  एकमेकांत गुंतलेले दोन जीव असावेत तसे ते दोघे दिसतात. एक एक कप कॉफी घेऊन तास अन तास गप्पा मारत बसलेले. एकमेकांची साथ मनापासून आवडते ते त्यांच्या चेहेऱ्यावर वाचताही येते, त्यांची देहबोली पण तशीच प्रकटते. म्हणजे ऑफिसमध्ये वागू नये असं काहीही ते वागत नाहीत पण तरीही! सुरुवातीला त्या दोघांकडे पाहताना त्यांच्या वयातला जाणवणारा फरक मला फारच खुपायचा (???? खुपायचा ????? काय संबंध???????? उगाच काहीपण :)) मधल्या काळात हिचं लग्न झालं असेल का नाही, त्याचं? जर असं असेल तर मग त्या नात्याचं काय, किंवा दोघे live- इन मधे असतील …. खरतर काहीही असू शकेल.  असे सगळे विचार येतानाच शेवटी मी स्वत:लाच एकदा बजावलं, " ते दोघे एकमेकांचा करत नसतील एवढा विचार तू त्या दोघांचा करतीयेस…. stop here". पण तसं घडत नाही. हा खरंच त्यांच्यातला बदल आहे की माझ्या नजरेतला ते ही माहित नाही. पण तरीही त्यांचे असे हे सोबत असणे, पाहताना तरी काहीसे सुखावणारे आहे. 

मुळात प्रत्येक नात्याला समाजाच्या रूढ नात्यांच्या चौकटीतच बसवलं जायला हवं का की काळानुरूप समाजानेच आपल्या नात्यांच्या चौकटी विस्तारायला हव्यात? बदलत्या काळानुसार माणसांच्या, त्यांच्या विस्तारणाऱ्या क्षितीजांसह बदलणाऱ्या मैत्री च्या, जोडीदाराच्या संकल्पना समाजाने पण त्याच्या चौकटीत सामावून घ्यायला हव्यात ना?

Tuesday, April 22, 2014

रंगूनी रंगात सारया रंग माझा ......……

कितीतरी दिवसांनी आजकाल  थोडा निवांत वेळ असतो माझ्याकडे! अर्थात हे फार काळ टिकणार नाहीच म्हणा. निवांत वेळ आहे या  कल्पनेनेच कसेनुसे वाटू  लागेल आणि कशातरी मी  स्वत:लाच गुंतवून घेईन . तसंही नव्याने करायच्या, नव्याने शिकायच्या गोष्टींची यादी मुळातच इतकी मोठी आहे आणि सातत्याने त्यात भर पडतच राहते. या वर्षी, घर आणि ऑफिस या व्यतिरिक्त  ज्योतिष शिकायला सिरीअसली सुरुवात करायची आहे, अर्थशास्त्र पुन्हा नव्याने शिकायचे आहे, म्हणजे खरंतर अर्थशास्त्रात मास्टर्स करायला यावर्षी admission घ्यायची आहे, एकदा ते केले की रिकामा किंवा निवांत वेळ हा उरणारच नाही. तरी पण याच वर्षी  ओरिगामीची सुरुवात तर केली आहे त्यातले सातत्य टिकवून ठेवायचे आहे, टेरेस आणि खाली असलेली बाग या वर्षी अजून चांगल्या प्रकारे फुलवायची आहे,  संस्कृत स्तोत्रे विष्णू-सह्स्रानामापर्यंत शिकून मधेच सोडून दिली होती आता रुद्र आणि सप्तशती एकदा शिकायची आहे. परवाच,  एके दिवशी दुपारी ऑफिसमधून लवकर घरी  गेले, माझ्या दोन मैत्रिणी जिन्यात भेटल्या, आता इथे कशा असे त्यांना विचारले तर म्हणे " तुझ्या चुलत सासूबाई सध्या गीता शिकवत आहेत, तो क्लास आताच संपला आता घरी चाललोय" ह्याला म्हणतात दिव्याखाली अंधार! पण असो. 

सदा सर्वकाळ सगळ्याच वेड लावणाऱ्या गोष्टी तुमच्या  बरोबर राहतात  असंही नाही, काही काही सोबत करतात, काही चुकारपणे मधेच रस्त्यात तुमचा हात सोडून देतात. पण हरकत नाही, त्या काळापुरत्या तरी त्या आनंददायी असतात हे  नक्की! त्या थोड्याशा सोबतीने देखील त्या  तुम्हाला अधिकाधिक समृद्ध करत असतात. प्रत्येक वेळी त्याच माझा हात सोडतात असेही  नाही, तर माझ्यातही एक लहान मूल दडलेले आहेच ना, त्यामुळे ते ही दरवेळी नवीन खेळाच्या शोधात असतेच, कुतूहल संपले की दिला नाद सोडून असेही  वागत असते. पण  मग अशावेळी माझ्यातल्या त्या लहान मुलाला, माझ्यातली जी एक आई आहे न ती कधी त्या गोष्टींकडे पुन्हा पुन्हा वळवू पाहते किंवा त्याचे  ते "मूलपण" समजून घेत "असे चालायचेच" म्हणत सोडून देते. मूळातच फार आखीव  रेखीव आयुष्याच्या कल्पनांशी मी स्वत:ला बांधून ठेवले नाहीये ते एका परिने  बरेच आहे. घर आणि करिअर ही एकच  मध्यवर्ती आयुष्य रेखा ठरवून, त्या सभोती मग आपल्या आवडी, इच्छा, आकांक्षा यांची हवी तशी सजावट करावी. पण जर घर किंवा करिअरच धोक्यात येणार असेल तर मात्र ती माझी सर्वात मोठी हार असेल, म्हणूनच या जीवन रेखेस  डिस्टर्ब न करताही स्वत: मुक्त आयुष्य कसे जगायचे हे चुकत माकत शिकण्याचा हा प्रयत्न! 

तर या निवांत वेळाचं मी काय करतीये?  सध्या तर फक्त पुस्तके आणि मी!  एक पुस्तक उशाशी ठेवलेले असते, एक सोफ्यावर, आलटून पालटून मी दोन्ही वाचतीये. दुसरीकडे  मला कविताही आवडतात मात्र त्या  वृत्त, मात्रा, छंद यांचे साज लेलेल्याच! आणि कदाचित  म्हणूनच शांताबाई, इंदिरा संत, रॉय  किणीकर, महानोर, आरती प्रभू किंवा बोरकर यांच्या कविता जास्त भावतात. नव्या कवींमध्ये  संदीप खरे किंवा वैभव जोशी जे लिहितात ते आवडते. दुसरे म्हणजे न कवितेचे स्वत:चे एक प्रसन्न व्यक्तीमत्त्व  असायला हवे, अगदी दु:खाची, विरहाची, वेदनेची कविता वाचताना, ऐकताना ते दु:ख, ती वेदना आपल्या पर्यंत पोहचली पाहिजे जरूर पण तिने आपला ताबा घ्यायचा नाही, ते दु:ख, वेदनेचे मळभ आपल्या मनावर सोडून जायचे नाही, आणि अशाच कविता फक्त मला गुंतवून ठेऊ शकतात. आजकाल कवितांनी थोडे वेड लावलेच आहे तर पुरतेच त्यात रंगून जावे म्हणत परवा "उत्तररात्र" वाचून काढली. त्यातूनच रोज एक मला आवडलेली कविता किंवा  ओळी  स्वत:च्याच ब्लॉगवर पोस्ट करायची कल्पना सुचली आणि ताबडतोब ती मी अमलात पण आणली. अनेकदा कवितेची सुरुवात आठवत असते किंवा काही ओळी, पण संपूर्ण कविताकाही आठवत नसते किंवा तोंडपाठही नसते. पण मग होते काय की किमान ब्लॉगवर ठेवण्यासाठी तरी मी त्या कवितेचा  थोडा शोध घेते, मला हव्या असतात त्यातल्या चार ओळीच पण  त्यामुळे पुन्हा एकदा ती कविता मात्र पूर्ण वाचून होते. 

