Friday, June 22, 2012

समवेदना - समं वेदयेमहि| निरामया: वर्तेमहि ॥



बराच काळ लोटला आहे तसा, जेंव्हा प्रथम मी समवेदनाबद्दल सर्वप्रथम साप्ताहिक सकाळ मध्ये वाचले होते. म्हणजे जवळपास ९ वर्ष झाली. या संस्थेच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मी तिच्याशी जोडलेली आहे. एखादे मोठे कार्य कसे उभे राहते हे ही मला यामुळे पाहता आले. डॉ. चारुदत्त अच्युत आपटे हे पुण्यातील प्रख्यात मेंदू रोग तज्ञ आहेत. घरात परंपरेने चालत आलेला समाजकार्याचा वसा त्यांनीही पुढे नेणेच पसंत केले व यातूनच "समवेदना" जन्मास आली. सुरुवातीस फक्त या रोगांनी पिडीत आर्थिक दृष्ट्या (खरोखर) गरजू रुग्णांवर उपचार "समवेदना" मार्फत केले जात असत. ज्याचा पसारा आता वाढून आता तो त्वचा बँक, कर्करोग या पर्यंत पोहचला आहे.
आज सकाळ मध्ये याबद्दल पुन्हा एकदा माहिती लिहून आलेली पहिली आणि सहजच वाटून गेले की ही माहिती आपल्यासारख्या काही लोकांपर्यंत पहोचवावी. खरोखर या बातमीत लिहिल्याप्रमाणे दरवर्षी मला माझ्या निधीचा विनियोग कसा केला हे विस्तृत माहितीसह एका पत्राद्वारे कळवले जाते. खरंतर एकदा मी माझा  ठराविक निधी त्यांना दिला की नंतर इतक्या विस्तृत माहितीची अपेक्षा नसते. मुळातच योग्य हाती निधी सोपवला आहे याची खातरजमा यापूर्वीच झालेली आहे. माझ्यासारखा विचार करणारे अनेक जण असतील. पण म्हणून "समवेदना" आपला पारदर्शी कारभार सोडत नाही. त्यांच्या वार्षिक अहवालावर नजर टाकली तर सहज हे लक्षात येते. 
खरंतर मला इच्छा आहे, निधी शिवायही काही मदत "समवेदना" स करण्याची. पुढे मागे जर मी नोकरी सोडून एखाद्या समाजकार्यास वाहून घायचे ठरवले तर "समवेदनाचे " नाव अगदी वर असेल.  पण सध्यातरी ते वेळेअभावी ते शक्य होत  नाही. पण मी मलाच समजावते की समाजकार्य फक्त वाहून घेतलेल्या लोकांमुळेच फक्त साध्य होत नाही, तर भक्कम आर्थिक पाठबळ ही तितकेच गरजेचे!!! खूप मनापासून मला आपणा सर्वांना आवाहन करण्याची इच्छा आहे, की जर आपण अशा एखाद्या संस्थेच्या पाठी उभे राहू इच्छित असाल व आपला खारीचा वाटा उचलू इच्छित असाल  तर या संस्थेचा जरूर विचार करावा. 
For E-transfers-
Union Bank of india, karve road branch, S/b Account No.- 37000201090 2648 for indian passport holders & Account No.- 37000201090 0967 for foreign passport holders.
IFSC Code- UBIN0537004 In case you are making E-transfers please send a mail to samavedana@gmail.com


Monday, June 18, 2012

मनातलं आकाश

आकाशाचं आणि आपलं नातं तसं जुनंच. अगदी लहान असतो तेंव्हा एक एक छंद असतात. वाड्याच्या मोठ्या अंगणात या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत जायचे आणि चंद्र पण आपल्याबरोबर पळतो का ते पहायचे. अर्थात प्रत्येक वेळी तो तसा पळतो असेच वाटते . मग खूप राग येतो आणि मी ओरडायची त्याच्यावर, "तू पळू नको माझ्याबरोबर, एका जागी बसून राहा." पण ऐकायचा नाही तो माझे काही. जवळपास ५/६ वर्षाची होईपर्यंत हा खेळ चालू असे.

