Friday, September 28, 2012

गाय जशी हंबरते तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.....

असं कधी झालंय का तुमच्याबरोबर ? की एखादी व्यक्ती, जिची आणि आपली प्रत्यक्ष ओळख नाही, आपले लौकिक अर्थाने काही नाते नाही, जिला आपण ओझरते देखील भेटलो नाही, आता ती व्यक्ती या जगात नाही, अशा व्यक्तीची तुम्हाला आठवण येते आणि डोळे वाहू लागतात. असं घडत होतं मध्यंतरी काही दिवस माझ्याबरोबर. रात्री गादीला पाठ टेकवली, आणि शांत विचार सुरु झाले की त्यांची आठवण.................. अनेक त्यांच्या तोंडाची वाक्ये जशीच्या तशी आठवत. तोच चेहरा भरल्या डोळ्यासमोर तरळत राही. तोच तो गोल चष्मा, कपाळावर थोडे वर लावलेले कुंकू, नीटनेटकी साधीशीच साडी, ओठांच्या या टोका पासून त्या टोकापर्यंतचे हसू. असे वाटे की आत्ता गप्पा मारायला सुरु करतील, मधेच अनेक कविता, संत साहित्याचा दाखला देत आपले म्हणणे पटवून देतील. कधी बा.भ., कधी आरती प्रभू, कधी मर्ढेकर तर कधी जी.ए. त्यांच्या बोलण्यातून डोकावतील. मनातलं सारं खरंखुरं बोलून मोकळे होणे हेच पटेल, अनेकदा ते बोलणे कडवट, दुसऱ्यांवर टीका केल्यासारखे पण वाटेल, पण ते खरे असेल.काल घरात दिवाळीत कुठेतरी ४ दिवस फिरून येवू अशी चर्चा चालू होती. खरतर मनापासून मी या गोष्टींसाठी तयार नसते. मुळातच फार हिंडण्या फिरण्याची मला आवड नाही आणि जायचंच तर त्या साऱ्या प्रवासात घरापेक्षा चांगल्या गोष्टी आणि कमालीची शांतता मिळणार असेल तरच जायची माझी तयारी असते. नाहीतर घरच्यांसोबत चार सुट्टीचे दिवस घरीच मी आनंदाने घालवू शकते. तशीही माझ्या घराइतकी चांगली जागा या जगात दुसरी कुठेही नाही यावर मी ठाम आहे. त्यामुळे अनेकदा चर्चेची सुरुवातच मुळी माझ्या नकाराने होते. पण फक्त "तारकर्ली जवळ "धामापूर" आहे या एका गोष्टी साठी मी तयार झालीये. खूप मनापासून वाटतंय की जिथे त्यांचे बालपण गेले त्या धामापूरच्या तळ्याकाठी काही शांततेचे क्षण अनुभवावेत. काही दोघींमधील नात्याचा धागा सापडतो का ते पाहावे. अगदी कळत्या वयापासून खरतर कोणाचे अनुकरण करावे असे वाटले नाही पण या मात्र अपवाद ठरल्या. माझ्यात अनेकदा मी त्यांना पाहते. गुण आणि दोष यांच्या सीमारेषेवर आढळणाऱ्या काही गोष्टी आमच्यात समान असतीलही. पण कधी कधी ना त्या माझे मनच सारे व्यापून टाकतात. तशा काही ना काही समान गोष्टी अनेक माणसांमध्ये असतातच ना मग कुठे आपण तेंव्हा प्रत्येकवेळी हे धागे शोधतो का? मग यांच्याच बाबत असे का?


त्या गेल्या तेंव्हा काहीकेल्या मनाची अस्वस्थता जात नव्हती. मग पुन्हा एकदा त्यांची जमेल ती पुस्तके पुन्हा पुन्हा वाचतच गेले. आमच्या काय नक्की नाते आहे हे तपासत राहिले. काही ठोस म्हणावे असे सापडले नाही, पण त्यांच्याशी जुळलेली मनाची नाळ मात्र तुटायचं नाही म्हणत राहिली. त्यामुळे आज लौकिकार्थाने नाहीत पण त्या माझ्याशी जोडलेल्याच आहेत.


मी त्यांच्या इतकी करारी आणि प्रज्ञावंत नाही, आग्रही नाही, नीट नेटकी नाही. अनेक वेळी माझी स्मरणशक्ती दगा देते, आणि काही वेळा काही गोष्टी विसरू म्हणता विसरू देत नाही. त्यांच्या इतकी प्रत्येक गोष्टीसाठी मी आग्रही राहत नाही आणि काही गोष्टींचा हेका मात्र मी सोडत नाही. स्वत:च्या अनुभवातून त्यांच्यासारखेच शिकत आले मी. त्या मुळे त्यातून शिकलेल्या गोष्टी मात्र आनंदाने मी जपते आणि स्वत:बाबत तरी याच गोष्टींसाठी खूप आग्रही आहते. थोडे थोडे करून जमवलेल्या माझ्या विश्वातील प्रत्येक माणसावर, प्रत्येक वस्तू वर नको इतका माझा जीव आहे, पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा एकाही गोष्टीत माझा जीव गुंतणार नाही हे मला माहित आहे. या समाजाचे आपण देणे लागतो ते कसे द्यावे याचे कोडे त्यांचे त्यांना सुटले होते. या बाबतीत किती नशीबवान होत्या त्या! आणि त्यांच्याच कल्पनेतून अनेक मोठी समाजोपयोगी कामे त्यांच्या नावाचा मोठा उदो उदो न करताही उभी राहिली आणि आजतोपर्यंत चालू ही आहेत. घर, आपली माणसे आणि त्यांची पुढील आर्थिक सोय आणि ती कधी पर्यंतची करायची, गरजा कुठे सीमित करायच्या याची उत्तरे अजूनतरी मला सर्वार्थाने सापडली नाहीत, त्यामुळेच समाजाचे देणे मी नक्की कोणत्या तऱ्हेने फेडणार आहे या प्रश्नाला आजतरी उत्तर नाही. एखाद दोन संस्थाना दरवर्षी थोडी आर्थिक मदत पाठवली की आपले काम झाले ही चुकीची कल्पना मनात नसल्याने, ती पाठवूनही मनाची अस्वस्थता काही कमी होत नाही. तिचे तुटपुंजेपण मनाला सतावत राहते.

ही एकच नाही तर अशा अनेक प्रकारे अस्वस्थता मला घेरून टाकते. आजूबाजूच्या अनेक घटना त्यास कारणीभूत असतात. सगळ्याच थेट माझ्याशी संबंधित नसतातही तरीही. असंच काहीसं त्यांच्या बाबतीत पण झालं असेल का? कशी त्यांनी त्यावर मात केली असेल? सुख-दु:ख सारेच परस्वाधीन, ही अवस्था तर आजही तशीच कायम आहे, मग गुंते सोडवले कसे? असे विचार मनात काहूर माजवत असताना भरून येणारे डोळे हे काही यावरचे उत्तर नाही असू शकत. आहे मनोहर तरी..... म्हणतच ह्या साऱ्याला सामोरे जावे का?  


(छायाचित्रे- आंतरजाल आणि शीर्षक-कवी ग्रेस यांच्या कवितेतून साभार.)

1 comment:

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!