हे ही वेड टिकेल वा मागे पडेल, पण त्यातून मला जो आनंद गवसेल त्याची तुलना दुसऱ्या कशाशीच नाही ना होऊ शकणार! म्हणूनच "रंगुनी रंगात साऱ्या" म्हणत मी हे सारे आनंदाने करतीये. 

Monday, April 21, 2014

नाते तिचे अन माझे

आपल्यात इतके गहिरे नाते नव्हतेच कधी 
तरीही  सुखी होतो आपापल्या जगात आपण दोघी 
ओळख होती फार पूर्वी पासूनची तुझी 
मलाच कधी इतकी ओढ वाटली मात्र नव्हती  

तुझ्या  नावासरशी समोर येतात अनेक दिग्गज नावे  
यांच्याशी नाते जोडल्यावर तू दुसऱ्या कोणाकडे का पाहावे?
आवडले नव्हते मला कधीच तुझे  मुक्त जगणे 
मुक्त कसले केविलवाणी धडपड ती 
रोजच्या जगण्याला दिवसाच्या चोवीस मात्रात बसवण्याची 

तुला अशी दूर ठेवता ठेवता,
नकळता डोकावू लागली आहेस मनात 
रुजत चालली आहेस कुठेतरी खोलवर काळजात 
आजकाल दिवसरात्र सोबत असतेस,
माझे क्षण माझ्या ऐवजी तूच जगतेस 
उघड्या डोळ्यांनी पाहते मी सारी धडपड तुझी 
माझ्या प्रत्येक क्षणाला स्वत:शीच बांधून टाकण्याची 
अशीच व्यापून मन माझे  राहशील 
एक दिवस माझी स्वप्नेही तुझीच होऊन जातील

तुझ्या साथीने छोट्या आनंदाचीही व्हावीत चांदणफुले 
आणि हलक्या दु:खानेही उरावे रितेपण कोवळे 
का ग करतेस असे? 
जगू दे ना काही क्षण मला माझ्यासवे 
तुझ्याशिवायही घेता येवू दे 
आयुष्याला मला माझ्या कवेत

Wednesday, April 16, 2014

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त ....................


अनेक प्रकारे माझ्या पुस्तकांच्या "विश- लिस्ट" मध्ये भर पडत असते. कधी सहज म्हणून अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बुकगंगा वर नवीन काय याचा शोध घेताना, कधी एखाद्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व प्रसिद्धी फार उत्तम झालेली असते म्हणून, कधी कधी कोणीतरी एखादे पुस्तक "हे नक्की वाच" असे सुचवले म्हणून. 

त्यामुळे माझी ही विश लिस्ट रिती झालीये असं कधीच होत नाही. ऑनलाईन पुस्तके खरेदी करण्याइतकी सहज सोपी गोष्ट नाही. हवे ते पुस्तक वरीलपैकी एखाद्या वेब साईट वर शोधायचे, LOOK INSIDE म्हणत त्या पुस्तकात थोडं डोकवायचं, आवडलं तर लगेच "Add To Cart" म्हणत कार्ड पेमेंट केले की  हवी असलेल्या पुस्तकांची खरेदी पूर्ण. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुस्तके घरी हजर!

पण मग त्यात स्वत: दुकानात जाऊन तास अन तास पुस्तके चाळत, खरेदी केल्याचा आनंद मिळत नाही. कोऱ्या पुस्तकांना आधी डोळे भरून न्याहाळावे, त्याचा गंध आपल्यात भरून घ्यावा आणि मग स्वत: ठरवलेली पुस्तके, न ठरवलेली पण तिथे गेल्यावर दृष्टीस पडली आणि वाचावीत अशी वाटली म्हणून घेतलेली पुस्तके, अशा सगळ्या प्रकारची पुस्तके घरी घेऊन येताना मला जेवढा आनंद होतो तेवढा कदाचित एखादा दागिना घेऊन येताना देखील होत नाही. 

तर मग जिच्याकडे अशी विश लिस्ट कायमच तयार असते, तिला तिची ही आवड ओळखून कोणीतरी म्हणावं, " आज हवी ती पुस्तके घे" मग ना तिचा आनंद वर्णनातीत असतो. असंच परवा काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत, मग माझ्या सोबत अनेक मंडळी घरी आली अक्षरधारा मधून. जशा की माझ्या लाडक्या सुनीताबाई आल्या त्यांच्या शेवटच्या काही आठवणी घेऊन, गौरी देशपांडे आणि सानिया आल्या, गिरीष कुबेर आले अधर्म युद्धाचा पट समोर ठेवत, झेन गार्डन मधून मिलिंद बोकील आले, अर्थात मुसाफिरी करत यापूर्वीच अच्युत गोडबोले घरी मुक्कामी होतेच, आता "गणिती" च्या रुपात ही त्यांना का न न्यावे असे म्हणताच, ते ही लगेच बास्केट मध्ये जाऊन बसले, सोबत भाचे मंडळीन साठी "त्तोतोचान. बाटलीतले भूत" अशी पुस्तके मला घरी न्या म्हणून मागे लागली, मग मला काही त्यांचे मन मोडवेना, म्हटलं "चला रे बाबांनो तुम्हीपण"

तरी पण या वेळेस लिस्ट वर असलेली दोन तीन पुस्तके जी अक्षरधारा मध्ये नव्हती. त्यांनी सांगितले २/३ दिवसांत मागवून देऊ शकू म्हणून, पण म्हटलं आता पुन्हा मी कोणत्या वीक एंडला तिथे पोहोचणार आणि कधी पुस्तके त्यांच्याकडून घेवून जाणार. त्यापेक्षा आता राहूच देत या तीन पुस्तकांना लिस्ट मधेच. 