त्याच सुमारास माझी पणजी गेली. मला तिची खूप आठवण येत असे. देवाकडे गेलेली माणसे आपल्याला देवळात का दिसत नाही असा कायम मला प्रश्न पडे. मग कोणीतरी मला सांगितले की देवाकडे म्हणजे आकाशात जातात माणसे. मग मी माझी समजूत करून घेतली की चांदण्या म्हणजे ती माणसे असतात. मग या कल्पनेचा अजून विस्तार होऊ लागला जसे की ती माणसे आपल्याकडे पाहतात. काळे ढग म्हणजे राक्षस असतात, पांढरे ढग म्हणजे देवाचे सैन्य असते. या दोन ढगांमध्ये युद्ध होते. मग मी खूप वेळ अशी ढगांची हालचाल बघत बसे. सुट्टीत आजी कडे जात असू, तेंव्हा अंगणात पडल्या पडल्या रात्री आजोबा नाहीतर मामा आम्हा सर्व भावंडाना " तो बघ सप्तर्षी" " ते मृग" असे दाखवत असे.

नंतर कधीतरी कोणीतरी मला सांगितले, की आकाशातून पडणारा तारा पहिला की आपलं जवळचं माणूस आपल्याला दुरावतं. अगदी लहान नव्हते तेंव्हा, तरी विश्वास ठेवला होता त्यावर मी. (जसा पापणीचा एखादा केस गालावर पडला, तर मुठीवर ठेवून काहीतरी मागण्याचा प्रकार मी अजून ही कधी कधी करते). असंच एकदा कधीतरी माझं माझ्या आईशी भांडण झालं होतं. कोणाशी भांडण झालं की मग मी त्या व्यक्तीबरोबर बोलणं बंद करते पुढचे काही दिवसतरी, किमान माझा राग शांत होईपर्यंत. तर असा आमच्या दोघींमधील अबोला चालू होता. रात्री जेवणानंतर, मी, माझी बहिण आणि शेजारच्या काकू फिरायला गेलो होतो. चालता चालता लक्ष आकाशाकडे गेलं, आणि एक तारा निखळताना दिसला. मी मनातून हादरले. त्या दोघीना म्हटलं चला बास फिरणं, आपण परत जावूया. आपण आईशी बोलत नाही आहोत, आणि तारा पडताना पहिला या दोन्ही गोष्टी एकत्र करून मी इतकी अस्वस्थ झाले, घरी पोहचले, तोपर्यंत रडूच फुटले. आई झोपली होती. तिला उठवून, म्हटलं "आई सॉरी, मी तुझ्याशी पुन्हा कधी भांडणार नाही". तिला काही कळले नाही मनात काय आधी घालमेल झाली होती ती. मग कॉलेजचे दिवस आले आणि हिंदी सिनेमांचेपण! मग त्यांनी ज्ञानात भर घातली " किसी टूटते हुए तारे को देखो, और कोई मन्नत मांगो, तो वो पुरी हो जाती है" शाहरुख खानच्या तोंडचा डायलॉग. हाहाहा...... आता नक्की काय खरं होतं यातलं? त्याचवेळी कधीतरी आकाशात काळे ढग जमा झालेले आवडायला लागतात, आणि मन "काली घटा छाए मोरा, जिया घबराए" असं म्हणत येणाऱ्या कोणाची वाट पाहू लागते.
दिवस सरतात, आपण बदलतो, कधीकधी मग ढग मनात दाटू लागतात, आणि डोळ्यांमधून बरसात सुरु होते. आकाश तेवढंच जवळचं वाटत राहते पण मग एक आकाश मनालाच व्यापून उरते. खऱ्या आकाशाकडे लक्ष जाणे कमी होतं. मनातल्या आकाशातच कधी पौर्णिमा असते, कधी आवसेची रात्र उतरते. कधी निरभ्र स्वच्छ आभाळ तर कधी गच्च दाटून आलेले ढग. अशातच कधी पौर्णिमेचा चंद्र खिडकीमागच्या आंब्याच्या झाडातून खोलीत उतरू पाहतो. हलकेच मला जागं करून जातो, गवसलेले काही पुन्हा मिळवल्याचा आनंद देवून जाण्यासाठी.


"तुका आकाशाएवढा" तर पाहिलेला नसतो, पण आकाशा एवढी मोठी माणसे आसपास आहेत हे जाणवू लागते. अनेक गोष्टींमधील अथांगता जाणवू लागते. जाणीवा बदलतात, त्या व्यापक होतात. परवा माझ्या ऑफिसमधील एका सिनियर व्यक्तीशी बोलत होते. ते म्हणाले " आपल्यासारख्या जाणीवा असलेली व्यक्ती भेटली, की बरे वाटते, आणि आयुष्यात काहीतरी उणीव असल्याशिवाय जाणीवा तितक्या खोल असत नाहीत." सोप्या सरळ शब्दात किती अर्थ व्यापलाय ना?






