Tuesday, April 29, 2014

भातुकलीच्या खेळामधली ............................

गेट उघडून काव्या आत शिरली. सभोती फुललेल्या बागेकडे तिने नजर टाकली ती थोड्या आश्चर्यानेच  अन घराच्या दरवाज्यासमोर उभी राहिली. बेल वाजताच आतून "आलो आलो " हा आवाज ऐकला  मग  क्षणातच काकांनी दरवाजा उघडला.

"ये काव्या, कधी आलीस दुबईहून? किती दिवस आहेस आता इथे? आणि आज इकडे कशी?"
"काका, आठवडा झाला इथे येऊन, मधेच दोन दिवस तुषार कामासाठी मुंबईला गेलाय तर माझ्याकडे थोडा वेळ आहे. म्हणून आईला म्हटलं की आज पलीकडच्या बँकेत थोडे काम आहेच, म्हणून थोडा जास्तीचा वेळ काढून तुम्हाला भेटून येते, कसे आहात तुम्ही?"
"मी कसा असणार आता? वेळ घालवतो काही कामात, काही तुझ्या मावशीच्या आठवणीत. बस तू, काय घेशील, पन्हं की लिंबू सरबत? उन्हाची आलीयेस."
"काका पन्हं ? तुमच्या घरात? म्हणजे तसं नव्हे पण आता मेघना मावशी नाहीये तर?
"अगं, मीच बनवून ठेवलंय"
"तुम्ही? विश्वासच नाही बसत काका. मला अजूनही तेच लहानपणी पाहिलेले काका आठवतात सारा वेळ ऑफिसच्या कामात बुडवून घेतलेले, अगदी चहा सुद्धा स्वत:चा स्वत: न करणारे"
"खरंय तुझं काव्या तुमच्या लहानपणी होतोच  मी तसा, लहानपणीच कशाला अगदी आता आत्तापर्यंत तसाच होतो मी, पण बदललो, मेघना, तिने बदल घडवून आणला हा अगदी गेल्या पाच सहा वर्षात"

काव्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य लपून राहत नाही. आज इतक्या वर्षानी काकांचे हे बदललेले रूप, ते ही मेघना मावशी गेल्यावर!

"आहे ना वेळ, बस निवांत इथे, हे समोर पेपर आहेत, नाहीतर टी व्ही लावू का, ऊन फार वाढलंय, मी आपल्या दोघांसाठी कैरीचे पन्हे घेऊन येतो"

काका आत जायला वळतात, काव्या थोडी निवांत होत सोफ्यात मागे सरकते. क्षणात अनेक वर्षाचे चित्र तिच्या डोळ्यासमोर तरळून जाते. मेघना मावशी तिच्या आईची मैत्रीण अगदी हानपणीपासूनची. एकाच शाळेत, एकाच महाविद्यालयात आणि लग्नानंतर एकाच गावात. जिथे तिथे दोघी सोबत अगदी वर्षांपूर्वी मेघना मावशी जाईपर्यंत.
काव्याने या घरात काकांना नेहमी पाहिलेय ते कामात बुडून गेलेले, आणि बाकी वेळ मित्रांसोबत. घराला घरपण होतं ते फक्त मेघना मावशीमूळेच. रोहित आणि वीणा ही दोन मुले आणि मावशी यांचे एक वेगळेच जग होते. काका त्यात जराही कुठे नसत. काकांचा संबंध फक्त कदाचित पैसे कमावणे आणि घर, गाडी इतर गुंतवणूक या बद्दलचे निर्णय घेणे इतकाच, काव्याने त्यांना घरात सगळ्यांशी हसत खेळत गप्पा मारताना कधी पहिलेच नव्हते. मुलांची शिक्षणे, त्यांची आजारपणे, नातेवाईक, लग्न कार्य या साऱ्या साऱ्या मावशीने सांभाळलेल्या गोष्टी. 

तिची आई मावशीला नेहमी म्हणे, "मेघना असे कसे चालते तुला? काहीच कसं सतीशराव लक्ष घालत नाहीत घरात, मुलांत, हे सारे काय तुझ्या एकटीचे आहे का? कधीतरी तू बोलायला हवेस ना"
अशा वेळी मेघना मावशी नुसतीच हसून, "अगं, चालायचंच नसते एकेकाला आवड" असे म्हणत तो विषय संपवत असे. 

पण तिने अक्षरश: एकटीने नुसते मुलांनाच नाही तर अनेक गोष्टीना जपले. नाती जपली, आपल्या मैत्रिणींचा ग्रुप जपला. रोहित आणि वीणा यांना अनेक गोष्टींची गोडी लावली, त्यांचा सर्वार्थाने विकास घडवण्यात तीच तर झिजली. ते दोघे शिकले, पुढच्या शिक्षणासाठी परदेशी गेले, यथावकाश अनुरूप जोडीदार मिळून त्यांची लग्नेही झाली. त्याच सुमारास काव्याही लग्न करून दुबईला गेली आणि तिथलीच झाली. मावशी कॅन्सरने गेल्यावरही तिला येता आलेच नव्हते. फोनवरच ती रोहित आणि वीणाशी बोलली होती. 

