Wednesday, July 4, 2012

कुछ मीठा हो जाये ....पूर्वी कधीतरी म्हंटल्याप्रमाणे खाणे आणि करून खाऊ घालणे या दोन्ही गोष्टी मी अगदी मनापासून करते, अगदी "दिलसे" ! त्याच प्रमाणे अजून एक त्यासंबंधी गोष्ट आवडते ते म्हणजे खाण्यावर बोलणे. माझ्या यापूर्वीच्या ऑफिस मध्ये एक मैत्रीण होती जी माझं हे खाण्यावरच बोलणं आनंदाने ऐकत असे आणि नंतर म्हणे " चल, फूड-कोर्ट मध्ये जाऊ, तुला भूक लागलीये". अजून एका मैत्रीणीला मला चिडवायला खूप आवडत असे, मग दर वेळी माझ्या डब्यातले खाताना, "तुझ्या स्वैपाकाच्या बाईंना सांग " पदार्थ छान झाला होता" असे म्हणून मला चिडवत असे आणि मग मी पण हो त्यांनीच केलाय असा तिला सांगत असे. एखादा आवडता पदार्थ म्हणजे मी त्याच्या रंग, रूप, स्वाद, सुवास याने वेडी होऊन जाते. या साऱ्या गोष्टी मग खूप वेळ मनात घर करून राहतात. कधी काही पदार्थांची मला आठवण होऊ लागते आणि जणू ते पदार्थ समोर आहेत, किंवा त्यांचा सुवास घरभर पसरला आहे असं वाटायला लागतं, असं घडायला लागलं की मग तो पदार्थ बनवावाच लागतो. अशा पदार्थांची माझी लिस्ट ही खूप मोठी आहे. उदा. गव्हाचा चीक, कणसाचा उपमा, गार्लिक ब्रेंड, किंवा पिझ्झा, व्हेज ऑग्रटीन, हळदीच्या पानावर केलेले काकडीच्या रसातले पानगे, नारळ, खवा घालून केलेले रव्याचे लाडू, उकडीचे मोदक करताना शेवटी बनवलेल्या निवगऱ्या, नारळाच्या दुधासोबत फणसाची सांदणे, पाकातल्या पुऱ्या, तांदळाच्या ओल्या फेण्या, फणसाची भाजी, ओल्या काजूची उसळ किंवा त्याची गरम मसाल्याची आमटी, दुधी हलवा, खरवस असे एक ना दोन .......


काही पदार्थांची काही खास कनेक्शन्स असतात, की एक पदार्थ समोर दिसला की हमखास दुसऱ्याची आठवण होतेच. जसे की, लोणी कढवायला ठेवले, आणि तूप होत आले, की त्या तुपाचाच नव्हे तर तव्यावरच्या पुरणपोळीचा दरवळ मला जाणवायला लागतो, आणि तेंव्हाच नाही फक्त तर नंतर चे २/३ दिवस जेंव्हा जेंव्हा त्या साजूक तुपाचा डबा उघडते, तेंव्हा तीच आठवण होते. पुरणपोळी ही कशी तर, एक बाजू भाजून उलटली, की मग भाजलेल्या बाजूवर लिंबाचा रस पसरवायचा, त्यावर एक पिठीसाखरेचा थर द्यायचा, आणि नंतर त्यावर तुपाची धार! तो पर्यंत दुसरी बाजू ही भाजून झालेलीच असते. पोळी तव्यावरून ताटात अलगदपणे, अगदी उलथने वगैरे सुद्धा लावायचे नाही तिला आणि अशी मऊसूत की प्रत्येक घास जणू विरघळत गेला पाहिजे! आहा हा .....सुख सुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं असू नाही शकत.

आंब्याचा सीझन आला की नुसती आमरस पोळी/पुरी खाण्यात मजा नाही. एकदा तरी पुरणपोळी तेंव्हा बनली पाहिजे घरी, हापूसचा रस आणि गरम तव्यावरची पुरणपोळी!!! या सीझन मध्ये एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळीच आंब्याचा रस काढून त्यात मिरपूड, मीठ घालून फ्रीज मध्ये गार करत ठेवायचा. जेवणात गरम फुलके, आमरस, बटाट्याची भाजी आणि सर्वात कळस म्हणजे गरम वाफाळता भात त्यावर तूप आणि वरण/आमटीच्या ऐवजी फक्त आमरस!!! सुट्टीच्या दिवशी यापेक्षा सुंदर जेवण नाही असू शकत!

धो धो कोसळत्या पावसाचा आणि आपल्या सुट्टीचा दिवस. सकाळी आरामात उठावे, लागोपाठ २/३ कप आले, गवती चहा घालून बनवलेला चहा पीत घरी येणारे सगळे पेपर त्यांच्या पुरवण्यांसह आरामात वाचून संपवायचे. नाश्त्याला मस्त पैकी बटाटेवडे, लसणाच्या चटणीसह, आणि अगदी सत्यनारायणाच्या प्रसादाला बनवतो तसा मस्त शिरा. असा नाश्ता झाला की मग बाकी काही करू नाही शकत आपण. दुलई घ्यायची, एखादं आवडेल असं पुस्तक आणि आपण बस्स..... एखाद्या संध्याकाळी, साधं पण छान जेवायचा मूड असेल तर मग पुलाव, मक्याच्या कणसांची नारळाच्या दुधात बनवलेली करी आणि बटाट्याचा पापड!

लक्षात येतंय का तुमच्या किती बोलतीये मी खाण्याबद्दल! खरंच खूप भूक लागलीये......काहीतरी खाऊन येते तोपर्यंत तुम्ही आज वरील पैकी काय बनवायचे ते  ठरवा  बरं.

3 comments:

 1. "आज कुछ मीठाकरें" असे योजून त्यावर हिंदीतून लिहावे असे योजूनही त्याऐवजी भक्तीभावपूर्ण मराठीतून बोलल्याकारणे आभार

  ReplyDelete
 2. Kitti Sundar lihilay tumhi! Me itkaa manapasun avdichya padarthaan badhaal prem vyaakta kartana khup divasaat konhala pahile nahiye...mhanjey swatahachya avdichya goshti saaglech saangtil pan itkaaaaa manapasun vyakta karna ki agdi vachnaryachya tondaala paani sutel..samor chitra kivva recipe chi garaj suddha nahi, tumcha utsaahach puresa ahe. Masta vatle vachun! Apli olakh asti tar apla nakkich chaan patla asta :) asa vatta maala.

  - Priti

  ReplyDelete
 3. धन्यवाद प्रिती. लिहिण्याचा उत्साह वाढवणाऱ्या प्रतिक्रियेसाठी!!! ओळख काय झाली ना आज, आत्ता इथे आपली, तू प्रीती, मी अनघा !!!!

  ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!