Friday, June 15, 2012

लखलख चंदेरी तेजाची..............


ऑफिस मधून घरी जाण्याच्या माझ्या वाटेवर काही मंगल कार्यालये आहेत. तिथे शक्यतो संध्याकाळी होणारी लग्ने होताना दिसतात. ऑफिसच्या परिसरात  सारे गुंठा-मंत्री राहत असल्यामुळे साधारण तिथे होणारी लग्ने पण तशाच प्रकारची असतात. असंख्य गाड्या रस्त्यावर असतात, जवळपास सगळ्या स्पेशल नंबर गाड्या. त्यामुळे त्या योग्य रीतीने  पार्क करणे वगैरे काही भानगड नाही. माणसाची मस्ती त्याच्या अनेक वस्तूंमधूनही व्यक्त होत असते. लग्नाच्या थोडे आधी तुम्ही तिथून जात असाल तर वैताग येतो. घोड्यावरून जाणारा नवरदेव, समोर आपल्याच बापाचा रस्ता आहे असे समजून नाचणारे लोक. मोठ्या स्पीकरच्या भिंती मधून गाणे ऐकू येत असते " मै परेशान" किंवा ऊ ला ला ? अरे देवा ! काय गाणी आहेत ही?  अनेकदा मला प्रश्न  पडतो " या घोड्यावर  बसलेल्या  गाढवाला  इतकंही कळू  नये की आपल्या आयुष्यातील सर्वात  महत्वाच्या दिवशी  आपण (मनातल्या मनात का होईना ) लोकांच्या  शिव्या खात आहोत."  त्यामुळे अर्थातच ट्राफिक जॅम ही ओघाने आलेच. पण जर लग्न लागून गेलेले असेल तर मात्र  हा ट्राफिक जॅम मला अगदी मनापासून आवडतो. अगदी घरी जायला उशीर होत असला तरी. 
कमाल आहे! हिंजवडी आय टी पार्क मधून संध्याकाळी बाहेर जाणारा प्रत्येक जण ट्राफिक जामवर वैतागलेला असतो, आणि मी म्हणे मला तो आवडतो??? आय टी वाले मला वेड्यात काढतील! पण खरंच जर त्या रस्त्यावर एखादे लग्न लागून गेले  असेल आणि जर त्यामुळे ट्राफिक जाम होत असेल तर मला खूप आवडते. त्याचे कारण म्हणजे लग्न लागल्याबरोबर आकाशात होणारी आतषबाजी. जरी मी दर वर्षी दीपावलीत लोकांना " गो ग्रीन " असा सल्ला देत असले तरी मला अगदी मनापासून ही आतषबाजी आवडते. आवाज करणारे फटाके जरी कधीच आवडले नाहीत तरी शोभेची दारू मात्र यास अपवाद. जशी नववर्षाच्या स्वागतास जगभर केली जाते.  सारं काही विसरून मी ती पाहत राहते. ते रंग, ती आकाशातून खाली उतरणाऱ्या चांदण्या इतका आनंद देतात. अगदी लखलख चंदेरी तेजाची  दुनियाच ती. भान हरपून मी ती पहात राहते. चांदण्या आकाशात विरू लागल्या की  ते क्षण घट्ट हाती पकडून ठेवावेसे वाटतात.
मधे एका रात्री असेच घडले. IPL चे दिवस होते ते. त्या दिवशी पुणे v s मुंबई चालू  होती  मी जेंव्हा घरी पोचले तेंव्हा. मी IPL पहात नव्हते पण एव्हढी जुजबी माहिती असते मला. रात्री अचानक झोपेतून फटाक्यांच्या आवाजाने जाग आली. मी थोडा पडदा बाजूला सरला आणि बसल्या जागेवरून होणारी आतषबाजी पाहू लागले. जवळपास सलग एक तास आकाशात सुंदर मनोहारी दृश्य दिसत होते. त्याने  आकाशच  नव्हे तर माझ्या मनालाच उजळवून टाकले होते. मनात एकदाच विचार आला पुणे जिंकले वाटते. इतके त्या आतषबाजीने वेड लावले की रात्री १ वाजेपर्यंत असे कोण फाटके वाजवेल असाही प्रश्न मला पडला नाही.    
तशी तेजाचा कवडसा वाटेल अशी उजळवून टाकणारी कोणतीही गोष्ट मन प्रसन्न करतेच. तो सूर्य असो पौर्णिमेचा चंद्र असो वा द्वितीयेची कोर वा असो शुक्राची चांदणी.  लक्ख घासून नुकतीच लावलेली समयी असो, संध्याकाळी लावलेले निरंजन, किंवा औक्षणासाठी लावलेल्या दोन ज्योती असोत, दिवाळीचे आकाशकंदील असोत, की पणत्यांची रांग असो, गंगेच्या पात्रात पानांवर सोडलेले दिवे असोत. इतकंच काय जेंव्हा देवासमोर रांगोळी रेखाटते, तेंव्हा त्यात काढलेला दीप असो. असं वाटतं की त्यातून असंख्य प्रभा फाकल्या आहेत आणि आणि त्यांच्या प्रकाशात सारं जीवन अवघं उजळून गेलं आहे.

