Tuesday, March 10, 2015

संधिप्रकाशात अजून जो सोने....... तो माझी लोचने मिटो यावी....

एक  आजोबा… वय सत्तरीच्या आसपास, काही वर्ष गादीला खिळून, नंतर नंतर  तर कोणालाच न ओळखू शकणारे. आजी आजोबा दोघंही व्यवसायाने वैद्यकीय  क्षेत्राशी संबंधित. अनेक वर्ष मदतीला एखादी नर्स ठेवून आजी  देखभाल करत. म्हणजे घरात मुलगा, सून, नाती असा परिवार होता . ते लोकही आपल्या परीने काळजी घेत होतेच. सर्वांना वाटत असणारी शक्यता अशी की ते आजोबा आधी जातील, कारण आजी  तशा ठणठणीत होत्या. मग आजींच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण होऊ  शकेल कारण इतकं त्यांनी आजोबांच्या देखरेखीत गुंतवून घेतलं होतं  स्वतःला.

पण झाले उलटेच …… एक दिवस आजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेल्या. आजोबा काही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतेच, त्यांना काही सांगण्याचाही प्रश्न नव्हताच. पण सेवा करणारी प्रेमाची व्यक्ती आसपास नाहीये हे त्या जीवास कळत असावे का? स्पर्शाच्या, अस्तित्त्वाच्या जाणिवा टिकून होत्या का? मनाचे मनाशी असे घट्ट नाते तसेच टिकून असेल? कारण आजी गेल्यावर पाचव्या दिवशी आजोबाही गेले. मेंदूचा कल याला योगायोग मानण्याकडे झुकू शकतो. म्हणजे ते नक्कीच चुकीचे नाही कारण  तसं असू शकते. पण मग वर व्यक्त केलेली शक्यताही असू शकतेच की!

अजून एक आजी आजोबा  एकमेकांशी कधीही न पटणारे. आजी कर्तृत्त्ववान. आजोबा त्यामानाने कमी. आजी मोठ्या करारी, थोड्या हेकट सुद्धा म्हणाव्या अशा. आजोबा तितके नाहीत. एका शाळेची उभारणी करून, ती नावारूपास आणून, आपण थकल्या नंतर एका तितक्याच मोठ्या आणि तत्त्वनिष्ठ  शैक्षणिक संस्थेला ती सुपूर्त करण्याचे मोठे काम या दोघांनी मिळून केलेले.  दोघांनीही वयाची ऐंशी पार केलेली. पण आजी फारच थकल्या, दोघांनाही काही आजार नाही. म्हातारपण हेच आजारपण. पण आजी पार आडव्याच झालेल्या, त्यामानाने आजोबा हिंडून फिरून, घरात २/३ नोकर, स्वत: वयाची साठी पार केलेली त्यांची लेक तिच्या लेक सुनेसह घरात दिमतीला. आजींनी अशा अवस्थेतही सगळ्यांची आपल्या हट्टी हेकेखोर स्वभावाने त्रेधा तिरपीट केलेली. आपल्या तापट स्वभावाने सर्वाना नको नको करून सोडलेले.

सगळ्यांना वाटत असे आजी गेल्या कि आजोबा ज्यांची तब्येत तितकीशी वाईट नाही, विशेष कोणता आजार नाही ते थोडा मोकळा श्वास घेऊ शकतील. मोकळं आयुष्य काही काळ जगतील. अपेक्षेनुसार आजी गेल्या. पण आजोबांनी तेंव्हा ही त्यांची साथ सोडायची नाही असे ठरवले असावे कारण मोजून तिसऱ्या दिवशी आजोबांनी झोपेतच राम म्हंटले.

