Sunday, June 15, 2014

तिसरा वाढदिवस!

जूनचा किंवा डिसेंबरचा दुसरा शनिवार म्हणजे इसाकाच्या परीक्षेचा दिवस. २०११ मध्ये अशीच एक परीक्षा देऊन निवांत रविवार घालवण्याचा विचार होता.पण होतं असं की थकवा वगैरे सारं परीक्षा होईपर्यंतच असतं, एकदा ती झाली कि मग एक अंगावर येणारे रिकामपण मागे उरते, तसेच काहीसे झाले होते. मग काय करावे असा मनात विचार चालू असतानाच अचानक त्यापूर्वी जवळपास २ वर्षे आधी सुरु केलेला आणि स्वत: काही न लिहिलेला ब्लॉग आठवला. तत्पूर्वी काही दिवस थोडे काहीतरी इन्फी ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न करून झाला होताच, आणि आता इन्फोसिस सोडायचे दिवस आता जवळ येत चाललेत याची जाणीवही तीव्र होत चाललेली. त्यामुळे आता अजून काही लिहिण्याचा प्रयत्न चालूच जर ठेवायचा असेल तर नवे माध्यम, नवे ठिकाण हवेच होते, जुना ब्लॉग आठवल्याने हा वेगळा शोध घेण्याची गरज मग उरली नाही. 


मग आधीच्या ३/४ महिन्यातले जे काही तोडके मोडके लिखाण होते ते या जूनच्या दुसऱ्या रविवारी या ब्लॉगवर घेऊन आले. म्हणजे तसे हे बाळ दत्तक आणण्यासारखेच झाले. पण तसे का होईना….… ते आले हे काय कमी? कसेही आलेले असले तरी बाळाचे आगमन सुखावणारेच असते. तर मग अशारितीने हे "ब्लॉगबाळ" आज ३ वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस लक्षात होता, लिहिण्याचा उत्साह ही खूप होता. दुसऱ्या वर्षी लिहिण्याच्या प्रक्रियेला अशी काही खीळ बसली होती की या ब्लॉगबाळाचा वाढदिवस खुद्द आईच विसरली. हे चालू वर्ष पुन्हापहिल्यासारखेच लिहिते करून गेले, त्यामुळे जवळपास आठवडाभर आधीपासून याची आठवण होती. 

या साऱ्या लेखना मागे प्रेरणा खरे तर एकच, आणि ती म्हणजे स्वत:ला व्यक्त होण्याचे हे उत्तम माध्यम. पण एकदा ते तुम्ही जगापुढे ठेवलेत की ते सर्वार्थाने तुमचे असे उरतच नाही. लिखाण,त्यावरील प्रतिक्रिया मग पुन्हा त्यातून पुढच्या लिखाणातील बदल असा प्रवास सुरु होतो. गोष्टी थोड्या बदलतात,जेंव्हा कौतुक वाट्याला येऊ लागले की. मग एक त्याचीही छान नशा असतेच, चांगल्या रितीने ती तुम्हाला लिहिते ठेवते. मागच्या वर्षात म्हणजे २०१३ मध्ये फक्त ८ इतक्या कमी पोस्ट हातून लिहिल्या जाऊनही एकूण तीन वर्षात १२० पोस्टस........ not bad अशी शाबासकी मी स्वत:लाच देतीये. कारण माझ्यासारख्या आळशी व्यक्तीने स्वानंदासाठी  सुरु केलेला हा उपक्रम सलग तीन वर्षे टिकू शकला हेच खूप झाले. तसे हे लिखाण म्हणजे तरी काय रोजच्या जगण्याच्या कुपीत लपलेले काही सुगंधी क्षण, काही आठवणींचा उमाळा जो कोणा समोर व्यक्त करायला मन तयार होत नाही, काही सभोतालच्या घटनांवरील प्रतिक्रिया, तर काही स्वत:शीच घडवून आणलेला मोकळा संवाद. 

अनेकदा हे लिहिले पाहिजेच का हा विचार छळतो आणि लिखाण थांबते, काही वेळा प्रचंड इच्छा असून शब्द साथ देत नाहीत, तर कधी वेळ. कधी मनातल्या मनात अनेक कल्पना रुंजी घालतात पण laptop समोर बसल्यावर "शब्दरूपी उरावे" यासाठी एकही कल्पना तयार होत नाही. कधी लिहिले गेल्यानंतर ते स्वत:च्याच मनास येत नाही, म्हणून ते ब्लॉगपर्यंत पोहचत नाही, अशा अनेक  अडथळ्यांच्या शर्यती पार करत हा ब्लॉग लिहित्या अर्थाने आज तीन वर्षाचा झाला. 

वाढदिवशी मागील आढावा तर घ्यावाच पण पुढील वाटचालीचा पण मागोवा घ्यावा. पण जमेल तसं स्वत:ला व्यक्त होऊ द्यायचं हे एकच ठरवलेले असल्याने पुढील प्रवासाचा मागोवा कसा आणि काय घेणार म्हणा. पण मागे वळून पाहताना या ब्लॉगने ज्या प्रकारे मला श्रीमंत केले ते याचे एक ऋण राहील माझ्यावर, अनेक ब्लॉगर मित्र मंडळी, अनेक फेसबुकीय मित्र मंडळ मला या लिखाणातून मिळत गेले, मैत्र तुमच्या नकळत तुम्हाला समृद्ध करत राहतेच, तसे ते इथेही झालेच. त्यामुळे या सर्वांचे मनापासून आभार. असेही अनेक जण असतात की नित्यनियमाने ते तुमचे लिखाण वाचतात, प्रतिक्रिया देत नाहीत, पण वाचत राहतात, कधीतरी गप्पांच्या ओघात लक्षात येते की अरे ही / हा आपण लिहिलेले वाचतात याची खात्री पटते, तर या सर्वानाही मनापासून धन्यवाद. माझ्या आसपासच्या अनेक व्यक्तींच्या स्वभावाच्या अनेक छटा माझ्या लिखाणात उतरतात, त्यामुळे तशा छटा घेऊ द्यायची  संधी देणाऱ्या ह्या साऱ्यांचेही खरोखर आभार! 

मी पूर्वी म्हंटल्या प्रमाणे संवाद संपला की नाती संपतात, नात्यांशिवायचे जगणे रुक्ष, कोरडे होऊन जाते, या ब्लॉगने मला व्यक्त होणेच नव्हे तर सारे जगणेच आनंदमयी करण्यास मदत केली. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा ठेवा या "मी …. माझे … मला" ने मला मिळवुन दिला. अनेक अर्थानी जगणे समृध्द केले. एक प्रयत्न म्हणून सुरु केलेला हा संवाद आता नकळत माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक कसा आणि कधी होऊन गेलाय ते कळलच नाही. म्हणूनच हा संवाद असाच चालू ठेवण्यासाठी या ब्लॉगबाळाला आणि त्याच्या आईला अनेकोत्तम शुभेच्छा !






(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

No comments:

Post a Comment

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!