काव्या अशी आठवणीत गढून गेली असताच काका ट्रे मध्ये दोन ग्लास पन्ह्याचे घेवून आले. 

त्यातला एक तिच्या हाती देत म्हणाले, " काव्या तुला आश्चर्य वाटणं सहाजिकच आहे ग, मला असे घरात काही काम करताना पाहून, आणि ते ही तुझी मावशी नसताना"

"हो काका, कारण तुम्हाला फारसे कधी आम्ही घरीच पाहिलेले नाही, घरातली काही कामे तुम्हाला करताना पाहणे मी कधी कल्पनेत पण नव्हता विचार केला" 

"खरं सांगू  …… मला घर संसार, नातेवाईक या  गोष्टींची मुळात कधी आवड नव्हतीच, त्यातून त्याकाळी आई वडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न करावे लागले याचा राग होताच. त्या काळी बायका शिकत पण नोकरी वगैरे फारशा नसत करत. पण ना मला वाटे बायको नोकरी करणारी असावी, पण मेघनाची कधी नोकरी वगैरे करण्याची कधी इच्छाच नव्हती. एकंदरीतच माझ्यासाठी हे एक लादलेले लग्न होते. मग मी त्या रागापोटी घराकडे कधी लक्षच दिले नाही. ऑफिसमधल्या परीक्षा देत पुढे जात राहिलो, उरला सुरला वेळ मित्र मंडळ होतेच, सिंहगड, पर्वती किंवा बुद्धिबळाचे डाव मांडून बसायला. जेवा, झोपायला फक्त घरी असाच त्याकाळी माझा दिनक्रम होता. मेघनाने हळूहळू घराचा ताबा घेतलाच होता, यथावकाश मुले झाली, त्यांच्या मोठं होण्यातही माझा विशेष काही वाटा नव्हताच. तिने कधी या गोष्टीची तक्रार केली नाही, एकटीवर सारे पडते म्हणत कधी त्रागा नाही केला ना कधी आमचे भांडण झाले. संवादच नसेल तर विसंवाद तरी कुठून येणार होता म्हणा.  मेघनाने घर छान ठेवले, मुलांना शिकवले, संस्कार दिले त्यांना, नातेवाईक जपले. पुढे रोहित, वीणा शिकायला परदेशी गेले तेंव्हा कुठे पहिल्यांदा मला जाणवले हे सारे मेघनाचे कर्तुत्त्व आहे, त्या दोघांच्या मोठे होण्यात आपला पैसे देण्याखेरीज काही वाटा नाही. दोघांनीही तिथेच शिकत असताना आपापले जोडीदार निवडले ते ही असेच उच्चशिक्षित, सालस. मेघनाचा गाढ विश्वास होता तिच्या संस्कारांवर. तिचा पाठिंबा होताच, सारे कसे छान सुरळीत चालू होते. पण मी त्यात कुठेच नव्हतो."

"पण मी रिटायर झालो, आणि काही काळ तरी दिवसभराचा मला घरात घालवावा लागू लागला. म्हणजे तसे पर्वती, सिंहगड, बुद्धिबळाचा अड्डा हे होते पण तरीही.  नकळत का होईना मेघना दिवसभर घरासाठी काय काय करते ते लक्षात येऊ लागले. मी साठीत पोहोचलो म्हणजे ती ही पंचावन्न ची होतीच की. सकाळी उठून योगासने, चहा नाश्ता, मग पेपर वाचन, थोडे बागकाम, देवपूजा, रांगोळी मग स्वैपाक, इतर आवाराआवर, मग दुपारी अंध शाळेत ती जात असे, तिथे लहान मुलांना गोष्टी सांग, लहान सहान गोष्टी करायला शिकवायला, तिथून परत आली की मग संध्याकाळचे चहापाणी मग एखादी मैत्रीणींबरोबर चक्कर, घरी येवून पुन्हा स्वैपाक, रात्री टी. व्ही पाहून झोप. पण या तिच्या दिनक्रमात मी स्वत:ला कुठे आणि कसे बसवावे हेच मला कळत नसे. जो काही संवाद आमच्यात होता तो फारच कामापुरता असे."