पण आज सकाळीच परवा आणलेल्या पुस्तकांना फेस बुकावर थोडे मिरवून झाले न झाले तोवर "फ्लिप कार्ट" ची मेल येऊन पडली, "World Book Day offer" मनात म्हटलं हा पण एक शकुनच आहे. ऑफिसला पोहोचल्या बरोबर त्या वेब साईट वर लॉग इन झाले आणि  हवी असलेली तीनही पुस्तके तिथे आहेत याची खात्री केली. मधेच एक मीटिंग होती ती आटोपली, तशी लगेचच या पुस्तकांची ऑर्डर देऊन मोकळी झाले. संध्याकाळी पुस्तके गाडीत बसून माझ्या घरी येण्यासाठी रवाना सुद्धा झालीत ! ती आहेत "द  जर्मन जिनिअस, द अल्केमिस्ट- इनसाईड द वर्ल्ड ऑफ सेन्ट्रल बँकर्स आणि रघुराम यांचे फ़ौल्ट लाईन्स"  याला म्हणतात "आवडीने वाचणार त्याला फ्लिप कार्ट  देणार!" (साखरेचे खाणार …त्याला देव देणार या म्हणी सारखे वाचावे). 

घरात आजच सीझनच्या पहिल्या हापूसचं आगमन झालंय, म्हणजे आता किचनमध्ये फार वेळ जाणार नाही. याच आठवड्यात "हि निवडणूक व्हावी ही तर काकांची इच्छा"(काकांच्या जागी आपल्या आवडीप्रमाणे कोणाचेही नाव घालून वाचावे, जसे की मोदी, रागा, झाडूवाला, ताई-दादा, अम्मा, दीदी कोणाचे ते महत्त्वाचे नाही) असल्यामुळे गुरुवारी ऑफिसला सुट्टी आहे. कधी नव्हे ते ह्या वीक एंडचा अजून तरी काही प्लान नाही त्यामुळे या पुस्तकांमधे गढून जाण्यास कोणताही अडसर दृष्टीपथात नाही. दिवस रात्र, खाता पीता हातात एकच एक. 

आजकाल एकच गोष्ट सगळ्या गोष्टीत मधे मधे करते ते म्हणजे "झुकी बाबाने सोडून दिलेली मांजर", आपण कामात असताना पाळलेली मनी सतत पायात घोटाळावी ना तसं हे फेस बुक कधी मोबाईल मधून कधी laptop मधून सतत मधे मधे येत असते. हे फेस बुक म्हणजे न तसा गावातला गप्पांचा पार, कोणी तुमची इथे वाट पाहत नसते, आलात, या, चार क्षण शिळोप्याच्या गप्पा मारा आणि जा. पण आजकाल आपली या संवादाची भूक  इतकी मोठी आहे त्यामुळे  एकदा तिथे डोकावले की मग लवकर तिथून सुटका नाहीच. हे म्हणजे कसं ना व्यसन आहे, सुटायला पाहिजे म्हणत अजून त्यात  बुडून जावे तसे. त्यामुळे असे व्यसन सुटायला, त्यापेक्षा एखादे सुटू न शकणारे व्यसन लावून घ्यायला हवे. आणि पुस्तकांपेक्षा मोठे व्यसन ते काय असू शकते? हे व्यसन काही मला नवे नाही त्यामुळे इथे मात्र क्षणभर विश्रांती!!!!

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त 
शून्याहूनही निळे तरी हासता आरक्त 
- आरती प्रभू 

Monday, April 14, 2014

पुन्हा एकदा नव्याने....................

आज पुन्हा एकदा नव्याने 
अलवार जाग आली 
रातीची बरसात तुझी चाहूल देऊन गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
मी न्याहाळले मलाच 
एकटक तुझी नजर माझे काळीज छेदून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
माळला मी गजरा 
फुले मोगऱ्याची गंध तुझाच पसरवून गेली 

आज पुन्हा एकदा नव्याने 
तुझ्या सयीत  रमले
ती चांदणभूलच माझी ओंजळ रिती करून गेली 
आज पुन्हा एकदा नव्याने 
मी काही क्षण जगले 
लागलेली तुझी आस सखया मग मलाच मिटवून गेली

Thursday, March 13, 2014

मनाचिये गुंती ………

रात्रीचे बारा वाजलेत. उद्या सकाळी लवकर उठायचय …. असं म्हणत गायत्री मोबाईल मधला गजर बदलते, तो सेव्ह करता क्षणीच त्यावर  मेसेज झळकतो "This alarm has been set for 5 hours and 30 minutes from now". फक्त साडेपाच तास सुखाची झोप आपल्या हाताशी आहे. झालं!  हा मेसेज पाहूनच तिची झोप उडते कदाचित. असे होणार अशी थोडी कल्पना म्हणा किंवा भीती मनात कुठेतरी असतेच. आजकाल झोपेने आपल्याशी काय वैर धरलंय कळत नाही असं म्हणत ती गादीवर अंग टेकते. 

झोप यावी म्हणून करावे असे सारे उपाय आसपास असतात. उशाशी एखादे पुस्तक असते, बामची बाटली असते, गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी असतात, मंद संगीत असते. जेमतेम ५ तास झोप मिळणार आहे तर आज पुस्तक हाती   नको घ्यायला असे म्हणत ती डोळे मिटू पहाते. उद्याचा सारा दिनक्रम एकदा डोळ्यासमोर येतो आणि एकंदरच दिवस फार दगदगीचा असणार याची खात्री पटते. त्यामुळे आता तरी झोपायला हवे म्हणत ती कूस बदलते. 

दुपारी ऑफिस मध्ये एका नको त्या विषयावर उगीचच झालेला वाद हळूच मनात डोकावतो. आता हा इथेच रेंगाळणार!  नाही, नको आता हे सारं आठवायला. उगाळून गोष्टींचा कडवटपणा वाढतो उगीचच. पण तरी काय गरज होती कोणी आपल्याला असे काही बोलायची? एकूणच आजचा सारा दिवसच असा होता! 

"आज सखीचा फोन आला होता, शेवटी ती आणि रोहन घटस्फोट घेणार आहेत. तिच्या बाजूने ती बरोबर असेल, नव्हे आहेच पण आपण एकदा रोहनशी पण बोलायला हवे का?"

"पण त्याने कुठे या घडामोडींची आपल्याला कल्पना दिली आहे अजून? मग आपण का त्याच्याशी आपणहून या विषयावर बोलायला जावे?" 

ती कूस बदलून हे विचार झटकण्याचा प्रयत्न करून पाहते. पण ते जमत नाहीच. मग थोड्या वेळाने उठते, किचन मध्ये शिरून  ग्लासभर पाणी पिते. पुन्हा जाऊन आडवी होते. 

"पण खरंतर मुळात तो आपला मित्र आहे, सखी तर मागून आली त्याची बायको म्हणून."

"एकदा दोघांशी एकत्रितपणे बोलावे का? मित्र म्हणून इतका हक्क आपल्याला नक्कीच आहे. शेवटी आपण त्या दोघांच्या भल्याचाच विचार करतोय ना?"

"काहीही काय? तू काय स्वत:ला देव समजतेस का ग ? की उठ सुठ इतरांचा विचार तुझ्या दृष्टीकोनातून करशील आणि तू ज्याला योग्य समजतेस त्यात त्यांचे भले होईल अशीही समजूत बाळगशील?" 

