Saturday, September 22, 2012

तू सुखकर्ता .....

कामावरून यावे, संध्याकाळी जवळच्या सार्वजनिक गणेश-उत्सवाच्या तयारीच्या बैठकांना उपस्थित राहावे. एकीकडे मनात घरच्या गणपतीला यंदा कोणती सजावट करावी याची आखणी करावी. मग बच्चे कंपनीला हाताशी धरून थर्माकोलची एक सुंदरशी सजावट करावी. मोठ्या उत्साहाने गणपतीची प्राण-प्रतिष्ठा सकाळी सकाळी करून मग पुन्हा मंडळाचा गणपती आणायला जावे. दाहीदिवस तिथे आपला सक्रीय सहभाग असावा, नाना स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रम याचे बेत पार पडावेत. असे माझे बाबा! आज मागे वळून पाहते तेंव्हा विचार येतो कसं जमत असेल हे त्यांना तेंव्हा. त्यांच्यात अती उत्साह होता की माझ्यातच उत्साहाचा थोडा अभाव आहे?

साधारण राखी पौर्णिमेनंतरच आमच्या घरादाराला गणपतीचे वेध लागत. कारण बाबा संध्याकाळी त्या संबंधीच्या मंडळाच्या बैठकांना जात असत. जिथून गणेश मूर्ती आणत असू तिथे मूर्ती आल्या आल्या आम्ही तो बुक करून येत असू आणि आम्हा सर्वांमध्येच प्रचंड उत्साह संचारत असे. आईची स्वयंपाकघरात तयारी सुरु होई. घराची विशेष साफ-सफाई, गणपतीसाठी जे काही होते त्या फर्निचरची हलवाहलवी होई एका सुट्टीच्या दिवशी. बाबा एकीकडे मंडळाच्या कार्यक्रमाची तयारी आणि घरच्या गणपतीची सजावट यात अगदी गढून जात. आम्हा भावंडांची त्यात लुडबुड असेच. वाड्यात सर्वात सुंदर सजावट आमच्या घरी असे. हरतालिकेच्या आदल्या दिवशी एकीकडे जोरदार तयारी आणि दुसरीकडे स्वयंपाक घरात मस्त मेनू शिजत असे, ज्यात मटार भात टोमाटोचे सार, शिरा असा बेत असे. आज पर्यंत मला तो का असे याचे कारण कळले नाही. दुसऱ्या दिवशी हरतालिकेची पूजा जी एकत्रितरित्या वाड्यातील सर्व बायका आणि मुली करत असत. त्यासाठी सकाळीच फुले आणि पत्री गोळा करून आणायचा भारी सोस असे. एकदा पूजा पार पडली की दुसऱ्या दिवशीचे वेध लागलेले असत. त्यातच कोण किती कडक उपास करते याची चर्चा असे आणि आया अगं, कडक नको, खाऊन उपास करा म्हणत आमच्या मागे लागत. उपास आणि दुप्पट खाणे हा प्रकार या दिवशी पण असे. खिचडी, वराई-दाण्याची आमटी, भरली केळी, रताळ्याचा कीस, खजूर, भोपळ्याचे भरीत असे नाना प्रकार त्या दिवशी बनत. रात्री उशिरापर्यंत बाबांची मखर बनवण्याची लगबग सुरु राही. ते बनल्यावरच ते झोपत. दुसऱ्या दिवशी भल्या पाहते सर्व उठत. जवळपास सकाळी ८ वाजता गणपतीची प्राण-प्रतिष्ठा होत असे, आणि ती झाली की बाबा लगेच मंडळाच्या गणपती बसवायला जात आणि आई स्वयंपाक घरात. यथासांग मोदकाचे जेवण पार पडले की जी सुस्ती येई. नित्य नियमाने आम्ही बच्चे कंपनी घरच्या गणपतीची, वाड्यातल्या गणपतीची आणि मंडळाच्या गणपतीची आरती करून येत असू. त्यातच एकी कडे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमांची तयारी करत असू. बाबा कार्यकारणीवर असत, त्यामुळे आम्ही त्यात भाग घेणे ओघाने येतच असे. छान छान फ्रॉक किंवा कधी साडी, हाताला आणि पायाला लावलेला अल्ता, कधी नव्हे ते रंगवलेले ओठ फार मजा वाटे या साऱ्यात. दुसरी मजा वाटे नंतर या साऱ्याचे फोटो शाळेत नेवून दाखवून भाव खाण्यात. 