"तेव्हाच नेमका मी एकदा सकाळी पर्वतीहून येत असताना स्कूटरला एका गाडीने ठोकले आणि पाय फ़्रक्चर होऊन सलग चार महिने घरी बसून राहायची माझ्यावर वेळ आली.तेंव्हा माझे करणे हे अजून एक वाढीव काम तिच्यासाठी होऊन बसले. हे सारे करत असताना काय त्रास आहे हि तिची भावना कधीच नव्हती. तिच्यावर सारा भार पडत होता हे नक्की. मुलांचा फोन येत असे, माझ्यापाशीच कॉर्डलेस ठेवलेला असे पण तो उचलताच तिकडून "बाबा कसे आहात, पाय बारा आहे का आता असे विचारून लगेचच "जरा आईला फोन देता?" असे विचारत, तिच्याकडे फोन गेल्यावर मात्र पुढचा कित्येक वेळ त्यांच्या गप्पा चालत. कुठेतरी दुखावला जात असे मी. पण त्या काळात झाले असे की सक्तीच्या विश्रांतीने मी या घराकडे, मेघनाकडे एकंदरीतच तिच्या घर आणि मुले यांच्यातील गुंतवणुकीकडे पाहू लागलो.  हळू हळू लक्षात येवू लागले की घर उत्तम रितीने सांभाळत तिने आपले एक वेगळेच विश्व निर्माण केले आहे. ज्यात तिचे पुस्तक भिशीचे ग्रुप्स आहेत, अंध मुलांची शाळा आहे. मी पुरता नास्तिक - कळता झाल्यापासून कधी मी देवाला हात जोडले नव्हते, पण मेघनामुळे घरात देव होते, त्यांची रोज पूजा होत असे, घराच्या बागेतली फुले त्यांच्यासाठी असत, दारात आमच्या रांगोळी असे, सांजवात कधी चुकत नसे. दिवसेंदिवस मला तिच्या या सगळ्या गोष्टी इतक्या जीव लावून करणाऱ्या स्वभावाचेच कौतुक वाटू लागले, आणि कुठेतरी खंत देखील, की हे विश्व आपले होते आणि आपण आपल्या हेकटपणाने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलो."

"पण याच जाणीवेने आमच्या दोघातला संवाद कुठेतरी पुन्हा जुळून येऊ लागला. मेघनानेही हा माझ्यातला बदल लक्षात घेत मनापासून साथ दिली आणि साठीला पोहोचता आमचे खऱ्या अर्थाने सहजीवन सुरु झाले. मेघना सोबतचे दिवस खरंच माझ्या आयुष्यातला एक अमुल्य ठेवा  आहे, ज्याने मला खूप समृद्ध केले. सकाळी पहिला चहा बनव, बागकाम कर, देव पूजेसाठी फुले ठेव, घराबाहेर पडताना आवर्जून बाहेरून काही आणायचे आहे का ते विचारून घेऊन ये, दर रविवारी आठवड्याची भाजी आण अशी अनेक छोटी छोटी कामे करण्यात मी रस घेऊ लागलो. तिच्यासाठी महत्त्व मी ती कामे करण्याचे नव्हतेच तर एकमेकांसोबत, एकमेकांसाठी ही कामे करण्याचे होते."

"अर्थात हे फार काळ नशिबी नव्हतेच, कारण त्यानंतर जेमतेम ३ वर्षांनी तुझ्या मावशीला कॅन्सर झाला. जिने इतक्या कष्टाने हे घर, ही माणसे घडवली तिच्या अखेरच्या काळात तिला थोडेतरी आनंदाचे क्षण वाट्यास आले आणि ते मी देऊ शकलो हेच फार झाले." 

"आज ती नाहीये पण ती करत असलेली प्रत्येक गोष्ट तशाच पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तिच्या इतक्या चांगल्या नसतील जमत मला पण तरीही…. जसे तिने ठेवले होते तसे घर, जी जी कामे ती या घरासाठी तन्मयतेने करे ते प्रत्येक काम करण्याचा मी प्रयत्न करतो, आता कळले मावशी नसतानाही घरी बनवलेले कैरीचे पन्हे तुला इथे कसे मिळाले ते ?" 

"काका मी समजू शकते आता तुम्हाला नक्की काय वाटते ते. आता सोडून द्या पूर्वी काय घडले ते कटू विचार. तिच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे तुमच्या साथीने आनंदात गेली हाच आनंद तिच्यासाठी खूप असणार. मी निघू आता? काळजी घ्या"

असं म्हणून काव्या पाणावलेल्या डोळ्यांनी बाहेर पडली खरी, पण बाहेर पूर्वीसारखीच फुललेली  टवटवीत बाग पाहताच चेहऱ्यावर पसरलेले एक हसू घेऊनच. 

4 comments:

  1. आभार गं मोहना!

    ReplyDelete
  2. खूपच छान आणि अर्थपूर्ण !!!

    ReplyDelete
  3. धन्यवाद आनंद!

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!