फसलेला............नाही, नाही. जमलेला प्रयोग!

स्वयंपाक करू लागण्याचे नवीन दिवस होते ते. एका सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी घरचे बाकी ३ मेम्बर्स बाहेर आणि मी एकटी घरी. आपोआप रात्रीच्या जेवणाची जबाबदारी माझी. नेहमीचा स्वयंपाक विशेष येत नव्हता तरी, छोले-पुरी, पावभाजी, आलूपराठे, रगडापुरी, चाट, इडली, डोसे असे पदार्थ मला करता येत असत. पण तेच तेच किती वेळा करून खावू घालणार ना? म्हणून नेहमीचा स्वयंपाक करण्याचे ठरविले. भात, फुलके, भाजी आणि कोशिंबीर. यात फार काही प्रॉब्लेम नव्हता. प्रश्न होता तो आमटीचा. घरात बाकी तिघाना चिंच-गुळ घालून केलेली कांद्याची आमटी खूप आवडते. ("आमटी कशी अमृततुल्य चवीची हवी!"  :P). पण मला तशी आमटी अजिबात आवडत नाही. काहीतरी प्रयोग करणे भाग होते.

शेवटी डाळ भाताचा कुकर लावला आणि फ्रीज उघडला. मिरची, कोथिंबीर, ओला नारळ होताच. लक्ष गेला दरवाज्याच्या कप्प्यात असलेल्या मसाल्यांच्या डब्यांकडे. म्हटलं करू काहीतरी. डाळीची कांदा, चिंच गुळ, थोडी धनाजीरा पावडर घालून आमटी करून घेतली, उकळी आल्यावर त्यात थोडा थोडा मसाला घालत गेले. पावभाजीचा, छोल्यांचा, राजवाडी,बिर्याणीचा. नारळ कोथिंबीर घालून आमटी तयार!! इतका मस्त वास दरवळत होता घरात! तरीही डोक्यातले, यात अजून काय करता येईल याचे विचार थांबले नव्हते.

नवरा बाहेरून आल्या आल्या त्याने विचारले " काय बेत आहे? मस्त वास येत आहेत किचन मधून?" म्हटलं थांब आणि बघ. जेवायची पाने घेता घेता, छोट्या कढल्यात साजूक तूप गरम करत ठेवले, त्यात, पुन्हा जिरे, कढीपत्ता आणि २/३ लाल मिरच्या घालून फोडणी केली आणि आमटी वर ओतली. आहा...काही तरी मस्त रेसिपी जमून आली आहे याची खात्री पटली. जेवताना सगळ्यांनाच ती खूप आवडली. काय विशेष/ वेगळे केले आहे असं विचारल्यावर सांगून टाकलं कोणकोणते मसाले घातले ते. त्यावर माझे सासरे म्हणाले " नशीब! तो चहाचा मसाला तुझ्या तावडीतून सुटला!"............आणि यावर एकाच हास्यकल्लोळ झाला.

Thursday, June 14, 2012

नमनाला घडाभर तेल .......