झाली सुरू स्वगताची मालिका. कुठून कुठे वहात जातो आपण या विचारांत आत्ता या क्षणी इतर काही नाही तर शांत झोप  गरजेची आहे. 

"पण त्यांनी सर्व बाजूनी विचार केलाय का? गंधार चा विचार केलाय का? दोघांच्या आई वडिलांचा?  एकमेकांचा?"

"लहान कुकुली बाळे आहेत का ती? गेली १५ वर्षे एकमेकांसोबत आहेत ते, लग्नाआधीची पाच आणि आता लग्नानंतरची दहा. त्यांच्या भूमिकेत दोघे बरोबरच असतील ना?" 

"पण तरीही, हे असे नको घडायला!"

"मग काय दोघांनी करावे काय? असेच मनाविरुद्ध एकमेकांसोबत आयुष्य काढावे का?"

सखी आज बोलताना म्हणाली, "इतकी वर्षे याच आशेवर आहे मी, की केंव्हातरी गोष्टी बदलतील, पण आता हळूहळू गोष्टी माझ्या हाताबाहेर जात चालल्या आहेत. आजकाल मी  माझ्या रोहनवरच्या प्रेमाची खूप मोठी किंमत मोजते आहे असे मला वाटायला लागले  आहे, आणि फक्त या  प्रेमापोटीच हे सारे इथेच कुठेतरी थांबावे असं मला वाटतंय. व्यसनांपायी रोहन मधला कलाकार विझत चालला आहे, आणि मी काहीही करू शकत नाही हेच माझ्यासाठी इतके त्रासदायक आहे की त्यापायी हा एकमेकांपासून असे दुरावण्याचा त्रास तितका मोठा वाटणार नाही." 

खरं आहे तिचं  म्हणणं, पण तरीही घटस्फोट नको, दुसरा काही तरी मार्ग निघू देत. रोहन सहन नाही करू शकणार सखीचं अशा रितीने त्याच्यापासून वेगळे होणे. 

"हे त्याला इतके दिवस कळत नाहीये का? सखी इतके दिवस अनेक आघाड्यांवर लढते आहे, रोहनच असं दारूच्या आधीन होणे, त्यापायी त्याने त्याचे गाणे थांबवणे, तिची नोकरी, त्याच्या आईचे आजारपण, गंधारची शाळा, अजून काय कोणी तिच्याकडून अपेक्षा करावी. प्रेमापायी काय काय तिने सोसावे अशी अपेक्षा आहे?"

ती पुन्हा उठते, दिवाणखान्यात जावून सोफ्यावर बसते. घड्याळावर नजर टाकते, रात्रीचे दोन वाजलेत म्हणजे साडेपाच तासातील २ तास संपलेत, अजून फक्त साडेतीन तास आपण झोपू शकतो. पुन्हा ती किचन मध्ये शिरते, बिस्किटांचा डबा उघडून त्यातली  दोन हातात घेते, ग्लासभर पाण्याबरोबर ती  घशाखाली उतरवते तेंव्हा तिला आठवते की आज आपण रात्री जेवलोच नाहीये. 

आता कदाचित झोप लागेल, सकाळी फ्रेश वाटेल. बोलू या आठवड्यात रोहनशी. उद्या आणि परवा एवढी महत्त्वाची मीटिंग पार पडू देत. प्रोजेक्ट च्या दृष्टीने हे दोन दिवस फार महत्त्वाचे आहेत आणि आपल्या करीअरसाठीपण! आज ऑफिसमधून निघताना सगळी उद्याच्या मिटींगची  तयारी करून निघालो म्हणून ठीक, उद्या सकाळी लवकर पोहोचणे जमले नसते कदाचित. मात्र आता झोप लागायला हवीच. ती आडवी होते, शेजारी तिचा नवरा सारंग गाढ झोपेत असतो.  ही अजून टक्क जागीच आहे याचा त्याला थांग पत्ताच नसलेला. त्याचे बरे असते, अशी झोप येत नाही असे झाले की  सरळ उठून टेरेसवर पोहोचायचे आणि एकामागून एक सिगारेटी ओढत राहायच्या. 

पुन्हा डोळे मिटले जातात, पुन्हा मनात विचारांचा धागा पोहोचतोच. सखीच्या जागी आपण असतो तर? उद्या इतर कोणत्या कारणांनी अशी वेळ आपल्यावर आली तर? कसे सामोरे जाणार आहोत आपण त्या टप्प्याला?

अगं, पण असे का होईल? इतके सारे छान तर चालले आहे ना? घर, गाडी, छानशी नोकरी, शिवाय कोणाची जबाबदारी नाही, कोणालाही हेवा वाटेल असे चालले आहे न? अचानक नाही घडत ग अशा घटना. 

हो न!  अचानक नाही घडत या गोष्टी, नाराजीचे धागे कधीतरी कुठेतरी खोलवर रुजलेले असतात, जेंव्हा सारे ठीक असते तेंव्हा ठीक असते, पण कदाचित एखादी शुल्लक वाटणारी घटना तळातल्या हा गाळ वर आणते, आणि सारेकाही बदलून जाते. सखी आणि रोहनही अगदी असेच हेवा वाटावा अशी एकमेकांत गुंतलेली जोडी होती ना काही काळापर्यंत. पण आज या वळणावर आहेतच न उभे?

आपण आठवतंय का शेवटचे एकटे घरी कधी राहिलो होतो? 

पाच वर्षांपूर्वी जेंव्हा नवरा प्रोजेक्ट च्या कामासाठी सिंगापूरला थोडे दिवस होता, त्या नंतर कधीच नाही. म्हणजे?? मनातल्या मनात आपण एकटे कसे राहणार आहोत याची कल्पना करायला लागलोय का? म्हणजे आपल्यातही असे घडू शकते?

पण आपल्यातही धुसफूस होतेच कधी कधी. शब्दाने शब्द वाढतो, एकमेक दुखावले जातो, काही दिवसांचा अबोला, त्यामुळे येणारी अस्वस्थ शांतता घरात, तसंही घरात तिसरे आहेच कोण बोलायला? गंधारसारखा एखादा आपल्याघरी असता तर? आयुष्य नक्कीच थोडे वेगळे असते. 

कशा रितीने घेऊ आपण उद्या अशी वेळ आलीच तर? चिडू, भांडू, वाद घालू, प्रेमाने त्याला समजावू की शांतपणे घटस्फोटाच्या कागदांवर  "ठीक आहे, कुठे सही करू?" असे विचारू?

मधे एकदा विराजने दिलेला सल्ला आठवतो? नक्की काय समजू मी? 

प्लीज प्लीज ,आत्ता ते विचार नकोत ना. आत्ता मला फक्त आणि फक्त एका चांगल्या झोपेची गरज आहे. देवा प्लीज हे सारे विचार थांबू देत. असे म्हणत ती उशीजवळचा मोबाईल हातात घेते, वेळ पाहते. साडेतीन वाजलेत. दिवस रात्र सारी आपली कशी घड्याळाशी जोडलेली म्हणत पुन्हा एकदा झोपायचा प्रयत्न करते. साईड टेबल वरून बामची बाटली घेऊन बामचे एक बोट कपाळावर फिरवते, वेंकटेश स्तोत्र मनातल्या मनात म्हणू लागते. लहानपणी आईने लावलेली सवय अजून कायम आहे. 

