Tuesday, June 12, 2012

सोनार की चोर????

सोन्याचांदीचे व्यापारी म्हणजे पक्के चोर अशी माझी ठाम समजूत आजकाल व्हायला लागली आहे. एका सोनाराकाडील सोने दुसऱ्याच्या दृष्टीने कधीच चोख सोने नसते. जुना दागिना घेवून नवीन काही घडवायला जावे तर जे काही अनुभव येतात की विचारू नका. असाच एक नुकताच घडलेला किस्सा-



रोज वापरायचे एक मंगळसूत्र. दोनतीन वेळा त्याची तार तुटली म्हणून दुरुस्त करून वापरत होते. परवा पुन्हा एकदा तार तुटली, मग विचार आला आता नवीनच करूया. आधीचं मंगळसूत्र पुण्यातल्याच "रांका ज्वेलर्स" कडून घेतलं होता, पण आजकाल चिंचवड मध्ये गाडगीळांच्या दुकानातूनच खरेदी होते. म्हणून आधी तिथे गेले. त्यांनी सांगितला "२०% घट जाईल" मी त्यांना विचारलं " काय जगात फक्त तुम्हीच शुद्ध सोने विकता का?" अर्थात असे प्रश्न ऐकून त्यांना काही फरक पडत नाही हे माहित होतेच. म्हणजे पुन्हा रांका कडे जाणे आले. तिथे गेले. लहान मंगळसूत्र घ्यायचं आहे, पण माझ्या कडे माझं आधीचं आहे ते मोडून, असे सांगितले. "आमच्याकडचाच दागिना आहे, म्हणजे काही घट जाणार नाही" असे त्यांनी सांगितले. लगेच त्यांनी वजन करून काळे मणी त्यातले काढून, उरलेले सोने तापवून सोन्याची किंमत सांगितली, जी तशी योग्य होती. मी नवीन पसंत केले, जे आधीच्या पेक्षा वजनाला जास्त होते, मी किती रक्कम द्यायची ते विचारले. आजकाल सर्वत्र डेबिट/क्रेडीट कार्ड घेतले जाते, पण सोनाराच्या दुकानातले आधीचे अनुभव लक्षात घेता, मी विचारले "कार्ड पेमेंट चालेल ना?" उत्तर आले " हो, पण आम्ही त्यावर १.५% जास्त घेतो. पण तुम्ही कॅशिअर ला विचारा." " अहो ते गाडगीळ सुद्धा कार्ड पेमेंट्चे चार्जेस घेत नाहीत, तुम्ही काय घेता" त्यावर उत्तर आले " ते नसतील घेत, पण आम्ही घेतो"(पुण्याला नावे ठेवायला मला आवडत नाहीत तरी..."किती हा पुणेरीपणा?") मी म्हटलं " जर हा तुमचा नियम असेल तर मी कशाला जावून विचारू, माझ्याजवळ इतकी रोख रक्कम नाहीये" पण त्या सेल्समन ने आग्रह केला म्हणून गेले. तिथेही तेच उत्तर मिळाले. मी सांगितलं "मला, काही घ्यायचं नाही जास्तीचे १.५% देवून, माझ्या जुन्या सोन्याच्या किमतीची वेढणी द्या मला" असं चार लोकांसमोर कॅश काऊनटर वर म्हंटल्यावर त्याने सेल्समन ला बोलावून विचारले " किती पेमेंट आहे यांचे? " त्यावर १.५% आकारू नका."


तो पर्यंत लक्षात आले की आधीचे मंगळसूत्र २३ कॅरेट चे होते पण त्यातल्या वाट्या-मणी २२ कॅरेटचे, पण किंमत करताना २२ कॅरेट नेच केली आहे. तसं मी म्हंटल्यावर त्याने पुन्हा हिशोब करून रक्कम सांगितली, ज्यामुळे जवळजवळ ६०० रु.चा फरक पडला. मला खात्री आहे जर ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात नसत्या आल्या तर या खरेदीत माझे किमान १२०० रु.चे नुकसान झाले असते. प्रश्न पैशांचा नाही तर सोनारांकडून होणाऱ्या लुटीचा आहे

5 comments:

  1. खरंय....हे कॅश घेऊन मग त्यावर स्वतः सरकारला कर भरत नसणार.....
    आणि घट हा एक सोनांराबरोबरचा सार्वत्रिक प्रश्न आहे...त्यांनीच निर्माण करून ठेवलेला.....सगळेच चोर.....घट नाही म्हणताना वजनात कापतील....

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. खरं आहे अपर्णा .

    ReplyDelete
  4. हि लूट फक्त सोनाराच नाही,सगळे दुकानदार करतात ...
    Actually ती swap machine असते ती दुकानदाराला बँक provide करते . त्यावर बँक 1.5% charge आकारते . पण दुकानदार ती स्वतः न भरता आपल्याकडून वसूल करतो.
    मी चष्म्याच्या दुकानातून चष्मा खरेदी केला होता. payment क्रेडीट कार्ड ने केले असता त्याने १.५% जास्त लागतील असे सांगितले, मी त्याला बोललो कि हा charge तर तुम्ही भरायचा असतो ना ?? तेव्हा हसून ते टाळले आणि without charge पैसे घेतले.
    "खरेतर जर आपण बँकेत तक्रार केली तर बँक ती machine जप्त करते आणि त्या दुकानदाराला blacklist करते."

    कृपया आपण कुणीही हि अतिरिक्त रक्कम भरू नये. दुकानदाराने विचारणा केल्यास त्याला जाब विचारावा.

    ReplyDelete
  5. हो अगदी बरोबर आहे. सोने मोड करताना सोनार खूप लुबाडणूक करतात

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!