Tuesday, July 24, 2012

"शनिवारची सकाळ"


पु.लंच्या "वाऱ्यावरच्या वरातीत" जी "रविवारची सकाळ" आहे, त्या पासून अनेक घरांमधील लोकांना स्फूर्ती मिळत असावी असा माझा अंदाज आहे.

ती: या घरात ना मला एकटीला कान, डोळे आहेत, कारण सगळ्यांना न सापडणाऱ्या गोष्टी मलाच फक्त दिसतात. समोर वस्तू असते पण ती बाकीच्यांना दिसतच नाही. सकाळी इतक्या वेळा घराची बेल वाजते, पेपरवाला, दुधवाला, कचरेवाला, इस्त्रीवाला..... पण एकाला ऐकू येईल तर शपथ.... सारी कामे करत मीच एक आहे धावाधाव करण्यासाठी. एक सुट्टीचा दिवस, त्यादिवशी पण शांत झोपता येत नाही....कारण बेल वाजल्यावर कोणाला सुद्धा जाग येणार नाही माझ्याशिवाय ......
:
:
:
(हे सगळ्यांना ऐकू गेलेले आहे पण यावर घरात फक्त शांतता)
(पुढचा आठवडा, शुक्रवार संध्याकाळ)


तो: "बायको" (हे तिचे नाव?) तू उद्या सकाळी लवकर उठू नकोस. दुधवाला येईल तेंव्हा मी उठेन, नंतर मी चहा करेन, मग तू उठ... पण सकाळी साडे सातच्या आत उठायचं  नाही. सहा वाजता उठून मला चहा बनव असं म्हणायचं नाही.

ती: असं कसं? तू उठ न कधीतरी लवकर. 


तो: जमणार नाही. तुला आयता चहा मिळाल्याशी कारण.


ती: बर, बघू.

दुसऱ्या दिवशी सकाळचे साडेपाच वाजलेत...तिला नेहमीसारखी जाग आलीये. खिडकीपलीकडच्या आंब्यावर कोकीळेसह अनेक पक्षी साद घालत आहेत. ती थोडावेळ खिडकीतून बाहेर बघत राहते. छान प्रसन्न वाटतंय. तो शांत झोपलाय. तिला हसू येतं, हा कधी जागा होणार आणि कधी चहा बनवून तिला उठवणार, त्यापेक्षा "झोपू दे त्याला शांत" असा विचार करून ती उठतेच. तयार होते, शांतपणे चहा पीत सगळे पेपर निवांत वाचून काढते. सकाळचे आठ वाजतात. ती पुन्हा किचन मध्ये शिरून नाश्त्याच्या तयारीला लागते. आठवड्यातून हे दोनच दिवस ज्यात एकत्र गप्पा मारत नाश्ता, जेवण होते. त्याला कांदे पोहे रोज दिले तरी आनंदाने ताव मारेल त्यावर इतके आवडतात. तिच्या मनात नेहमी विचार येतो देव तरी कशा अशा विरुद्ध व्यक्तिमत्वाच्या जोड्या बनवतो. त्याला कांदेपोहे तर तिला उपमा, त्याला डोसे तर तिला इडली चटणी, तिला पराठे आणि दही प्रिय तर तो म्हणे थालीपीठ आणि लोणीच मस्त. अशा भिन्न आवडी जपत, ती शेवटी बनवायला घेते कांदे-पोहेच. खमंग दरवळ त्याच्या पर्यंत पोहोचतोच...तो उठून किचन मध्ये येतो.

तो: अहाहा काय मस्त वास येतोय .... बायको, आज कांदे पोहे आहेत?


ती: हो.


तो: सुट्टीची चांगली सुरुवात!

भरपेट पोहे आणि त्या नंतर मस्त वाफाळता चहा पुन्हा एकदा होतो.

तो: पण आज तू का माझ्या आधी उठलीस? सांगितलं होतं ना तुला? काही लोकांच्या ना नशिबातच नसतो आराम.


ती: (हसत) अरे हो ना! तू लवकर उठून चहा बनवून मला दिलास तर मग नंतर मी कोणाला बोलणार... पण खरं सांगू का इतकी फ्रेश जाग आली होती मला....मग उठावे असेच वाटले. म्हणून उठले. शांत घरात चहा पीत मनसोक्त सगळे पेपर वाचून काढण्यात काय मजा असते तुला नाही कळणार.


तो: झालेत ना तुझे सगळे पेपर वाचून ....आता मी चाळतो थोडे...तोपर्यंत अर्धा कप चहा दे मला.


ती: ठीक आहे, तो पिऊन लवकर तयार हो. आठवड्याची भाजी, इतर सामान आणायला जायचे आहे. आज तू चल.


तो: मी कशाला? तू जा गाडी घेऊन, आरामात सगळ्या गोष्टी घेऊन ये. मला कुठे बाहेर जायचं नाहीये. लागलं तर मी अक्तीवा घेऊन जाईन.


ती: नाही नाही ....तुम्ही दोघं बाप-लेक चला बरोबर. आणि तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या मंडईत मिळतात त्या आणूयात, कारण मी आणलेल्या कोणत्याच भाज्या तुम्हाला आवडत नाहीत. 


तो: खाऊ या आठवड्यात आम्ही दुधीभोपळा, दोडका, पडवळ अशा भाज्या. आण तुला ज्या आणायच्यात त्या. पण मी आता बाहेर येत नाही.

ती आणि कन्यका  बाहेरून तासाभराने परत येतात. घराची बेल वाजवते. कोणी दार उघडत नाही. पुन्हा पुटपुटते " या घरात कोणाला बेल ऐकू येईल तर शपथ" पर्स मधून किल्ली शोधून दार उघडते. बेडरूम मध्ये डोकावते. हा बाबा गाढ झोपलाय. 

ती: अरे झोपलायस काय....कळत नाही मला इतकी झोप येते कशी? 
तो: अगं, इतका मस्त नाश्ता झाल्यावर सुट्टीच्या दिवशी अजून काय करू शकतो? 

1 comment:

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!