या दुसऱ्या घटनेने मात्र विचारांची आवर्तने निर्माण केली. एकापरीने त्या आजींच्या सोबत राहणे हा कोणालाही जाच वाटला असता, मग त्यातून सुटका मिळण्याचा आनंद ही खऱ्या अर्थाने मिळू नये? पण तसेही नसेल कदाचित. त्या साऱ्याची इतकी सवय असेल की त्याशिवाय आयुष्यात एक भली मोठी पोकळीच निर्माण झाली असेल की तिचा सामना करणे अशक्य झाले असेल. किंवा कोणता असा एकमेकांना बांधून ठेवणारा घट्ट धागा असतो जो वर वर पाहता कोणालाच दिसत नाही कोणालाही तो जाणवत नाही कदाचित त्या दोघांना ही तो जाणवलेला नसावा. वरकरणी मतभेद इतके तीव्र असले तरी, आत एकमेकांना घट्ट बांधून ठेवणारा ………

हिंदी चित्रपटात घासून गुळगुळीत झालेले "मै तुम्हारे बिना जिंदा नही रह सकता/ती" असे संवाद यांच्यात कधी घडले नसतील. असा विचारसुद्धा कधी दोघांपैकी कोणाच्या मनात आला नसेल,  एकंदरीत त्यांची असलेली घडण आणि विचारांची बैठक लक्षात घेता, हा अर्थात अंदाजच………… कदाचित याच्या अगदी विरुद्ध असू शकेल की मनात कुठेतरी हि स्पंदने असतील, ते विचारतरंग कधी बाहेर उमटले नसतीलही. पण मनाला मन उमजले असावे. तशीही मनाची ताकद खूप मोठी असते.

अशा साऱ्या विचारांतूनच बर्फी चित्रपटाचा शेवट योग्य वाटतो. त्याचा मृत्यू झालाय, याची कदाचित जाणीव सुद्धा नसलेली ती त्याच्या जवळ जाते, थोडा त्यास सरकवून स्वत:साठी जागा करत त्या पलंगावर  आडवी होते, नेहमीप्रमाणे त्याच्या करंगळीत आपली करंगळी अडकवते आणि कायमसाठी त्याच्यासारखीच निद्राधीन होते.  मृत्यूचे हे अनपेक्षित रूप मात्र विचारात पडणारे. अशा जोडीदारापाठी जगूच न शकणाऱ्या व्यक्तींच्या रूपात घडणारे.  म्हणजे माहित असतं कि  हे असे घडणे आपल्या हाती नाही, जोडीदाराच्या नंतर मागे उरण्याची कल्पना कितीही त्रासदायक वाटली, नकोशी वाटली, कितीही इच्छा व्यक्त केली की तुझ्याशिवाय हे जगणे नको तरीही…अशी अनेक शक्य-अशक्यते वर आधारित असल्यामुळेच असे मृत्यूचे येणे ही कल्पना तशी मोहात पडणारी!

पण दुसऱ्या बाजूस असंख्य जोडप्यांमधील कोणी तरी एक मागे राहतो, गेलेल्याच्या आठवणीत जगतो, आपली कर्तव्ये पुरी करतो, जगणे सुसह्य व्हावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्त्न करतो. पण जाणाऱ्या व्यक्तीसोबत आपला काही हिस्सा गेलेला असतो. दोघांमधील तो बंध गेलेला असतो. असंख्य गोष्टी दोघांनी एकत्र बोललेल्या, पाहिलेल्या, जाणीवेत उमटलेल्या ज्या फक्त त्या दोघांमधील असतात त्या आता एकाच्या मनाच्या कप्य्याचा हिस्सा बनून जातात आणि त्याच्यासवे त्याही जातात. पण म्हणजेच यातली कोणतीच गोष्ट आपल्या हाती नाही. काही म्हणता काही आपला त्यावर कंट्रोल नाही.असं आपल्यातून काहीतरी जाणे, नाहीसे होणे हा देखील मृत्यूच ना? 