मला लहानपणी शाळेतली प्रयोगशाळा खूप आवडत असे. विशेषत: chemistry ची lab . नशिबाने तिथे सदैव राहणे जमले नाही. तरीही मी नेहमी म्हणते, माझं किचन ना ते किचन नाही ती माझी प्रयोगशाळा आहे. जिथे मी रमते आणि मनापासून माझे प्रयोग चालू असतात. पदवीधर झाल्या झाल्या लग्न केलं तेंव्हा ना धड गोल पोळ्या सुद्धा लाटता येत नसत मला. पण स्वत:चा असं एक किचन मिळालं आणि माझा तेथे मुक्त वावर सुरु झाला. इतके म्हणून मी येथे प्रयोग केलेत ......अनेक यशस्वी, अनेक अयशस्वी, पण माझ्यासाठी ते फक्त प्रयोग नसतात. ते माझं घडणं असतं.

या ब्लॉगमधून मी शेअर करणार आहे हाच माझा प्रवास. स्वैपाकघरात काहीही फारसं न येण्यापासून आता स्वघोषित "बेस्ट कूक" पर्यंतचा.
माझं किचन हे म्हणजे माझं एक स्वत:चं राज्य आहे, जिथे फक्त माझाच अंमल चालतो, जिथे इतर कुणाला फारशी लुडबूड करायला फारसा वाव कधी मिळत नाही. अनेक किस्से घडतात येथे, अनेक कौतुकाचे क्षण अनुभवलेत मी माझ्या या चिमुकल्या विश्वात, अनेक फसलेल्या प्रयोगातून मी काही तरी नवीन घडवलंय, कधी तरी एखाद्या रुसलेल्या पाककृतीने मला रडवलं देखील आहे. माझ्या करीअर इतकीच दुसरी समाधान देणारी दुसरी कोणती गोष्ट असेल तर ते माझं किचन. या विषयी बोलत राहीनच यापुढे...........

चलो एक बार फिरसे....................

आजकाल अधून मधून लेकीचं बौद्धिक घ्यावं लागतं, अनेकदा विषय असतो ती आणि तिच्या मैत्रिणी. अनेक माझे सल्ले तिला पटतच नाहीत. ते वयच असं असतं ना. आपणही गेलेलो असतो त्यातून, आईशी भांडलेलो असतो. "काय बोलायचं ते मला बोल, तिला नावे ठेऊ नको" हा आवडता डायलॉग असतो. आपली मैत्री म्हणजे एकदम जगावेगळी, ग्रेट असे भ्रम जपत आपण ती फुलवत असतो. मैत्रीण किंवा मित्र या शब्दाला लहानपणी कसलं खास महत्व असतं ना. अनेकदा मी स्वत:लाच बजावते, तिला तिच्या अनुभवातून शिकू देत. चांगलं काय वाईट काय तिचं तिला ठरवू देत. पण पिढी दर पिढी असंच होत असावं.


लहानपण पुण्यातल्या एका वाड्यात गेलेलं. त्यामुळे तिथे भरपूर बच्चे कंपनी . शिवाय आजूबाजूच्या वाड्यांमधील पण जमा होत असत. त्याकाळी त्यावर काही बंधन नसे. पण या सगळ्या मुलामुलींमध्ये तेंव्हा मला एकाच मित्र वाटत असे. त्याचे नाव पराग. आम्ही दोघं एकाच वयाचे होतो. कधी अभ्यास मात्र बरोबर करत नसू. सगळेजण मला सतत त्याचे उदाहरण देत " बघ, तो किती अभ्यास करतो" . मला काही त्याने फरक पडत नसे. एकदा उन्हाळ्यातल्या दुपारी आम्ही दोघे बर्फाचा गोळा खात होतो. त्याचे घर पहिल्या मजल्यावर होते. तो गोळा खात वर गेला. घराच्या सज्जातून खाली डोकावला, आणि खाली रस्त्यात पडला. त्याची आई म्हणजे इन्ना संचेती हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असे त्या काळी. या बाबाला तिथे ठेवले एक दिवस, तर हा तिथे ही अभ्यास करत होता. आणि बोलणी मी खात होते. तरीही तो माझा चांगला मित्र होता.


