Wednesday, April 16, 2014

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त ....................


अनेक प्रकारे माझ्या पुस्तकांच्या "विश- लिस्ट" मध्ये भर पडत असते. कधी सहज म्हणून अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा बुकगंगा वर नवीन काय याचा शोध घेताना, कधी एखाद्या पुस्तकाची प्रकाशनपूर्व प्रसिद्धी फार उत्तम झालेली असते म्हणून, कधी कधी कोणीतरी एखादे पुस्तक "हे नक्की वाच" असे सुचवले म्हणून. 

त्यामुळे माझी ही विश लिस्ट रिती झालीये असं कधीच होत नाही. ऑनलाईन पुस्तके खरेदी करण्याइतकी सहज सोपी गोष्ट नाही. हवे ते पुस्तक वरीलपैकी एखाद्या वेब साईट वर शोधायचे, LOOK INSIDE म्हणत त्या पुस्तकात थोडं डोकवायचं, आवडलं तर लगेच "Add To Cart" म्हणत कार्ड पेमेंट केले की  हवी असलेल्या पुस्तकांची खरेदी पूर्ण. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुस्तके घरी हजर!

पण मग त्यात स्वत: दुकानात जाऊन तास अन तास पुस्तके चाळत, खरेदी केल्याचा आनंद मिळत नाही. कोऱ्या पुस्तकांना आधी डोळे भरून न्याहाळावे, त्याचा गंध आपल्यात भरून घ्यावा आणि मग स्वत: ठरवलेली पुस्तके, न ठरवलेली पण तिथे गेल्यावर दृष्टीस पडली आणि वाचावीत अशी वाटली म्हणून घेतलेली पुस्तके, अशा सगळ्या प्रकारची पुस्तके घरी घेऊन येताना मला जेवढा आनंद होतो तेवढा कदाचित एखादा दागिना घेऊन येताना देखील होत नाही. 

तर मग जिच्याकडे अशी विश लिस्ट कायमच तयार असते, तिला तिची ही आवड ओळखून कोणीतरी म्हणावं, " आज हवी ती पुस्तके घे" मग ना तिचा आनंद वर्णनातीत असतो. असंच परवा काहीसं झालं होतं माझ्या बाबतीत, मग माझ्या सोबत अनेक मंडळी घरी आली अक्षरधारा मधून. जशा की माझ्या लाडक्या सुनीताबाई आल्या त्यांच्या शेवटच्या काही आठवणी घेऊन, गौरी देशपांडे आणि सानिया आल्या, गिरीष कुबेर आले अधर्म युद्धाचा पट समोर ठेवत, झेन गार्डन मधून मिलिंद बोकील आले, अर्थात मुसाफिरी करत यापूर्वीच अच्युत गोडबोले घरी मुक्कामी होतेच, आता "गणिती" च्या रुपात ही त्यांना का न न्यावे असे म्हणताच, ते ही लगेच बास्केट मध्ये जाऊन बसले, सोबत भाचे मंडळीन साठी "त्तोतोचान. बाटलीतले भूत" अशी पुस्तके मला घरी न्या म्हणून मागे लागली, मग मला काही त्यांचे मन मोडवेना, म्हटलं "चला रे बाबांनो तुम्हीपण"

तरी पण या वेळेस लिस्ट वर असलेली दोन तीन पुस्तके जी अक्षरधारा मध्ये नव्हती. त्यांनी सांगितले २/३ दिवसांत मागवून देऊ शकू म्हणून, पण म्हटलं आता पुन्हा मी कोणत्या वीक एंडला तिथे पोहोचणार आणि कधी पुस्तके त्यांच्याकडून घेवून जाणार. त्यापेक्षा आता राहूच देत या तीन पुस्तकांना लिस्ट मधेच. 

पण आज सकाळीच परवा आणलेल्या पुस्तकांना फेस बुकावर थोडे मिरवून झाले न झाले तोवर "फ्लिप कार्ट" ची मेल येऊन पडली, "World Book Day offer" मनात म्हटलं हा पण एक शकुनच आहे. ऑफिसला पोहोचल्या बरोबर त्या वेब साईट वर लॉग इन झाले आणि  हवी असलेली तीनही पुस्तके तिथे आहेत याची खात्री केली. मधेच एक मीटिंग होती ती आटोपली, तशी लगेचच या पुस्तकांची ऑर्डर देऊन मोकळी झाले. संध्याकाळी पुस्तके गाडीत बसून माझ्या घरी येण्यासाठी रवाना सुद्धा झालीत ! ती आहेत "द  जर्मन जिनिअस, द अल्केमिस्ट- इनसाईड द वर्ल्ड ऑफ सेन्ट्रल बँकर्स आणि रघुराम यांचे फ़ौल्ट लाईन्स"  याला म्हणतात "आवडीने वाचणार त्याला फ्लिप कार्ट  देणार!" (साखरेचे खाणार …त्याला देव देणार या म्हणी सारखे वाचावे). 

घरात आजच सीझनच्या पहिल्या हापूसचं आगमन झालंय, म्हणजे आता किचनमध्ये फार वेळ जाणार नाही. याच आठवड्यात "हि निवडणूक व्हावी ही तर काकांची इच्छा"(काकांच्या जागी आपल्या आवडीप्रमाणे कोणाचेही नाव घालून वाचावे, जसे की मोदी, रागा, झाडूवाला, ताई-दादा, अम्मा, दीदी कोणाचे ते महत्त्वाचे नाही) असल्यामुळे गुरुवारी ऑफिसला सुट्टी आहे. कधी नव्हे ते ह्या वीक एंडचा अजून तरी काही प्लान नाही त्यामुळे या पुस्तकांमधे गढून जाण्यास कोणताही अडसर दृष्टीपथात नाही. दिवस रात्र, खाता पीता हातात एकच एक. 

आजकाल एकच गोष्ट सगळ्या गोष्टीत मधे मधे करते ते म्हणजे "झुकी बाबाने सोडून दिलेली मांजर", आपण कामात असताना पाळलेली मनी सतत पायात घोटाळावी ना तसं हे फेस बुक कधी मोबाईल मधून कधी laptop मधून सतत मधे मधे येत असते. हे फेस बुक म्हणजे न तसा गावातला गप्पांचा पार, कोणी तुमची इथे वाट पाहत नसते, आलात, या, चार क्षण शिळोप्याच्या गप्पा मारा आणि जा. पण आजकाल आपली या संवादाची भूक  इतकी मोठी आहे त्यामुळे  एकदा तिथे डोकावले की मग लवकर तिथून सुटका नाहीच. हे म्हणजे कसं ना व्यसन आहे, सुटायला पाहिजे म्हणत अजून त्यात  बुडून जावे तसे. त्यामुळे असे व्यसन सुटायला, त्यापेक्षा एखादे सुटू न शकणारे व्यसन लावून घ्यायला हवे. आणि पुस्तकांपेक्षा मोठे व्यसन ते काय असू शकते? हे व्यसन काही मला नवे नाही त्यामुळे इथे मात्र क्षणभर विश्रांती!!!!

आहे त्याचे लागलेले खूळ मला फक्त 
शून्याहूनही निळे तरी हासता आरक्त 
- आरती प्रभू 

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!