प्रत्येक दिवशी घरी दारी काही ना काही कार्यक्रम असेच. ऋषी पंचमीचे खास जेवण, मग गौरी आणण्याची लगबग, गौरी जेवण आणि मग गौरी आणि गणपतीचे एकत्र विसर्जन. हे ५ दिवस कधी घराला कुलूप लागत नसे. एकदा गौरी गणपतीचे आंब्याची डाळ आणि खिरापत या सोबत विसर्जन केले, की मग त्यादिवशी रात्री पासून आम्ही पाची जण गणपती पहावयास बाहेर पडत असू. आठ च्या सुमारास जेवून बाहेर पडायचे, आणि रात्री १२ पर्यंत घरी परत. पायी पायी फिरत २/३ दिवसात सारे पुण्यातले गणपती पाहून होत. त्या काळातही त्या दिवसात रस्त्यावर अनेक लहान मुलांसाठी खास अशा वस्तूंची रेलचेल असे. आम्ही हट्टही करत असू. काही वस्तू, खेळणी मिळतही. पण तो काळ, मनातला अमाप  उत्साह  आणि खिशातल्या तुटपुंज्या नोटा यांचे व्यस्त प्रमाण असण्याचा होता. वाड्यात एवढ्या उत्साहाने दरवर्षी गणपती बघणारे आम्ही एकमेव घर होतो. विसर्जनाच्या दिवशी आमच्या घरी अनेक वर्षे संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भेळ बनत असे. बाबा तर मंडळाच्या गणपती सोबत असत. पण लक्ष्मी रोड पासून घर दोन मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे, अनेक नातेवाईक त्या दिवशी आमच्या कडे दुपार पासूनच येवू लागत. दुपारी ३ च्या सुमारास पहिला मानाचा गणपती शगुन चौकात पोहचत असे, तर तिथे जावून आधी पासूनच जागा पकडावी लागे. संध्याकाळ पर्यंत गणपती बघायचे, घरी यायचे, भेळ खायची, पुन्हा जायचे रात्री १०/११ पर्यंत रोषणाई चे गणपती पाहून मग मात्र डोळे मिटू लागत. घरी जाऊन झोपत असू. पहाटे कोणी तरी येवून उठवे की "चला मंडई आणि दगडूशेठ चे गणपती येत आहेत." त्यांची रोषणाई आणि त्यांच्या समोरील  वाद्य पथके पाहणे फार मौजेचे वाटे त्या काळी. एकदा गणपती विसर्जन झाले की लक्षी रोड कसा सुना सुना वाटू लागे.

हे सारे करत असता आम्ही कधी शाळेला कधी दांडी मारली नाही, आमच्या मागे कधी कोणी अभ्यास करा म्हणून लागले नाही. कार्यक्रम, स्पर्धा यात भाग घेण्यापासून आम्हाला कधी कोणी अडवले नाही, रात्री १२ पर्यंत पायपीट करूनही दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी करण्यासाठी तेवढाच उत्साह असे. कमावता माणूस एक आणि खाणारी तोंडे ५, दर महिन्याचा खर्च भागवताना नाकीनाऊ येत असण्याच्या काळात माझ्या आई बाबांकडे एवढा अमाप उत्साह कुठून बरे येत असेल? मला राहून राहून त्या मागचे गमक कधी कळले नाहीये. 

आता  मी काय करते? तोच वारसा मी पुढे चालवते आहे का?  घरच्या गणपती साठी तेवढाच जोरदार उत्साह असतो. कोकणस्थ असून हे दोन दिवस सारा कारभार देशस्थी असतो. कारण घरी दुपारी जेवायला बहिण, नणंद, दीर आपापल्या कुटुंबासमवेत असतात. अशारितीने आम्ही १६/१७ जण असतो. उकडीच्या मोदकांचा बेत असतो. सजावट नेहमी फुलांचीच असते, त्याच सोबत हार घरीच बनतात. दुपारी जेवण अटपतानाच ३ वाजतात. साधारण सकाळी ११.३० ते २ मी फक्त मोदकच बनवत असते. जेवणे पार पडून सर्व जण थोडे पडतात, आणि मला संध्याकाळच्या आरतीचे वेध लागतात. ज्यास एक तिखट आणि एक गोड असे दोन  ताजे नैवेद्य असतात आणि आरतीला साधारण ५० जण असतात. या साऱ्या गोष्टींची कोरडी तयारी किमान आधीचे ३/४ वीकेंड्स आणि गणपतीच्या आधीचे २ दिवस सुट्टी घेवून चालू असते. पण बास इतकेच.एकदा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले की भरले घर सुद्धा सुने सुने वाटू लागते.  कॉलनीत कुठे अन कसा गणपती बसतो ह्याचा सुद्धा मला पत्ता नसतो. गेल्या कित्येक वर्षात मी जावून गणपती पहिले नाहीत. नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींकडे श्रींच्या दर्शनाला मी जर या दीड दिवसा नंतर एखादा वीकेंड आला, तरच जाऊ शकते. गौरी आणते, पण तिची सवाष्ण नवरात्रातल्या सवाष्णी सोबत बोलावते. कारण तेंव्हा खात्रीने एक वीकेंड मिळतोच. आज काल सार्वजनिक गणेश उत्सवात काही गाण्याचे कार्यक्रम, इतर स्थानिक लोकांचे विविध गुण दर्शनाचे  कार्यक्रम, काही स्पर्धा होतात की नाही ते मला माहित देखील नाही. कॉलनीतल्या गणपती पुढे स्पीकर लावून संध्याकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत गाणी (भक्ती गीतेच, किंवा गायत्री/गणेश मंत्र) चालू असतो, त्यामुळे या दिवसात घरून काम करण्याचा मी विचार सुद्धा करू नाही शकत. पुण्यातालीच काय पण चिंचवड मधील विसर्जन मिरवणूक कशी असते ते देखील मी गेल्या काही वर्षात पाहिलेली नाही. थोडक्यात काय? तशी आज आताही सारी गणिते व्यस्तच आहेत कारण पैसा आहे पण वेळ आणि तेवढा उत्साह मात्र कुठून उसना मिळत नाहीये.



3 comments:

  1. आपल्या आणि आपल्या आई-बाबांचा उत्साह, संयम, सहनशक्ती, अपेक्षा, गरजा इत्यादी सगळ्यांचं गुणोत्तर इतकं व्यस्त आहे की कुठे ताळमेळच लागू शकणार नाही आणि हे फक्त गणपतीच नव्हे तर प्रत्येक सामान्य दिवसाला लागू होतं !!

    ReplyDelete
  2. खरं आहे. उत्साह, संयम, सहनशक्ती ......अजून कशा कशाची किमत आपण मोजणार आहोत देव जाणे.

    ReplyDelete
  3. आपण फक्त तसा उत्साह , संयम, सहनशक्ती आपल्यात यावी अशी प्रार्थना मात्र गणरायापाशी करू शकतो...

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!