वेंकटेशो वसुदेवो प्रद्युम्नो मितविक्रम; पासून सुरु होऊन रमानाथो महीभर्ता पर्यंत पोचून गाडी थांबते आणि विचार चक्र पुन्हा कसे आणि कधी चालू होते ते तिलाही कळत नाही. 

मध्यंतरी नवरा थोडा नाराज होता, ज्या  वेळी त्याची सलग २ वर्षाकरिता असलेली  ऑनसाईट ची संधी हुकली तेंव्हा. एक दिवस संध्याकाळी सोबत विराजला  म्हणजे त्याच्या परम मित्राला घेऊनच आला होता. विराजला भविष्य पहाता येते, आपला विश्वास नाही पण सारंगचा आहे. बराच वेळ दोघेजण याच विषयावर बोलत राहिले. सोबत दारू होतीच. आपले काही काम नाही तिथे असे समजून आपण किचन मधील कामे संपवत राहिलो. 

काही वेळाने विराज बर्फ घेण्याच्या निमित्ताने आत आला, म्हणाला "गायत्री, मी आत्ता सारंग सोबत तुझीही पत्रिका पहिली, मला माहित आहे तुझा विश्वास नाही या साऱ्यांवर. सारंगचा प्रश्न ऑन साईट  पोस्टिंगचा, तो  आज न उद्या सुटेलच, जाईलच तो त्याच्या इच्छित स्थळी, पण मला तुला एक सल्ला आवर्जून द्यायचा आहे तो म्हणजे "रिलेशन्स जप" हे ऐकून एक सेकंद हादरलोच आपण मनोमन. पण तितक्यात सारंग आत आला आणि विराजने विषय बदलला मग आपणही तो विचार बाजूला सारला. 

असे का केले असेल त्याने? आपल्यालाच का ??  हाच सल्ला त्याने सारंगला दिला असेल का? आपला ज्योतिष, भविष्य पाहणे यावर विश्वास नाही हे माहित असूनही मलाच का असे सांगितले असेल? सारंगच्या मनातही असे काही विचार येत असतील का? जे आपल्याला नाहीत पण विराजला माहित आहेत, आणि  ज्यामुळे विराज असे म्हणाला असेल? कधीतरी सारंगशी बोलले पाहिजे यावर. 

पण आत्ता झोपले पाहिजे, म्हणत ती पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळते. 

तिच्या या हालचालीने थोडी झोप चाळवलेल्या  सारंगने तिला  झोपेतच विचारले, "उद्या सकाळी लवकर जायचंय न तुला? झोपली नाहीस का अजून?" 

"नाही रे, काय करू, झोपच येत नाहीये"

"येईल येईल शांतपणे डोळे मीट बरं" असे म्हणत झोपेतच एका हाताने तो तिला कपाळावर थोपटू लागतो. 

त्याचा हा आश्वासक स्पर्श जाणवताच, उगीचच इतके नको ते विचार मनात का घोंगावत होते असं  काही आपल्या बाबतीत होणार नाहीये असा विचार मनात येउन एक हलकेसे स्मित चेहऱ्यावर पसरून निद्रेच्या आधीन ती केंव्हा आणि कशी होते ते तिलाही कळत नाही. 

Thursday, February 27, 2014

दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे.....................

एकंदरीतच वेगवेगळे दिवस अती उत्साहात साजरे करण्याची आपल्याला फार आवड! साहजिकच उत्साह जितका अती, तितकाच तो विरून जाण्याची प्रक्रियाही वेगवान! सगळे वरवरचे दिवस साजरे करण्याने होते तरी काय? मूळ उद्धेश अशा या दिवसांपासून लांबच असतात, दिन साजरा करण्याचा हेतू साध्य होत नाहीच  मग  तो  मराठी भाषा दिन साजरा असो,  महाराष्ट्र दिन वा प्रजासत्ताक दिन! 

असे दिवस साजरे करतानाही, आपल्याकडील विरोधाभास असा की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणार, स्वत: घराबाहेर पडल्यावर हिंदी नाहीतर इंग्रजीचा आधार घेत बोलणार  आणि असा हा एक दिवस साजरा करून आपण किती मराठीभाषेवर आपले किती प्रेम आहे याचे कवतिक करत राहणार, ते ही कसे तर फेसबुक, whatsapp, ट्वीटरवर कोणाकडून तरी आलेल्या मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा एकमेकांना पाठवून, अशाने कशी ती भाषा वाढावी, फुलावी? अशा शुभेच्छा पाठवणारे कितीजण किमान हा दिवस एखादे मराठी पुस्तक विकत घेऊन, नुसतेच विकत घेऊन नव्हे तर ते वाचून, किंवा आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलाला किंवा मुलीला  एखादी उत्तम, कथा, कविता किंवा एखादा ललित लेख वाचून दाखवून किंवा वाचावयास लावून साजरा करतात? ज्या योगे पुढील पिढीस मराठीच्या समृद्धतेची कल्पना यावी? 

आपले मूल जन्माला येण्यापूर्वीपासूनच  आपण स्वप्ने पहाणार ती त्याच्या इंजिनीअर, डॉक्टर बनून खोऱ्याने पैसे कमावण्याची. क्रीडा प्रकार साऱ्या देशात एकच त्यामुळे जर चुकून आपण त्याने क्रीडापटू स्वप्न पहिलेच तर आपली इच्छा त्याने  सचिन तेंडूलकर बनावे हीच. आजतोवर मला अभावानेच कोणी आई बाप भेटलेत ज्यांचे स्वप्न आपल्या मुलाने साहित्यिक व्हावे असे  होते. त्यातल्या त्यात सोयीची भूमिका आपण घेतो ती म्हणजे "तिला/ त्याला स्वत:च्या आवडीने काय ते करिअर घडवू देत". पण शेवटी जे आदर्श समोर ठेवतो किंवा ज्या प्रकारच्या पुढील आयुष्यातील जीवनशैलीची गोडी लावतो त्या अपरिहार्यतेने मुले मळलेल्या वाटाच जवळ करताना दिसतात. 

आपली शैक्षणिक पद्धत ही अशी की हुशार ( मार्क मिळवण्यात ) मंडळी विज्ञान शाखेकडे वळावीत, थोडी कमी हुशार यांनी आपले कॉमर्सला जावून उत्तम नोकरी कशी मिळेल ते पाहावे, उरलेला सारा भार, आपण जमेल तसा कला शाखेत धाडून द्यावा, त्यांच्यातूनच मग डी एड, बी एड  वगैरे करून मंडळी जावीत पुन्हा शिक्षकी पेशात! बरं, त्यांना आपले सरकार पद कोणते देणार तर म्हणे "शिक्षण सेवक" ! आता अशा रीतीने मारून मुटकून शिक्षक बनलेल्या व्यक्तीकडून आपण उत्तम विद्यार्थी किंवा साहित्यिक घडवण्याची  अपेक्षा करणार, म्हणजे जे आडातच नाही ते आपल्याला पोहऱ्यात मिळावे ही आपली अपेक्षा. आता असा शिक्षक साहित्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करेल कसा ? 

