"चला पुन्हा एकदा १०/११ दिवसांसाठी पृथ्वीवर पाहुणे म्हणून जायची वेळ झाली. आजकाल ना नको वाटतं हे दर दर वर्षी तिथे जाणं. काय काय पाहावं लागतं, फार मनस्ताप होतो. पण काय करू ठरवल्या प्रमाणे जावे लागेलच....उंदीरमामा, चला तयार आहात ना?"
"हुश्श, पोचलो एकदाचा, काय हे ट्राफिक या शहरात, किती गाड्या रस्त्यावर! काय झालंय या देशात? मंत्री, पंतप्रधान राष्ट्रपती येणार म्हंटल्यावर रस्ते लोकांसाठी बंद करायची पद्धत आहे, पण माझ्यासाठी नाही, कसाबसा उंदीरमामांबरोबर पोहोचलो. सकाळी ९:३० पर्यंतचा मुहूर्त एका पंडितांनी सकाळ मध्ये दिला होता, म्हटलं आपल्यामुळे मुहूर्त चुकायला नको. पण दमलो बुवा."
" सकाळपासून इथे येऊन बसलोय, मंडप सजवलाय, पण कार्यकर्ते कुठे आहेत? आजूबाजूच्या घरातून सुग्रास भोजनाचा सुवास दरवळतोय, पण पूजा झाल्याखेरीज कोण मला नैवैद्य दाखवताय? शोधलं पाहिजे कारण या थंड्या स्वागताच पुढच्या दहा दिवसात इथे बसल्या बसल्या"
"जेवण नाही, वामकुक्षी नाही, हे काय चाललाय? रात्रीचे साडेसात वाजले, बाजूच्या आपटे काकूंनी काय काय बनवले होते, मोदक, अळूवडीचाच नव्हे तर संध्याकाळच्या प्रसादाचा ही सुवास दरवळला. दणक्यात तास भर आरतीही चालू आहे. इथले लोक कुठे गायब आहेत? मागच्या वर्षी अनेक माणसे रोज सकाळ संध्याकाळ येऊन पाया पडत होती, बाप्पा या वेळी निवडून येवू देत म्हणत होती, रस्ता अर्धा अडवून तिथेच कारंजे बनवले होते, मग या वर्षी काय झाले? अजून माझी प्रतिष्ठापना नाही. पृथ्वीवर "गुरुजींचा" मोठाच तुटवडा आहे वाटतं?"
"आले एकदाचे. बरोबर एक किरकोळ गुरुजी घेवून, काय पुटपुटत होता तोच जाणे. शेवटी एक दोन आरत्या कोणी तरी म्हंटल्या आणि मग सुरु " ओम गं गणपतये नमः: ची सी डी. दरवर्षी १० दिवस रोज संध्याकाळी इथे फक्त हेच वाजते."
"आरतीला दरवर्षी एक आपटे काकू यायच्या, त्यांच्यामुळेच सर्व आरत्या रोज संध्याकाळी कानी पडायच्या. फार हौस हो त्यांना. भजनाचा एक कार्यक्रम ही करायच्या. आज त्या आल्या नाहीत पण स्टेजवर त्यांचा फोटो हार घालून ठेवलाय. अरे अरे. गेली ३० वर्षे मी त्यांच्याच आवाजातली आरती ऐकतोय, त्यांनी बसवलेले करमणुकीचे कार्यक्रम आनंदाने पाहतोय. किती दिवसांच्या तयारीने छोट्या छोट्या मुलांकडून त्या ते करून घेत असत, कौतुकाने मी सारे बघत असे. या वर्षी यांनी आरतीची पण सी डी आणली आहे तर."
"सकाळी कोणी फिरकत नाही संध्याकाळी कोणीतरी सहा वाजता येते, पडदा सरकवून जाते, दिवा बत्ती करून जाते, पुन्हा कोणी नाही. नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, पुन्हा स्वर्गात परत गेलो की इथला एकदा हिशोब पहिला पाहिजे, कोणी काय मागितलं, आणि आपण कोणाला काय काय दिलं ते. मी ही विचार करतोय, या लोकांसारखेच, आपणही दर पाच वर्षांनी यावे काय?"
"आज एक नगरसेवक बाई आल्या होत्या सकाळीच, सोबत आमदार होते, त्यामुळे बाईंचे माझ्याकडे लक्षच नव्हते. त्या आमदारांच्याच सर-बराईत गुंतल्या होत्या. रक्तदान शिबीर आयोजित केले होते, दोघांनी तिथे पण भाषण केले. शब्दा शब्दाला मला हसू येत होते. आख्या ४ तासात अवघ्या १० लोकांनी रक्तदान केले. यांनी का नाही केले, आणि त्यांचे टगे कार्यकर्ते? ते नुसतेच गाड्या उडवत आले आणि गेले, कठीण आहे, पण सांगू कोणाला, १० दिवसांची शिक्षा आहे मला ही दरवर्षी."
