शुक्रवारचा दिवस. ऑफिस मध्ये तसाही कामाचा मूड नसतोच. या दिवशी सगळी माणसे, या एका दिवसापुरती वेगळीच वाटू लागतात. सारं जग या दिवशीच कसं इतकं रंगीबेरंगी वाटू लागते हे इतक्या वर्षात कधी मला कळले नाही. फॉरमल्स आणि इनफॉरमल्स मुळे इतका फरक पडतो? पण असं होतं हे मात्र खरं आहे. या दिवशी ऑफिसला जावे असे वाटते, बाहेर हवा खूप छान आहे असे वाटते, एफ. एम. वर या दिवशीच सगळी चांगली गाणी लागतात, रोज नको वाटणारी त्या आर.जे. ची वटवट आज त्रासदायक वाटत नाही. पुढच्या दोन दिवसाच्या सुट्टीची तयारी प्रत्येकाच्या मनात चालू असते. अनेकदा असं घडतं की जर काही प्लान्स नसतील तर सुट्टी जास्त बोअर जाते, तरी तिची मनापासून वाट मात्र पहिली जातेच.
आज शुक्रवार आहे. तो ही लास्ट वर्किंग डे ऑफ द मंथ, अधून मधून प्रत्येकाचं लक्ष आपल्या मोबाईलकडे, बँकेच्या मेसेज साठी. त्यातून आज salary revision ची मेल पण अपेक्षित आहे. सकाळचे ९ वाजलेत प्रत्येक जण "friday fever" सह ऑफिसमध्ये पोहचतो. आणि ऑफिसमध्ये पोहचल्यावर लक्षात येतं की पूर्ण क्लायंत नेटवर्क डाऊन आहे. त्यामुळे काही काम होणार नाही. थोडक्यात ऑफिसमध्ये येऊनही काम होणार नाही. एक मोठी टीम. काही जण वैतागतात. लवकर काम संपवून घरी जाण्याचा त्यांचा बेत धोक्यात आलेला असतो. एखादा नुकताच जॉईन झालेला फ्रेशर्स ग्रुप असतो. त्यांना फरक पडणार नाहीये. त्यांचे संध्याकाळचे हार्ड रॉक कॅफे किंवा हाय स्पिरीटस चे प्लान तयार आहेत. वेगवेगळे ग्रुप्स, वेगवेगळ्या फूड-कोर्ट मध्ये जावून येतात. कोणी फक्त चहा, कोणी चहा आणि खाणे, कोणी चहा आणि सिगारेटसाठी बाहेर चक्कर टाकणारा, तर कोणी नुसताच टेरेस वर बसून गप्पा मारणारा. थोडा वेळ जातो. पावसाचे दिवस, त्यामुळे ODC मध्ये परत यावेच लागते. मग आपापल्या डेस्कपाशीच फक्त खुर्च्या फिरवून गप्पा सुरु आहेत. यात पण अनेक छटा आहेत. दोन तीन जण आपापल्या मशीन्सवर अंग्री बर्डस खेळण्यात मग्न आहेत, काही गाणी ऐकत आहेत. गप्पांच्या ग्रुपमध्ये ही दोन तीन वेगवेगळे ग्रुप आहेत. एका ग्रुपला वाढत्या डॉलरची चिंता आहे, एकाला आज रिलीज होणाऱ्या सिनेमांची. मधूनच कोणालातरी बाहेर पडावं वाटू लागतं, मग तो किंवा ती " ए, चला ना दोन तीन गाड्या काढून लांब पर्यंत फिरून येऊ, बाहेर किती मस्त हवा आहे. बोअर आहे असं इथे बसून राहणं" चा नारा लावतं. बाकीच्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. दोन तीन मुली, त्यांना वीकेंड ला करण्याचा शॉपिंगचे वेध लागलेत आणि मी नेहमीप्रमाणे कुमार गंधर्व ऐकत आहे.
एका ग्रुप कडे लक्ष जातं, ते चर्चा करत आहेत इतिहासावर, मोगल इतिहासावर. वाटलं नव्हतं या मंडळीना या बद्दल फार काही माहित असेल. पण ऐकताना छान वाटत होते. बसतात ना असे अनपेक्षित धक्के. हळू हळू सारे जण या ग्रुपकडे आकर्षित होवू लागतात. इतिहासावरील चर्चा मनोरंजक वाटू लागते. गाडी पानिपतावर पोहचते. आता मी ही मागे वळून या गप्पांमध्ये सामील होते. एकजण इतर वेळी ज्याला इतका सिरिअस बोलताना कधी ऐकले नव्हते, खरं तर तो फारसा कोणाशी बोलतच नाही, तो बोलतोय ..... बोलण्यात आवेश पण असा की त्याने जणू याची देही, याची डोळा हे सारे पहिले आहे, इतिहास जणू तो जगला आहे. असं वाटत होतं की जणू बाबासाहेब पुरंदरेच समोर बसून इतिहास जिवंत करत आहेत.
"पानिपत हा एक निव्वळ पराभव नव्हता तर मराठ्यांसाठी ती एक भळभळती जखम होती. "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. विश्वासराव आणि सदाशिवराव या दोन मोत्यांसह २७ सरदार आणि सैन्यासह काफिला मारला" हे वर्णन अंगावर काटा आणणारं त्याने जसच्या तसं सामोर उभे केले. दुपारपर्यंत लढाईवर मराठ्यांचा ताबा होता पण गणितं चुकली आणि लढाई फिरली . अब्दालीने डाव साधला, रसद रोखली आणि पानिपताची भूमी मराठी रक्ताने न्हाहून गेली. असं असतानाही ज्याच्याकडून पराभव पत्करला त्या अब्दालीने सुद्धा ज्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द लिहावेत यातच त्यांचे महान योध्येपण सामावले आहे."
टीम मध्ये मराठी न समजणारे पण काही जण आहेत, त्यांना शब्द न शब्द कळत नाहीये पण भावना पोहचत आहेत असं वाटतंय. एककंदरीत त्याचं अवांतर वाचन खूपच चांगलं आहे याचा अंदाज आलाय. विश्वास पाटलांच्या पानिपतची तर त्याची पारायणे झाली असावीत. ऐकायला छान वाटतंय, अनपेक्षित धक्का आहेच पण तो सुखावणारा आहे. सलग तासभर तो एकटाच बोलतोय आणि एक न एक टीम मेम्बर्स श्रोते आहेत. काम होत नाहीये, आणि सोमवारी खूप लोड असणार हा विचार हळूहळू मागे पडत चालला आहे, मोबाईलकडे कोणाचं इतका वेळ लक्ष गेलं नाहीये. मेल्स कोणी चेक करत नाहीये. असं मुळातच सारं काही विसरून जाणं फार कमी वेळा घडतं. श्रवणीय अशा या तासानंतर मनोमन वाटले, वीकेंडची या पेक्षा चांगली सुरुवात नाही असू शकत.
ता. क. (आज जरी शुक्रवार असला तरी ही आजची गोष्ट नाही.)
Khup sundar varnan kelay tumhi! Masta vatla vachayla.
ReplyDeleteDhanyawad!
ReplyDelete