भाषा, साहित्य म्हणजे विज्ञानातील, तंत्रज्ञानातील  एखाद्या शोधाप्रमाणे नसते ना की लागला एखादा महत्त्वाचा शोध आणि सारी क्षितीजेच बदलून गेली! भाषा, ती रूजावी लागते. तिची मशागत व्हावी लागते. आणि घडते ते उत्तम निर्मिती मुल्ये असलेले लेखन, इतर भाषांतून अनुवादाच्या माध्यमातून होणारे संस्कार याचा पाया, बोली भाषेची समृद्धता तिचा सतत आणि सहज वापर, शालेयच नव्हे तर उच्च शिक्षणही या भाषेतून देण्याची  सोय आणि त्या साठीचे सातत्याचे प्रयत्न, त्याच बरोबर खोलवर रुजलेली वाचन संस्कृती यातून.  इतक्या साऱ्या बाबी वर्षानुवर्षे जुळून याव्यात तेंव्हा कुठे आपण विचार करू शकू ना पुढील अनेक पिढ्यांपर्यंत एक समृद्ध वारसा पोहचवण्याचा!

एक बरे आहे, जन्माला येताना जसे नाक कान डोळे घेऊनच येतो तशी वाचनाची गोडी किंवा नावड सोबत घेऊन येत नाही हे! त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर  वाचनाची नसलेली  गोडी लागण्याची शक्यता तरी किमान कायम राहते! 

पण तरीही आपण जाणीवपूर्वक ही आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. कोणत्याही भाषेमुळे असोत, जाणीवा समृद्ध होणे महत्त्वाचे असे आपण म्हणत नाही. रोजच्या जगण्यात हजारो रुपये विविध गोष्टींवर खर्च करणारे आपण कितीजण सहजपणे हजारभर रुपयांची पुस्तके आणून आपल्या मुलासमोर ठेवून," बाबारे, तुला  टी व्ही, मोबाईल, आय पॅड, मित्र मंडळ यातून वेळ मिळाल्यावर तरी  हे वाच" असे सांगतात? एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी भेटवस्तू च्या रुपात उत्तम साहित्यकृती देतात? किंवा एखाद्यास एक वर्षाची पुणे मराठी ग्रंथालयाची किंवा ब्रिटीश कौन्सिल ची  वर्गणी भरून त्याच्या हाती ठेवतात? 

दिसामाजी काहीतरी लिहिणे नाही जमणार कदाचित पण "दिसामाजी काहीतरी उत्तम वाचीत जावे" हे तर शक्य होवू शकते ना आपल्याला? चला, नुसत्या "मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा" एकमेकांना  देण्यापेक्षा तिच्या वैभवात भर पडेल याकरिता एक पाऊल टाकूयात. माझ्या सर्व मित्र मंडळीना याकरिता अनेकोत्तम शुभेच्छा!

Saturday, January 18, 2014

रंजिश ही सही.................

रविवारची सकाळ …प्रसन्न सकाळ म्हणू हवे तर. अदल्या दिवशी संध्याकाळीच बऱ्याच  दिवसांनी जुना ग्रुप भेटल्यामुळे मूडही तसा आपसूकच छान  बनलेला होता. पेंडिंग कामे संपवावीत म्हणून सिटीत जायचा प्लान ठरलेला, लेकीचा जर्मनचा क्लास ही होताच तिला तिथे सोडून कामे संपवावी आणि परत येताना तिला घेऊन परत यावे हा उद्देश. 

सगळी कामे मनाजोगी झटपट होत गेली, वेळेच्या थोडी आधीच तिच्या क्लास मध्ये पोहचले. गाडी  पे and पार्क मध्ये लावलेली असल्याने ती थोडी लांब, मग दोन्ही हाती सामानाचे ओझे. लेकीशी आधी ठरल्याप्रमाणे ती ज्यांच्या कडे जर्मन शिकायला जाते, त्यांना क्लास सुटण्याच्या वेळी भेटायला जायचे होते. तिने आधीच सांगितले होते की त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे आणि लिफ्ट नाहीये. अरे देवा !

ठरल्या वेळी तिथे पोहचले, हाश हुश करत … एका व्यक्तीने दार उघडले, त्यांना सांगितले मला "मिसेस …  " यांना भेटायचे आहे, त्याने आत जाऊन सांगितले असावे, त्या बाहेर आल्या. त्यांना ओळख सांगितली. त्यांनी आत येउन बसा, माझा क्लास संपायला थोडा वेळ लागेल असे सांगितले. तो पर्यंत त्यांनी पाणी दिले आणि आरामात पेपर वाचत इथे बसा असे म्हणून त्या ही  आत निघून गेल्या. पाण्याचा ग्लास रिकामा करून मी थोडी स्थिरावले, सकाळीच निवांत पेपर वाचून झाल्याने त्यात मला फारसा रस नव्हता तरीही तो हाती घेऊन  मी त्या दिवाणखान्याचे निरीक्षण करू लागले. अगदी राहते वाटावे असे घर. मला अशी जिती जागती घरे आवडतात. नीट नेटकी पण इतकीही नव्हेत की इथे कोणाचा वावर आहे की नाही हा प्रश्न पडावा. घर म्हणजे कसे की  थोडे अस्ताव्यस्त पण त्यातल्या माणसांचे प्रतिबिंब वाटावे असे. पहिल्याच नजरेत माणसांची न पाहताही चित्रे नजरेसमोर उभी रहावीत असे घर! हे नक्कीच तसे होते.   

भाषा विषयक पुस्तके टी पॉय वर, खाली होती, तिथेच ज्योतिषा वरील पुस्तके, समोर wall युनीट वर दोन तीन गाड्यांची मिनिएचर्स. तिथे एक म्युझिक सिस्टीम, अनेक सी डी त्याच्या आस पास. खाली एक जणू आताच वाजवताना कोणी उठले आहे असे वाटायला लावणारी एक तबला -डग्ग्याची जोडी. सारे घरदारच घरातल्याच्या संगीताच्या आवडीची साक्ष देणारे. अगदी पहिल्याच नजरेत मला हे घर आवडून गेले. 

