Monday, July 2, 2012

क्षितिजे विस्तारताना......

घरून जेंव्हा ऑफिसचे काम करत नसे, त्याकाळी, कोणी जर म्हणाले, की घरून काम करते तर, मला वाटे, काय मजा आहे हिची. ऑफिसला जाण्यासाठी तयार नको व्हायला, वेळेत या म्हणून पोळीवाल्या काकू, इतर कामे करणाऱ्या बाईंच्या मागे नको लागायला, गाडी नको चालवायला, पेट्रोल नको जाळायला, ट्राफिकवर वैतागायला नको आणि घरी येताना त्यामुळे होणारी चिडचिड नको. कल्पनेप्रमाणे कितीतरी वेळ या एका गोष्टीमुळे वाचतो असे वाटत असे. आणि हे सगळे फायदेच फायदे बघून खरच त्या व्यक्तीचा मनोमन हेवा वाटत असे.

एक डिमांड पूरी झाली की मन लागोपाठ दुसऱ्याची तयारी सुरु करतं. जसं की फक्त रविवार सुट्टीचा असे तेंव्हा शनिवार-रविवार सुट्टी हवी होती. बस ने जाताना वाटे आपली गाडी कधी येणार. गाडी आली तेंव्हा ती चालवणे त्रासदायक वाटू लागले आणि ऑफिसनेच जाण्या-येण्याची सोय करावी ही इच्छा प्रकट झाली. शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली तेंव्हा वाटू लागले की शुक्रवारी सकाळी लवकर ऑफिसला जाता आले आणि दुपारी ४ नंतर घरी जाता आले तर किती बरं होईल. ते पण शक्य होवू लागले तेंव्हा घरूनच रोज काम करता आले तर किती बरं होईल! खरंच नेव्हर एन्डिंग स्टोरी!!!!

जेंव्हा एखादी गोष्ट मिळावी असं वाटत असते तेंव्हा ती मिळवताना आपण काय गमावणार आहोत याचा पत्ताच नसतो अनेकदा. मधे काही दिवस खरोखरच घरून काम करू लागले आणि लक्षात आले की काय काय हरवतंय रोजच्या आयुष्यातून ते. तत्पूर्वी एक आठवडा मस्त वाटत होतं. येण्याजाण्याचा वेळ वाचेल त्याचं काय काय करायचं याचे ही प्लान्स झाले. किमान सकाळी चालायला जाणे, संध्याकाळी गरम गरम जेवण. पहिले काही दिवस छान गेले. नंतर हळू हळू लक्षात आलं, ठरवलेला एकही प्लान प्रत्यक्षात येवू नाही शकला. इतर वेळी सगळी कामे आटपून सकाळी ११ वाजेपर्यंत ऑफिसला पोहते, तर जेमतेम तोपर्यंत बाकी घरची कामे आटपून मी लॉग-इन करू शकत असे. बर बाकी लोकांच्या दृष्टीने काय " तू तर घरीच आहेस सध्या असाच सूर असे. इतर वेळी घरातले दोघे जी कामे करत ती त्यांच्या दृष्टीने करण्याची गरज उरली नाही कारण मी काय घरी होते ना.

एकंदरच असे काम करणे नंतर कंटाळवाणे वाटू लागले. आजूबाजूस असणारी माणसे, कामासंबंधीच्या गप्पा, त्याशिवाय च्या गप्पा, एकमेकांवर होणारे विनोद किंवा होणारे थोडे वाद विवाद, गॉसिप्स, निरनिराळ्या कारणांनी होणाऱ्या पार्ट्या, एकत्र चहा, जेवण या सगळ्यात एक आनंद असतो. अगदी सर्वच माणसांशी आपली मैत्री असते असं नाही पण तरीही. लक्षात आले, घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. ५ दिवस ऑफिसमध्ये जावून काम केलं तरच शनिवार-रविवार घरी राहण्यात मजा आहे.एक आपलं असं दुसरं जग असणं, त्यातून होणारं शेअरिंग, नकळत सहकार्यांबद्दल वाटणारी आपुलकी. साऱ्या गोष्टी तुमच्या नकळत तुमच्या सवयीच्या होवून जातात. अगदी माझ्यासारख्या एकटेपण आवड्णारीच्या सुद्धा! प्रत्येक गोष्टीचा आनंद तिची किंमत मोजल्या नंतरच खऱ्या अर्थाने मिळतो. न जाणो उद्या या घर- ऑफिस पलीकडच देखील एक माझं जग बनेल, परवा अजून एखादं! क्षितिजे विस्तारत जातील आणि या साऱ्या पसारयात मी कुठेतरी हरवून जाईन आणि मग माझी मलाच मी नव्याने भेटत राहीन.


2 comments:

  1. welcome to the club....:)

    >> क्षितिजे विस्तारत जातील आणि या साऱ्या पसारयात मी कुठेतरी हरवून जाईन आणि मग माझी मलाच मी नव्याने भेटत राहीन

    हे खूप भावलं

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!