शाळेतही काही मैत्रिणी होत्या. पण घट्ट मैत्रीण म्हणावी अशी एकच होती. खरंतर आमच्यामध्ये काहीच समान नव्हतं आणि तरीही आम्ही मैत्रिणी होतो. तिची अजून पण एक मैत्रीण होती. खरंतर त्या दोघी खूप सारख्या होत्या, घर,पैसा, अभ्यास यामध्ये. अधूनमधून आमची भांडणे पण होत असत. बऱ्याचदा भांडणाचे खरे कारण ती तिसरीच असे, पण तसे बोलून दाखवता येत नसे. शाळा सुटली, तरी मैत्री तशीच राहिली ती अगदी कालपरवा पर्यंत. बदलत्या आयुष्याने आमचे नाते नाही बदलले. काळ सरला, बरेच पाणी वाहून गेले. आयुष्यभर नाती जशीच्या तशी राहत नाहीत याचा साक्षात्कार कधीतरी कोणालातरी व्हावाच लागतो. आजही मैत्री या नावाबरोबर हीच फक्त दोन नावे ओठी येतात. काळाच्या ओघात काही दिवसच सरत नाहीत फक्त, माणसेही बदलतात, त्यांचे विचार, त्यांची मुल्ये बदलतात.


"एकला चलो रे" हेच बरे वाटू लागते. अनेक नाती काळाच्या कसोट्यांवर तपासून पाहू नयेत असे वाटू लागते, भीती वाटते, नव्या बंधांची, नव्या नात्यांची. आहेत ती पण घट्ट धरून ठेवण्याचा अट्टाहास नको वाटतो. माणसे कारणपरत्वे आयुष्यात येतात, तशीच जातातही. एखादी व्यक्ती जितके दिवस आपल्याबरोबर आहे तितके दिवस आनंदात घालवावे. साहिरच्या ओळी मला म्हणूनच फार भावतात. कमीत कमी शब्दात जीवनाचे सार सांगतो साहीर.


तार्रुफ रोग हो जाये तो उसको भुलना बेहतर
तालुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा
चलो एक बार फिरसे....................




Tuesday, June 12, 2012

सोनार की चोर????

सोन्याचांदीचे व्यापारी म्हणजे पक्के चोर अशी माझी ठाम समजूत आजकाल व्हायला लागली आहे. एका सोनाराकाडील सोने दुसऱ्याच्या दृष्टीने कधीच चोख सोने नसते. जुना दागिना घेवून नवीन काही घडवायला जावे तर जे काही अनुभव येतात की विचारू नका. असाच एक नुकताच घडलेला किस्सा-



रोज वापरायचे एक मंगळसूत्र. दोनतीन वेळा त्याची तार तुटली म्हणून दुरुस्त करून वापरत होते. परवा पुन्हा एकदा तार तुटली, मग विचार आला आता नवीनच करूया. आधीचं मंगळसूत्र पुण्यातल्याच "रांका ज्वेलर्स" कडून घेतलं होता, पण आजकाल चिंचवड मध्ये गाडगीळांच्या दुकानातूनच खरेदी होते. म्हणून आधी तिथे गेले. त्यांनी सांगितला "२०% घट जाईल" मी त्यांना विचारलं " काय जगात फक्त तुम्हीच शुद्ध सोने विकता का?" अर्थात असे प्रश्न ऐकून त्यांना काही फरक पडत नाही हे माहित होतेच. म्हणजे पुन्हा रांका कडे जाणे आले. तिथे गेले. लहान मंगळसूत्र घ्यायचं आहे, पण माझ्या कडे माझं आधीचं आहे ते मोडून, असे सांगितले. "आमच्याकडचाच दागिना आहे, म्हणजे काही घट जाणार नाही" असे त्यांनी सांगितले. लगेच त्यांनी वजन करून काळे मणी त्यातले काढून, उरलेले सोने तापवून सोन्याची किंमत सांगितली, जी तशी योग्य होती. मी नवीन पसंत केले, जे आधीच्या पेक्षा वजनाला जास्त होते, मी किती रक्कम द्यायची ते विचारले. आजकाल सर्वत्र डेबिट/क्रेडीट कार्ड घेतले जाते, पण सोनाराच्या दुकानातले आधीचे अनुभव लक्षात घेता, मी विचारले "कार्ड पेमेंट चालेल ना?" उत्तर आले " हो, पण आम्ही त्यावर १.५% जास्त घेतो. पण तुम्ही कॅशिअर ला विचारा." " अहो ते गाडगीळ सुद्धा कार्ड पेमेंट्चे चार्जेस घेत नाहीत, तुम्ही काय घेता" त्यावर उत्तर आले " ते नसतील घेत, पण आम्ही घेतो"(पुण्याला नावे ठेवायला मला आवडत नाहीत तरी..."किती हा पुणेरीपणा?") मी म्हटलं " जर हा तुमचा नियम असेल तर मी कशाला जावून विचारू, माझ्याजवळ इतकी रोख रक्कम नाहीये" पण त्या सेल्समन ने आग्रह केला म्हणून गेले. तिथेही तेच उत्तर मिळाले. मी सांगितलं "मला, काही घ्यायचं नाही जास्तीचे १.५% देवून, माझ्या जुन्या सोन्याच्या किमतीची वेढणी द्या मला" असं चार लोकांसमोर कॅश काऊनटर वर म्हंटल्यावर त्याने सेल्समन ला बोलावून विचारले " किती पेमेंट आहे यांचे? " त्यावर १.५% आकारू नका."