यात पाच दहा मिनिटे गेली. तेव्हद्यात बाहेरून किल्लीने दार उघडून कोणी आत येत असावे असे वाटून मी त्या दिशेस पाहू लागले. एक व्यक्ती हातात एक दोन सामानाच्या पिशव्या घेऊन आत शिरली. वय फार वाटणार नाही असे व्यक्तीमत्व, म्हणजे नसेलही तिशीच्या आसपास.हसरा चेहरा.  आपसूकच मी हे ते मि. ……. हे ओळखले. त्यांनी ही या कोण आपल्या घरात आहेत असे मनातले भाव चेहऱ्यावर येवू न देत, एक हलकेसे स्मित करत हातातील समान आत नेवून ठेवले. दुसऱ्या खोलीमध्ये जिथे क्लास चालू होता तिथे नजर टाकून ते पुन्हा बाहेर आले. मला म्हणाले, " ……. चा क्लास चालू आहे, थोडा वेळ लागेल तिला" मी बर ठीक आहे म्हणाले. मनात विचार, "ज्या अर्थी कोणीतरी मला घरात घेतलं आहे त्या अर्थी त्या व्यक्ती ने  मला हे सांगितले असेल न रे बाबा" 

पुन्हा ते आत गेले, पाण्याचा ग्लास घेवून बाहेर. मी त्यांना धन्यवाद देत माझे  पाणी आताच पिऊन झाले आहे, मी आले तेंव्हा मिसेस ……. यांच्याशी बोलले होते, infact मी त्यांच्याशीच  काही बोलायला आले आहे, आणि त्यांना थोडा वेळ लागेल याची कल्पना त्यांनी दिलेली आहे हे सांगितले. ते ही बर बर म्हणत म्युझिक सिस्टम कडे वळले. आता काय सुरु होणार या उत्सुकतेने मी हातातल्या बळेच घेतलेल्या पेपर मध्ये डोके आणि कान सारे तिकडे. त्यातली एक आधी कदाचित चालू असलेली सी डी चालू करून ते आत किचन मध्ये वळले. 

काही क्षणातच माझी सर्वात आवडती गझल ……मेहंदी हसन यांची …रंजिश ही सही …… आणि त्याची सुरावट कानी पडताच आता काय आपले कान तृप्त करणार आहेत या जाणीवेने माझ्या आधीच गोल असलेल्या चेहऱ्यावर अजून पसरलेले हसू. आता थोडा अजूनच वेळ लागू दे हा क्लास संपायला असा चमकून गेलेला विचार! एखाद्या सुंदर सकाळी यापेक्षा अजून काही मी नाही मागणार! खरच त्यासाठी त्या रसिकाचे मनापासून आभार! 

ही गझल संपूर्ण ऐकणे, समजून घेत ऐकणे हा इतका सुंदर अनुभव असतो न. प्रेमात पडणे म्हणजेच एका हव्याहव्याशा दु:खाला जवळ करणे. तर मग दुरावलेल्या सख्याला साद घालताना तर त्या दु;खाच्या अभिव्यक्तीची परिसीमाच व्हावी. पण असे असतानाही इथे असे होत नाही. हे एकमेकांना आता आपण संपूर्णपणे दुरवलोच आहोत, तुझ्या परत येण्याने सर्व काही परत पुन्हा पहिल्या सारखे होण्यासाठी  नाहीच तर पुन्हा मला सोडून जाण्यासाठीच तू ये अशी ही साद! माझ्या आयुष्यातून तुझे असे वजा होत जाणे, मला पुन्हा ते दु:ख देखील खूप हवे हवेसे वाटू लागले आहे कारण ते तूझ्यामुळे मिळालेले आहे. 

अशी काव्ये त्यांचा अर्थ लावत आणि सांगत बसूच नये, इतका जिवंतपणा, अर्थाने इतकं हृदयात खोलवर रुजण्याची भाषाशैली हे काव्य. अहमद फराज ह्या माणसाकडे प्रत्येक भावनेच्या अभिव्यक्तीसाठी इतके चपखल शब्द कसे होते हे कोडे मला कधीच उलगडत नाही. शब्दांची निवड, त्यांची जागा, त्यांचे वजन याची इतकी सुंदररित्या गुंफण केलेली असते की अनेकदा तुम्ही एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द शोधू पाहाल तर शक्यच नाही. त्यातून काही शब्द जसे की "दिल-ए-ख़ुश’फ़हम, पिन्दार-ए-मुहब्बत किंवा "ऐ राहत-ए-जाँ" हाच अर्थ पोचवणारे, इतकेच शब्द सौंदर्य असणारे शब्द कुठून उसने आणाल?
एक खानदानी आब असणारी उर्दू भाषा! क्या कहने!

जे आता कधी घडणार नाही, जे प्रेम आता माझ्या कधी वाट्याला येणार नाही,  तू कधी मागे वळून पाहणार नाहीस पण मी तुला साद घालणे कशी सोडू? विरहाशिवाय आणि त्याच्या दु:खाशिवाय दुसरे काही पदरी पडणार याची खात्री असताना मागितलेले हे दान ! जे मनपासून घडावेसे वाटते ते घडणार नाही, पण त्या खेरीज इतर काही माझे मागणे नाही….काही  मिळणारच  असेल तर फक्त तू आणि तूच परत ये … 

तशा अनेक गझल्स ज्या फराज यांच्या  मनात अगदी खोलवर रुजलेल्या आहेत, पण हिची बरोबरी कोणी करू शकत नाही.कानाने ऐकत राहावी, हृदयात साठवत राहावी, पहिल्यांदाच ऐकताना ती वेदना तुम्हाला आतून  हलवून सोडते, हळू हळू तुम्ही त्या वेदनेच्या हुंकारांशी जोडले जाऊ  लागता अन कणाकणाने तुम्ही ते क्षण जगू लागता!
....................................................................................................................

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रह-ए-दुनिया ही निभाने के लिये आ

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से ख़फ़ा है तो ज़माने के लिए आ

अब तक दिल-ए-ख़ुश’फ़हम को तुझ से हैं उम्मीदें
ये आख़िरी शम्में भी बुझाने के लिए आ

इक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझको रुलाने के लिये आ

कुछ तो मेरे पिंदार-ए-मुहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझको मनाने के लिये आ

एक उम्र से हूँ लज़्ज़त-ए-गिरिया से भी महरूम
ऐ राहत-ए-जाँ मुझ को रुलाने के लिए आ 

-अहमद फ़राज़

Saturday, December 7, 2013

श… श शेअर बाजाराचा!

अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच  जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात"  तर मग काय विचारायलाच नको!

अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच. 

आयुष्याच्या एका टप्प्यावर जेंव्हा घरासाठी वेळ द्यावा असे वाटत होते, त्यामुळे पूर्ण वेळेची नोकरी करूच नये अशी इच्छा होती, पण अर्थार्जन ही सर्वार्थाने सोडून द्यायचे नव्हते, तेंव्हा दुसरा कोणता पर्याय निवडावा असा जेंव्हा प्रश्न समोर होता तेंव्हा खरे तर अनेक पर्याय डोक्यात रुंजी घालत होते, ज्यांना उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहायला आवडतात त्यांचे काय विचारता? एक भले मोठे, अद्ययावत आणि मागाल ते पुस्तक चुटकीसरशी मिळेल अशी लायब्ररी सुरु करायची होती. कदाचित बालपणीचा मोठा काळ पुणे मराठी ग्रंथालयाच्या सानिध्यात गेल्याचा परिणाम असेल म्हणा, जेंव्हा पुण्यात डेक्कन वर मक्डोनाल्ड्स  आणि पिझ्झा हट  यांचे आगमन होत होते, तेंव्हा मी पिंपरी चिंचवड मधे असा फूड जोइण्ट सुरु करायची स्वप्ने बघत होते, ही गोष्ट आहे साधारण १९९८/९९ ची आणि चिंचवड मध्ये मक्डोनाल्ड्स पहिले अवतरले ते २००५/६ मध्ये. किंवा इच्छा होती असा एखादा फूड जोइण्ट सुरु करण्याची जिथे काही खास इंडियन डेलिकसीज बनवल्या जातील, जिथे बनणारे पदार्थ हे पोषण मूल्यांच्या तक्त्यात खूप वर असतील आणि टेस्ट मध्येही सर्वोत्तम ठरतील…………एक न दोन!