"तरी बरं, दर वर्षी लोकमान्य मी स्वर्गात परत गेल्यावर विचारतात इथला इति-वृतांत.तेंव्हा त्यांना मी हे काही सांगत नाही. उगीच बिचारे दु:खी व्हावयाचे. त्यांना उगीच अजून वाटते की त्यांनी सुरु केल्या प्रमाणे हा उत्सव चालतो, भजन, पोवाडे, भाव-भक्तीगीते, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणे, अहो लोकमान्य, ते शेवाळकर, शिवाजीराव, वसंतराव, भीमसेन आता तुमच्याच सोबत आहेत ना? मग भाषणे देणार कोण आणि शास्त्रीय संगीत गाणार कोण?"
"आज नववा दिवस. सत्यनारायणाची पूजा झाली. हुश्श जायचा दिवस जवळ आला म्हणायचा. आता शेवटचा एक दिवस स्पीकर वरून कोणतीही गाणी ऐकवून घेतील, असो, पण उद्या परत जायचे आहे. पूजेला पुन्हा नगरसेवक बाई आणि त्यांचे पतीदेव आले होते. जात पडताळणी च्या केस मधून सलामत सुटू दे असं काहीसे म्हणाल्या. हे काय असतं मला माहित देखील नाही. आणि श्री. नगरसेवक म्हणाले बाप्पा मध्यावधी निवडणुका होवू देत म्हणजे, हिलाच आमदारपदासाठी उभे करतो. सोबत त्यांचे चिरंजीव होते म्हणाले बाप्पा तेवढी जमीन लाटल्याच्या प्रकरणातून सोडव बाबा, आणि कित्येक दिवस आई-बाबांकडे एक ऑडी मागतो आहे, या वर्षी ती मिळूदे बाप्पा. पूजा झाली, धार्मिक कार्यक्रम संपले, आता आयटम नंबर ची गाणी सुरु. दरवर्षी माझ्या माहितीत भर पडते, इथे येऊन. मग मी ती स्वर्गात जावून इतर देवांना ऐकवतो. तसा माझ्या इतका मुक्काम एक देवी सोडल्यास कोणीच करत नाही ना इथे."
"अजून वाजले की बारा आहेच का? नवीन काय तर म्हणे हलकट जवानी? हे काय प्रकरण? बाकी शीला, मुन्नी, जलेबीबाई अजून आहेतच. सोबत पुणेकर बाई आणि त्यांची गाणी होतीच. उद्या जायचे आहे, आता शांत झोपू द्या रे"
"जायचे म्हणून भल्या पहाटे उठून तयार बसलोय, पण अजून कोणी फिरकले नाही. आठ वाजले आता"
"सकाळी ९ वाजता कोणीतरी आले, सगळ्या भूपाळ्या लावून गेले, गणपतीसमोर सगळ्या देवांना उठवून झाले, घनश्याम सुंदर, उठी श्रीरामा, उठ पंढरीच्या राया, उठा उठा हो गजानना, अरे देव म्हणजे काय तुमच्या सारखे आहेत का ९/९ वाजे पर्यंत झोपून राहणारे?
"जायचे जायचे म्हणता, संध्याकाळचे ९ वाजलेच. सात वाजल्या पासून इथे नुसतेच एक ढोल पथक आणि झांज पथक वादन करतंय. पण जायचं कुठे अडलंय? समोर रांगोळी काढून झाली, मग निघालो, हळू हळू ठिक ठिकाणी थांबत, महापौर, उप-महापौर, अनेक राजकीय पुढारी यांना दर्शन देत निघालो. महत्वाची माणसे ना ती. त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना नारळ दिला, तो कशाला? या वर्षी इको फ्रेंडली म्हणत गुलाल नव्हता. ते एक बरे झाले, इतका उधळत असत तो, नंतर चार दिवस डोळे नुसते चुरचुरत माझे. एकदाचा नदीवर पोहचलो. मोठा जयघोष झाला. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! कुठेतरी आजी आजोबांचे डोळे पाणावले, काकूंना वाईट वाटले, बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले मला निरोप देताना, त्या साऱ्यांसाठी तरी मला परत यायलाच हवे. मनात म्हटलं येतो बाबांनो!
पुनरागमनायच .....
बाप्पा मोरया..
ReplyDeleteउत्तम लेख.
ReplyDeleteधन्यवाद नानिवडेकरजी आणि ब्लॉगवर स्वागत!
ReplyDeleteमागे फेसबुकवर एक कमेंट टाकली तीच आज परत लिहितो आहे
ReplyDelete||गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या||
गेले ११ दिवस दुमदुमत असलेला ' गणपती बाप्पा मोरया ' चा गजर थोडासा खिन्न झाला... '
पुढल्या वर्षी लवकर या' असं म्हणताता अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले...
पावसाची रिपरिप, दहशतीचे सावट, खड्डे असे कशाकशाला न जुमानता लाखो लोक रस्त्यावर उतरले
आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
आता वाट बघुया पुढच्या वर्षाची
खरं आहे शैलेश सर्वात लाडक्या व्यक्तीचा वर्षभरासाठी निरोप घ्यावा तसे वाटते विसर्जानाच्या वेळी.
ReplyDelete