तो पर्यंत लक्षात आले की आधीचे मंगळसूत्र २३ कॅरेट चे होते पण त्यातल्या वाट्या-मणी २२ कॅरेटचे, पण किंमत करताना २२ कॅरेट नेच केली आहे. तसं मी म्हंटल्यावर त्याने पुन्हा हिशोब करून रक्कम सांगितली, ज्यामुळे जवळजवळ ६०० रु.चा फरक पडला. मला खात्री आहे जर ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात नसत्या आल्या तर या खरेदीत माझे किमान १२०० रु.चे नुकसान झाले असते. प्रश्न पैशांचा नाही तर सोनारांकडून होणाऱ्या लुटीचा आहे

Saturday, June 9, 2012

मागे वळून पाहताना .......


परवा एका मित्राशी फोनवर बोलताना तो म्हणाला " बरेच दिवस काही लिहिलं नाहीयेस, एकपण नवीन पोस्ट नाही ब्लॉगवर तुझी". आणि एकदम चमकून मी विचारलं, "तू इतक्या नियमित माझा ब्लॉग वाचतोस?" माझ्या लक्षातच आलं नव्हतं की असे किती जण आपला ब्लॉग वाचत असतील, जरी त्यांनी काही प्रतिक्रिया नाही दिल्या तरी. तसा हा ब्लॉग मी सुरु करून बरीच वर्षे झाली आहेत पण खऱ्या अर्थाने मी मनातलं यावर उतरवायला सुरुवात केली ती मागच्यावर्षी. जूनच्या दुसऱ्या शनिवारी झालेल्या एका परीक्षेनंतरचा निवांत वीकेंड....आणि मी लिहिती झाले. अनेकदा मी म्हणते तसे हे शब्दांचे खेळ. छोट्याशा मनोगताला भलीमोठी शब्दांची आरास. उद्या जूनचा दुसरा शनिवार, माझ्या टीममधील एकीची उद्या तीच परीक्षा आहे, तिला शुभेच्छा दिल्या आणि मला आठवले की खऱ्या अर्थाने येत्या रविवारी आपला ब्लॉग ही एक वर्षाचा होईल.
या एक वर्षात, या ब्लॉगने मला व्यक्त व्हायला मदत केली. मी नेहमी म्हणते की आजूबाजूला अनेक जण, अनेक नातेवाईक, मित्र मंडळी जरी असली तरी प्रत्येक वेळी ते सर्व "माझिया जातीचा" या सदरात मोडतातच असे नाही, त्यामुळे तो शोध तसा कायमच असतो. पण हा ब्लॉग माझी मनातलं काही सहज मांडायची गरज पूर्ण करतो. तशा अर्थाने ही माझी डायरीच.......कोणालाही वाचायची परवानगी असलेली. त्यामुळे सुरुवातीला तो कोणी वाचतो की नाही याची मी फारशी दखल घेत नसे. पण नंतर लक्षात आले की माझ्या ओळखीतले अनेक जण तो वाचतात. प्रतिक्रिया पण देतात. कधी प्रत्यक्ष भेटीत, किंवा फोनवर आवर्जून तसं सांगतात ही.  अशा प्रतिक्रिया तुमचा उत्साह वाढवतात हे मात्र खरं. असा हा,  माझे, मला" असलेल्या ब्लॉगने संवादाचा ही सेतू बांधायला सुरुवात केली. 
संवाद संपला की नाती संपतात, म्हणूनच मला जापायचा आहे हा सेतू, हे नातं. संवाद संपला की सारे जगणेच रुक्ष कोरडे होवून जाते. म्हणूनच "आपुला हा संवाद आपणाशी" असाच चालू राहो.