या गोष्टी मुळातच खूप मोठी गुंतवणूक असणारी होत्या पण त्याचकाळात मनात कुठेतरी शेअर बाजारातून आपण पैसा कमवू शकू असे वाटू लागले होते. तत्पूर्वी काही जणांना एखादा शेअर सुचवून पहिला होता आणि त्याला त्यात थोड्या कालावधीत फायदा होतानाही दिसला होता. डिजिटल व्यवहारांना नुकतीच सुरुवात झाली होती, CNBC सारख्या chaanel वर अखंड बडबड करणारी काही हुशार माणसे  अवतीर्ण झाली होती, त्यांच्या जोडीला अनेक ब्रोकरेज फर्म्स  मधील काही मंडळी  दिवसभर या चर्चा करत असत. अनेक ब्लू चीप कंपन्याचे शेअर कवडी मोलाने विकले जात होते तर  Infosys, सत्यम, विप्रो यांचे भाव रोज नवे उच्चांक दाखवत होते, आज बाजारात नामोनिशाण नसलेल्या अनेक डॉट- कॉम कंपन्या भूतो न भविष्यती असे रोजचे भाव दाखवत होत्या आणि अनेक ब्रोकर्स ह्या कंपन्या बाजाराला उद्या परवा अजून कुठल्या कुठे नेवून ठेवतील याची भली स्वप्ने दाखवत होते. बाजाराने पहिल्यांदा ६००० ची पातळी  एकच दिवस गाठली होती. इतक्या साऱ्या पूरक गोष्टी असताना या शेअर बाजाराने भुरळ पाडली नसती तरच नवल!

काळाच्या थोडी  पुढची स्वप्ने हे तेंव्हाही होतेच त्यामुळे पुणे शेअर बाजाराचा अध्यक्ष असणाऱ्या माझ्या एका ओळखीच्या गृहस्थाना विचारलं की ऑन लाईन ट्रेडिंग करता येईल का? त्याने उत्तर दिले की सर्व सामान्य लोकांना हे करता यायला बरीच वर्षे लागतील. मग एक मित्र जो एक ब्रोकरचे टर्मिनल घेवून हेच काम करायचा त्याच्याशी सौदा ठरवला, मी त्याला फोन वर ओर्डर द्यायची, त्याने माझ्यासाठी ते शेअर घ्यायचे /विकायचे. छोट्या छोट्या ऑर्डर्स मी ठेवू लागले थोडासा फायदा दिसू लागला मग मोठ्या मोठ्या सुरु झाल्या, डे  ट्रेडिंग नसल्याने आठवडा मिळत असे …. मग एक दिवस असा आला  अर्थ संकल्पाच्या दिवशी मार्केट वर जाणार या अपेक्षेने काही मोठ्या पोझिशन्स घेवून ठेवल्या. साधारण ११/१२ च्या सुमारास तो सुरु झाला आणि मार्केट ने जी उतरण दाखवायला सुरु केली, एकाच दिवसात एक भला मोठा फटका माझ्या वाट्याला आला की पुनः मी या गोष्टी कडे आपला व्यवसाय म्हणून पाहू नाही शकले. ६००० चा टप्पा २००० साली गाठलेल्या बाजाराने जवळपास २००३ मध्ये २९००ची पातळी दाखवली. 

याच सुमारास माझी ओळख डोंबिवलीमधील एका ज्योतिषांशी झाली. माझा या गोष्टी वर विश्वास आहे, आणि ते शेअर बाजार आणि ज्योतिष शास्त्र यातील चांगले जाणकार म्हणून ओळखले जातात. त्यांना जेंव्हा मी असे का झाले असावे असे विचारले तेंव्हा ते म्हणाले " असे एक एक धडे आयुष्य शिकवत असते, आपण त्यातून बोध घ्यायचा असतो, तुमच्या नशिबी असा बिन कष्टाचा ,फुकटचा पैसा नाही, पैसा तुम्ही कमवाल पण  तो फक्त स्वतच्या कष्टाचाच असेल, एक दिवस असा येईल की तुम्ही अशा मार्गाने पैसे कामावता येतात या गोष्टीला  हसाल. पुढे त्यांच्याशी संपर्क राहिला नाही, पण या त्यांच्या वाक्याने आयुष्याला दिशा दिली. थोडे दिवस विचार करण्यात गेले, हळू हळू नवीन मार्गावर वाटचाल सुरु झाली. 

आज अनेक टेक्निकल बाबी मला काळात नाहीत  किंवा त्या शिकून घेण्याइतका माझ्या कडे वेळ नाही. पुट/ कॉल ऑप्शन, मुव्हिंग अव्हेरज  आणि  काय काय ते. पण याचा अर्थ मी इथे नसतेच का तर तसं मुळीच नाही, पण आता पद्धत थोडी बदलून गेली. थोड्याच प्रमाणात पण फक्त delivery based करण्यासाठीच मी शेअर बाजाराकडे पहाते. काही माझे लाडके शेअर्स आहेत तेवढ्यानवरच नजर ठेवून मी असते, त्यांनी मला आजतागायत कधी निराश नाही केले. 

पण या शेअर बाजाराबद्दलचे प्रेम आजही कमी झालेले नाही काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलून गेल्या, अनेक नवीन सोफ्टवेअर्स आली, मोबाईल वरून ट्रेडिंग चुटकीसारखे होवू लागले, ब्रोकर नावाच्या माणसाची गरज भासेनाशी झाली, शेअर्स नव्हे तर कमोडीटी, forex यात ट्रेडिंग करता येवू लागले, पण मुंबई शेअर बाजारचे महत्व काही उतरले नाही, फरक पडला "निफ्टी" च्या आगमनाने पण तरीही…  क्षणात जादूची कानडी फिरवल्यागत कोणाची चांदी होईल, तर क्षणात रावाचे रंक ही इथेच होताना दिसतील. माठ मोठ्या Management/business schools मधून पदव्या घेवून बाहेर पडून कोणत्या तरी टी व्ही chanels च्या बड्या बड्यांचे  अंदाज चुकवत राहील. पिढ्यान पिढ्या येत जात राहतील पण बाजार आपल्याच मस्तीत आपली दिशा बदलत राहील.