मन:पटलावर कधी कधी असंख्य तरंग उमटतात, आतून इतकं काही बाहेर येऊ पाहते की त्या  सारयास सावरताना, समेटताना माझी दमछाक होते. तरीही अनेकदा काही हाती  लागतंच नाही. विचारांचा वेग इतका जबरदस्त असतो आणि एकातून दुसऱ्यात जाण्याची गती………… की काही करू शकत नाही मी. हातातून वाळू सुटत राहावी तसे….  कशालाच धरून ठेवता येत नाही. एक येतो जातो, पाठोपाठ दुसरा…. तिसरा …… हे चालूच एकाच्या अस्तित्त्वाचा अंत…. दुसऱ्याच्या …. तिसऱ्याच्या … हे नाट्य लागोपाठ माझ्याच मन:पटलावर घडणारे… असे जोडी जोडीचे मृत्यू अनुभवणारी…. हतबल, निराश…. माझाच काही हिस्सा हरवताना पाहणारी अन तरीही काही
करू न  शकणारी मी .
अनेकदा एखादा विचार, एखादा धागा जोडीदार गेलेल्याच्या मागे उरावा तसा एकटाच मनात उरणारा, अधून मधून त्याच्या अस्तित्वाची जाणिव करून देणारा, जणू त्याचे ते कर्तव्य असावे असा. त्याला मनातच राहू देणारी , पण त्यास घडविण्यास, फुलविण्यास काहीच न करणारी मी. नकळत माझ्या मनात एकटेपणाचे, खुरटलेले जगणे नशिबी घेऊन मग मृत्यू पावणारा तो.

असे दिवसागणिक मनात विचारांच्या मृत्यूचे थैमान कधी कधी चालू असताही, खऱ्या मृत्युच्या विचारांना सतत दूर लोटणारी किंवा फक्त स्वत:चाच एकतर्फी विचार करत जोडीदाराच्या मनाचे काय होत असेल हा विचार न करता,
नको तुळशीचे पान, नको गंगाजल
हात तुझा हाती असता व्हावा संधिकाल
असे म्हणणारी मी.

अनेक रूपात भेटणारा तो ,
आणि तरीही त्याच्या बद्दलचे
कुतूहल कधीही न शमणारे .
कधी चोर पावलाने येऊन
मागून कवेत घेणारा
कधी येतोय येतोय म्हणत
चकवा देत राहणारा
कधी परतीचे तिकीट
न मागताच हाती ठेवणारा
दोन बाजूस दोन रस्ते
खुणावत असतानाच
डेढ एंडचा फलक हाती
घेऊन सामोरा येणारा
चिंतेतून दर्शन घडवणारा
कधी चितेवरही विश्वास
न बसू देणारा
कधी शांत सात्त्विकतेने
कधी थैमान घालत
मनातल्या विचारांचा
फुटणाऱ्या लाटेचा
अंधार दाटून येताना
हातातून निसटून
जाणाऱ्या वाळूचा
संपणाऱ्या नात्यांचा, बंधांचा
मृत्यू ……………

2 comments:

  1. माणसं वृद्धावस्थेकडे पोचली की बहुतेकांच्या बाबतीत होतं असं. विशेषत: पुरुष बाई गेली की वृद्धावस्थेत फार एकाकी पडतो. तरुणपणी एक गेला तर दुसर्‍यावर ’जबाबदारी’ येते ती निभावण्यासाठी पुढे निघून गेलेल्या जोडीदाराचं दु:ख विसरावं लागतं. .तू जे लिहलंस तेच अगदी माझ्या मावशी आणि तिच्या पतीच्या बाबतीत झालं. त्यांना अल्सायमर मुळे काही आठवायचं नाही, आजूबाजूला असणारी माणसं विसरायचे. पण मावशी गेलेली व्यवस्थित कळलं आणि महिन्याच्या आत गेले. मृत्यू!

    ReplyDelete
  2. हेच कुतूहल आहे मला, एकमेकांत असणारे ,न दिसणारे, न जाणवणारे पण मुळे घट्ट धरून असणारे हे नात्यांचे बंध आपल्या नकळत कसे काम करत असतात बघ मोहना!

    ReplyDelete

हा शब्दपट कसा वाटला, मला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियाच मला लिहिते ठेवतील. या आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार!